December 11, 2023

घटिका गेली, पळे वाचवू …

 “या संपूर्ण विश्वात सगळ्यात शक्तीशाली असे काय आहे?’, असा प्रश्न एखाद्या लहान मुलाला विचारला, तर तो कदाचित “सुपरमॅन” किंवा “आयर्नमॅन” अशा सुपरहीरोचे नाव घेईल. हाच प्रश्न एखाद्या प्रौढ माणसाला विचारला, तर तो कदाचित “पैसा” किंवा “देव” असं उत्तर देईल. मात्र, जो खरा बुद्धीवंत आणि ज्ञानी असेल, त्याचं उत्तर अगदी अनपेक्षित असेल. त्याचं उत्तर असेल- “काळ”.

काळ- सेकंद, मिनिट, तास, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, दिवस, आठवडा, महिना, वर्ष, दशक, शतक असा फक्त पुढच्या दिशेनंच सरकतो. सूक्ष्म ते महाकाय अशा कोणत्याही तुकड्यांमध्ये त्याची विभागणी केली, तरी तो त्यालाही व्यापतो... काळ होता, काळ आहे आणि काळ पुढेही असणार आहे. हे एकच शाश्वत सत्य आहे. म्हणूनच, या विश्वात सगळ्यात शक्तीशाली असा एकच आहे- काळ.

जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाचं संपूर्ण अस्तित्व काळाच्या तुकड्यांमध्ये विभागलं गेलेलं आहे. तरीही, आपण काळाच्या आधीन आहोत, याचाच विसर आपल्याला पडतो. आपल्याकडे मर्यादित वेळ आहे, आणि म्हणूनच तो अतिशय मौल्यवान आहे, याची आठवण आपल्याला कधीच का रहात नाही? ’कल करे सो आज कर, आज करे सो अब’, ’काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही’, ’अ स्टिच इन टाईम सेव्ह्ज नाईन’… शाळेत आपण हे शिकलेलो असतो. पण, “कळते पण वळत नाही” या उक्तीला जागत, प्रत्यक्ष जीवनात त्याचं अनुसरण मात्र आपण करत नाही.

आपण काळाला किती गृहित धरतो! अविचारानं आणि बेफिकिरीनं आपण आपली विहीत कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पुढे ढकलत राहतो, व्यायाम आणि समतोल आहाराचे महत्त्व याबद्दल आवडीनं वाचतो, पण स्वत:च्या भल्यासाठीही त्याची अंमलबजावणी करणं टाळत राहतो. इतकंच कशाला, प्रियजनांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठीही आपण वेळ काढत नाही. आणि काळ? तो मात्र नि:शब्दपणे पुढे वाटचाल करत राहतो. आपली कामं अपूर्ण राहतात, तब्येत ढासळते, अनेक रोग शरीरात शिरकाव करतात, प्रियजनांचा तात्पुरता किंवा कायमचाही वियोग होतो… आणि मग पश्चातबुद्धीने आपण केवळ खेद व्यक्त करत राहतो!

पण हे चित्र बदलू शकतं. जो वेळ वाया गेला, तो तर परत येणार नाही, पण जो वेळ हातात आहे, त्याचा सदुपयोग आत्ता, या क्षणापासून आपण करायला लागू शकतो! प्रसिद्ध कवी संदीप खरेंनी लिहिलंच आहे- “मुहूर्त माझा तोच ज्या क्षणी हो इच्छा, वेळ पाहुनी खेळ मांडणे, नामंजूर!” स्वत:मध्ये बदल घडवण्याची हीच योग्य “वेळ” आहे!

सुदैवाने, वेळेचा सदुपयोग कसा करायचा, म्हणजेच वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं या विषयावर सखोल संशोधन झालेलं आहे. हा विषय सर्वव्यापी असल्यामुळे, वेळेचं सर्वोत्तम आणि प्रभावी व्यवस्थापन कसं करता येईल यावर असंख्य संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी प्रयोग केले आहेत आणि शोधनिबंध लिहिले आहेत. 

 

वेळेचं व्यवस्थापन म्हणजे काय?

व्याख्या - हातात असलेले काम आणि त्यासाठी उपलब्ध असलेला वेळ यांची योग्य सांगड घालणं म्हणजे वेळेचं उत्तम व्यवस्थापन करणं. 

वेळ मर्यादित असतो. त्यामुळे, कोणत्या कामासाठी किती वेळ द्यायचा याचा प्राधान्यक्रम लावणं हा वेळेच्या व्यवस्थापनातला कळीचा मुद्दा आहे. बिझनेस मॅनेजमेन्टमध्ये याला ’एबीसीडी प्रिन्सिपल’ असे म्हणतात. त्यानुसार, “अर्जंट ऍन्ड इम्पॉरटंट” हे कळीचे शब्द लक्षात ठेवून कोणत्याही कामाची वर्गवारी खालीलप्रमाणे चार प्रकारांत केली जाऊ शकते:

