October 11, 2023

"कथापौर्णिमा" विशेष का आहे?

 

तुझी तर इतकी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, मग “कथापौर्णिमा”चं काय इतकं विशेष? – असा प्रश्न मला काही जणांनी विचारला. तर, हा संग्रह बऱ्याच कारणांमुळे विशेष आहे. वाचा, म्हणजे लेखकाला कशाकशातून जावं लागतं ते कळेल तुम्हाला! 😉
१) मी २००७ पासून कथा लिहिते आहे. माझ्या अनेक कथा अनेक प्रतिष्ठित मासिकं आणि दिवाळी अंकांमधून प्रकाशित झाल्या आहेत. काही कथा ऑनलाईन व्यासपिठावर प्रकाशित झाल्या, माझ्या ब्लॉगवरही मी लिहिलेल्या कथा आहेत. पण, संग्रहाचे महत्त्व वेगळे असते. एका संग्रहातून, म्हणजे १०-१२-१५ कथांमधून संपूर्ण लेखक तुमच्यासमोर येतो. त्याची शैली, त्याचे विषय, त्याची मांडणी, शब्दसंपदा… सगळेच. एरवी एकेका सुट्या कथेतून फक्त शैलीचा एक पैलू दिसतो, संग्रहातून मात्र बऱ्यापैकी संपूर्ण चित्र उभे राहते. वाचकासमोर असे येणे, हे लेखकासाठी आव्हानात्मक असते. स्वत:वर विश्वास असतो, पण वाचकासमोर त्याची पडताळणी होते. Its like baring yourself before everyone. मग कोणी लचके तोडेल, कोणी सौंदर्यदृष्टीने आस्वाद घेईल, कोणी समरस होईल, तर कोणाला कंटाळा येईल. सारेच अनिश्चित. लेखक फक्त आशावादी असतो 🤞🏼🙏🏻
 
२) मग, येतो “प्रकाशक” हा घटक. “भारत हा विकसनशील देश आहे” इतकेच जुने “सध्या कथासंग्रहांना मागणी नाही” हे वाक्य आहे 😝 त्यामुळे सध्या सहसा आपणहोऊन प्रकाशक कथासंग्रह छापत नाहीत. यात त्यांची आर्थिक गणितेही आहेत. सध्या ९५% संग्रह हे लेखक स्वत: खर्च करून प्रकाशित करतात. मीही अशा पद्धतीने कधीच माझा संग्रह प्रकाशित करू शकले असते. पण मला ते पटत नव्हते. हातात तशी प्रपोजल्स असूनही मी थांबले होते. आणि त्या थांबण्याचे चीज झाले! 😊
 
३) “कथापौर्णिमा” हा रसिक आन्तरभारती “निर्मित” कथासंग्रह आहे. म्हणजेच, हा संग्रह प्रकाशित करण्यासाठीची संपूर्ण गुंतवणूक प्रकाशकाने केलेली आहे. मी एक पैसाही यात घातला नाहीये! 🙂 कोणत्याही लेखकासाठी ही फार मोठी गोष्ट असते. माझ्यासाठीही आहे. (कॉलर ताठ इमोजी 😉) माझ्या लेखनावर प्रकाशकाने केलेले हे शिक्कामोर्तब आहे. म्हणून कथापौर्णिमा विशेष आहे.
 
४) माझी याआधीही स्वतंत्र पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, त्यापैकी दोन चरित्र आहेत आणि एक शिक्षण क्षेत्रासंबंधी आहे. पण “कथा” हा फार सुंदर प्रकार असतो. कोणतीतरी एखादी घटना, एखादा ट्रिगर, कल्पनेशक्तीची एक भरारी यातून काहीतरी दिसायला लागतं. ते अस्पष्ट, धूसर दिसणं चिमटीत पकडून त्यातून मूर्त काहीतरी निर्माण करणं फार मस्त असतं. कथा पूर्ण उतरेपर्यंत लेखक एका “झोन”मध्ये असतो. ती अवस्था “उन्मनी” का काय म्हणतात अशी असते. अशा अनेक कथा जेव्हा एका संग्रहात बंदिस्त होतात, तेव्हा तो संग्रह असतोच विशेष! 😇
 
तेव्हा “कथापौर्णिमा” विशेष आहे. तो विशेष दिवशी, म्हणजे २८ ऑक्टोबर, २०२३ रोजी, कोजागिरी पौर्णिमेला प्रकाशित होत आहे. रसिक आन्तरभारती निर्मित १५ निवडक, hand picked कथांचा हा संग्रह तुम्हाला disappoint करणार नाही, हे निश्चित (असे मीच म्हणते! 😁).

0 comments: