“मोरया रे
बाप्पा मोरया रे…”
अंगणातून
आवाज यायला लागले तसे आप्पा लगबगीने आत वासंतीताईंना म्हणाले, “अहो, मंडळी आली. तबक
घेऊन या…”
आप्पा पुढच्या
दाराकडे गेले. श्रीधरच्या हातात गणपतीची मूर्ती रेशमी रुमालाखाली व्यवस्थित झाकलेली
आहे ना हे त्यांनी आधी नीट पाहून घेतलं. ’बाप्पा मोरया’ असं पुटपुटत त्यांनी नातवंडांकडे
कौतुकानं पाहिलं. सानिका आणि शौनक “मोरया रे बाप्पा मोरया रे…”चा गजर करत नाचत होते
श्रीधरसमोर. सानिकाच्या हातात घंटा होती आणि छोट्याशा शौनकच्या गळ्यात झांजा. सून मानसी
थोडीशीच मागे होती. आपल्या मुलाच्या हसत्या सुखी चौकोनी कुटुंबाकडे पाहून आप्पांना
एकदम भरून आलं. ते समाधानानं हसले. मंडळी अंगण ओलांडून दरवाज्यात आली. वासंतीताई आतून
आल्या. त्या गणपतीला ओवाळत असताना मागून अचानक “गणपती बाप्पा मोरया” असा खणखणीत आवाज आला. सर्वांनीच चमकून
मागे पाहिलं! अंगणात जयंत कुलकर्णी आणि नचिकेत उभे!
“श्री, तू
आत जा. नेहेमीच्या ठिकाणी मूर्ती ठेव नीट…” आप्पा लगबगीनं पुढे झाले.
“अरे वा वा!
अलभ्य लाभ जयंतराव! या या. चांगल्या मुहूर्तावर आलात… कसा आहेस रे नचिकेता?”
नचिकेत झटकन
पुढे आला आणि त्यानं आप्पांना वाकून नमस्कार केला. आप्पा सुखावले. मुलगा खूप मोठा झाला
तरी संस्कार विसरला नाही हे पाहून त्यांना जरा बरं वाटलं. “आयुष्यमान भव, यशस्वी भव”
ते मनापासून म्हणाले.
“चला चला,
आत चला…कधी आलात?”
“हे काय,
आत्ताच येतोय मुंबईहून. जरा घर उघडून, सामान ठेवून, हात-पाय धुवून येतो. खरं तर हे
सगळं करून नंतरच येणार होतो, पण अनायसे गणपतीचं आगमन होत होतं, म्हणून म्हणलं आपणही
सामील व्हावं…” जयंतराव हसत हसत म्हणाले.
“बर बर, या
आवरून. तोवर मी हिला चहा टाकायला सांगतो.”
***
आज सुमारे
वर्षभराने कुलकर्ण्यांची आणि म्हसकरांची भेट होती. हे दोघे सख्खे शेजारी. कराडसारख्या
छोट्या गावात बंगल्यांच्या कॉलनीत शेजारी-शेजारी राहणारे. दोन्ही कुटुंब मध्यमवर्गीय.
आप्पा म्हसकर आणि जयंत कुलकर्णी दोघेही सहकारी बॅंकेत नोकरीला होते. तिथे नोकरी करत
असतानाच कर्ज घेऊन, गावाबाहेर प्लॉट घेऊन आपापली छोटीशी बंगली बांधायची कल्पना रुजली
होती. हळूहळू घराचं स्वप्न पूर्ण झालं, दोन्ही कुटुंब इथे राहायला आली. वासंतीताई आणि
कल्पनाताई यांचीही उत्तम मैत्री जमलेली होती. कौटुंबिक, सांसारिक कामं दोघी मिळून करत.
