सकाळी ११च्या शिफ्टला सुशांत अगदी वेळेवर पोचला. सेटवर आल्याआल्या त्याने पलिकडच्या सुसज्ज स्वयंपाकघराकडे नजर टाकली. काहीतरी लगबग चालू होती. चैत्राली, अमित, दोन स्पॉट हे उचल, ते तिथे ठेव वगैरे प्रकार करत होते. त्याला पाहून अमित त्याच्या दिशेने आलाच.
"या राजे!"
"खेचा! आज काय खायला घलणार ह्या राजाला?"
उत्तरादाखल अमित अत्यंत गूढपणे हसला. त्याचं हास्य पाहून सुशांतला एक अनामिक भीती वाटली.
"ए हसतो काय नुसता? सांग बाबा, आज काय वाढून ठेवलंय?"
" Fasting Cutlets with curry!"
ऐकायला तरी छान वाटत होतं. आईशॉट! इथेच तर सापळा होता. नाव जितकं फॅन्सी, पदार्थ तितकाच बेकार!!! सुशांतच्या पोटात गोळा आला. आई अंबाबाई! माझ्या पोटाचं रक्षण कर.
त्याचा चेहरा करूण झाला. अमित पुढे म्हणाला, "थांब. अजूनही एक धक्का आहे. सगळं एकदमच सांगून टाकतो, म्हणजे तुला घाऊकात सावरायला वेळ मिळेल."
सुशांत कानात प्राण आणून ऐकायला लागला.
"सादरकर्त्या आहेत, सुशांतच्या आणि सर्व प्रेक्षकांच्या लाडक्या- सौ. पद्मिनीताई जमखंडीकर!" असं म्हणून अमित फिदीफिदी हसला.
"आई शप्पथ! मेलो! अम्या, मी नाही करणार आजचा भाग. माझ्या पोटात दुखायला लागलंय, मला बहुधा हार्टऍटॅकच यायला लागलाय. किंवा मला तोंड येणारे. माझी जीभ सुजलीये. काहीही रे. मला वाचव. मी नाही त्या बाईबरोबर शूट करणार!" सुशांत विनवण्या करू लागला.
उत्तरादखल आता अमितने सहानुभूतीदर्शक हास्य आणले तोंडावर. अमितला अशी विविध एक्स्प्रेशन देणारी किमान वीस हास्य त्याच्या मुखकमलावर उमटवता यायची.
"ते शक्य आहे का- असा प्रश्न तूच विचार स्वत:ला सुशांता!" तो शांतपणे म्हणाला.
त्यातली अपरिहार्यता सुशांतला उमगली आणि त्याने फार कष्टाने स्वत:ला पुढच्या ’एपिसोड’साठी तयार केलं.
तो मेकपला जरी जाऊन बसला, तरी डोळे बंद केल्यावर त्याचा आणि जामखिंडीकर काकूंचा गेल्या वेळेचा भाग त्याला स्पष्टपणे आठवत होताच. गेल्या वेळ कोबीची, त्यातूनही शिजवलेल्या कोबीची धिरडी त्यांनी त्याला गिळायला लावली होती. बर बाई कसल्या टेरर! तशा ’विशाल महिला’ अनेक असतात. पण ह्या अंगाने विशाल, दृष्टीने तिखट आणि जीभेने तर कडू जहरच अशा अनबीटेबल कॉम्बीनेशनच्या होत्या! त्यासम त्याच! एपिसोड चालू असताना त्याने सहजच धिरड्यावर पेरण्यासाठी ठेवलेले दोन काजू तोंडात टाकले. अगदी सहज. त्याला तर ते तोंडात टाकलेलेही समजले नाहीत इतकी सहज आणि निरागस कृती होती ती. ते पाहून काकूंनी लगेचच, ’आजकाल सुकामेवा काय महागलाय नाई? बघा ना, सहज दोनचार काजू तोंडात टाकलेत, त्याची किंमत पंचवीस रुपये होईल! आहात कुठे?’ असं म्हणत त्याचीच भर कॅमेऱ्यासमोर किंमत केली होती. नंतर ते धिरडं उलटताना चिकटलं, तेव्हा त्याला बाईंच्या रागामुळे फिस्सकन हसू आलं होतं. तो भाग नंतर री-शूट करताना तर काकूंनी चक्क त्याच्याच हातात उलथनं देऊन त्याला धिरडं उलटवायचं चॅलेंज दिलं होतं! परत भर कॅमेऱ्यासमोरच!! त्याचं फॅन फॉलोईंग होतं, नाही म्हणलं तरी. त्याला ते धिरडं उलटवायला जमलं नसतं तर काय नाचक्की झाली असती! बाई तेव्हा नुसतं कुत्सितपणे बघत होत्या! आणि नंतर ते भयंकर ’कोबीट’ वास येणारं धिरडं हसरा चेहरा ठेवून मिटक्या मारत खाण्याचं दिव्यही पार पाडावं लागलंच होतं. तीच बाई आज परत?! बाई कसली महामाया होती ती. प्रत्यक्ष अंबाबाईच यायला हवी होती आज त्याच्या रक्षणार्थ! ती बाई आणि हा पदार्थ! प्रोड्यूसरच्या बायकोच्या माहेरचं कनेक्शन असणार नक्कीच काहीतरी! नाहीतर रिपिटचं भाग्य नसतं कोणाचं सहसा!
"दादा, झालं."
सुशांत उठला. पण कपडे बदलता बदलता, मेकपवर अखेरचा हात फिरवता विचार चालूच होते. ’अगंगं. आता रणांगणावर जाण्याशिवाय पर्याय नाही. पाहुणे आलेत की नाही, त्यांच्याशी माफक गप्पा, पदार्थाशी ओळख, सर्व आयुधं तपासणे वगैरे रूटीन गोष्टी जमखिंडीकर काकूंबरोबर शक्यच नाहीत. हे सगळं का करायचं? तर पाहुण्यांना कॅमेऱ्यासमोर बुजल्यासारखं वाटू नये म्हणून! इथे काकूंसमोर मीच बुजतो! कसल्या बघतात त्या रोखून! एकदम चिखलातला किडा वगैरे असल्यासारखं वाटतं. आज एक शब्दही वावगा, जास्तीचा बोलायचा नाही! सांगितलंय कोणी तोंडावर पडायला! मरूदे! अमितने फारच बोंब मारली, तर एखादं वाक्य बोलू! आयला. कायम बडबडून समोरच्याला वात आणणारा मी. आणि ह्या एक काकूंनी माझी काही अवस्था केली! का त्यापेक्षा बडबडबडबड करून त्यांचंच डोकं खाऊ का? काय होईल? कुचकट बोलतील फार तर! चालेल! कुठे प्रेमाने बोलणारेत नाहीतर? झाला तर एक फायदाच होईल- परत येणार नाहीत!! हां. असंच करावं.’
मनाशी फाईट मारायचं ठरवल्यानंतर सुशांतला एकदम हुशारी वाटू लागली. त्याने सेटवर नजर फिरवली. अमित कॅमेऱ्यामागे गेला होता. चैत्राली एका असिस्टंटबरोबर कुजबुजत होती. आणि दिसल्या. काकू दिसल्या. सेटवरच्या स्वयंपाकघरातल्या ओट्यामागेच उभा होत्या. सरसावून. त्याचा घास घ्यायला जणू! श्या! काहीही काय! त्या कल्पनेनेच सुशांतला कसंतरी झालं!
तेवढ्यात चैत्रालीचं लक्षही गेलंच त्याच्याकडे.
"सुशांत, सुरू करूया? तू मिसेस. जमखिंडीकरांना ओळखलंस ना?" मिसेस. जमखिंडीकरही ओळखत होत्याच की त्याला. पण त्यांनी चेहरा प्रयत्नपूर्वक निर्विकार ठेवला होता. सुशांतनेही मग बघून न बघितल्यागत केलं. दोघांचेही कोल्ड वॉर पाहून चैत्रालीच पुढे बोलली.
"आपला ’उपवासाचे पदार्थ’ हा आठवडा चालू असणार आहे. आज काकू Fasting Cutlets with curry! करणारेत. नाव नीट पाठ कर."
" Fasting Cutlets? कटलेट जोरात धावणारेत का कुठल्या स्पर्धेत?" त्याला कोटी करायचा मोह आवरला नाही.
ह्या त्याच्या कोटीवर काकूंच्या चेहऱ्यावरच्या भुवयांमध्ये सूक्ष्मशी हालचाल झालेली त्याने टिपली.
"गप रे." चैत्रालीला त्यांच्या कोल्ड वॉरची कल्पना होती. "सुरण-बटाटा-भोपळा ह्यांचे कटलेट्स आहेत, आणि साबूदाण्याच्या तिखट खीरीत ते सोडून, बुडवून खायचेत. हो ना काकू?" चैत्रालीने तिच्या हातातला कागद वाचून दाखवला. काकूंनी तिच्याकडे अंमळ प्रेमळ कटाक्ष टाकला.
अगंगंगं! अत्याचार!! कटलेटही एकवेळ बरे, पण ते गिळगिळीत साबूदाण्याच्या खीरीत सोडून, एकत्र करून खायचे? का? कशासाठी? आणि वर त्यांना ’वा! काय अभिनव पदार्थ आहे!’ असंही म्हणायचं? का? कशासाठी? सुशांतच्या अंगावर खरंच काटा आला. पण! त्याने निश्चय केला. आज हार मानायची नाही. आज काकूंच्या तिखट नजरेला आणि कटू शब्दांना तोडीसतोड उत्तर द्यायचे, तेही त्यांनाच कळेल असे! प्रेक्षकांना मात्र तो सुख-संवाद वाटला पाहिजे.
टेक सुरू झाला. सुरूवातीचे नमस्कार-चमत्कार काहीही विशेष न घडता आटोपले. आता प्रत्यक्ष युद्ध भूमी. दोघंही खोट्या ओट्यापाशी आले. तिथे सर्व सिद्धता केलेली होतीच. सुरण, बटाटा, भोपळा उकडलेलाच होता. इथे सुशांतने संधी घ्यायचे ठरवले.
"काकू, बटाटा आणि भोपळा उकडायला सोपे आहे. म्हणजे नेहेमीच उकडले जातात ते. पण सुरण शिजवायची काही खास पद्धत असते का?"
काकूंनी त्याच्याकडे भुवया उंचावून पाहिले. त्याबरोब्बर, "नाही, प्रेक्षकांना आपण सांगून टाकू ना, काही वेगळी पद्धत असेल तर, त्यामुळे कोणी चुकायला नको.." असं म्हणून त्याने सारवासारव केली.
"वेगळी अशी काही पद्धत नाही. सुरणाची साल जाड असते. ती विळीवर किंवा चाकूने काढून घ्यायची आणि धुवून बटाटा-भोपळ्यासारखेच कूकरला तीन शिट्ट्या देऊन उकडून घ्यायचे.. हा असा दिसेल मग.." असं म्हणत काकूंनी वाडग्यातल्या सुरणाकडे निर्देश केला. त्यांना पुढे सरकायची घाई होती बहुतेक. पण सुशांत आता कुठे एन्ट्री घेत होता..
"असं आहे होय? इतकी सोप्पी पद्धत? पण काकू, मी तर ऐकलं होतं, की सुरण हाताला, किंवा घशात खाजतो.. म्हणून तो नेहेमी चिंचेच्या किंवा आंबट पदार्थात शिजवावा?" असं म्हणत त्याने काकूंकडे ’आता बोला’ असा चेंडू टाकला.
