September 3, 2018

Kia Ora New Zealand- भाग ६


न्यु झीलंडचा लखलखता हिरा- क्वीन्सटाऊन



आपण सगळेच जण लहान असताना हमखास एक चित्र काढतो- त्रिकोणी आकाराचे हिरवेगार डोंगर, त्यांच्यामधून उगवणारा गोलमटोल पिवळाधमक सूर्य आणि डोंगरातून निघालेली वळणावळणाची निळीशार नदी. क्वीन्सटाऊन खरंच अगदी हुबेहुब या चित्रासारखंच दिसतं. अतिशय देखणं, अतिशय सुंदर. बघताक्षणी प्रेमात पडावं असं गाव.
“वाकाटिपू” नावाच्या मोठ्या तळ्याच्या काठावर वसलेले क्वीन्सटाऊन हे न्यु झीलंडच्या साऊथ आयलंडमधलं पर्यटकांचं आवडतं गाव. हे तळं साधारणपणे इंग्रजी ’झेड’ आकाराचं आहे. तळ्याच्या चहूबाजूंनी सुंदर, घनदाट झाडीचे डोंगर आहेत. या डोंगरावरच्या नद्यांचं पाणी खळाळत वाकाटिपूत येतं आणि तळ्याचं सौंदर्य वाढवतं. क्वीन्सटाऊनचं मूळ माओरी नाव होतं ’ताहुना’. १८६० पासून इथे युरोपियन वस्ती वाढली. इथे सोन्याच्या खाणी होत्या, त्यात काम करायला मोठ्या प्रमाणावर युरोपियन कामगार आणि मजूर आले. यात आयरिश लोकांची वस्ती बहुसंख्य होती. त्यांनी मग आपल्या लाडक्या क्वीन व्हिक्टोरिआचं नाव या गावाला दिलं आणि ताहुनाचं नाव झालं क्वीन्सटाऊन.
क्वीन्सटाऊनची भौगोलिक स्थिती एकदम इंटरेस्टिंग आहे. हे गाव समुद्रसपाटीपासून फक्त ३१० मीटर्स उंचीवर असलं, तरी चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं असल्यामुळे इथे थंडीच्या ऋतूत चक्क बर्फवृष्टी होते. एरवीही इथे आल्हाददायक हवा असते. उन्हाळा खूप तीव्र नसतो, मस्त स्वच्छ ऊन पडतं.  थंडीत बर्फ पडत असला, तरी गोठून जावं इतकं तीव्र तापमान नसतं. पाऊसही मध्यमच पडतो (पुण्यात पडतो तितपत!). त्यामुळे जवळपास वर्षभर ’प्लेझन्ट’ म्हणावी अशी हवा इथे असते. कोणत्याही ऋतूत या गावाचं सौंदर्य कमी होत नाही.  
आणखी एका कारणामुळे क्वीन्सटाऊन पर्यटकांचं आवडतं गाव आहे- ’ऍडव्हेन्चर स्पोर्ट्स’, अर्थात साहसी खेळ. न्यु झीलंड ही अनेक साहसी खेळांची जन्मभूमी आहे. बंजी जंपिंग, स्नो बोर्डिंग, स्काय डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, पॅराजंपिग, जेट बोट राईडसारखे अनेक प्रकारचे पाण्यावरचे खेळ, इत्यादी इथे खेळायला उपलब्ध आहेत. तसं पाहिलं, तर संपूर्ण न्यु झीलंडमध्ये विविध ठिकाणी वेगवेगळे साहसी खेळ खेळायची सोय आहे, पण क्वीन्सटाऊन हे साहसी खेळांकरता विशेष प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसात बर्फ पडल्यावर इथल्या डोंगरांवर स्किइंग करण्याकरता आणि बर्फावरचे इतर खेळ खेळण्याकरता अक्षरश: झुंबड उडते. उन्हाळ्यात, स्वच्छ हवेत बंजी जंपिंग, पॅराग्लायडिंग, स्काय डायव्हिंगसारखे साहसी खेळ खेळले जातात. साहसी खेळांची सर्व उपकरणं उत्तम अवस्थेत आहेत, सर्व प्रशिक्षक व्यावसायिक असल्यामुळे व्यवस्थित बोलतात आणि मदतीकरता तत्पर आहेत, त्यामुळे निर्धोकपणे कोणत्याही साहसी खेळाचा अनुभव घेता येतो.
आम्हाला ’स्काय डायव्हिंग’ करायचं होतं. ९००० फूटांवरून हवेत स्वत:ला झोकून द्यायचं ही कल्पनाच प्रचंड उत्तेजित करणारी होती. त्याचं बुकिंग आम्ही भारतातूनच केलं होतं. ’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटात तीन मित्रांना जो आकाशातून उडी मारायचा आनंद मिळाला तोच आम्हालाही अनुभवायचा होता. ट्रिप सुरू झाल्यापासूनच कधी एकदा आपण क्वीन्सटाऊनला जातोय आणि स्काय डायव्हिंग करतोय असं झालं होतं. आम्ही क्वीन्सटाऊनला रात्री ९च्या सुमारास पोचलो. दुस-या दिवशी सकाळी ९ ला आकाशातून उडी मारायची होती.  एक्साइटमेन्ट शिगेला पोचली होती!
आणि जे व्हायचं तेच झालं! दुस-या दिवशी सकाळी पडदे उघडून पाहतो, तर…समोरच्या सुंदर डोंगरावर भलेमोठे राखाडी ढग उतरलेले होते आणि चक्क पाऊस पडत होता! एरवी पाऊस आवडणारे आम्ही, त्या दिवशी मात्र खूप निराश झालो. आकाश निरभ्र होत नाही, पाऊस पूर्ण थांबत नाही, तोवर स्काय डायव्हिंग होऊ शकणार नाही असं आम्हाला आमच्या स्काय डायव्हिंग कंपनीने कळवलं. आम्ही ११ वाजेपर्यंत वाट पाहिली, पण पाऊस थांबला नाही. तो दिवसभर पडतच राहील असं भाकीत हवामान खात्याने केलेलंच होतं. आमचे ट्रिपचे उरलेले सगळे दिवस बांधलेले होते, पुढची आरक्षणं झालेली होती, त्यामुळे आणखी एक दिवस राहायचा पर्यायही नव्हता. अखेर, आमच्या स्काय डायव्हिंगच्या स्वप्नावर शब्दश: पाणी पडलं!
अचानक दिवस रिकामा मिळाला. मग आम्ही गोन्डोला राईडने डोंगरावर गेलो. तिथून क्वीन्सटाऊनचा सुंदर नजारा दिसत होता. तिथे ’लुग राईड’ नावाचा एक छोटा साहसी खेळही खेळलो. वरवर आम्ही एकमेकांना चीअर-अप करत होतो, गप्पा मारत होतो, पण स्काय डायव्हिंगची निराशा लपता लपत नव्हती. स्वप्नपूर्तीच्या अगदी जवळ गेल्यावर ते हातातून निसटून गेलं होतं, त्याचा सल ठसठसत होता. 

दुस-या दिवशी आम्ही बसने ’मिलफोर्ड साउंड’ला गेलो. ही जागा एक ’फिओर्ड’, म्हणजेच सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेली ही एक चिंचोळी नदी आहे असं आपण म्हणू शकतो. चारही बाजूंनी जे डोंगर आहेत, त्यावरून बारमाही धबधबे या नदीत कोसळतात. वर्षभर अधूनमधून पाऊस आणि बर्फ पडतो. या सर्वांमुळे ही नदी तयार होते आणि सरळ तास्मान समुद्रात जाऊन मिळते. 

मिलफोर्ड साउंड क्वीन्सटाऊनपासून २१० किमि.वर आहे. बस सकाळी लवकर निघाली. या बसेस विशेष असतात. यांची आसनं अधिक कलती असतात आणि छतावर काही प्रमाणात काच असते, जेणेकरून जंगलातून जाताना झाडं दिसतात. आधी लिहिलं तसं, क्वीन्सटाऊनमध्ये सर्व प्रकारची भूदृष्य (geographical landscapes) दिसतात. हा प्रवास लांबचा असल्यामुळे सर्व निसर्गचित्रांचा मनमुराद आनंद घेता आला. वाटेत अनेक विस्तीर्ण तळी आहेत. वरच्या डोंगराचं, काठावर असलेल्या एखाद्या झाडाचं जसंच्या तसं प्रतिबिंब त्यांच्या निवळशंख पाण्यात पडतं, म्हणून काहींना ’मिरर लेक’ असंही म्हणतात. तळ्यांना लागूनच हिरवीगार कुरणं आणि त्यावर आरामात चरणा-या गायी-म्हशी तर सतत सोबतीला होत्याच. मधूनच एखादा रस्ता घनदाट जंगलातून जात होता, जिथून उंचचउंच झाडांची सावली बसच्या छतातून आमच्यावर पडत होती. जसजसे आम्ही फिओर्डच्या जवळ यायला लागलो, तसा या हिरव्यागार दृश्यातही बदल झाला. अचानक बर्फाच्छादित डोंगरांच्या प्रदेशात आम्ही शिरलो.  कुठे मोठमोठ्या शिळा पायथ्याशी पडलेल्या होत्या, तर काही ठिकाणी बर्फ वितळून त्याचं पाणी रस्त्यावरून झुळझुळ वाहत होतं. निसर्गाने मुक्त हस्तानं आपल्या वेगवेगळी रूपांची देणगी न्यु झीलंडला दिली आहे. त्याच्या खरोखर हेवा वाटला.
प्रत्यक्ष मिलफोर्ड साउंडची सफर एका आलीशान क्रूझ बोटीतून होती. बसमधून उतरून आम्ही एका मोठ्या दुमजली बोटीवर गेलो. संथ गतीनं बोट निघाली. वाटाड्या स्पीकरवरून परिसराची माहिती देत होता. समोर चिंचोळी नदी दिसत होती, बाजूच्या डोंगरावरून धबधबे कोसळत होते. बोट अगदी त्यांच्या जवळून जात होती. तुषार अंगावर उडत होते. या परिसराचं आणखी एक आश्चर्य म्हणजे, इथे पाण्याचे दोन थर आहेत. वरचा थर शुद्ध पाण्याचा- पाऊस आणि बर्फाचा, आणि त्याखाली समुद्राचं खारं पाणी! यामुळे खोल समुद्रात आढळणारे सागरी जीव आणि कोरल्स इथे अवघ्या १० मीटर खोलीवर बघता येतात! तसंच, इथे