March 1, 2011

ठेवा!

ती पिशवी टेबलावरच्या त्या कोपर्‍यात येऊन बरोब्बर 15 दिवस झाले! तिची अधूनमधून आठवण झाली की तिच्याकडे एक कटाक्ष टाकते मी. बस. ह्यापलिकडे काहीच करत नाही!
ही पिशवी गेली दहा वर्ष आईकडे अशाच एका कपाटाच्या कोपर्‍यात पडलेली होती!
मी-
’घेऊन जाते पुढच्यावेळी’,
’आत्ता माझ्याकडे खूप वजन आहे, पुढल्यावेळी नक्की’,
’तुला तिचा इतका का त्रास होतोय? जरा राहूदे की माझं थोडं काहीतरी इथे!’
अशी सर्व अस्त्र वापरून तिला हातही लावला नाही. आईलाही लावू दिला नाही.

ह्यावेळी अल्टीमेटम आलं! ’ही घेऊन जातेस की रद्दीत देऊ?’
नको. रद्दीत नको अगदी. इतका जालिम उपाय नको. मी पिशवीकडे करूण दृष्टीक्षेप टाकला आणि जड हाताने आणि मनाने ती ऑफिसात आणली आणि तिथल्या एका कोपर्‍यात सरकवली.

आहे काय त्या पिशवीत असं? तऽर, त्यात आहेत माझ्या शेवटच्या अभ्यासाची शेवटची पुस्तकं! :) त्या पुस्तकांचा अभ्यास करून डिग्री मिळवली आणि परिक्षेशी संबंध संपवला!

बर्‍याच जणांकडे असतात ना अशी पुस्तकं? इंजिनिअर असाल, तर शेवटच्या वर्षाची पुस्तकं, कोणत्याही ब्रँचचे मास्टर असाल, तर तेव्हा वापरलेली रेफरन्स बुक्स, आमच्यासारखे प्रोफेशनल असाल, तर स्टडी मटेरिअल, कॉम्प्युटर शिकला असाल, तर अर्थातच प्रोग्रॅमिंगच्या भाषांची पुस्तकं- असं प्रत्येकाकडे काही ना काहीतरी असतंच! बर, आधीच्या वर्षाची पुस्तकं आपण बिनदिक्कत रद्दीत देतो, त्यांच्या बदल्यात सहजपणे नवीन घेतो. पण ही शेवटची काही रद्दीत देववत नाहीत बघा! ही जी ’शेवटची’ पुस्तकं असतात, त्यांच्याशी शेकडो आठवणी जुळलेल्या असतात. एक तर अभ्यास करताना खाली रेघा मारलेले काही अत्यंत महत्त्वाचे परिच्छेद, ठिकठिकाणी बाण दाखवून त्यावर आपली विशेष टिप्पणी, कधी मार्करने ’आत्यंतिक महत्त्वाचं’ असं हायलाईट केलेलं, कधी लाल पेनानं, कधी निळ्या, कधी हिरव्या- अशी परिक्षेत येणार्‍या हमखास उत्तरांची गुणांच्या महत्त्वानं क्रमाक्रमानं केलेली रांगोळी, काही जागी गोल, काही जागी मिस्प्रिन्ट आहे, तिथे पेनानं स्पष्ट केलेलं, मध्येच कोणाचातरी फोन नंबर (आमच्यावेळी सर्व लॅन्डलाईन्स होत्या, नो मोबाईल्स! :)), एखादा निरोपही चक्क!

खरंतर ह्या टिप्पण्या, नोट्स सर्व वर्षांच्या पुस्तकांवर असतात. पण ह्या शेवटच्या पुस्तकांची बात थोडी अलग असते ना? पुन्हा हे असं सगळं करण्याची संधी येणार नसते. म्हणून ही पुस्तकं आपल्या जास्त जवळची! पण मग इतक्या जिव्हाळ्याची ती पुस्तकं असताना, त्यांना ठिकठिकाणचे कोपरे अन माळेच का बरं दाखवले जावेत? मुख्य ठशठशीत जागा का दिली जाऊ नये? ती कधी कोणाच्या हातात तर दिसत नाहीत. ती फक्त असतात. बस्स!

ह्याचं एक कारण म्हणजे, आजमितीला ती पुस्तकं जुनी झालेली असतात- दिसायलाही आणि कन्टेन्टप्रमाणेही. सततची नवीन टेक्नॉलॉजी, बदलत जाणारे संदर्भ, नवीनच आखलेला अभ्यासक्रम- एक ना अनेक कारणांमुळे ही पुस्तकं आजच्या घडीला ’आऊटडेटेड’ झालेली असतात. शिवाय जुनेपणाची एक पिवळी झाकही त्यांच्या चेहर्‍यामोहर्‍यावर वस्तीला आलेली असते. त्यामुळे आजच्या काळात त्यांचे व्यावहारिक मूल्य शून्य!