काकू सटपटल्याच. ’इतका महत्त्वाचा मुद्दा कसा सुटला? तेही ह्या फालतू माणसापुढे? बरीच माहिती आहे की स्वयंपाकाची. जरा सांभाळून बोलले पाहिजे.’ अशी त्यांनी स्वत:शीच नोंद घेतली.
"वा! अगदी बरोब्बर माहिती आहे की तुम्हाला. हा जो मी शिजवला आहे ना सुरण, तो नेहेमीसारखाच शिजवलाय, कारण आपण पाककृतीत आमसूल घालणार आहोत. पण उकडतानाच चिंचेच्या पाण्यातच शिजवला तरी चालतो. आता आपण पुढची कृती पाहूया का?" शेवटचा प्रश्न विचारताना काकूंच्या जीभेला अंमळ धार चडली. पण सुशांतचे काम फत्ते झाले होते. इतक्यातच त्याची नजर इतर साहित्यात असलेल्या ’कढीपत्त्यावर’ स्थिरावली. जागच्याजागी टुणकन उडीच मारली त्याने जवळपास!
काकू आता कटलेट बनवण्यात मग्न होत्या. रूटीन बडबड करताकरता त्यांनी तिन्ही कंद एकत्र मळले, त्यात मीठ, साखर, जिरं-बिरं घातलं आणि सुशांतने संधी पकडली..
"चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात आलंच असेल की ह्या इथे छोट्या बाऊलमध्ये जो कढीपत्ता दिसत आहे, तो पदार्थात वापरायचा नाहीये! कारण कढीपत्ता तर उपवासाला चालत नाही. पण काय सुरेख पानं आहेत पहा, आणि वास! आहाहा!" असं म्हणत त्याने नाट्यमयतेने ती पानं नाकाजवळ धरली.
आता काकू चिडल्याच! त्यांनीच ’कट’ म्हणले.
"कढीपत्ता कसा आला इथे? निर्मलाऽऽऽऽ" त्यांनी जरबेच्या आवाजात त्यांच्या असिस्टन्टला हाक मारली. चुकून आला असेल हे उघड होतं. पण सुशांतने ते बरोब्बर हेरून त्यावर कुचकटपणा केला होता. कॅमेऱ्यात सर्व रेकॉर्ड झाले होते. आणि री-शूट करण्याइतका वेळही नव्हता आणि सामुग्रीही. काकू रडवेल्या झाल्या! त्यांच्या ’रेप्युटेशन’चा प्रश्न होता शेवटी! पार धुळीला मिळालं ते! त्यांना अजूनच संताप झाला. पण तो व्यक्त कसा करावा त्यांना कळेना.
"इट्स ओके काकू. सुशांतने चांगलं कव्हर केलं ते. कढीपत्ता दिसत होता ना कॅमेऱ्यात, त्यामुळे त्याबद्दल बोलायला हवेच होते. पण नो इश्यूज. आपण एक काम करू. तुम्ही ’काही ठिकाणी कढीपत्ता चालतो उपवासाला’ असं म्हणा. म्हणजे तो प्रश्न मिटेल. चालेल ना? चला, लेट्स रोल.." चैत्रालीने नाईलाजाने सूत्र हातात घेतली. तिने सुशांतकडे एक विनवणीवजा मान हलवली ज्यातून ’ए बाबा! गप की’ असं ती म्हणतेय हे सुशांतला समजलं. त्याला तिची दया आली. तो अमितकडे पाहून फिदीफिदी हसला. अम्याने परत कॅमेऱ्यात डोकं खुपसलं!
काकूंना पुरेसं घायाळ करून झालं होतं आता. त्यांनाही उगाच सुशांतवर खवचट कॉमेन्ट्स करू नयेत इतपत समजलं असावं. ’कटलेट घडणे’ हा भाग विना शाब्दिक चममकी उरकला.
आता राहिली होती ती साबुदाण्याची खीर आणि त्यात थे कटलेट बुडवून ते दोन्ही एकत्र खाणे! सुशांतच्या पोटात ढवळायला लागलं!