पेंग्विनांचीही वस्ती आहे आणि डॉल्फिन्सचीही! या दोघांनी नाही, पण सील्सनी मात्र आम्हाला दर्शन दिलं. काठावर असलेल्या अजस्त्र शिळांवर काही सील्स उन्हात स्वत:ला शेकत बसले होते. बोट एका मर्यादेपर्यंत गेली, त्यापुढे ही चिंचोळी नदी संपली, पात्र विस्तारलं आणि खोल समुद्र सुरू झाला. पाच मिनिटं ते दृश्य पाहून आम्ही परत फिरलो. या आधी दोन नद्यांचे संगम पाहिले होते, तेही लांबूनच; पण त्या क्षणी चक्क नदी आणि समुद्राच्या संगमात आम्ही प्रत्यक्ष उभे होतो! रोमांचित करणारा क्षण होता तो.  


त्या संध्याकाळी पाय मोकळे करायला आम्ही क्वीन्सटाऊनच्या ’डाऊनटाऊन’ भागात गेलो. संध्याकाळचे सात वाजून गेले होते, तरी स्वच्छ सूर्यप्रकाश होता. तळ्याकाठच्या  कॅफेज आणि रेस्तरांमधून ’डिनर’ची लगबग सुरू झाली होती. कुठून ग्रिल केल्याचे, तर कुठून कॉफीचे सुवास दरवळत होते. तरुणांची, जोडप्यांची गजबज होती. तळ्याकाठी एक मोठी बाग आहे, त्यात कोणी पळत होते, कोणी चालत होते. तळ्यातली बदकं चक्क उडून काठावर येऊन लोकांनी दिलेला खाऊ खात परत पाण्यात जात होती. वातावरण अतिशय रिलॅक्स्ड होतं. त्या क्षणी क्वीन्सटाऊन अगदी आपलंसं वाटलं.  जणू ते म्हणत होतं, ’कालच्याबद्दल सॉरी. इथून जाऊ नका ना, आणखी रहा, हे वातावरण अनुभवा.’ अर्थातच, ते शक्य नव्हतं. पण मावळत्या सूर्याच्या साक्षीने आम्ही एक मात्र ठरवलं- इथे परत यायचं. जमेल तेव्हा, जमेल तसं, पण यायचं नक्की. या शहराची जादूच अशी आहे.

क्रमश: 

(हा लेख ’मेनका जुलै, २०१८’च्या अंकात पूर्वप्रकाशित झालेला आहे.)
 


3 comments:

मिलिंद कोलटकर said...

काय हे? बरेच दिवसांनी? ...(हा लेख ’मेनका जुलै, २०१८’च्या अंकात पूर्वप्रकाशित झालेला आहे.) ... आणि आज इथे वाचायला मिळायला सप्टेंबर उजाडला..! बाकी मस्तच! मजा येतेय. धन्यवाद.

poonam said...

मिलिंदजी, धन्यवाद. ही लेखमालिका side by side parallely मेनका मासिकात देखील प्रकाशित होत आहे. त्यामुळे मी ब्लॉगवर दोन महिने उशीराने त्या मालिकेतला लेख प्रकाशित करते.

मिलिंद कोलटकर said...

धन्यवाद! नक्कीच. होतंय काय, की आपण एवढं ओघवतं लिहिताहात की वाचत रहावसं वाटतं. बरेच दिवसांत नाही दिसले तर चुकल्या, चुकल्या सारखे वाटते. बाकी मस्तच. अगदी स्वतः फिरून आल्यासारखे वाटते. मग काय, कधी कधी मागचे भाग चाळतो. धन्यवाद. :-)