February 2, 2011

आजी

मुलं आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून काही गोष्टी आपोआप आत्मसात करतात. मी माझ्या आजीकडून ’वाचन’ शिकले. माझी आजी म्हणजे टिपिकल आजी कधीच नव्हती. त्या काळातही ती ब्रिजक्लबात जायची, पत्ते खेळायची. घरकाम वगैरे उरकून दुपारी निवांत वाचायची! मला आठवतंय तेव्हापासून, स्वयंपाकघर आईच्या ताब्यात देऊन आजी सुपरव्हायजरी मोडमध्ये होती. तीक्ष्ण नजरेने स्वयंपाकघराकडे एक डोळा असायचा आणि दुसरा डोळा कायम काहीतरी वाचत असलेला असायचा. संपूर्ण सकाळभर वर्तमानपत्र पुरायचं. दुपारी तिने कधी वामकुक्षी घेतल्याची आठवत नाही! लवंडून पुस्तकं वाचायची. संध्याकाळी वनिता समाजात ब्रिज आणि रात्री थोडा टीव्ही, की परत पुस्तक! कधीच्या काळापासून आजीकडे ’घरपोच लायब्ररी’ होती. महिन्याला बारा पुस्तकं! चंगळ!! आजीच्या वाचनप्रियतेमुळं मी आणि माझी भावंडंही पुस्तकातले किडे झालो होतो. त्या बारा पुस्तकांपैकी सहा आजीच्या पसंतीची आणि सहा आमची अशी वाटणी होती. लायब्ररीवाल्यांची डोळ्यात प्राणबिण आणून वाट पाहिली जायची. ते आले की माझे आत्तेभाऊ जवळजवळ झडप घालूनच पुस्तकं ताब्यात घेत. प्रचंड खल करून पुस्तकं निवडली जात. आणि लायब्ररीवाले गेले की चार कोपर्‍यात चार जणं एकेक पुस्तक हातात घेऊन सुरू!

आजी अजिबात धार्मिक नव्हती. देवळात जाणं, कीर्तन ऐकणं तिने माफक केलं. ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, कसकसल्या पोथ्याबिथ्या वगैरेही वाचल्या, पण तिला मनापासून आवडायचं ते फिक्शनच! कथा, कादंबर्‍या सर्वात प्रिय. फार जड, फिलॉसॉफिकल पुस्तकं वाचायची नाही! बर, जे वाचलंय त्यावर हीरीरीने चर्चाही कराबिरायची नाही!सगळं फक्त स्वानंदासाठी! तिची वाचायला बसायची एक टिपिकल पोझ होती.. एक पाय लांब करायचा, कंबरेत वाकून दुसर्‍या पायावर हाताने पुस्तक तोलून रेलायचे आणि तासनतास वाचत बसायचं! नंतर पुस्त्क पेलवत नसे, तर पोझ तीच, फक्त पुस्तक हातात धरण्याऐवजी समोर उशीवर ठेवायचं! थंडीच्या दिवसात दुपारी नऊवारी साडीचा पदर डोक्यावरून घेत, उन्हाला पाठ करून अंगणात ती वाचत बसायची. आम्हीही तिचं अनुकरण करत तिच्या शेजारी बसत असू. पण, थोड्य़ा वेळाने उन्हाने आमच्या पाठीला चटके वसायचे आणि आम्ही उठायचो, आजी मात्र निवांत बसलेली असायची! एकदा वाचायला लागलं, की आमचे आवाज, ऊन, खराब हवा वगैरे किरकोळ गोष्टी तिला त्रास देत नसत.

माझे वडिलही असेच पुस्तककिडे. त्यांची वेळ मात्र रात्रीची, आणि ते अवघड आणि अवजड इंग्रजी पुस्तकं वाचत. मला आजोबांनी बाराखडी शिकवल्यापासून मी झपाझप वाचायला लागले. माझी बहिण आणि भाऊही असेच. दिवसभर दंगा, मारामारी, ओरडाआरडा करून संध्याकाळी चुपचाप सगळे काही ना काही वाचत असलेले. आत्या आणि माझी आई मात्र पाण्यात राहूनही कोरड्या! आईला वेळ नाही, म्हणून आणि आत्याला आवड नाही फारशी म्हणून. आत्याने वाचावं म्हणून आजीने थोडीशी खटपट केल्याचं आठवतं, पण तिची इच्छा नसल्याचं दिसल्यानंतर तिने तो नाद सोडला.

आजी गोष्टीही मस्त सांगायची. तिच्या ठरलेल्या अशा खास गोष्टी होत्या. आलटूनपालटून आम्हालाही त्याच लागायच्या. लहानपणी लाईट जायचे :) मग अंधारात झोपायला भीती वाटायची. अशावेळी हमखास आजीच्या गोष्टीनंतर मस्त झोप लागायची. त्या तिच्या गोष्टी पार तिच्या पतवंडांनीही ऐकल्या आहेत! ती नऊवारी नेसत असल्यामुळे तिच्या शेजारी झोपायला मस्त मऊ वाटायचं. कित्येकदा मी रात्री उठून तिच्या शेजारी झोपल्याचं मला आठवत आहे.

तिने आम्हा नातवंडांचे भरपूर लाड केले. ती वाढदिवस तिथीने मानायची आणि हमखास आमच्या तिथीने वाढदिवसाला आम्हाला पैसे द्यायची. तिच्या नातवंडांमध्ये मी सर्वात लहान आणि त्यातल्यात्यात तिची सर्वात लाडकी. मात्र तिचं जनरल वागणं, ताठा, आईशी असलेलं वागणं हे माझ्यासाठी तिच्या ’आजी’ असण्यापेक्षाही वेगळं होतं, खटकणारं होतं. माझे आणि तिचे यावरूनच सतत वाद व्हायचे. मोठी भावंडं कधी त्या फंदात पडली नाहीत. बोलणारी मीच. अर्थात, तिने कधी तिचं वागणं बदललं नाही, पण माझ्याबद्दल मी उद्धटपणाने बोलते म्हणून कटूताही धरली नाही. ’मी लहान आहे’ म्हणून मला नेहेमीच माफ केलं.

आजीची बुद्धी तल्लख होती. लग्नानंतर ती बरंच शिकली होती. वाचनामुळे तिच्या बुद्धीला धार होती. पुस्तकं, मासिकांशी ओळख तिच्यामुळे मला झाली. आज मी जे काही बरंवाईट लिहीत आहे, त्याचं तिला फार कौतुक होतं. ब्लॉग म्हणजे काय हे तिला कळायचं नाही, पण मी कथाबिथा लिहीते, हेच तिच्यासाठी अप्रूपाचं होतं फार. तिची आवडती मासिकं म्हणजे ’माहेर’ आणि ’मेनका’. दर महिन्याच्या सुरूवातीला हे ताजे अंक वाचायची ती अगदी वाट बघायची. लायब्ररीवाल्यांकडे तिचा महिन्याच्या पहिल्या आठवड्यातला ’माहेर नाही आणलं?’ हा प्रश्न हमखास ठरलेला! ’मेनका प्रकाशना’कडून जेव्हा मला डिसेंबरात माझी कथा छापण्याबद्दल विचारणा झाली, तेव्हा मला खात्री होती, की सर्वात जास्त ह्याचं कौतुक आजीला वाटणार आहे! पण तेव्हा कुटुंबात इतर काही ईमर्जन्सी चालू असल्यामुळे संपूर्ण वातावरणच बिघडून गेलं होतं. पुस्तकं-मासिकांवर चर्चा करायची ती वेळ नव्हती आणि तिला ते सांगायचंच राहून गेलं. यथावकाश, ’माहेर’च्या फ़ेब्रुवारीच्या अंकात कथा छापून येणार आहे, हे नक्की झालं. घरातली परिस्थितीही बरी झाली, आणि मी तिला मुद्दाम ते सांगायचं ठरवलं. नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळं होतं तेव्हा. ह्याच सुमारास आजीला परत विस्मरण व्हायला लागलं. माणसं ओळखत होती, पण अधूनमधून एक ’लॉस्ट लुक’ तिच्या चेहर्‍यावर यायचा. तिला बरं वाटावं, म्हणून माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही बातमी मी तिला सांगितली. तिच्या चेहर्‍यावर क्षणभर कौतुक पसरलं, पण पुढच्याच क्षणी ती परत ट्रान्समध्ये गेली. तिला मी काय म्हणाले, हे कळले की नाही, समजले की नाही हे मला अज्ञातच राहिले.

ही माझी कणखर आजी जानेवारी महिन्यात वृद्धापकाळाने निवर्तली. फेब्रुवारीचा ’माहेर’चा अंक मला दोन दिवस आधीच मिळाला. मात्र ताजा ताजा माझं छापील नाव असलेला अंक वाचायला आजीच राहिली नव्हती!

निर्भेळ सुख लाभणं हेही नशिबात असावं लागतं!

6 comments:

Jaya said...

maji aaji hi aashich aahe , tichich athavan jali. aaj tiche vay 95 varshe aahe tari dusarya dolyache motibinduche operation gelya athavadyat jale. ani ata parat navin kahitari vachayala sajja.

Peeves said...

Khup sundar post! Ek sundar adaranjali tujhya aaji la. Mala khatri ahe ki tila tichya naticha kautuk asel katha chapun ali "Maher" ankat hyacha.

Prashant said...

very touching. Keep up your writing. That will be the best 'adarananjalee' in a way.

poonam said...

मनापासून धन्यवाद जया, पीव्ह्ज, प्रशांत :)

BinaryBandya™ said...

छान झालीये पोस्ट...

Dk said...

पूनम,

सॉरी.

तू जसं लिहिलंयसना अगदी सेम त्याच पोझिशनमध्ये माझी आज्जी वाचायला बसते. आता जाणं होत नाही एवढं :( छान लिहिलंस आवडलं.