साबूदाण्याची खीर करताना त्याने न राहवून काकूंना विचारलंच..
"हे भन्नाट कॉम्बिनेशन सुचलं तरी कसं तुम्हाला?"
’भन्नाट’ शब्द ऐकून परत एकदा काकूंच्या चेहऱ्यावर सूक्ष्म हालचाल झाली. पण आता घोडं गंगेत जवळजवळ न्हायलेलं होतंच. एपिसोड संपत आलेला होता. आता काहीही रिस्क नव्हती.
"बघा ना, ही खीर तर आबालवृद्ध, आजारी असे सर्वच जण खातात. कटलेटही कदाचित कोणी बनवत असेल. पण हे दोन्ही पदार्थ मिक्स करण्याचं सुचणं हेच किती भन्नाट आहे! नाही?"
स्वत:च कौतुक ऐकून काकू थोड्या सैलावत होत्या, तोवर सुशांतचं पुढे चालूच..
"काकू, मला तर वाटतंय की "Fasting cutlets with curry" इतक्या साहेबी नावापेक्षा चक्क ’उपवासाचा रगडा पॅटीस" म्हणावं त्याला! रगड्याऐवजी साबूदाणा आणि पॅटीस आहेतच. काय म्हणता प्रेक्षकहो?"
काकूंनी त्या दिवशी खीर जाळली. आधी दोन मोठ्य चुका झाल्या होत्या. आणि आता त्यांच्या फॅन्सी नावाचीही सुशांतने कत्तल केली होती!! निर्मलाने परत खीर करून दिली नवीन. भागाच्या शेवटीही काकू आल्या नाहीत टेबलापाशी. अपमान सहन न होऊन त्या तडक सेट सोडून निघून गेल्या. एक कान फोनला लावत चैत्राली त्यांच्यामागे पळाली. अमितच्या कॅमेऱ्यात पहात सुशांत म्हणाला, "आणि हे झाले तयार आपले फास्टींग कटलेट्स, ऊर्फ उपवासाचा रगडा पॅटीस! असेल हिम्मत तर हाणा!!"
खबर अशी आहे की ’असेल हिम्मत तर’ हे शब्द नंतर ’बाह्या सरसावून’ असे डब केले एका डबिंग आर्टिस्टने. नंतर मालिकेच्या प्रोड्यूसरने मालिकेचे प्रायोजकत्व काढून घेतले. पण सुशांतवर खुश झालेल्या एका नवीन प्रोड्यूसरने दिलेल्या अर्थबळाच्या जोरावर मालिका, सुशांत आणि खवय्येगिरी चालूच राहिली.
(संपूर्णपणे काल्पनिक)
(संपूर्णपणे काल्पनिक)
9 comments:
good one!
मस्त खुसखुशीत :) मी आणि आई 'आम्ही सारे खवय्ये..' बघायचो मी तिथे होते तेव्हा. बरेचदा इतके भयानक पदार्थ असतात की त्या होस्टाची दया आल्याशिवाय रहात नाही ;)
मस्त. मजा आली वाचताना. :)
धन्यवाद सुदीप, तृप्ती, प्राची :)
’पोटासाठी’ वाट्टेल त्या पदार्थांना ’व्वा!’ ’सुरेख’ असं म्हणायला लागणाऱ्या सूत्रसंचालकाप्रती थोडी सहानुभूती दाखवावीशी वाटली ;)
maLyaat naahee kaa TaakaNaar ?
LOL Trupti. तिथल्या विनोदाचा दर्जा ’फारच उच्च’ आहे. हे साधंभोळं लेखन इथेच बरंच ;)
खवय्येगिरी फक्त प्रशांत दामलेच करू जाणे. त्याच्याही अभिनयक्षमतेची कसोटी लागत असणार... :D
मस्त लेख...अशा प्रकारच्या सगळ्या होस्टना वाचायला दिला पाहिजे....:)
मस्तच!
Post a Comment