आप्पांचा श्रीधर आणि सुनिती आणि जयंतरावांचा नचिकेत पाठोपाठच्या वयाचे होते, एकमेकांचे
खेळगडी होते. नचिकेत लहानपणापासूनच मध्यमवर्गाला न झेपणा-या बुद्धीमत्तेचा होता. त्याचा
स्वभावही गंभीर होता. अतिशय विचारी, चौकस नचिकेतावर आप्पांचा फार जीव होता, कदाचित
आपल्या दोन्ही मुलांपेक्षाही कांकणभर जास्त. अर्थात त्यांनी हे उघडपणे कधी मान्य केलं
नव्हतं. पण त्यांचं नचिकेताकडे झुकतं माप होतं हे खरंच. क्वचित कधी वासंतीताई आणि श्रीधर
याबद्दल कधी त्यांचा चिडवायचेही. पण ते कधी ते मनावर घेत नसत.
“फार दिवसांनी
भेट होतेय जयंतराव. पण बरं झालं गणपतीच्या दिवसात आलात. कसे आहात? आता राहणार आहात
ना? बाग, अंगण, घर तसं स्वच्छ करून घेतोय आम्ही वरचेवर, त्यामुळे तशी अडचण येणार नाही
तुम्हाला…”
“आता काय
सांगायचं आप्पा… आपली सद्दी संपली. निवृत्त झालं की आपला लगाम मुलांच्या हातात, ते
म्हणतात त्याप्रमाणे आपण करायचं.”
“म्हणजे?
मी समजलो नाही…”
“बाबा, आडवळणानं
तुम्ही जे सांगू पाहताय तेच मी स्पष्ट सांगतो. आप्पाकाका, बाबांना दोन महिन्यांपूर्वी
अचानक चक्कर आली. घरातच होते आणि मीही सुदैवानं घरीच होतो, त्यामुळे तातडीनं उपचार
झाले. बीपी हाय झालं होतं. हाय डायबिटिसही निघाला. आयुष्यभर एकही तपासणी करून घेतली
नाही. त्यामुळे शुगर आहे हे माहितच नव्हतं त्यांना. आईही दीड वर्षापूर्वी अशीच अचानक
गेली. त्यामुळे मी ठरवलं आहे की बाबा आता कायमचे मुंबईलाच राहतील माझ्याबरोबर.” एका
दमात नचिकेताने सांगून टाकलं.
जयंतरावांचा
चेहरा जरा ओशाळा झाला.
“हिच्या हृदयविकाराची
तर कल्पनाच नव्हती आप्पा. तुम्हाला तर माहितच आहे सगळं. अचानक होत्याचं नव्हतं झालं.
कधी किरकोळ दुखणंही माहित नव्हतं तिला, आणि एक दिवस थेट सिव्हिअर हार्टऍटॅक! आपल्याला
काहीच करता आलं नाही तिच्याकरता. याचं म्हणणं की मी इथे एकटाच राहणार, त्यापेक्षा त्याच्यासोबत
रहावं. म्हणजे त्याच्या जीवाला घोर लागून राहणार नाही.”
“अरे, आम्ही
आहोत की इथे बाबांकडे पाहायला.”
“तसं काय,
आईला ऍटॅक आला तेव्हाही आपण होतो सगळे. पण आता बाबांच्या बाबतीत मी रिस्क घेऊ शकत नाही.”
नचिकेत तटकन तोडत म्हणाला, तसे सगळेच एकदम गप्प झाले.
आप्पांना
वाईट वाटलं. शेवटी कितीही घरोबा असला तरी आपण शेजारी ते शेजारीच. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे
आपण परके आहोत, हे जाणवून त्यांच्या मनाला जरा लागलंच.
“तुझंही बरोबरच
आहे नचिकेता. आणि मुंबईला वैद्यकीय सुविधाही चांगल्या मिळतील.” आप्पा सावरत म्हणाले.
“मग आता काय सामान घ्यायला आलात का?”
जयंतरावांचा
चेहरा पडला. “नचिकेत म्हणतोय की आता हे घरही विकून टाकूया… किंवा भाड्याने तरी देऊ…”
हे ऐकून सर्वांनाच
धक्का बसला. धाडस करून, कर्ज घेऊन, हौसेने बांधलेलं घर विकून टाकणार?
