२६/११च्या निमित्तानं खरंच हा प्रश्न विचारावासा वाटतो- खरंच फरक पडतो का तुम्हाला? तुम्ही- राजकारणी, मंत्री आणि मीडीयाचे प्रतिनिधी.
आज त्या हल्ल्याला एक वर्ष झालं, त्यानिमित्तानं संपूर्ण भारतदेश परत एकदा ते दु:खद, संतापजनक क्षण जगतोय- तो सुरेक्षेमधला ढिलेपणा, हलगर्जीपणा, सामान्यांचे आणि पोलिसांचे मृत्यू, तब्बल तीन दिवस चाललेला संहार, अतिरेक्यांनी मुंबईच्या नाकावर टिच्चून केलेली विटंबना..
त्यानंतर पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. कसाबचा खटला चालू आहे, शेजारचे राष्ट्र आज एक आणि उद्या एक बोलत, आपल्याला झुलवत ठेवत बाकी बलाढ्य देशांकडून कोट्यवधी डोलर्सचा निधी मिळवत परत अतिरेकी कारवायांना उत्तेजन देत आहेच. काही ठिकाणी सुरक्षा यंत्रणा बसली आणि कालांतराने परत एकदा ढासळलीही. नेत्यांनी भाषणं ठोकली सवयीनी.. त्यांना त्याचा दाह कळला का तरी? मीडीया त्यावेळी बाईटसाठी वेडी झाली, जीवावर उदार झाली, माणूसकी विसरली. शेवटी पुढे आला तो सामान्य माणूसच- असा माणूस ज्याला चेहरा नाही, पण संवेदना आहेत. आज तोच माणूस शांततेसाठी मेणबत्त्या लावेल, तर पोलिस निधीसाठी एक दिवसाचा पगार देईल.
पण ज्यांना ठोस काही करता येईल त्यांनी काय केले हो ह्या काळात? अगदीच काही नाही असं नाही- दोन निवडणूका केल्या ना- आधी लोकसभा, मग विधानसभा. त्यात सर्व शक्ती पणाला लावली. अमूक मंत्री पडावा म्हणून केलेली फिल्डींग, तमूक उभा रहावा म्हणून वापरलेलं दबावतंत्र, जागांची गणितं, करोडोंचे व्यवहार! ह्या सगळ्यात देशाचा स्वाभिमान, लोकांची सुरक्षितता कुठे लक्षात ठेवणार? आणि हे केवळ सत्ताधारी पक्षासाठी नाही, विरोधी पक्षाने काय केले? त्यांना नक्की विरोध कशाला करावा हे तरी उमगतंय का? ह्या देशातल्या सध्याच्या राजकारण्यांनी कधीतरी 'देश' ही प्रायॉरिटी ठेवली का हो? ठेवली असती, तर आज ही वेळ आली असती का? अन्य देशांनी काही विधानं केली, तर निषेध पत्रकं काढण्याशिवाय काय केलं आपण? देश आतून सुधारण्यासाठी कोणी साधा ठरावही पुढे केला नाही? आजही पोलिस खात्यात हजारो पदं रिक्त आहेत, पोलिस महासंचालक कोण?- ह्यावरही राजकारण शिजत आहे- खरंच कोणाला काय पडलंय? लाखो-करोडोंच्या पैशात हे अक्षरशः लोळतात, पण देशाच्या सैनिकासाठी, सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलिस दलासाठी पुरेशी शस्त्रास्त्रही उपलब्ध करून देऊ शकत नाही आपण? त्यावेळी नाही आणि त्यानंतरही नाही? मग कशाच्या जोरावर हे लोक श्रद्धांजली सभांचं आयोजन करतात?
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गौरवण्यात आलेला पत्रकार आज मोठमोठे लेख लिहिल, ते दिवस, त्या घटना सगळं परत जिवंत करेल. पण वर्षभर तो काय करत होता? कोणत्या वृत्तपत्राने, टीव्ही चॅनेलने 'सुरक्षा' ह्या विषयावर पाठपुरावा केला? प्रसारमाध्यमांनी का नाही वर्षभर युवकांची जागृती मोहिम राबवली? का नाही लोकशाहीमधले दबावतंत्राचे हत्यार वापरून उगवत्या पीढीची ऊर्जा मंत्र्यांना उत्तर देण्यास भाग पाडण्यात खर्ची घातली? लोकशाहीचा प्रमुख घटक म्हणून किती ताकद आहे त्यांच्याकडे ती कशात वापरली?- नको ते बाईट्स घेण्यात, सासू-सून छळात, फालतू स्टींग ऑपरेशन्समध्ये, मांजर आडवं गेलं की काय कराल? -यांमध्ये? का नाही ते पुढाकार घेत कोणत्या विधायक चळवळीत? २४ तास तुमचे कारखाने बातम्या बाहेर काढत असता, तुम्हाला कोणालाच ह्या एका विषयाची लाट उठवता आली नाही? आज मारे पानपानभर लिहाल, म्हणजे जबाबदारी संपली का? मीडीया ही राजकारणासारखीच केवळ पैश्यांचाच गणिताला बघून वार्तांकन करते यासारखं कोणतं दुर्दैव असणार?
खरंच कोणालाच काहीच फरक पडेनासा झालाय? पैसा पैसा पैसा.. इतका गैरमार्गाचा पैसा घेऊन काय करणार? असा पैसा, जो तुम्ही स्वतःला विकून उभा केलाय? असं म्हणतात की ह्या जन्मात जी पापं केली आहेत, ती ह्याच जन्मात फेडून जावं लागतं. खरंच असतं का हो असं? कारण ह्यांची पापं इतकी मोठी आहेत, की तीही ती पैसा फेकून पुण्यात बदलून घेतील. 'वजीर' नावाचा एक चित्रपट होता, त्यात शेवटी अशोक सराफाचं पात्र- माजी मुख्यमंत्री- अशा अवस्थेला पोचतो, की अगदी एकटा, एकाकी पडतो, कोणीही ओळखत नाही त्याला! पण हे आजच्या जगात शक्य नाही, कारण देवाची लाठी बसणार तरी कोणाच्या पाठी? सगळेच चोर. ह्या लोकांना कधीच मनातही शरम वाटत नाही का? आपण काय करतोय? ह्याचा परिणाम काय होणारे? किती भयानक खेळ चालू आहे हा?
आणि दु:ख म्हणजे ह्याची झळ त्यांना कधीच बसत नाही, भरडला जातो तो केवळ सामान्य माणूस- असा माणूस ज्याच्याकडे कोणतंही 'बॅकिंग' नाही, 'कनेक्शन' नाही- जो आपलं ज्ञान, कौशल्य वापरून केवळ एक चांगलं स्वच्छ आयुष्य जगू पहातोय! पण त्याला तसं जगू दिलं जात नाही. ज्यांच्या हातात सर्व बदल करण्याची शक्ती आहे, बळ आहे, ते स्वतःची अक्कल विकून बसलेत आणि जे काही करू पहात आहेत, त्यांचं आयुष्य म्हणजे एक न संपणारी शिक्षा झालीये!
तोच हा सामान्य माणूस. आज हळहळेल, व्याकूळ होईल, सरकारला शिव्या हासडेल आणि दोन मिनिटे शांतीसाठी प्रार्थना करेल.
सत्ताधारी नेहेमीप्रमाणेच निष्क्रीय रहातील, अजून भ्रष्टाचार करण्याच्या वाटा शोधतील आणि दोन मिनिटे शांतीसाठी प्रार्थना करेल.
बातमीवाले बातमी देतील 'देशवासी कटू आठवणीत शोकाकूल'.
करण्यासारखं जे काही आहे, ते कोणीच करणार नाही. २६/११ नंतर अजून एखादी तारीख येईल, अजून एक, अजून एक. निष्क्रीयपणा आणि बातम्या त्याच रहातील.
असं म्हणेन, की दुर्दैवाने जे गेले, ते सुटले. आम्ही बाष्कळ बडबड करणारे वाट बघतोय आमच्या सुटकेची.
November 26, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
>>"करण्यासारखं जे काही आहे, ते कोणीच करणार नाही. २६/११ नंतर अजून एखादी तारीख येईल, अजून एक, अजून एक. निष्क्रीयपणा आणि बातम्या त्याच रहातील."
१००% सहमत. अगदी मनातले बोललात. मी देखील अशीच उद्विग्न अवस्थेत आजची पोस्ट लिहाली. नेहमीप्रमाणे सरकारला दोष दिला आणि मोकळा झालो. मी स्वत:देखील आयुष्यभर गोर्या लोकांसाठी कोडिंग करत, देशासाठी काही न करता, असाच शरमेने मान खाली घालून निषेध नोंदवत राहणार. खरचं कुणालाही काही फरक पडत नाही.
पूर्ण सहमत आहे मी तुमच्याशी. आपण देश म्हणून, समाज म्हणून ’तुम्ही आमच्या जीवाशी असा खेळ यापुढे खेळू शकणार नाही’ असा स्पष्ट संदेश दहशतवाद्यांना देऊ शकलो नाही सबंध वर्षभरात ही अगदी लाजीरवाणी बाब आहे. नुसती चर्चा करून काय साधणार आपण?
I guess this is our time to do something! If govt. can not do this job then it's people who have to do the same
Poonam,
I definetely can feel your angst, terrorism has no short cut solutions. We certainly face grave danger from terrorists, but you can give some credit to the government that thankfully after 26.11.08, we havent seen many terrorist attacks, as compared to earlier years. So we can hope that there won't be any further in future.
***** आजची वात्रटिका *****
*********************
ज्वाला बने ज्योती
२६/११ नंतर पेटलेली
ती आग,आग राहिली नाही.
तेंव्हा जी आली होती
ती जाग,जाग राहिली नाही.
हा महिमा काळाचा की,
आम्हीच विसराळू आहोत?
आम्हांस ना देणे-घेणे कशाचे
आम्ही फक्त दिवसपाळू आहोत?
त्या लवलवत्या ज्वालांच्या
पुन्हा ज्योती झाल्या आहेत.
नका करू कुणी खुलासे,
सार्या गोष्टी ध्यानी आल्या आहेत.
झटका भोवतालची राख
आतले निखारे धगधगु द्या !
दुश्मनांची हिंमत होईल कशी?
त्यांना हे निखारे बघू द्या !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
तुझ्यासारखीच फीलींग बहुंताश लोकांची आहे, फरक सगळ्यांनाच पडतो पण सरकारला पडत नाही हेच दु:ख आहे. अतिशय छान लेख झालाय.
-अजय
धन्यवाद मित्रांनो!
nice
Post a Comment