June 8, 2016

ते एक वर्ष- १

पार्श्वभूमी


रवाच वर्तमानपत्रात बातमी वाचली- ट्रेनच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात स्त्रियांची अरेरावी आणि परत एकदा ’ते एक वर्ष’ डोळ्यापुढून तरळून गेलं. ते एक वर्ष जेव्हा मीही पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास केला होता. ते एक वर्ष ज्यामध्ये मला कित्येक अनुभव पहिल्यांदाच मिळाले. ते एक वर्ष जेव्हा ख-या अर्थाने मी स्वत:च्या पायावर उभी राहिले आणि ते एक वर्ष जेव्हा मी एका झॉंबीसारखी जगले. ते एक वर्ष- खूप खूप वर्षांपूर्वीचं, पण अजूनही लख्ख आठवणारं आणि मधूनच ’आता मला लिहून काढ म्हणजे निचरा होईल सगळा’ असा टाहो फोडणारं ते एक वर्ष. 

का लिहून काढायचंय ते सगळं? त्यात काही नाट्यपूर्ण आहे का? नाही. काही भयानक आहे का? सुदैवानं नाही. खूप काही भारी आहे का? नाही. मग असं घडलं तरी काय? खरं सांगायचं तर काहीच विशेष नाही. आणि तसं म्हणलं तर खूप काही. एका तळ्यातल्या माशाला समुद्रात आणून सोडलं तर त्याचं काय होईल? किंवा सुरक्षित कुंडीतल्या रोपट्याला जंगलात लावलं तर? क्लिशे प्रश्नाचं क्लिशे उत्तर क्रमांक एक की तो मासा किंवा ते रोपटं आधी घाबरेल, भांबावेल आणि मग रुळेल आणि झपाट्याने वाढेल किंवा क्लिशे उत्तर क्रमांक दोन की तो मासा किंवा ते रोपटं तो वेग न झेपून मरून जाईल. पण माझं असं काहीच झालं नाही. मी घाबरलेही नाही, भांबावलेही नाही आणि मेले तर नाहीचे (हेहे!), पण मी केवळ ते अनुभव अंगावर येऊ दिले. ते जगले. त्यातून तेव्हा शिकावं, धडा घ्यावा इतका विचार तेव्हा केला नाही. पण शिकले निश्चित. नाहीतर ते एक वर्ष अजूनही बरोबर चालत राहिलं नसतं.

मला मांडायचेत केवळ अनुभव. मला आलेले. वैयक्तिक. हे युनिव्हर्सल नाहीत. कोणी यातून काही शिकावं असं मुळीच नाही. फार तर मी एक माणूस म्हणून कशी आहे इतकं यातून कळेल. पण तेव्हाही आणि आजही मी ग्रेट नव्हते, नाहीये. तरी का? याचं प्रामाणिक उत्तर खरंच माझ्यापाशी नाही. बस, लिहायचंय. माझ्यासाठी. कदाचित ते वाचणा-यांसाठीही. मी सगळं खरं-खरं लिहू शकेन का? तेव्हा जे जे वाटलं, अनुभवलं, जाणवलं तेते मांडू शकेन का? का आता मॅच्युरिटी आल्यानंतर काही गोष्टी वगळेन, काही लपवेन आणि काही शुगरकोट करेन? मला सगळं आठवतंय- तेव्हा काय झालं होतं, हवा कशी होती, माझा ड्रेस कोणता होता… शप्पथ! तरीही मी जे लिहिणार आहे त्यातल्या ९०% घटना ख-या आहेत. १०% फोडणी आहे. काय खरं आणि काय फोडणी हे सहज समजणार नाही (बहुतेक). हे लिहिता लिहिता कदाचित मी परत स्वत:ला सापडत जाईन. मला वीस वीस वर्षांनी मित्र-मैत्रिणी भेटतात आणि सहज उद्गारतात- तू आहेस तशीच आहेस! हे सुखावणारं असतं यात वादच नाही. पण शारीरिक ठेवण आहे तशी आहे, यापेक्षाही मी माझ्यातला साधेपणा जपून ठेवू शकले आहे, माझं भाबडेपण, निरागसपण, कदाचित मूर्खपणही- हे मला जास्त सुखावणारं वाटतं. त्या महत्त्वाच्या एका वर्षानंतरही ते बदललं नाही याचंच मला जास्त अप्रूप! तर खूप झालं इन्ट्रो पुराण. आता वेळ कसोटीची… 

क्रमश: 

****

Disclaimer- Fact and fiction are intertwined together in this work.  

1 comments:

Bob1806 said...

पुढील भागाच्या प्रतीक्षेत!
पु.ले.शु