“शक्यतो भाड्याने
नाही, विकायचाच प्लॅन आहे माझा आप्पाकाका. थोडा प्रॅक्टिकल विचार केला, तर आता इथे
कोण राहणार सांगा? मी काही मुंबई सोडून इथे येणार नाही. आई गेली, बाबा एकटे… त्यांनाही
आता मी घेऊन चाललो आहे माझ्याकडे…”
नचिकेत जे
म्हणत होता त्यात तथ्य होतं, पण तरीही बातमी मोठी होती. नाही म्हणलं तरी दोन्ही कुटुंबांचा
पंचवीस-तीस वर्षांचा घरोबा होता. नातेवाईकांपेक्षाही ही कुटुंब एकमेकांना जवळ होती.
शेजारशेजारची ही घरं म्हणजे एक दुवा होता एकमेकांना जोडणारा. मुलं आपापल्या उद्योगधंद्यात
स्थिरावली, कराड सोडून लांब गेली, तरी आपण इथेच राहायचं, एकमेकांच्या सोबतीनं असं जणू
काही आप्पा आणि जयंतरावांचं ठरलेलं होतं. पण कल्पनाताई कोणाच्याही ध्यानीमनी नसताना
गेल्या आणि आता आप्पाही दुरावणार होते, त्या घरासकट. सगळेच गप्प होऊन आपापल्या आठवणींत
बुडले. वातावरण गंभीर झालं.
“फार खेळलो
आपण नाही तुमच्या घरात? मागच्या अंगणात तर धुडगूस घालायचो आपण. तुझ्यापेक्षाही मी आणि
माझे मित्र. तू नुसताच असायचास आपला. कल्पनाकाकूंकडे दुर्लक्ष करून बिनदिक्कत गल्लीतल्या
पोरांबरोबर क्रिकेटच्या मॅचेस घ्यायचो, आठवतं ना? आणि उन्हाळ्यात आलटून पालटून गच्चीवर
झोपायचो…”इतका वेळ नुसताच श्रोता असलेला श्रीधरही घराच्या आठवणीने बोलता झाला.
“आणि तू अमेरिकेहून
आणलेली ती शेगडी रे… काय म्हणायचं त्याला…” वासंतीताई म्हणाल्या.
“बार्बेक्यु
गं आई.”
“हां, तेच.
काय ती तुमची नाचानाच त्याभोवती…”
“काकू, अमेरिकेत
त्यावर मस्तपैकी चिकन, बक-या, ससे, हरणं भाजून खातात… आणि आपण काय भाजायचो, तर बटाटे,
कणसं आणि गाजरं…” नचिकेत चिडवत म्हणाला
“ए बाबा,
गणपतीच्या दिवसात त्या तसल्या खाण्याचं नावही नको…” वासंतीताईंना ऐकूनही कसंतरी झालं.
सगळे हसले.
वातावरण जरासं हलकंफुलकं झालं.
“तू मिस नाही
करणार का रे तुमचं हे घर? हा निर्णय घेणं तुला जड नाही गेलं?” श्रीधरनं कुतुहलानं विचारलं.
“मला वाटतं
आई गेल्यानंतर हा निर्णय कधी ना कधीतरी घेणं गरजेचंच होतं. बाबांना मी इथे एकटं किती
दिवस ठेवलं असतं? हो, म्हणजे, तुम्ही सगळे आहातच. पण तुमच्यावर तरी जबाबदारी कशाला
आणि किती दिवस टाकणार मी? हां… घर विकायचा निर्णय घेतला हे बाबांनाही आवडलेलं नाही,
आणि तुम्हालाही धक्काच बसलेला दिसतोय. पण तुम्ही
लोक फार इमोशनल होता, इतके होऊ नका प्लीज. आपण राहू ते आपलं घर. आता श्रीधर, तू नाही
का सेटल झालास पुण्यात? पुण्यातलं घरही तुझंच घर आहे ना? पण म्हणजे तू इथलं सगळं विसरलास
का? आठवणी असतातच रे, पण त्यात किती अडकून पडायचं? बाबांची तब्येत बघून मला हा निर्णय
इतक्या लगेच घ्यावा लागतोय. ते व्यवस्थित असते, तर कदाचित इतक्यात असं काही ठरवलं नसतं.
पण माहितेय का, प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की तुम्हाला आवडो किंवा न आवडो,
पण एकदाचा नको असलेल्या विषयाचा तुकडा पाडायची वेळ येतेच…तुम्हाला कळतंय ना मला काय
म्हणायचं आहे ते? ”
नचिकेतचं
बोलणं पटण्यासारखं होतं, तो नेहेमीच बिनतोड आणि मुद्देसूद बोलायचा. मात्र आप्पांना
त्याच्या बोलण्यातले अनेक गर्भितार्थही समजत गेले. आपण नचिकेतावर श्रीधरप्रमाणेच प्रेम
केलं, त्याचं कौतुक केलं, पण त्याच्या लेखी आपण फक्त एक चांगले शेजारी आहोत. भावनांना
त्याच्या लेखी फारसं स्थान नाही. तो कोणत्याच गोष्टीत फारसा अडकून पडत नाही. कोणताही
विषय रेंगाळत ठेवायला त्याला आवडत नाही. हे सर्व त्याचे दोष आहेत का गुण आहेत हे आप्पांना
चटकन ठरवता येईना. पण त्यांना नचिकेताबद्दल वाटणा-या वात्सल्यामुळे त्यांनी स्वत:लाच
समजावलं की हे त्याचे गुणच आहेत. त्यामुळेच त्याने त्याच्या क्षेत्रात इतकी प्रगती
केली असावी. त्यांना आपल्या लाडक्या लेकीची, सुनितीची तीव्रतेने आठवण झाली.
“वहिनी, सुनिती
कशी आहे? रुळली का आपल्या घरी?” योगायोगानं जयंतरावांनीही तोच विषय काढला.
वासंतीताईंच्या
चेह-यावर हसू उमटलं.
“हो, रुळतेय
हळूहळू. गेल्याच महिन्यात मंगळागौर केली तिची, तेव्हा कल्पनाची, तुमची फार आठवण झाली.
कल्पनाला सुनूचं फार कौतुक होतं. फार लाडकी होती तिची. तिचं लग्न, सणवार बघायला हवी
होती ती. सुनूचं काही करायचं म्हटलं की पदोपदी कल्पनाची आठवण येते मला. सुनू आनंदात
आहे. छान स्थळ मिळालं तिला. जावईबापूही उमदे आहेत. तेही बॅंकेतच आहेत नोकरीला, पण प्रायव्हेट
बँकेत.घरचेही चांगले आहेत सगळे. जावईबापूंच्या आजी आहेत अजून. त्यांचीही सुनू लाडकी
झाली आहे.”
“अहो होणारच.
जिथे जाईल तिथे आपल्या हस-या स्वभावाने सर्वांना जिंकून घेणारी आहे ती. येणार आहे का
उद्या?”
“नाही हो.
तिच्या घरीही आहे ना गणपती दीड दिवसाचा. पहिलाच गणपती तिचा तिकडचा.”
“अच्छा, म्हणजे
आत्ता भेट होणार नाही तर. हरकत नाही, आता घराचा व्यवहार होईपर्यंत येणं-जाणं होईलच
माझं, तेव्हा एकदा भेटेन तिला.”
“नचिकेता,
बाबांना तुझ्याकडे कायमचं नेणार म्हणतोस, पण बाबांकडे बघायला कोण आहे घरी? तू कधी लग्नाचं
मनावर घेणारेस?” वासंतीताईंनी त्याच्याकडे मोर्चा वळवला.
“बापरे. मला
वाटलंच की आता माझ्यावर शेकणार हे. श्री, अरे
गणपतीच्या डेकोरेशनचं जरा बघायचं आहे ना? चल, मी तुला मदत करतो.”
“शिताफीने
विषय कसा बदलतोय बघा” आप्पा हसत म्हणाले.
“नाही नाही,
पण डेकोरेशनही संपवायला हवं ना वेळेत…” नचिकेत पटकन उठलाच. सगळे हसले. श्रीधर, नचिकेत,
मुलं डेकोरेशनच्या मागे लागले. वासंतीताई आणि मानसीही उठल्या. आप्पा आणि जयंतराव, दोघे
मित्र तेवढे उरले.
“लग्नाचा
विषय अजूनही टाळतोच आहे का नचिकेत?” आप्पांनी विचारलं.
एक सुस्कारा
सोडत जयंतराव म्हणाले, “या मुलाचं काही कळत नाही आप्पा. त्याची विचार करायची पद्धत,
बुद्धीची झेप, त्याची महत्त्वाकांक्षा सगळं काही आपल्यासारख्या साध्या लोकांपेक्षा
वेगळी आहे. मी आणि कल्पना आम्ही सामान्य, मध्यमवर्गीय माणसं. इतकी कुशाग्र बुद्धी असलेला
हा मुलगा आमच्या पोटी जन्माला कसा आला याचं खरंच आश्चर्य वाटतं मला कधीकधी. बारावीनंतर
आयआयटीला गेला, मग अमेरिकेत स्कॉलपशिपवर एम.एस, त्यानंतर पीएच.डी केल्यानंतर आम्हाला
वाटलंच नव्हतं की हा परत भारतात येईल. पण एका ध्येयाने भारून परत आला. सरकारचं साहाय्य
असलेल्या रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये संशोधन करतो आहे. त्याची स्वप्नं फार मोठी, उत्तुंग
आहेत. ती तो पूर्णही करेल… तितका जिद्दीही आहे तो. आपल्यासारख्या सामान्य संसारी लोकांचे
जे प्रश्न आहेत ते नाही महत्त्वाचे वाटत त्याला. लग्नाचा विषय तो टाळतोच. कारणही सांगत
नाही. एखादी मुलगी त्याच्या आयुष्यात असेल असंही मला वाटत नाही. कधीकधी वाटतं, आपल्याच
हाडामासाचा हा मुलगा, पण आपण याला नीट ओळखतंच नाही!”
आप्पांना
जयंतरावांचा शब्दनशब्द पटला. खरंच नचिकेत एक गूढ मुलगा होता. आता विषय निघालाच आहे,
तर अनेक दिवस मनात घोळत असलेली एक गोष्ट आता सांगूनच टाकावी असं त्यांनी ठरवलं.
“जयंतराव,
एक गोष्ट सांगायची होती. माझ्या फार मनात होतं की सुनू आणि नचिकेताचं लग्न व्हावं…”
जयंतराव काही
बोलणार, इतक्यात आप्पांनी त्यांना थांबवलं.
“ऐकून घ्या.
दोन वर्षांपूर्वी जेव्हा नचिकेत भारतात परत आला, तेव्हाच सुनूचंही शिक्षण पूर्ण होऊन
तीही नोकरीला लागली होती. तिच्यासाठी स्थळं बघायला सुरूवात करायच्या आधी मी तिला नचिकेताबद्दल
विचारलं होतं. तेव्हा काय म्हणाली होती माहितेय? म्हणाली, ’बाबा नचिकेतला माझ्याबद्दल
तसं काही वाटत नाही हे मला माहित आहे. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं.
तो जेव्हा इथे येतो, तेव्हा आम्ही खूप गप्पा मारतो, हसतो, चिडवतो एकमेकांना. मला तो
फार आवडतो. पण त्याच्या लेखी मी फक्त एक बालमैत्रिण आहे, जी असली तरी त्याला फरक पडणार
नाही, आणि नसली तरी. तो मनाने वाईट नाहीये, पण त्याचं डोकं संसारात रमणारं नाहीये.
मी एका अपेक्षेने त्याच्याशी लग्न करेन, पण माझ्या अपेक्षा तो कधीच पूर्ण करू शकणार
नाही बाबा. मला एक नॉर्मल नवरा हवा आहे, आणि नचिकेत असामान्य आहे.’ हे ऐकून मी हललो
होतो जयंतराव. केवढीशी माझी पोर ती, आणि तिची समज केवढी! त्यामुळेच मी याची वाच्यता
नंतर कोणापाशीही केली नाही.”
हे ऐकून जयंतरावही
अंतर्मुख झाले. आप्पाच पुढे म्हणाले,
“जयंतराव,
आज खूप बरं वाटलं तुमच्यापाशी मन मोकळं केल्यावर. तुम्ही आराम करा आता जरा. सकाळपासून
दगदग झाली बरीच.”