१.    १) तातडीचं आणि महत्त्वाचं

२.    २) तातडीचं नाही, पण महत्त्वाचं

३.    ३) तातडीचं, पण बिनमहत्त्वाचं

४.    ४) तातडीचं नाही आणि महत्त्वाचंही नाही

एक उदाहरण पाहू. तुम्ही गॅसवर दूध तापत ठेवलं आहे. बरोब्बर तीन मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे. इतक्यात, घराच्या दुसऱ्या खोलीत अभ्यास करत असलेल्या तुमच्या लहान मुलाने तुम्हाला हाक मारली... त्याच वेळी दाराची घंटा वाजली आणि त्याच क्षणी तुमचा मोबाईल फोनही खणखणायला लागला... तुम्ही सगळ्यात आधी काय कराल? तुमचा प्राधान्यक्रम कसा असेल? या ’सिच्युएशन’चे कोणतेही फाटे न फोडता सगळ्यात तर्कशुद्ध उत्तर असे:-

१.    १. सर्वप्रथम, गॅस बंद करा. कारण, दूध उतू जाऊन गॅसची गळती होत राहिली, तर मोठी दुर्घटना होऊ शकते. (तातडीचं आणि महत्त्वाचं)

२.    २. मूल का हाक मारतंय? त्याला मदत हवी आहे का? (तातडीचं नाही, पण महत्त्वाचं)

३.    ३. मूल ठीक आहे याची खातरी करून मग दार उघडा. (तातडीचं, पण बिनमहत्त्वाचं)

४.    ४. मोबाईलवर फोन करणाऱ्याचे नंबर/नाव येते. त्याला नंतर उलटा फोन करता येऊ शकतो. म्हणून त्याला सगळ्यात शेवटचे प्राधान्य. (तातडीचं नाही आणि महत्त्वाचंही नाही)

अमेरिकेचे पूर्वाध्यक्ष ड्वाइट आयजेनहॉवर यांनी एका चौकोनाचे चार भाग केले आणि याच प्राधान्यक्रमाला नावे दिली- “डू, डिसाईड, डेलिगेट, डिलिट”. त्याला म्हणतात “आयजेनहॉवर बॉक्स.” त्यानुसार, तुमच्यासमोर असलेल्या कामांची वर्गवारी करून त्या-त्या चौकोनात ते-ते काम लिहायचं. असं केल्यानं वेळेचा जास्तीतजास्त आणि सुयोग्य वापर कसा होईल, याची चटकन स्पष्टता येते.  


 

·       एखादं काम तुम्हीच केलं पाहिजे- ते लगेच करा (डू).

·       एखादं काम तुम्ही नंतर करू शकता- त्याबद्दल निर्णय घ्या (डिसाईड).

·       एखादं काम दुसऱ्याकडे सोपवलं जाऊ शकतं- त्याला जबाबदारी द्या (डेलिगेट).

·       एखादे काम पूर्णपणे अनावश्यक असूनही तुम्ही त्याचं दडपण घेतलंय- त्याबद्दल विसरून जा (डिलिट).

महत्त्वाचं: त्या क्षणी, त्या वेळी प्राधान्य कशाला आहे हे समजणं आणि त्यानुसार कामं करणं हा वेळेच्या व्यवस्थापनातला कळीचा मुद्दा असतो.

 

वेळेचं व्यवस्थापन सापेक्ष असतं

प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, परिस्थिती वेगळी. त्यामुळे हा विषय सापेक्ष आहे. त्या स्थितीत असलेल्या प्रत्येकाला एकच एक ठरावीक उत्तर लागू होणार नाही. पण साधारण ठोकताळे मात्र मांडलेले आहेत. प्रत्येकाचं वय, त्याच्या कामाचं स्वरूप, त्याच्यावर असलेली जबाबदारी, त्याचा व्यवसाय याप्रमाणे त्याच्यासमोर असलेल्या कामांची आणि अर्थातच त्याच्या प्राधान्याची यादीही बदलेल. विद्यार्थ्याला अभ्यासाच्या विषयांचे प्राधान्य, नोकरदाराला त्याच्या कर्तव्यांबाबतचे प्राधान्य, व्यावसायिकाला वित्तपुरवठा, उत्पादनसाखळी, कामगार यांमध्ये प्राधान्यक्रम ठरवावा लागेल आणि सगळ्यांनाच काम-आराम-व्यायाम यांत वेळेचा मेळ साधावा लागेल.

पण मुख्य सूत्र तेच राहतं- कोणत्या कामासाठी, कधी आणि किती वेळ द्यायचा हे ठरवणं, म्हणजेच, वेळेचं इष्टतम व्यवस्थापन करणं.

 

फायदे

वेळेच्या सुयोग्य व्यवस्थापनाचा एकही तोटा नाही, उलट असंख्य फायदेच आहेत, असं म्हणलं, तर ती अतीशयोक्ती वाटू नये.  

१.    मानसिक शांतता- कितीही नाकारलं, तरी वेळेचं व्यवस्थापन न केल्यामुळे अर्धवट राहिलेल्या कामांचं अदृश्य ओझं मेंदू आणि मनावर साठत राहतं. त्याचंच रूपांतर पुढे “स्ट्रेस”मध्ये आणि नंतर गंभीर आजारांतही होतं. वेळच्या वेळी कामांचा निपटारा केल्यामुळे आपण तणावमुक्त होतो. मन प्रसन्न आणि समाधानी राहतं. वेळेच्या योग्य व्यवस्थापनाचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे.

