July 4, 2016

ते एक वर्ष- ६प्रवास प्रवास (२)

फर्स्ट क्लासमध्ये गर्दी खूपच कमी होती. खूपच आधुनिक कपडे घातलेल्या काही, लिपस्टिक लावलेल्या काही, आपल्याला मुळीच न शोभणारे कपडे घातलेल्या काही अशाही होत्या. मी त्या डब्यातच न शोभणारी होते ते एक सोडा, पण माझ्याकडे अधिकृत तिकिट होतं! कोण्णी कोण्णाशी बोलत नव्हतं. शक्यतो eye-contact होणार नाही असा बेतानं सगळ्या शांत गप्प मख्ख बसून होत्या. मला विन्डो सीट मिळाली. मीही त्यांच्यासारखीच शांत बसले. ऊन तळपत होतं, पण वारंही येत होतं. परत एकदा सकाळपासून काय-काय झालं आणि आता आपल्याला काय-काय करायचं आहे याची उजळणी केली. फार काही न घडता चर्चगेट आलं आणि अहो आश्चर्यम!! लेडीज फर्स्ट क्लासच्या डब्यासमोर चक्क नीलेश उभा!! त्याच्याकडे खुन्नसने पाहतापाहताच मी हसले आणि कागद घट्ट कवटाळले.

“अरे तुमने सुना नही क्या? Announcement हो रहा था. होता है कभी कभी. स्लो ट्रेन फास्ट करते है. इसलिये टाईम पे और announcement पे ध्यान देना चाहिये” परत प्रवचन सुरू! वैतागलेच मी.

“मुझे नही था पता नीलेश. ये तुम्हे पता होना चाहिये ना? Anyways लेकिन तुम क्यूं रुके? Why did you not go to Mr Shah’s office or back to Andheri?”

“मैं जानेवाला था अपने ऑफिस. लेकिन सुनिथा ने मुझे बोला रुकने के लिये.”

“अच्छा. तुम्हारी बात हुई क्या उससे? But you can go back. I’ll go alone. I have also talked to her.”

“नही. नही. मैं आता हूं ना. अब यहांतक आये है तो… और शहाका ऑफिस भी कहां मालूम है तुम्हे?”

“I will find out. You can go. Seriously.”

“नही, नही. I’ll come. Let’s go.”

त्याला पुरेसं खजील करून आम्ही निघालो. तो बरोबर आहे हे बरंच होतं माझ्यासाठी. आता मला सोडून भलतीकडे जाण्याचं धाडस त्याने केलं नसतं. मलाही शोधाशोध न करता शहांकडे जाता आलं असतं. टॅक्सी करून आम्ही हॉर्निमन सर्कलला आलो आणि I was impressed. कसला भारी, पक्का ऑफिस एरिआ दिसत होता तो! मुंबईची hustle-bustle ठासून भरली होती तिथे. सगळेजण घाईत. पण प्रत्येकाच्या   चेह-यावर एक कामाची व्यग्रता. कोणाला टाईमपासला वेळ म्हणून नाही. तो परिसरही किती भव्य, मोकळा, काहीसा अंगावर येणारा होता. सर्कलला असलेला पुतळा, त्याच्या चहूबाजूने असलेल्या मजबूत, दगडी, नव्या-जुन्या बिल्डिंग्ज, लोकांची लगबग आणि एकूणच त्या हवेत असलेलं चैतन्य! मस्त वाटलं मला एकदम तिथे. नीलेशपाठोपाठ मी चालायला लागले. घाम मात्र भयंकर यायचा मला तिथे आणि वैतागायला व्हायचं. (पुण्यात असं कद्धी व्हायचं नाही!) केस आणखीच चिप्प बसायचे. चेहरा घामटतेलकट व्हायचा. थोडं चाललो आणि आलीच शहांची बिल्डिंग. सुनिथाने पर्फेक्ट खुणा सांगितल्या होत्या. मी एकटी येऊ शकले असते. शेजारून चाललेल्या नीलेशकडे पाहून उगाचच मी नापसंतीचा चेहरा केला.

शहांचं ऑफिस होतं ती कमर्शियल बिल्डिंगच होती. मधोमध एक पॅसेज आणि चहूबाजूनी फक्त ऑफिस स्पेसेस. कोंदट, छोटी-छोटी ऑफिसेस आणि त्यात टाय वगैरे घातलेले कोंबून बसवलेले लोक. नववा मजला. माझ्या आयुष्यात प्रथमच मी इतक्या उंच गेले (लिटरली!). पुण्यात अरोरा टॉवर्समध्येही माझं ऑफिस चौथ्याच मजल्यावर होतं. घर तिस-या आणि बाकी कामं तर तळमजल्यावरच होती. पुण्याचं मेलं स्टॉक एक्सचेन्जही तीन मजली!! लिफ्टमध्येही गर्दी होती. लोक चढत-उतरत होते. एकदाचा नववा मजला गाठला आम्ही. मला एकदा खाली डोकावून पहायचं होतं. पण मी मोह आवरला. शहांचं ऑफिस शोधलं. कित्ती छोटुसं ऑफिस होतं!! माणूस इतका पॉवरफुल, त्याचा क्लायंट (म्हणजे आमचा एमडी) इतका पैसेवाला, पण यांचं ऑफिस किती लहान!! पार्ल्याच्या पुढच्या खोलीइतक्या दोन खोल्या होत्या. मागे अर्ध्या जागेत काचेचं पार्टिशन करून शहांची केबिन. बाहेर दोन ज्युनिअर. उरलेल्या जागेत दोन खुर्च्या, दोन मिनी खुर्च्या, दोन कॉम्प्युटर्स आणि असंख्य फायली आणि जाडी लीगल पुस्तकं जागा मिळेल तिथे, अगदी जमिनीवरही खच्चून भरली होती. (एक मात्र होतं, की हे ऑफिस चक्क एसी होतं!) मला एकदम पुण्यातल्या सरांचं ऑफिस आठवलं. असंच सेम टु सेम, पण जरा मोठं होतं (आणि तिथे एसी नव्हता). एकदम ’आपलंवालं’ फमिलियर फीलिंग आलं.

आम्हाला पाहून शहा केबिनमधून बाहेर आले आणि माझ्याकडे पाहून हसले. कालच्या एमडीच्या घरापुढे हे ऑफिस म्हणजे अगदी ऍन्टी-क्लायमॅक्स आहे ना? असं म्हणाले. मला एकदम संकोचल्यासारखं झालं. त्यांना स्वत:च्या ऑफिसचा अभिमान वाटत होता का नव्हता, त्यांना नक्की काय म्हणायचं होतं, का मला चिडवत होते मला कळलं नाही. कुठून हिंमत केली माहित नाही, पण मी एकदम म्हणून गेले, “I like this office better.” ते परत एकदा माझ्याकडे पाहून हसले. त्यांना माझं उत्तर आवडलं असावं. मग आम्ही त्यांच्या केबिनमध्ये बसून काम केलं. नीलेश बाहेरच्या मिनी खुर्चीतच बसलेला होता हे पाहून मला उगाच उकळ्या फुटल्या. शहा तसे बोलायला रफ होते. शिवाय वजनदार माणूस. तरी माझ्याशी नेहेमी ते एक प्रोफेशनल कर्टसीने बोलत. मला कामाशी संबंधित प्रश्न विचारत. मी चुकले तर फक्त हसत आणि योग्य उत्तर सांगत. मला काम करायला आवडत होतं त्यांच्याबरोबर. ते अधूनमधून बोलता बोलता एमडीच्या चुका काढत तेव्हा तर मला फारच मजा वाटायची :-) असो. मध्ये चहा झाला. सर्व अपेक्षित काम झालं. मी आणि नीलेश परत निघालो. येताना मात्र लिफ्टची वाट पहात असताना मी पॅसेजच्या झरोक्यातून खाली डोकावून पाहिलंच. आपण किती वर आहोत आणि जग किती खाली असं वाटलं. वेगळंच फीलिंग होतं ते.

पार संध्याकाळी पार्ल्याच्या घरात बसलेली असताना मी गेल्या दोन दिवसांचा विचार करत होते. झापडबंद सगळं चालू असताना हे दोन दिवस टोटली वेगळेच होते. कुठे ती पाली हिल, ते चकाचक घर, तो श्रीमंती थाट, कुठे ते फोर्टचं इतकुसं ऑफिस, काय ते बेसमेन्ट असलेलं निराळंच ऑफिस आणि कुठे हे शेअरिंगमधलं घर. पुण्याचं घर, ते चिरपरिचित वातावरण डोळ्यापुढून सरकत होतं. मी प्रचंड होमसिक झाले. कोणाला तरी हे सांगावं, बोलावं असं तीव्रतेनं वाटलं, पण असं शेअरिंग करावं असं कोणीच नव्हतं. ’मला अशा जागी, अशा ठिकाणी रहायचंय का? करियर करायचंय का? मला नक्की काय करायचं आहे? मी खुश आहे का नक्की? इथे घरापासून लांब येऊन मी काय मिळवलं?’ असे अनेक विचार डोक्यात येत होते उत्तरं सापडत होतीही आणि नव्हतीही. 

मुंबईला गेल्यापासून हे प्रश्न मला सतत पडत असत. त्या प्रश्नांवर विचार करता करता आणि त्यांची उत्तरं शोधता शोधता तेव्हाही आणि त्यानंतरही अनेकदा मी माझ्यातच अगदी एकटी पडत जात असे. आपण एका तळघरात इतके खाली उतरत आहोत की पुढची वाटही दिसत नाहीये आणि मागचा प्रकाशही नाहीसा झाला आहे अशी claustrophobic भावना असायची ती. पण तरीही चालत होते. का? कारण दुसरं काही सुचत नव्हतं म्हणून!           

****
Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

6 comments:

Peeves said...

Liked all six chapters of this 'katha'. Do post the next one soon.

Only one suggestion...please provide a link to the earlier chapters in the newer ones. That way people can go back and forth if they haven't read the earlier ones.

poonam said...

Good suggestion Peeves. Will do that before the next post.
Thanks for your feedback!

इनिगोय said...

mast maja yetey.

ha blog geli teen varsha vachatey. Hi series nehami peksha vegali, ani chhan hotey.

poonam said...

मन:पूर्वक धन्यवाद इनिगोय!

rahul hodage said...

तुमच्या ७ व्या भागावर तांत्रिक कारणास्तव प्रतिक्रीया देता येत नाहीये. म्हणून इथे देत आहे. जबरदस्त आणि वास्तववादी झालाय ७ वा भाग. ओघवता. 'डबा' पुराणामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मी देखील वय वर्ष ११ ते २८ शिक्षणानिमीत्त बाहेर काढले. दुनियादारी शिकवणारा अतिशय समृध्द अनुभव होता तो. तुमचं काय मत आहे, हा ही अनुभव हवाच आयुष्यात की नको??

poonam said...

राहुल, अर्थातच हवा! काही काळ तरी आई-वडिलांपासून लांब एकट्याने रहायलाच हवे. तेव्हाच आयुष्य म्हणजे नक्की काय असतं ते कळतं. माझ्या मनात त्या दिवसांबद्दल कटूता मुळीच नाही. उलट ’आपण काय करू नये’ हे त्या दिवसांनी शिकवलं.