****
दुसरा दिवस
गडबडीचाच होता. आप्पांनी पूजा सांगितली आणि श्रीधरने गणपती बसवला. गणपतीची प्रतिष्ठापना,
यथासांग पूजा, आरत्या अगदी व्यवस्थित पार पडलं. जयंतराव आवर्जून सकाळपासूनच आले होते.
अथर्वशीर्षाचं आवर्तन पार पडताच आप्पा कपडे करून आले.
“अहो, मी
बाजारात जाऊन येतो जरा. काही आणायचं आहे का?”
“आत्ता कुठे
जाताय उन्हाचं? सगळं आहे घरात. थोडा आराम करा. चहा टाकू का?”
“आलोच मी,
अर्ध्या तासात येतो, मग द्या चहा.”
त्यांना जास्त
संधी न देता, आप्पा बाहेर पडलेच. वासंतीताई स्वयंपाकाच्या गडबडीत असल्यानं त्या जास्त
काही बोलू शकल्या नाहीत.
दुपारी सगळे
जेवायला बसले. जयंतराव आणि नचिकेतही पंगतीला होते. वासंतीताई आणि मानसी वाढत होत्या.
इतक्यात आप्पा पिशवीतून काहीतरी घेऊन आले. वासंतीताईंच्या हातात पुडकं ठेवून ते म्हणाले,
“हेही वाढा
सर्वांना…”
“अगंबाई,
हे काय? बालुशाही! हं… हे आणायला गेला होतात वाटतं मगाशी…बाबू आगाशेची का?”
“नचिकेताला
आवडते ना, म्हणून…”
“बघतेस ना
आई, बाबूची जिलबी मला आवडते, पण बाबांनी ती नाही आणली…” श्रीधर चिडवत म्हणाला. पण आप्पांनी
मनातल्या मनातच जीभ चावली. खरंच, पाव किलो जिलबी घ्यावी असं सुचलंच नाही.
“काका… तुम्हाला
आठवतंय! मला कमीतकमी पंधरा वर्ष झाली असतील बालुशाही खाऊन. काय माहित आता आवडेल का
नाही? लहान असताना कशाचंही ऍट्रॅक्शन असतं नाही? बाबांना मात्र एकही देऊ नका हं. आणि
त्यांना मोदकही एकच वाढा काकू. बाबा, तुम्हीही समजून खा ना जरा प्लीज!”
नचिकेताच्या
प्रत्येक वाक्यानं आप्पांचा उत्साह फुग्यातली हवा जावा तसा कमी कमी होत गेला. त्यांना
वाटलं, मोदकाचं जेवण असताना बालुशाही आणायचा वेडेपणा आपण करायलाच नको होता. ज्याच्याकरता
आणली त्याला त्याचं अप्रूप नाही, उलट श्रीधर दुखावला गेला. नाही म्हणलं तरी श्रीकडे
आपलं कायम दुर्लक्षच झालं. बिचारा साधा, सरळ आहे. पण नचिकेताच्या हुशारीपुढे आणि सुनूच्या
अल्लडपणामुळे तो कायम झाकोळला गेला.
“अरे पण एक
तरी घेशील ना. बाबांनी एवढी आणलीये…” इतकं होऊनही श्रीला आपलीच बाजू घेताना पाहून आप्पांना
गहिवरून आलं. त्यांचं जेवणातलं लक्षच उडालं. पहिलं वाढलेलं कसंबसं संपवून ते उठलेच.
***
दुपारी जरा
सामसूम झाली. सगळेच जरा लवंडले. पण आप्पा मनातून अस्वस्थ होते. त्यांचा डोळा लागेना.
ते बाहेर येऊन गणपतीसमोर बसले. जयंतरावांशी असलेला घरोबा संपणं, नचिकेताचं बदललेलं
रोखठोक वागणं, श्रीकडे झालेलं दुर्लक्ष आणि लाडक्या लेकीची आठवण हे सगळं त्यांच्या
डोक्यात फिरायला लागलं. त्यांनी गणपतीकडे पाहिलं. आरास सुरेख दिसत होती. नचिकेत आणि
श्रीने मिळून वेगळ्या प्रकारचं लायटिंग केलं होतं. परत एकदा मुलांच्या विचाराने त्यांच्या
मनाचा तळ ढवळून निघाला.
आपल्या पोटची
मुलं, पण आजवर आपण त्यांना किती गृहित धरत गेलो… एक माणूस म्हणून ती कशी आहेत, त्यांचे
स्वभाव कसे आहेत हे त्रयस्थपणे पाहू शकलो नाही याची जाणीव आप्पांना व्हायला लागली.
’श्रीधर एक
शहाणा, सरळमार्गी मुलगा, कधीही त्याने कोणत्याच प्रकारचा त्रास दिला नाही. आपापला शिकला,
स्थिरस्थावर झाला, अजूनही आपल्याला मानतो. पण त्याचं कधी कौतुक झालं नाही. सुनू शेंडेफळ,
सर्वांची लाडकी. तिच्या अल्लडपणामुळे तिच्यातली समजूतदार मुलगी नेहेमीच मागे पडली.
पण नचिकेताच्या बाबतीत भावनांच्या भरात वाहून न जाता अचूक निर्णय घेतला तिने. आपल्याला
तरी ते जमलं असतं का?
नचिकेताचं
आत्ताचं वागणं म्हणजे एक अंजन आहे. निष्काम कर्मयोगाबद्दल आपण वाचलं आहे, पण ते आचरणात
आणणं किती अवघड आहे हे आज समजतंय. हा मुलगा वेगळाच आहे हे आपल्याला फार पूर्वीपासून
माहित होतं. तरी त्याचं हळूहळू एकेक पाश सोडवत लांब जाणं इतकं का बोचतंय? आपल्या मुलांकडून
आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण झालेल्या असताना आता नचिकेताकडून हे मन कोणती अपेक्षा करतंय
नक्की?’
इतक्यात गणपतीच्या
मूर्तीवर वाहिलेलं एक फूल खाली सरकलं. आप्पांचं तिकडे लक्ष गेलं. त्यांच्या विचारांची
साखळी तुटली.
वर्षानुवर्ष
आपण गणपती बसवत आहोत. तो दीड दिवसांचा पाहुणा हे माहित असूनही त्याची भक्तीभावानं पूजा
करतो, जमेल तितकी हौस करतो. पुढच्या वर्षी तो येईल ही आस मनात ठेवून त्याला या वर्षी
निरोप देतो. मुलांच्या बाबतीतही आपण असंच व्हायला हवं याचा आप्पांना एकदम साक्षात्कार
झाला. विशेषत: नचिकेताबद्दल. श्री आणि सुनूनी त्यांना पुरेपूर समाधान दिलं होतं. पण
यापुढे नि:संकोच त्यांचं कौतुक करायला हवं. नचिकेताशी एक अनामिक असा बंध होता. त्याच्याबाजूने
तो बंध तितकाच घट्ट आहे की नाही याचा फारसा विचार न करता आपण आपल्याकडून शक्य तितकं
करत रहावं. मुलांना पंख फुटून ती लांब जाणार हे वैश्विक सत्य मान्य करूनही, त्यांना
जर कधी विश्रांतीकरता परत यावंसं वाटलं, तर त्याकरता आपलं घरटं स्वागताला कायम सज्ज
असावं.
जयंतराव आणि
नचिकेतही दुरावले तरी संबंध संपणार नाहीत याची साक्षच जणू काही त्या सरकलेल्या फुलानं
त्यांना दिली. लगबगीनं उठून ते मूर्तीजवळ गेले, फूल सारखं केलं आणि गणपतीला मनोभावे
नमस्कार करून म्हणाले, “देवा, माझ्या मुलांना सुखी ठेव.”
समाप्त.
(’श्री व सौ’च्या २०१७ च्या दिवाळी अंकात ही कथा प्रथम प्रकाशित झालेली आहे.)
5 comments:
Mast
Thanks Unknown, I would like to know your name though :)
Mast katha poonam!
vaah...kiti sahaj lihita ho tumhi. khupach bhidanar likhan karata.
Manjiri, Satish ji, mana:poorvak aabhaar!
Post a Comment