July 12, 2016

ते एक वर्ष- ७



कशासाठी? पोटासाठी??

पार्ल्यात रहायला आले त्या रात्री माझ्या मैत्रिण जिथे रहात होती त्या आजींनी आपुलकीने जेवायला बोलावले होते. त्या आजी एकदम प्रेमळ होत्या. ’डब्याची काय सोय केली आहेस?’ असं त्यांनी मला विचारलं. मी कसली सोय करतेय? मला सुचलंच नव्हतं. त्यांनीच एक पत्ता दिला. त्यांच्या बिल्डिंगच्या मागे एक चाळ होती. तिथे राहणा-या एक बाई डबा करून देतील असं त्यांनी मला सांगितलं. त्या बाईंना गरज होती, मलाही. डब्याची सोय अचानकच आपलीआपण झाली. मी लगेच माझ्या मैत्रिणीला बरोबर घेऊन त्यांना भेटायला गेले. ही चाळ म्हणजे अक्षरश: चाळ होती. एल आकारातली, तीन मजली. या बाई तळमजल्यावरच रहात होत्या. एकच खोली. त्यात कॉटवर झोपलेले त्यांचे सासरे, सिगरेट ओढणारा नवरा, कॉलेजमधली मुलगी आणि त्या असा संसार होता. स्वयंपाकघर असं नव्हतंच. एका भिंतीपाशी ओटा टाईप टेबल, त्यावर गॅस वगैरे मांडणी होती. सकाळी डब्यासाठी दोन पोळ्या आणि भाजी-आमटी यांचे २० रू. आणि संध्याकाळी २ पोळ्या, (तीच) भाजी, कोशिंबीर, आमटी आणि भात यांचे ३० रू. असा दर होता. पैसे रोजचे रोज द्यायचे. एकदम दोन दिवसाचे १०० रू. दिले तरी चालणार होते. मी मान डोलावली. (रेफरन्स म्हणून सांगते, मी ज्या काळाबद्दल बोलते आहे त्यासाठी हे पैसे खूप जास्त होते कारण तेव्हा वडापाव २रू.ला मिळायचा.) पण मला तेव्हा ते समजत नव्हतं. शिवाय दुसरी डबा देणारी तरी कुठे माहित होती?

ऑफिसच्या पहिल्या दिवशी लंच टाईममध्ये मी डबा उघडला आणि मला नक्की काय वाटलं मी सांगू शकत नाही. आमटीचं पाणी होतं; डाळ नव्हतीच त्यात. भाजी चक्क पाणचट होती आणि दोन पोळ्या इतक्या पातळ की सगळं मिळून अर्धी ते पाऊण पोळीचा ऐवज होता. आईची आठवण येणं अपरिहार्य होतं. जेवणात मीठ होतं, इतकंच आठवतं. चवीची बातच नव्हती. संध्याकाळी तीच भाजी आणि तेच पिवळं पाणी, भाताची दोन ढेकळं आणि काकडीची कोशिंबीरही पचपचीतच!! त्यातही पाणी होतं की काय कोण जाणे. दोडका, पडवळ, दुध्या, कोबी आणि एक दिवस उसळ- हा ठरलेला ’मेनू’ असायचा आठवड्याचा. प्रत्येक भाजी पचपचीतच असायची. चव एकसारखीच. भाजीनुसार टेक्स्चरमध्ये जो फरक पडेल तितकाच. काकडी, टोमॅटो, काकडी, टोमॅटो आणि काकडी-टोमॅटो हाही क्रम संध्याकाळी ठरलेला. आमटीच्या पाण्यात काही व्हेरिएशन होत नव्हतं. भातातही. खूप म्हणजे खूपच चांगला मूड असेल बाईंचा तर सकाळी पोळीत चटणी सरकवलेली असायची. आणि संध्याकाळी कधीतरी भाताऐवजी खिचडी. पण हे फार रेअर. बाई पैशाला पक्क्या. रोज सकाळी आणि संध्याकाळी रिकामे डबे त्यांना भरायला देतानाच पैसे द्यावे लागायचे. पहिल्या दिवशी अर्थातच मला हे माहित नव्हतं. मी नुसतेच डबे दिले. त्या तशाच उभ्या. मीही. मग मी त्यांच्याकडे डोळ्यांनीच पृच्छा केली. तर त्यांनी एकच शब्द उच्चारला- पैसे? मीच ओशाळले! दुपारी डबा खाल्ल्यावर लक्षात आलं. अशा चवीचा डबा त्या देत असतील तर साहजिकच कोण परत परत तो घेत राहील? पैसे बुडण्याचीच शक्यता जास्त. त्यामुळे पैसे हातात पडल्याशिवाय त्या डबे भरतच नसाव्यात. बिलिव्ह मी… ’पैसे?’ या व्यतिरिक्त ती बाई माझ्याशी त्या काळात एक शब्दही बोलली नाही!!