पण ’भावनिक गुंतवणूक’?! तीच तर गंमत आहे ना! छोट्या छोट्या गोष्टीत जिथे आपला जीव अडकलेला, तिथे आपल्याला आयुष्यभराची शिदोरी देणार्‍या पुस्तकांमध्ये आपलं सर्व ’मोठेपण’ अडकलेलं! त्या पुस्तकांमधल्या एकाचंही पान उलटलं, तरी धुळीबरोबर त्या सर्व आठवणी, ते क्षण, ते दिवस आपल्या अंगावर चालून येणार! एका सेकंदात आपण फ्लॅशबॅकमध्ये जाणार. रकान्यातल्या प्रत्येक बाणानिशी ते दिवस जिवंत होऊन आपल्याला टोचणार. ते अक्षर, त्या नोट्स, तो मजकूर पाहताच ते जुने दिवस आपल्या भोवती रूंजी घालणार. मग आपण वास्तवात येणार. शिकताना पाहिलेली स्वप्नं, ठरवलेली ध्येयं, ’आपण कायम एकत्रच राहू’ अशी मैत्रिणींना दिलेली वचनं, ’जग बदललं तरी मी बदलणार नाही’- असा त्यावेळी ठाम असलेला भोळा आशावाद आणि पाहता पाहता बदललेलं प्रखर वास्तव- कशाचाच एकमेकांशी मेळ नाही लागणार. मग आपण बेचैन होणार.

परीकथांमध्ये असतं ना- परीनं तरूणाला एक जादूचे पेटी दिलेली असते. ऐन विरहाच्या क्षणी परी त्याला ती देते अन म्हणते, तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल, तर ही पेटी कधीही उघडू नकोस. फक्त माझी तीव्रतेने आठवण झाली, की तिच्यावर हात ठेवून माझं स्मरण कर. मी तुझ्यासमोर हजर होईन. काही दिवसांनी तरूण विरहात व्याकूळ होतो आणि परीला भेटायच्या बेचैनीत घिसाडघाईनं ती पेटी उघडतो. पेटीत काहीच नसतं! उलट पेटी उघडल्याबरोब्बर धूर येतो आणि दु:खी परी त्याच्यासमोर येते अन म्हणते- तू मला दिलेलं वचन विसरलास! आता मी तुला कधीही भेटणार नाही! असं म्हणून अदृश्य होते! ही जुन्या पुस्तकांची पिशवी मला त्या पेटीसारखीच वाटते.

त्या पुस्तकांशी असतात भविष्याशी निगडीत असलेले संकल्प, भूतकाळाशी जोडलेली नाळ. पण ’आज’? आज ना त्या भूतकाळाशी आपण बांधलेलो असतो, ना तो पाहिलेला सोनेरी भविष्यकाळ आपल्या हातात असतो. आपला ’आज’ हा सर्वापेक्षा विपरीतच असतो. आपण ठरवलेलं असतं एक, पण आपण जगत असतो तो आपण कल्पनाही न केलेला तो काळ. आपण घडवत असतो ती स्वप्न काही वेगळीच असतात. ती वचनं, ते सोनेरी दिवस, ती माणसं, तो काळ- आज काहीच ओळखीचे वाटत नाहीत त्या जुन्या दिवसांसारखे. मग घालमेल होत राहते. धडपड करून आपण ते दिवस परत आणायचा प्रयत्न करू लागतो. पण ही लढाई आता आपल्या एकट्याची असते. आणि आपण त्यात अपुरेच पडतो. ’आज’ आपण ’काल’च्यासारखा घडवू शकत नाही. हे सत्य एकदा पटलं, की मग त्या पिशवीला कोपर्‍याशिवाय कोणती जागा मिळणार?

ती पिशवी आणि ती पुस्तकं एकाचवेळी हवीशीही असतात आणि नकोशीही. माझ्या दृष्टीनं तो असा एक मौल्यवान ठेवा, जो कोपर्‍यातच ठेवावा!

2 comments:

aativas said...

मध्यंतरी आकाशवाणीवर एक कार्यक्रम ऐकला होता. 'आज उपयोग नसलेल्या पण जपून ठेवलेल्या' गोष्टींविषयी लोक त्यांचे अनुभव सांगत होते. माणूस नामक प्राणी एकतर भूतकाळात जगतो अथवा भविष्यात जगतो .. ही एक गंमतच आहे!

आदित्य चंद्रशेखर said...

मला माझ्या पुस्तकांच्या कपाटाची आठवण झाली. प्रत्येक वेळेस आई मला सांगते की ती पुस्तकं आता रद्दीत तरी दे नाहीतर एखाद्या गरजूला देउन टाक! मी प्रत्येकवेळेस वेळ मारुन नेतो. शेवटी भावनिक गुंतवणूक, दुसरं काय!