अॅक्टिव्हिटी!
"आई, उद्या नारळाची करवंटी हवी आहे" रात्री सुमारे आठाच्या सुमारास एक बॉम्ब पडला.
"अरे! उद्या? आणि हे आत्ता सांगतोयस?!" माझा आवाज चढायला तसाही फार वेळ लागत नाही!
"आजच सांगितलं. आम्ही बहुतेक त्याचा तबला करणारोत उद्या. आई, करवंटी म्हणजे काय?"
करवंटीचा तबला! हसावं की रडावं कळेना. त्यात हा असा निरागसपणा!
"अरे, आपली काय नारळाची बाग आहे की काय आं? पाहिजे नारळ, तर जा बागेत, आणि आण तोडून! आणि थेट करवंटीच! खोबरं नको का? त्याचंही काहीतरी करा की करंज्याबिरंज्या!"
माझी चिडचिड, माझी अगतिकता, समोर पडलेली कामं आणि त्यात हे आलेलं वाढीव काम! पण बिचार्यापर्यंत काहीच पोचत नव्हतं, कारण करवंटी म्हणजे काय हेच माहित नसलेल्या मुलाला, करवंटीसाठी काय काय सव्यापसव्य करावं लागतं हे माहित असणंच शक्य नव्हतं!
"हां आई, त्याला आतून पॉलिश करून स्मूथ करून न्यायची आहे बर्का!"
"हो सर. अजून काही?"
उपरोध समजतो त्याला. "काही नाही. इतकंच."
मुलाला शीशू वर्गात अडकवल्यानंतर साधारणपणे आपल्यावर काय बेतणार आहे ह्याची कल्पना आई-वडिलांना आलेली असते. रडकं मूल, आक्रस्ताळं मूल, लाजरं मूल, अतीउत्साही मूल, डबा न खाणारं मूल- ह्याच्याशी दोन हात करता येतात. इतर अनुभवी पालक, शिक्षक, खुद्द मूल ह्यांच्याशी बोलून काही ना काही मार्ग निघतोच. मग मूल मोठं होतं. शाळेत चांगलंच रमतं आणि सुरू होतात ’अॅक्टिव्हिटीज’! हा म्हणजे शुद्ध छ्ळ असतो पालकांचा! कारण ह्या सुरू होतात प्राथमिक शाळेत. मुलं त्या करण्याइतकी मोठी आणि कुशलही नसतात. त्यामुळे त्या कराव्या लागतात पालकांनाच. आता हा तबला! करणार पाल्यच शाळेत. पण नारळ आणा, फोडा, संपूर्ण खोवून घ्या, आतून ’स्मूथ’ करा आणि त्या गळ्यात पडलेल्या खोबर्याचं काहीतरी करून डायटची वाट लावून घ्या. हे शाळेत ऑर्डर देणार्या शिक्षिकेला समजत नाही. ती फक्त सांगते. आणि आपल्याला ऐकावंच लागतं!
पुढल्या गुरूवारी अजून एक फर्मान.
"आई शनिवारी कचरा न्यायचाय शाळेत."
"कचरा????????"
"म्हणजे, वाळलेली पानं, काड्या, पिसं, जुन्या रिबिनी असं. पक्ष्याचं घरटं करायचं आहे."
पानं, काड्यांपर्यंत ठीक. पण पिसं? रिबिनी? मी माझ्या जन्मात सहा इंचांची लांबी न ओलांडलेल्या केसांकडे एक करूण कटाक्ष टाकला. त्यानंतर ’अनुभव’ वगैरे पणाला लावून वाळकी पानं, कुंच्याच्या काड्या, कापूस, ’त्या’ नारळाची शेंडी वगैरे दिली. त्याने त्या दिवसाचा प्रश्न मिटवला.
मग मक्याच्या कणसाची पानं, एकदा नुसतंच बाटलीभरून चिंचेचं पाणी, अजून दोन वेळा करवंट्या (त्या पहिल्या करवंटीचा बाहेरून तबला, दुसरीवर बाहेरून ’वारली पेन्टिंग आणि तिसरीचा आतून पेन स्टॅन्ड झाला!), सहा प्रकारची झाडांची पानं आणि असेच अनेक शेकडो प्रकार झाले! त्यानंतर अशा एका झाडाची पानं आणायची होती, ज्याची पानं वापरून एक प्राणी करता येईल! (कशासाठी? त्याने कोणतं कौशल्य आत्मसात होतं? शहरात आधी झाडं कमी, त्यात अशी झाडं हवीत ज्यांची पानं नुसती पानं असून चालत नाहीत, तर वेळप्रसंगी त्यांचे प्राणी आणि पक्षीही व्हायला हवेत- अशी किती झाडं मिळणार? पण हे सगळे प्रश्न मनातच. मुलाच्या मनात शाळेबद्दल काही भलतंसलतं नको भरवायला!) आमच्या इथे जे झाड उपलब्ध आहे, त्याची पानं वापरून मी (माझ्या दृष्टीने) मोराचा आकार तयार केला होता आणि मुलाला कौतुकाने दाखवायला गेले- की उद्या असं चिकटव. तर पाहिल्या पाहिल्या बाळ वदले, "आई, मस्त झालंय शहामृग!" त्यानंतर ’आदिवासी मानवाची अस्त्र-शस्त्र’ ह्यांचा कार्यानुभव हवा, म्हणून आम्हाला चक्क रस्त्यावरच्या झाडांच्या खाली पडलेल्या काटक्या गोळा कराव्या लागल्या- कारण त्या काटक्यांना कागदी पाती चिकटवून ह्यांना भाले करायचे होते!!
मग आली वार्षिक संमेलनाची तयारी. आमच्या मुलाला पार्श्वभूमीवर असलेल्या एका ’झाडा’चा रोल आला! काऽऽऽही करायचं नाही, फक्त उभं राहून डोलायचं. अशी अजून अर्धा डझन झाडं होती. पण साधंसुधं झाड नाही, त्याला ड्रेपरी आणा- असं फर्मान काढलं शाळेनं. बर. आम्ही फक्त आज्ञापालनासाठी बसलेलो असलेने, गेलो भाड्याने पोशाख मिळणार्या दुकानात. तिथे फारच भारी ’ड्वायलॉक’ चालले होते.
काऊंटरवरच्या दोघी ’शिवाजी आणि मावळे’ ह्यावर चर्चा करत होत्या-
’परवाला 12 मावळे आणि एक शिवाजी हवाय. आहेत का इतके मावळे?’
’मावळे आहेत. पण शिवाजी नाहीये. काय वयोगट आहे? संभाजी आहे, चालेल का विचार.. एकच ड्रेपरी असते, फक्त साईझ लहान!’
’जीवन ह्यांना कळले हो’ असा कार्यक्रम असतो ना? त्यांनी नक्कीच इथे येऊन फक्त ह्या संवादांचं रेकॉर्डिंग केलं तरी चाललं असतं. असो. तर झाडाचं सांगत होते.. त्यांच्या भाषेत सांगायचं तर, ’झाड संपलंय. खालचा खोडाचा भाग आहे फक्त. (इथेही वृक्षतोड चालू आहे की काय?) वरचा कटाआऊट तुम्ही कराल का? सोपा असतो अहो!’ आम्हाला आता कोणतीही संकटं लीलया पेलायची सवयच घडवली आहे शाळेने. शिवाय झाड ’उद्या’वर येऊन ठेपलं होतं. ’हो’ म्हणण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं! मग कार्डशीट आणा, हिरवे घोटीव कागद, ’झाडाला’ बळकटी मिळावी म्हणून मध्ये थोडा जाड पुठ्ठा, डोकं बाहेर काढायला जागा असे बरेच सव्यापसव्य करावे लागले! एकदाचं झालं ते झाड उभं आणि स्नेहसंमेलनात डोलूनदेखील आलं! आता वार्षिक ’प्रोजेक्ट’ येईल. ती सर्व आई-वडिलांनीच केलेली असतात हे त्यांच्याकडे पाहूनच कळतं. गेल्या वर्षी सामोस्याच्या आकाराचे डोंगर उभे केले होते! यंदा काय करायला लागतंय काय माहित! तरी अजून मी दर शनिवारी होणार्या ’अॅक्टिव्हिटी’च्या सामानाची यादी नाही दिलेली!
एकूणात कार्यानुभव आणि मुलं ह्यांचा परस्परसंबंध काय? शाळा आपण मुलांना काही भरीव शिकवतोय ह्या भ्रमात असते का? अश्याने मुलांना खरंच हस्तकलेची गोडी लागते का? बर विषयानुरूप जे काही करायचं असेल, ते शाळेतच का नाही करत? त्याचं साहित्य, त्याची कलाकुसर जे करायचं आहे, ते शाळेतच पुरवा ना. किंवा पालकांना पुरेसा अवधी तरी त्या तयारीसाठी. अशी एका रात्रीत मक्याच्या कणसांची (नुसतीच) पानं, काटक्या, करवंट्या कुठून पैदा करायच्या? बर, जे घरून करून आणायचं असतं, त्याला कौशल्याची एक ठराविक पातळी लागते. ती ह्या वयात नसतेच. सांडलवंड, वाया घालवणे हे मुलांचे जन्मजात गुण आहेत. ’कापसाचे फुलपाखरू’ करताना चिकटवलेल्या कापसाच्या किती पट कापूस हवेत उडाला ते आम्हाला विचारा! जन्मजात टेन्डन्सीला शिस्त लावून ह्या वयाची मुलं सुबक सुंदर काही जन्माला घातलील हे शक्यच नाही. तरी. तरी कमीअधिक हे मुलांच्या बोकांडी प्रत्येक शाळा बसवतेच! (मुलांच्या म्हणजे पालकांच्या.) कशासाठी?
कदाचित हा एक अव्यक्त सूड असावा का? तुमच्या मुलाला पाच तास सांभाळल्याबद्दल, त्याला शिस्त लावल्याबद्दल, त्याला ’शहाणं’ करून सोडल्याबद्दल ही एक जास्तीची फी मागत असेल का शाळा? का, पालकांना ह्या वयात त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा उदात्त हेतू असावा? हे कारण असू शकेल. उद्याच्या उद्या ’कडध्यान्यापासून केलेले पाच प्राणी’ द्यायचे असतात ना, तेव्हा खरं सांगते, सांसारातले कोणतेच गहन आणि गंभीर प्रश्न त्या दोन तासात सतावत नाहीत.. कल्पनाशक्तीला धुमारे फुटतात.. एखाद्या कलाकृतीला जन्म देण्यापूर्वीचि अस्वस्थता, हुरहूर वगैरे जाणवायला लागते, पंचवीस वर्षापूर्वीच्या ’कार्यानुभा’च्या तासाला आपण काय माती खाल्ली होती ते आठवून मनात इर्ष्या जागृत होते आणि संपूर्ण एकाग्रता साधत मन कसं त्या ’अॅक्टिव्हिटीत’ गुंतून जातं! ..
6 comments:
अप्रतिम, मस्त अनुभव कथन आहे तुमचं. एवढं सगळं लक्षात राहिलयं हेच मोठ्ठ काम केलय पालक म्हणीन तुम्ही. आमच्या दोन कार्ट्यांच्या गोंधळात काहीच लक्षात रहात नाही.
आधीचा प्रतिसाद बहुतेक पोचलेला दिसत नाही.
तुम्ही हा लेख 'पालकनीति' मासिकाकडे नक्की पाठवा. तिथे या विचारांशी सहमत असणारे आणखी लोक भेटतील. मला अर्थातच हा लेख आवडला आहे.
बाकी आपण शाळेत असताना जे काही केल नाही ते सगळ पालक या भूमिकेतून कराव लागत आणि चांगलच कराव लागत अस दिसतंय.
मस्त! आईबापांच्या कलागुणांचा विकास हा हेतू असावा बहुतेक या ऍक्टिव्हिटीज् चा! :)
धन्यवाद मिलिंद, आतिवास, गौरी.
जे पाल्य असताना केलं नाही ते पालक झाल्यावर करावं लागतं ह्याला सहमत!
आतिवास, 'पालकनीती' मासिकाबद्दल ठाऊक नव्हते. माहिती काढून त्यांना नक्कीच पाठवेन हा लेख. धन्यवाद :)
hehehe sahi aahe
आपले लेखन वाचले. कथा या प्रकाराबद्दल आपुलकी दिसते. शैलीही उत्तम. शुभेच्छा.
Post a Comment