जोशी आजी- ज्यांच्याकडे मी रहात होते- त्यांच्याबद्दल सांगायलाच हवं. आजी ७५ वर्षांच्या होत्या. पण त्यांना चाळीत सर्वजण ’काकू’ म्हणत. मी गेल्यागेल्या त्यांना ’आजी’ म्हणाले कारण त्या माझ्या आजीच्याच वयाच्या होत्या. तर याचा त्यांना राग!! “मला काही कोणी आजी म्हणत नाही… तूच पहिली!” असं मला लगेच म्हणाल्या. मीही त्यांना बिनधास्त म्हणाले, “पण तुम्ही आजीच्याच वयाच्या आहात की.” “हो गं, पण कोणी म्हणत नाही” त्यांनी मुद्दा रेटला, मग मीही त्यांना जेव्हा वेळ येई तेव्हा आजीच म्हणायला लागले. उगाच काय? असो. तर आजी एकट्या होत्या. मिस्टर वारले होते, मूल-बाळ नव्हते. खमक्या होत्या. गेली काही वर्ष सोबत म्हणून मुली ठेवत होत्या. “इथे स्वयंपाक करायचा नाही. मुलींनी आपापली सोय बाहेर करायची.” असं माझ्या वडिलांना ठणकावूनच सांगितलं होतं त्यांनी. मी गेले तेव्हा अजून एकच मुलगी होती. नंतर वर्षभरात कधी तीन. कधी चार, तर कधी आम्ही पाच जणीही होतो.

आजी पहाटे पाचला उठायच्या आणि सर्वांचा चहा करून ठेवायच्या. आम्ही उठलो की एकेक जण आपापला कपभर चहा गरम करून प्यायचो. चहा इतका जेवढ्यास तेवढा केलेला असायचा, की एकीने एक घोट जरी जास्त घेतला, तर दुसरीला अर्धाच कप उरायचा! आम्ही चहा ओतला की आजी डोकावून आमचे कप बघत! नाश्त्याची बातच नव्हती. प्रत्येकीकडे बिस्किटं असायची. चहाबरोबर आपापली बिस्किटं खायची आणि आवरून निघायचं.

हे ’आपापलं’ खाणं प्रकार खूप होता. जो काही खाऊ आहे तो आपापला वेगवेगळा ठेवायचा आणि तोही मोजून असा आजींचा हुकूमच होता. बिस्किटांचा पुडा फोडल्यावर किती एकूण आहेत, मी आज किती खाल्ली आणि आता किती उरली आहेत हे रोज लक्षात ठेवायचं. हीच त-हा लाडू, चिवडे, शंकरपाळी, चकल्या यांचीही. संख्या कमी झाली तर आजींवर संशय येऊ नये म्हणून हा बंदोबस्त. “मला काय करायचंय तुमचं? माझ्याकडे आहे माझं चिकार. पण संशय वाईट. त्यापेक्षा हे बरं” असं त्या म्हणायच्या. आता चिवडे-शंकरपाळी कसे मोजणार? असा बेसिक प्रश्न मला पडायचा. पण मी त्यांना कधी विचारलं नाही. सहसा मी त्यांच्या वाट्याला जातच नसे.

सकाळी सातला चहा-बिस्किट झालं की ९-९.३० पर्यंत ऑफिसला पोचायचे. मला तोवरच परत भूक लागायला लागायची. आमचे एमडी तसे दयाळू होते. बेसमेन्टमधले त्यांचे लाडके इंजिनियर नाईट आऊट मारायचे म्हणून पॅन्ट्रीमध्ये त्यांच्यासाठी बिस्किटं असायची. किशोरला रोज अमूक पुडे फोडायचे असं फर्मान होतं. त्यातले दोन पुडे आम्हा वरच्या मजल्यांकरता असायचे आणि उरलेले तळमजल्यासाठी. मी ऑफिसला गेले की फ्रेश होऊन आधी चार बिस्किटं ताब्यात घ्यायचे. ज्या दिवशी क्रीमचं बिस्किट मिळेल त्या दिवशी दिवाळी!! ती तोंडात घोळवत १० पर्यंत खायचे. ११ ला कॉफी. दीडला डबा, जो खाऊन माझं पोट आणखीच कलकलायला लागायचं. रेवा आणि सुनिथाबरोबर मी लंच करायचे. त्यांचे डबे छान, वेगवेगळ्या पदार्थांचे, घरच्या सकस अन्नाने भरलेले असायचे. त्या अर्थातच मला ऑफर करायच्या. पण मी जे काही अन्न खात होते ते मला त्यांना उलटऑफर करणं शक्यच नव्हतं. अतीव संकोच आणि लाज यामुळे मी त्यांच्या डब्यातलं काहीही खाऊ शकायचे नाही. दुपारी चहा. तेव्हा बिस्किटं नसायची. संध्याकाळी ६ ला ऑफिस सुटेपर्यंत अक्षरश: भुकेचा आगडोंब उसळायचा. परतीच्या बसस्टॉपपाशीच एक पाणीपुरीवाला उभा रहायचा. पण मला धीरच होत नसे असं काही विकतचं खायचा. आई मला दर रविवारी पुण्याला गेले की खाऊ द्यायचीच काही ना काही. जास्तकरून लाडू. (ते मोजायलाही सोपे होते!) संध्याकाळी घरी पोचलं कीच ते खायचे हे पक्कं ठसलं होतं मनात. कधी बस उशीरा यायची, कधी वाटेत ट्रॅफिक लागायचा. अनेकदा भूक सहन न होऊन मला रडू यायचं, पित्त व्हायचं पण खाण्याच्या या पॅटर्नमध्ये काही बदल झाला नाही; किंवा मी केला नाही असं म्हणणं जास्त योग्य होईल. 

का नाही केला बदल? एकच उत्तर- यात काही बदल करता येईल हेच कधी डोक्यात आलं नाही! वाचायला अत्यंत वेडगळ किंवा न पटणारं वाटू शकतं हे, पण खरंच हेच प्रामाणिक उत्तर आहे. रोज ५० रुपये मोजून आपण जे अन्न विकत घेतोय ते नि:सत्व आहे, त्यासाठी आपण जे पैसे देतो ते खूप जास्त आहेत, आपण पार्ल्यासारख्या ठिकाणी राहतो, आपल्याला अनेक ऑप्शन्स मिळतील, संध्याकाळी जो लाडू आपण घरी येऊन खातो तो आपल्याला डब्यात नेता येईल आणि वेळेवर खाता येईल, आणखी पैसे मोजून आपण फळं, नाश्ता करू शकतो- असा alternative विचार करायची अक्कलच नव्हती. शिवाय एक बिनकामाचा ईगो होता. आता आपण घरापासून लांब आहोत. आईला कोणत्याही त्रासाबद्दल सांगायचं नाही. मुंबईत आपल्याला किती एकटं वाटतंय, आपल्याला बोलायला कसं कोणीच नाहीये, आपल्याला जेवण कसं मुळीच जात नाही हे काहीकाही सांगायचं नाही. तिने काळजीने विचारलेला हरेक प्रश्न टोलवायचा, पण तिचा सल्ला घ्यायचा नाही असा काहीतरी विचित्र हेका होता मनाचा.

