November 6, 2009

क्रश!

रवा दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर रांगेत उभी होते.. बरीच मोठी रांग होती, हळूहळू पुढे सरकत होती.. माझ्या पुढचा एक माणूस सोडून त्याच्या पुढचा माणसाकडे माझं लक्ष गेलं आणि मला तो उगाचच ओळखीचा वाटायला लागला.. बराच ताण दिला मेन्दूला, पण काही ट्यूब पेटेना.. इतक्यात रांग पुढे सरकली, त्याचा नंबर आला, आणि आम्हीही पुढे सरकलो.. माझ्या गाडीत इंधन टाकून झालं, तोवर तो अजून पंपावरच होता.. मोबाईल कानाला होता.. बोलता बोलता त्याने सहजच मागे वळून पाहिलं आणि मला त्याचा संपूर्ण चेहरा दिसला! आणि क्लिक!!! येस्स्स्स! आठवला..

बापरे! मी कितीऽऽऽऽऽऽ वर्ष मागे गेले.. पार शाळेत- आठवीत. आमच्या शाळेने फोकडान्स स्पर्धेत भाग घेतला होता.. आधी गॅदरिंगमध्येच बसवलेला नाच अजून मोठ्या प्रमाणात बसवणार होत्या बाई.. त्या बाईही नवीनच लागल्या होत्या शाळेत.. हा त्यांच्या मुलीचा मित्र- तेव्हा बहुधा अकरावीला होता.. शाळेआधी तालमी असायच्या तेव्हा बाईंची मुलगी यायची त्यांना मदत करायला- नाचाच्या स्ट्पेस वगैरेसाठी.. तेव्हा हाही यायचा तिच्याबरोबर टेपरेकॉर्डर, माईकसाठी मदत वगैरे करायला.. आधी बहुतेक फक्त मदत म्हणून, आणि नंतर इथे बर्‍याच मुली आहेत, म्हणून नंतरही येत राहिला. आधीच तो दिसायला हँडसम वगैरे, त्यातून कॉलेजकुमार आणि आमचं टीनएज!! आम्हा तमाम (बहुधा) २४ मुलींचा (बहुतांश पहिला) (सामूहिक) क्रश एकाचवेळी झाला तो!! लख्ख आठवतात ते दिवस.. शाळेला तर लवकर जायचोच आम्ही, पण वेळ मिळाला की त्याच गप्पा.. ’आज तो तिच्याकडे बघत होता’, ’आज त्याने मस्त शर्ट घातलाय ना..’, ’आज टीचरकडे त्याचं लक्षच नव्हतं’, ’जरा जास्तच भावखाऊ आहे ना..’, ’तो ’तिच्याशी’ बोलला अगं काल, नाहीतरी त्याच्या पुढे पुढे करायचीच ती!’ इथे बाईंची मुलगी आमच्या खिजगणतीतही नव्हती हा..

फोकडान्सच्या अगदी आदल्या दिवशी रंगीत तालीम होती- ड्रेपरी आणि आमचं आकर्षण म्हणजे मेकप! शिवाय ’तो’ असणार प्रॅक्टीस बघायला, म्हणून जास्तच काळजीपूर्वक रंगरंगोटी केलेली प्रत्येकीने! आणि जसा सामूहिक क्रश झाला, तसाच सामूहिक प्रेमभंगही!! तो चक्क त्या दिवशी त्याच्या अजून एक मैत्रिणीबरोबर आला!! मैत्रिण एकदम मस्त होती (हे तेव्हा मान्य करणं जडच गेलं होतं, हा भाग वेगळा!). ती आता त्याची बायकोच झालीच ह्या खात्रीने आम्हीच आमचे पत्ते कट करून टाकले!! लगेच काहीकाही मुलींनी शहाणपणा करत ’मला नाहीतरी तो जादाच वाटत होता’ वगैरे म्हणत ’आम्ही कशा शहाण्या’ वगैरे ठसवण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यांनाच सगळं ठाऊक होतं!

असो! त्याला बघितल्याबरोब्बर कुठलं कुठलं कायकाय आठवलं! आता मी त्याच्याकडे पाहिलं. अगदी मुद्दाम- असं काय होतं बरं त्याच्यात? आज पाहिलं, तर काहीच नाही सापडलं.. नेहेमीसारखाच साधा माणूस होता.. जिथे मी गृहिणी झाले, तिथे तोही गृहस्थ झालाच की! (मनात त्याचं वयही काढून पाहिलं ;-)) हे जाणवल्यानंतर मात्र थोडीश्शी निराशा झाली हं.. म्हणजे जो आपला ’फर्स्ट क्रश’ होता, तो तसाच हँडसम हंक न रहाता, साधा बाईकवर फिरणारा, नोकरीबिकरी करणारा, भाजी-बिजी आणणारा, पेट्रोल भरायला येणारा सामान्य माणूसच असावा ना? हाय रे दैवा वगैरे.. :-)

त्यावरून आठवलं- थोडी मोठी असेन तेव्हा, पण असाच महा-क्रश होता ’मिलिंद सोमण’वर! हाऽऽऽऽय! वगैरे.. पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा मस्त लांब केस होते त्याचे, काय स्माईल होतं, मधूबरोबरचं अफेयर, ’तो’ फोटो- एकदम फॉर्मात होता.. स्विमिंग चॅम्प असल्याने बांधेसूद शरीर, उंची, देखणा चेहरा, किलर हास्य- आहाहा! कोणत्याही मुलीच्या ’स्वप्नातला राजकुमार’ लेबलखाली पर्रफेक्ट! आणि अगदी तितकं ’आहा’ नसलं, तरी अगदी आत्तापर्यंत मला मिलिंद सोमण आवडायचा.. ह्म्म.. म्हणजे अजूनही आवडतो, पण जरास्सा, बारीकसा भ्रमनिरास झाला ’गंध’ पाहिल्यानंतर- त्याचं मराठी ऐकल्यानंतर! लूक्सच्या बाबतीत प्रश्नच नाही.. साहेब चाळीशीत पोचूनदेखील असे फिट की अजूनही बघऽऽत रहावे! पण त्यांनी मराठी बोलू नये बाबा.. कसलं ते इन्ग्रजाळलेलं, मुद्दाम प्रयत्न करून बोललेलं मराठी? बर्‍याच जणांनी त्याचंही कौतुक केलं म्हणा, पण ’सोमण’ असून ऍक्सेन्टेड मराठी? अंहं, मला तरी पटलं नाही..

असो, ह्या दोन्ही क्रशांमुळे आज ’आपण किती येडचाप होतो’ हे परत एकदा सिद्ध झालं म्हणा, तरी मस्त फ्रेश वाटलं. त्या निमित्ताने मी कुठे कुठे फिरून आले- तो पहिला क्रश- आत्ता तो सामान्य असला, तरी एकेकाळी तो आमचा हीरो होता, हे नाकारता येणार का? पाच मिनिटात त्याने किती जुन्या गल्लीत नेऊन आणलं मला! त्या निमित्तनं शाळेतले नाच, त्यावेळचं सळसळतं वातावरण, कमेन्ट्स, नाचात जावं म्हणून बाईंची केलेली भलावण, मैत्रिणीला दिलेला पाठींबा, तिच्यासाठी बाईंची केलेली मनधरणी.., कायकाय आठवलं! आज त्यातल्या कित्येक मैत्रिणींच्या अजूनही टचमध्ये आहे, तर त्यातल्या अजून कितीतरी कुठेकुठे गेल्यात काय माहिती? टीचर भेटतात, त्यांचं वय झालेलं मात्र सहन होत नाही!

मिलिंद सोमणने तर कॉलेजमध्ये नेलं मला.. अजूनही आठवतंय- त्याचा ’तो’ बहुचर्चित फोटो- इतका घाबरत घाबरत, लाजत लाजत पाहिला होता, आणि अक्षरश: क्षणभर बघून धडधडत्या काळजाने गप्पकन ते पान बंद करून टाकलं होतं.. मधु सप्रेचं लग्न झाल्यानंतर ’आता त्याचं कसं होणार’ वाटून बरेच दिवस अस्वस्थ होते.. ’कुठे तो, कुठे आपण’ असे प्रॅक्टीकल विचारही केला नाही तेव्हा.. कम ऑन, मिलिंदचा प्रेमभंग, म्हणजे मला त्याच्याइतकं वाईट वाटणारच ना! ज्यांना तो आवडायचा नाही, त्यांच्याशी वाद घालघालून तो कसा बेस्ट आहे हे पटवण्यात अनेक तासही घालवले.. त्याकाळी त्याची आलेली प्रत्येक मुलाखत ऐकली, वाचली, बघितली होती..