२.    शिस्त बाणवते- वेळेची टंचाई आणि महत्त्व समजल्यामुळे कामांचा निपटारा करताना अंगात आपोआपच शिस्त भिनते. प्रत्येक दिवशी कोणती कामं संपवायची आहेत, याची यादी केली आणि त्याबरहुकूम एकेक काम संपवलं, तर गोंधळ न होता, शिस्तीत कामं मार्गी लागतात. कामातली शिस्त हळूहळू आयुष्यातही येते. आळशीपणा, कंटाळा, चालढकल हे नकारात्मक शब्द आणि कृती आपसुकच हद्दपार होतात.

३.    उत्पादनक्षमता वाढते- वेळेचं नियोजन केल्यामुळे, कामं पटापट हातावेगळी होतात. त्यामुळे, आणखी नवीन जबाबदारी घेण्यासाठी उत्साहही येतो आणि त्याचा ताणही येत नाही. नोकरी/ व्यवसायाच्या ठिकाणी “कार्यक्षम” असं तुमचं कौतुक होतं. त्याचं पर्यवसान बढतीतही होऊ शकतं. वेळेचं व्यवस्थापन केल्यामुळे व्यावसायिक प्रगती निश्चितपणे व्हायला लागते.

४.    आत्मविश्वास वाढतो – प्राधान्यक्रमानुसार प्रत्येक कामाची विभागणी छोट्या भागात करायची सवय लागल्यामुळे, कोणतंही काम अवघड किंवा अशक्य वाटत नाही. आत्मविश्वासात कमालीची भर पडते. कामाकडे “कटकट” म्हणून न बघता, “आव्हान” म्हणून बघण्याचा दृष्टीकोन विकसित होतो.

५.    स्व-प्रतिमा सुधारते – ’मी बेजबाबदार आहे’, ’मी आळशी आहे’, ’मला काहीच नीट जमत नाही’ स्वत:बद्दलच असा विचार करायला कोणाला आवडेल? उलट, ’मी जबाबदार आहे’, ’मी सगळी कामं वेळेवर करतो’, ’कशाला प्राधान्य द्यायचे, हे मला समजायला लागलंय’ ही वाक्य स्व-प्रतिमा उजळवणारी आणि उंचावणारी असतात. जेव्हा आपण स्वत:ला आवडायला लागतो, तेव्हाच जगाला आवडायला लागतो. कुशलतेनं वेळेचं योग्य व्यवस्थापन केल्यामुळे स्व-प्रतिमा कमालीची सुधारते.

६.    तुम्ही “इन्फ्लुएन्सर” होता – हा सध्याचा “ट्रेण्डिंग” शब्द आहे! वेळेचं व्यवस्थापन जमायला लागल्यामुळे, तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करता, शिवाय अतिरिक्त कामंही करता, तुमच्या कार्यक्षमतेत आणि आत्मविश्वासात भर पडते, भरपूर काम करूनही तुम्ही रिलॅक्स्ड असता, समाधानी असता. वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं, आणि त्याचे फायदे काय आहेत याचं तुम्ही मूर्तीमंत उदाहरण होता! साहजिकच, याचा प्रभाव तुमच्या सहकाऱ्यांवर आणि मित्रांवरही पडतो. ते तुमचं अनुकरण करायला लागतात. या अर्थी, तुम्ही एक उत्तम इन्फ्लुएन्सर होता आणि इतरांनाही तुमच्याप्रमाणे वागण्यासाठी उद्युक्त करता.  

७.    छंदांची जोपासना- काम करणं आवश्यक असतंच, पण कामातून विश्राम घेणंही तितकंच गरजेचं असतं. त्यासाठी छंद जोपासले जातात. वेळेचं योग्य व्यवस्थापन केल्यामुळे, एरवी मागे पडलेल्या छंदांसाठी व्यवस्थित वेळ मिळायला लागतो. आठवड्यातून अगदी दोनच तास जरी आवडत्या छंदासाठी मिळाले, तरी त्याचा मन:स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होतो.

 

तात्पर्य

काळ स्वयंभू आहे. त्याला आपण ना मागे नेऊ शकत, ना पुढे; आपण फक्त त्याच्याबरोबर चालू शकतो. या जगात अविश्वसनीय वाटतील असे शोध लागलेले आहेत. फक्त एकच गोष्ट अजूनही अशक्य आहे- गेलेला वेळ परत आणणं. म्हणूनच, आपल्याला जेवढ्या काळाचं दान मिळालेलं आहे, त्याचा पुरेपूर वापर करूया. एक प्रगल्भ आणि विकसित मनुष्यप्राणी म्हणून ते आपलं कर्तव्य आहे आणि त्यातच आपलं भलंही आहे. 

***

हा लेख दैनिक लोकसत्ताच्या "चतुरंग" पुरवणीत दि. ९ डिसेंबर, २०२३ रोजी प्रकाशित झाला आहे.

0 comments: