December 15, 2021

Adjustment

“घे की गं चहा पटकन... तुला लागतो तसा अगदी गरमागरम, वाफाळता आहे.” अनुसमोर ठेवलेला चहाचा कप तसाच आहे, हे रश्मीच्या लक्षात आलं.

“घेते गं. जरा गार होऊदे...”

“गाऽऽऽर?” रश्मीला अमाप आश्चर्य वाटलं. “पातेल्यातून थेट हिच्या घशात ओता चहा... असं म्हणायची ना तुझी आई? आणि मलाही आठवतंय की, कॅन्टीनमध्ये आम्ही चहाचा पहिला घोट घ्यायचो, तोवर तुझा ग्लास रिकामा झालेला असायचा. कसला कोमट, फुलकावणी चहा पीता म्हणून तू आम्हाला टोमणे मारायचीस तेव्हा... आणि आता तू चक्क गार चहा पीतेस???”

“गार म्हणजे अगदी गारढोण नव्हे गं, पण जरासा निवलेला पीते. झाली सवय. लग्नानंतर ’आधाशासारखा चहा पीते, हावरटच आहे”, असे रोज टोमणे ऐकले बाई त्यावर. आशिषही म्हणले, ’अनुची चहाला कंपनीच मिळत नाही. पाणी प्यायल्यासारखा चहा पीते घटाघट.’ मग काय, एकदा केलं ट्राय. हळूहळू प्यायले. काही वाईट लागला नाही. सासरचेही खूश झाले. मग काय, तीच सवय लागली...”

रश्मीला अनुबद्दल कणवच वाटायला लागली. बिचारी. छोट्या छोट्या बाबतीत किती ऍडजस्टमेन्ट्स करायला लागतात न बाईला...

“काहीतरीच. उगाच ऐकलंस तू. अशानेच हे सासरचे लोक डोक्यावर बसतात आपल्या. मी बघ... माझं काहीही सोडलेलं नाही, आजतागायत! सगळ्या त्याच सवयी, त्याच आवडी... हे लोक कोण डिक्टेट करणार आपण कसं जगायचं ते?” रश्मीने तोऱ्यात सांगितलं.

“हो का?” अनुला गंमत वाटली. “मी काही नोकरी-बिकरी करणार नाही... नवऱ्याच्या जिवावर ऐश करणार... घरातली सगळी कामं मीच करणार, असे ’पण’ तूही केले होतेस, आठवतंय? काय काय पूर्ण झालंय यातलं? मला वाटतं, रोज किमान दहा तास तरी कंपनीत काम करतेस, जास्तच असेल. वीकेंडसुद्धा कसाबसा फ्री मिळतो तुला...” 

“आणि घरात बाया किती आहेत गं कामाला?” अनुची सरबत्ती सुरूच राहिली. “मुलांना सांभाळायला एक पूर्णवेळ ताई, फक्त पोळ्याला एक बाई, बाकी स्वयंपाकाला एक काकू, केर, फरशी, धुणं, भांडीवाली एक, डस्टिंग, क्लिनिंगची एक पाहिली, बाकी ड्रायव्हर वगैरे असेलच... “

“हो हो. टोमणे नको मारूस...” रश्मीला फणकाराच आला. साध्या चहाच्या कपावर हिची सत्ता नाही. ही काय मला शिकवते? “लहान असताना काय कळतं? नोकरी करणार नाही आणि व्हॉट नॉट! बोलायला काय जातंय? अनायसे चांगला जॉब मिळाला. होतं जरा हेक्टिक... पण पगार! ही लाईफस्टाईल बघतेस ना... पैसे कमावू तितके कमीच आहेत आजकाल.”

“तेच म्हणतेय मी डिअर. तुला जाणवलं नसेल कदाचित, पण तूही ऍडजस्टमेन्ट्स करतेच आहेस. मी गरम चहा सोडला, इतकंच काय... हाताला लागेल त्या ताटात जेवते मी. आठवतंय ना, आईकडे माझं एक स्पेशल मोठं ताट होतं? तेही खूळ गेलं. जेवण महत्त्वाचं, का ताट?- असं एकदा सासूबाईंनी विचारलं आणि मला उत्तरच मिळेना! बाबा प्यायचे असा गरम चहा. त्यांचं बघून मी तसाच पीत होते. पुढे दादाशी कॉम्पिटिशन म्हणून चालू केलं, ते चालूच राहिलं. मग एकदा बंद झालं, तर बंदच झालं. तेव्हा तो कढत चहाही आवडत होता, मग हा ’जरा थंड’ चहाही आवडायला लागला. खरंतर, आपल्याला नेमकं काय आवडतं आणि काय आवडत नाही, ऍडजस्टमेन्ट म्हणजे नक्की काय आणि काय नाही हे कळेपर्यंत चाळीशी उजाडली!”

“ए मला आवडतो हां जॉब करायला. पैसे तर मिळतातच. पण सेन्स ऑफ अचीव्हमेन्ट किती मिळतो. कॉन्फिडन्स मिळतो. तू तर तोही केला नाहीस. ’आमच्या घरातल्या सुना नोकऱ्या करत नाहीत’-वाले आहेत का ते लोक?”

अनु खूप जोरात हसली. “अगं मी दु:खात पिचलेली, बिचारी, स्वत्व नसलेली, भकास बाई आहे असं वाटतंय की काय तुला?”

“आता सासरच्यांनी तुला...”

“बास आता. किती जजमेंटल होशील. मी ज्या गोष्टींचा इश्यू केला नाहीस, तो तू करते आहेस. तोही इतक्या वर्षांनी! मॅडच आहेस. मी एकदम आनंदात, मजेत आहे. सासराच्यांनी काही माझा जाचबिच केला नाहीये. हे सगळे माझे चॉईसेस आहेत. आणि नोकरीचं म्हणशील तर... मी माझ्या नवऱ्याच्या जिवावर मस्त जगतेय याचा तुला नाही ना त्रास होत आहे?” अनु परत एकदा जोरात हसली.

“गोल गोल उत्तरं दे तू नुसती. पण स्वत:लाच हे प्रश्न विचार...”

“मी नाही, तूच विचार हे प्रश्न. तुलाच. ते जाऊदे. तुला माहीतच नाहीये असं दिसतंय. माझ्या एका मैत्रिणीचा खूप मोठा बिझनेस आहे ज्यूट बॅग्जचा. त्यावर कस्टमाईज्ड पेंटिंग, एम्ब्रॉयडरी असं मी करते. घरी बसून बरंका! पूर्ण फ्रीडम आहे मला. क्लायंटशी बोलून, त्यांना जे, जसं हवंय ते पेंट करून देते. सो फार, खूप सुंदर प्रतिसाद आले आहेत मला. ज्यूटवर पेंट करणं तसं ट्रिकी असतं. पण मी डेव्हलप केलं आहे माझं सीक्रेट टेक्निक. हा बघ, तुझ्यासाठी हा क्लच आणला आहे. एकदम फ्रेश प्रॉडक्ट आहे हे. तुला द्यायचा, म्हणून मुद्दाम त्यावर मोगरा आणि अबोली पेंट केलेत. तुझी फेव्हरेट्स. ए, इतकं मोठं घर आहे तुझं... बाग केली आहेस की नाही आईकडे केली होतीस तशी? किती आवडीने करायचीस तू ते सगळं... जास्वंद, मोगरा, अबोली, गोकर्ण आणि कसकसले वेल... फूलवेडी होतीस नुसती!”

रश्मीचा चेहरा पडला. “छे गं. झाडांकडे बघायला वेळ कुठे होतो? मी शेवटचा मोगऱ्याचा वास कधी घेतला होता, हेही आठवत नाही मला. केस हे असे छोटे आणि कॉर्पोरेटमध्ये मोगरेबिगरे चालत नाहीत.” रश्मीचा आवाज दाटून आला.

“ओह!” अनुने रश्मीचा हात हातात घेतला. दोघीही गप्प झाल्या.     

“बर, आता हा चहा गारढोण झालाय हां. इतका पण गार चहा नाही पीत मी. हाच परत गरम करून आण आता...”

“हा नको. नवाच करते. नवाकोरा. त्यात परत ऍडजस्टमेन्ट नको!”

दोघीही हसल्या.

***

 

2 comments:

इंद्रधनु said...

सुंदर कथा, दुसऱ्याला शिकवताना आपण कशातून जातोय हे खरंच विसरायला होतं. एखाद्या वेगळ्या दृष्टिकोनातून आपणही त्यातूनच जात असतो हे उत्तमरीत्या उतरलं आहे कथेमध्ये.

poonam said...

इंद्रधनू, किती सुंदर कॉमेन्ट! कथा लिहिताना माझ्या डोक्यात जे विचार होते, तेच एक्स्प्रेस केले आहेत तुम्ही :) thanks so much!