हे क्रश म्हणजे तरी काय होते? मिलिंद सोमणतर अप्राप्यच, पण ’तो’ मुलगाही.. त्याचा ’तसा’ विचार कधी नव्हता केलेला.. तेवढी अक्कल, समज नव्हतीच तेव्हा.. पण अडोलसन्समध्ये पदार्पण आपण केलंय ही जाणीव त्याच्यामुळे झाली हे नक्की. हे काहीतरी वेगळं आहे, वेगळं असतं हे कळलं होतं.. कसल्या हुरहुरत्या गोड भावना त्या.. त्या परत आठवतानाही मज्जा वाटली.. वाह! काय साधे सोपे मस्त अन्कॉम्प्लिकेटेड दिवस होते ना ते.. जुन्या गोष्टींचं असंच असतं ना? कोणत्या क्षणी कोणती जुनी वस्तू, आठवण, माणूस आपल्या कोर्‍या मनासमोर येईल आणि कोणत्या गावाला आपल्याला घेऊन जाईल काहीच सांगता येत नाही! त्यात्या क्रशच्या निमित्तानं मस्त ट्रीप टू द नॉस्टॅलजिया लेन झाली.. त्या क्रशांचं पुढे काही झालं नाही, तरी ह्या ट्रीपसाठीतरी त्यांचे आभारच!

11 comments:

कांचन कराई said...

मिलिंद सोमण हे माझं फर्स्ट क्रश बरं का! मीही त्याला त्याच रुपात पाहिलं होतं. लांब मानेवर रुळणारे केस.... तेव्हा दहावीत होते मी. मैत्रीणी अजूनही मिलिंद सोमणबद्दलची एखादी बातमी वाचली की मला फोन करून सांगतात. इतकं हे क्रश बहुचर्चित झालं होतं.

Anonymous said...

सही आहे. एवढं छान प्रामाणिकपणे क्रश बद्दल लिहिणं सोपं नसतं विशेषत: लग्नानंतर. मला तर माझे क्रश मान्य करणं पण जड जातं.
मुली एक्सप्रेसिव असत्या तर भारतात लव्ह मॅरेजेसचा टक्का वाढला असता हे मात्र नक्की.

Parag said...

mast lihilays.. :)

Nanatar chya "milind" baddal nahi ka kahi?? ;) :D

Monsieur K said...

ekdam mast :)

Heramb Oak (हेरंब ओक) said...

mast zalay lekh.. pahila crush "to" aani dusra crush direct milind soman :) ha ha .. crush pan andhal ch asat mhanayach :)

कोहम said...

hehehe sahi...

poonam said...

धन्यवाद सगळ्यांना! कांचन, अजूनही आवडतो ना मिसो? :) एकदा आवडला, की नेहेमी आवडत रहातो तो ;)

पराग, केतन, कोहम- सगळे नुस्तेच हसताय म्हणजे नक्कीच आपापले ’क्रश’ आठवले ना? :)

पण मला क्रशपेक्षा, किंवा क्रशबरोबर ते धमाल दिवसच जास्त छान वाटतात आज.. त्या काळात राहून येते मी.. आजच्या रहाटगाडग्यामधून तेवढीच सुटका! :)

Harshad said...

Perfect about "Wonder Years"

Anonymous said...

zakas Poonam . Kharech majaa aali wachun , majha me 7th std madhe asatanacha asach eka crush athawala . Aata athawun wedepanach watato to . Pun tu solid manmokala lihilayas . Mast .

attarian.01 said...

Poonam kharch zakaas liahtes . mala jast bolata yet nahi samajoon ghe . tuza praamanikpana khupch aawadato..

Anonymous said...

'Soman' asoon marathi accents kadhun bolalela patla nahi ka :)? What abt amruta kahnvilkar and her mingraji , pallavi joshi and her mingraji!