असो. सुमारे सहाएक महिन्यांनंतर माझी एक रूममेट पोटाच्या विकाराने आजारी पडली. बाहेरचं खाऊन खाऊन पोटाची पार वाट लागली होती तिच्या. डॉक्टरने तिला एक महिनाभर फक्त मऊ भात आणि मूगाची आमटी खायला सांगितली होती. जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा हेच. घरी कूकर लावायची तिने आजींना परवानगी मागितली. आजींनी साफ नकार दिला. हा मला धक्का होता. ही रूममेट आजींकडे दोनेक वर्ष तरी रहात होती. आजारी होती. तिला एक महिनाभर साधा भात लावायची परवानगी त्या देऊ शकत नव्हत्या? पथ्य म्हणूनही? ती पैसेही देणार होती. पण आजी द्रवल्या नाहीत. माणसाने रोखठोक असावं, पण तुम्हाला समोरच्या व्यक्तीची साधी गरज समजत नसेल तर काय अर्थ आहे माणूस म्हणवून घेण्याचा? आणि अशी काय अवास्तव अपेक्षा होती तिची? साधा कूकर तर लावायचा होता ना? फार लागलं मला ते. आजींशी तोवर मी फारसा संबंध येऊ देत नव्हते माझा, पण त्यानंतर तर मनातून उतरल्याच त्या. रूममेटला शेजारच्या घरातल्या काकूंनी (बक्कळ पैसे उकळून) डबा दिला महिनाभर. 

ही रूममेट तशी चळवळी होती. हे सगळं झाल्यानंतर तिने आमच्याच बिल्डिंगमधली एक मुलगी शोधली. तिच्या हाताला चव होती. डबे द्यावे का असा विचार करतच होती, तोवर आम्ही गि-हाईक म्हणून हजर झालो. सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण ती द्यायला तयार झाली. दोन्ही मिळून ३०रू! खरंच चांगली होती ती. हात सढळ होता तिचा, विविध पदार्थही करायची आणि जवळपास आमच्याच वयाची होती त्यामुळे आम्ही तिच्याशी गप्पाही मारायचो. सहाएक महिन्यांनंतर मी नाश्ता करायला लागले. ते एक वर्ष ऑफिसला मात्र माझ्या २०रू.वालीकडूनच डबा नेत राहिले.    

आज आपण आपल्या जेवणाचा, घटकपदार्थांचा, उष्मांकाचा किती विचार करतो! पण तेव्हा कुठे गेलं होतं ते शहाणपण? रोज सकाळी आम्ही सगळ्या कमावत्या मुली चहाचे कप हातात धरून आपापाली बिस्किटं खायचो, दरिद्रीपणे आपापला खाऊ मोजायचो आणि खाण्याचा हिशोब करायचो पण मोकळेपणानी कधी आम्ही शेअरिंग केलं नाही. आजींनी नजर आमच्या खाण्यावर असेच. हावरट नव्हत्या त्या, पण अत्यंत भोचक. त्या वातावरणात निकोपपणे काहीच होऊ शकत नसे. परिणामत: मी माझ्या खाण्याचे उगाचच अपरिमित हाल करून घेतले. एखादी तरूण, स्वत:च्या पायावर उभी असलेली, उच्चशिक्षित मुलगी कशी छान कॉन्फिडन्ट दिसायला हवी! आणि मी कशी दिसत होते? निस्तेज, हडकलेली, उदास. मला तेव्हाची मी आठवते तेव्हा माझ्याचबद्दल दया आणि करूणा वाटते. मी स्वत:ला दोषही देत नाही. ती परिस्थिती बदलण्यासारखी होती, पण मी केवळ स्वत:चा गाढवपणाने आहे तशीच जगत राहिले याचं केवळ आणि केवळ दु:ख होतं.

****   
Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

0 comments: