October 20, 2009

वैशाली सामंतबरोबर साधलेला संवाद

नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर ’मायबोली’(www.maayboli.com)चा दहावा दिवाळी अंक प्रकाशित झाला. विविध प्रकारच्या साहित्याने नटलेल्या ह्या अंकात मला या वर्षी ’वैशाली सामंत’ची मुलाखत घ्यायची सोनेरी संधी मिळाली. ही मुलाखत इथे देत आहे. उर्वरित वाचनीय अंक जरूर ’मायबोली’वर येऊन वाचा..
------------------------------------------------

'वैशाली सामंत' - मराठी चित्रपटांच्या पार्श्वगायनामधलं आजचं आघाडीचं नाव, आजची 'स्टार'! तिचं नुसतं नाव जरी घेतलं, तरी एका पाठोपाठ एक कितीतरी लोकप्रिय गाणी आठवतात, 'सारेगमप लिटिल चँप्स'मधलं तिचं आश्वासक रूप आठवतं, एक कलाकार म्हणून चांगल्या गाण्याची असलेली आस जाणवते. तिची मुलाखत घ्यायची इच्छा होती, पण तिचा असलेला अतिशय व्यग्र दिनक्रम, ध्वनिमुद्रणं, गाण्याचे कार्यक्रम.. अर्धा तासही रिकामा सापडणं अवघड होत होतं. तरीही फोनवर दिलगिरी व्यक्त करत, पुढच्या तारखा देत देत, एके दिवशी थोडा वेळ मिळाला.



वैशालीला पाहिल्या पाहिल्या जाणवतं, ते तिचं अत्यंत साधं व्यक्तिमत्त्व.. ना वृथा मेकअप् ना भडक कपडे.. अगदी 'गर्ल नेक्स्ट डोअर'! "मला 'अगं'च म्हण," असं भेटल्याभेटल्या सांगितलं तिने मला. मुलाखत इतकी पुढे-पुढे गेली, याची माफीही मागितली. इतका मोकळेपणा पाहून मीच सेकंदभर अवघडले. अत्यंत गोड आवाज, साधी राहणी, आल्याआल्या चहा-कॉफी विचारत, एकीकडे मोबाइलवर महत्त्वाचे फोन घेत तिने सर्व प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरं दिली. अत्यंत मोकळ्या वातावरणात झालेला हा संवाद:

आज 'वैशाली सामंत' हे नाव घराघरांत पोचलं आहे. अवधूत गुप्ते यांच्याबरोबर केलेल्या 'ऐका दाजीबा..'ने या प्रवासाची सुरुवात झाली. या काळाच्या आधीची वैशाली सामंत कुठे होती, काय करत होती?
वैशाली: आधीची वैशाली सतत नवीन कामाच्या शोधात होती. फार आधीपासून मी ठरवलं होतं, की आपल्याला आपलं, स्वतःचं गाणं करायचंय, वाढवायचंय. त्यामुळे मी सतत नवीन संधीच्या शोधात होते. एक गोष्ट निर्विवादच आहे, की जुन्या लोकांनी - गायक, संगीतकार - या सर्वांनी अजरामर काम करून ठेवलंय. एकेक नाव जरी घेतलं, तरी नतमस्तक व्हायला होतं त्यांच्यासमोर. पण त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवूनदेखील मला सतत असं वाटायचं, की हे थोर लोक आपापलं काम करून गेलेत. त्यांना आपण त्यांच्या कामांमुळे ओळखतो. असंच आपलंही नाव व्हायला हवं. हं, अगदी सुरुवातीच्या काळात मीही मान्यवरांची गाणी गायली, तशी त्याकाळची गायकी आत्मसात करून घेत गायली. ते गाताना मला मजाही वाटली, पण त्याचबरोबर हे सतत ठाऊक होतं, की इथेच आपल्याला थांबायचं नाहीये. मी माझ्या स्वतःच्या कामाच्या चाचपणीत होते. त्यासाठी नवीन लोकांच्या शोधात, नवीन कामाच्या शोधात होते.

आणि 'ऐका दाजीबा'ने मराठी पॉप संगीत जन्माला आलं..
वैशाली: 'ऐका दाजीबा' इतकं प्रचंड हिट होईल, याची आम्हांला कोणालाच इतकी कल्पना नव्हती. ते प्रोजेक्ट खूप इंटरेस्टिंग, एक्सायटिंग होतं. काम करताना तर धमाल येत होती. सर्व टीम नवीन, तरूण होती. पण शेवटी लोकांना ते पसंत पडेल की नाही, ही धाकधूक होतीच. गाण्याची सीडी आली आणि त्यावेळेच्या ट्रेंडप्रमाणे त्यावर व्हिडिओही करायचे ठरले. खरी कमाल त्या व्हिडिओमुळे झाली. तो लोकांपर्यंत एका झटक्यात पोचला. त्या रीमिक्समधला ठेका, रिदम आणि चित्रीकरण एकमेकांशी पर्फेक्ट जुळलं आणि 'ऐका दाजीबा' हिट झाला.

सहसा गाणी गाताना असं जाणवलं आहे का, की उडत्या चालींची गाणी, अशी गाणी ज्यांचे शब्द काहीही असले, तरी त्यांच्या चालींत ठेका आहे, अशी गाणी हमखास चालतात? उदाहरणार्थ - 'कोंबडी पळाली..' हे गाणं..
वैशाली: नाही, असं जनरलायजेशन नाही करू शकणार आपण. 'कोंबडी पळाली..'चंच उदाहरण घेऊन सांगता येईल - वरवर पाहिलं, तर त्या शब्दांना काहीच अर्थ नाही असं वाटतं, पण त्यातल्या प्रत्येक शब्दात एक रिदम आहे. ठराविक शब्दांनंतर आपोआप एक लय येत जाते. शिवाय, चित्रपटात ते गाणं अगदी व्यवस्थित येत होतं - त्या चित्रपटातला हीरो कोंबड्या पाळत असतो, त्याला नीट बोलता येत नसतं, म्हणून तो कोंबड्यांचा आवाज काढत असतो - हे सगळं त्या गाण्यामधून येत होतं. नुसतेच एकामागून एक शब्द नव्हते ते. उलट त्या शब्दांमुळे गाणं आपोआप तयार होत गेलं. ते सगळं इतकं सोपं होत गेलं आणि म्हणूनच लोकांपर्यंतही अगदी सहज पोचलं. त्या गाण्यात त्याचे शब्द आणि गाण्याची चाल यांचं मोठं योगदान होतं.

पण म्हणून सगळीच अशी गाणी हिट होतील का? तर अर्थातच नाही. प्रत्येक गाणं स्वतःचं नशीब घेऊन जन्माला येतं. त्या कवीलादेखील हे माहीत नसतं, की ह्या गाण्याचं पुढे काय होणार आहे. तो चार शब्द लिहून जातो, संगीतकार त्याला एक चाल लावून जातो, पण शेवटी त्या गाण्याचं नशीबच त्याला तारून किंवा मारून जातं. असा हिट गाण्यांचा ठराविक फॉर्म्यूला असता, तर सगळं सोपंच झालं असतं ना? 'कोंबडी..' सारखंच तंतोतंत गाणं उद्या कोणी केलं, तर ते तितकंच चालेल असं नाही. आज इतक्या वर्षांनंतरही शांताबाई शेळके, सुरेश भट यांची गाणी, गझला आमच्याकडे पहिल्यांदा गाण्यासाठी येतात - त्या कविता त्यांनी कितीतरी आधी लिहून ठेवल्या आहेत, पण त्यांचं 'गाणं' आज होतंय. हे त्या गाण्याचं लक! आणि अशीसुद्धा कितीतरी गाणी आहेत, जी अप्रतिम आहेत - चाल, शब्द एकसे एक. तरी पण ती चालत नाहीत, लोकांना आवडत नाहीत. त्यामुळे आधी म्हटलं तसं, अमुक एक गाणं हिट होईल का, चालेल का, हे त्या गाण्याचं नशीबच ठरवतं. आपण फक्त त्यातलं आपलं काम मनापासून करायचं!

श्रोता 'तयार' करता येतो का? 'पब्लिकला हे आवडतं' असं म्हटलं जातं; त्या पब्लिकच्या आवडीत बदल करता येऊ शकतो का?
वैशाली: श्रोते तयारच असतात, त्यांना 'तयार' करायला लागत नाही. आपण काही वेगळं करून श्रोत्यांचा कल आजमावू शकतो. जे जे उत्तम, ते ते स्वीकारायला श्रोते कायमच तयार असतात. आत्ता कदाचित एका गीतप्रकाराला श्रोते नसतील, पण उत्तम प्रकारे ते गीत, तो प्रकार लोकांपुढे आणला, तर त्याला नक्कीच श्रोता, रसिक मिळतो हा अनुभव आहे. आत्ता आपण सहज म्हणून जातो, की 'हे पब्लिकला आवडणार नाही', पण योग्य वेळी ते लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोचवलं, तर लोक ते स्वीकारतील देखील! का नाही? 'तयार'च कोणाला करायचं असेल, तर ते आर्टिस्टला तयार करावं लागतं - श्रोत्यांना जे आवडतं ते त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी.

'सारेगमप लिटिल चँप्स'चा अनुभव कसा होता?
वैशाली: खूपच छान. इतकं टॅलेंट आपल्याकडे आहे, हे पाहूनच थक्क व्हायला होतं. सगळीच मुलं गात तर अप्रतिम होतीच; पण इतकी निरागस होती, की कार्यक्रम आपोआपच रंगत गेला. मी आणि अवधूत खूप लहानपणापासून गात आहोत. हे स्टेज, तिथे गाणं, स्टुडियो, लाइट्स याचं नाही म्हटलं, तरी एक दडपण येतं. आम्ही त्यातून गेलो, तेव्हा आम्हांला समजावणारं कोणी नव्हतं, आम्ही आपापलेच शिकलो. पण त्या वेळी आपली अवस्था कशी झाली होती, ते तर आताही आठवतंय! त्यामुळेच ह्या मुलांना शक्य तितकं मोकळं करायचं, त्यांचं गाणं मुक्त करायचं यासाठी आम्ही मुद्दाम प्रयत्न केले. सतत त्यांना धीर देत, समजावत होतो, चक्क मैत्री झाली त्यांच्याशी. आणि ही मुलंही सगळी स्मार्ट होती. मला गंमत वाटते, आम्ही लहान असताना गात होतो, तेव्हा परीक्षकांशी मोकळेपणाने आपण बोलू शकू, ही कल्पनाही मनाला शिवत नव्हती! आणि आता ही मुलं बिनधास्त जवळ येतात, शंका विचारतात, गप्पा मारतात.. मस्त वाटतं बघायला.

एकंदर 'सारेगमप लिटिल चँप्स' हे पर्वच सर्वाधिक गाजलं..
वैशाली: हो, याचं कारण, या मुलांत असलेली गुणवत्ता! शिवाय इनोसन्स. आणि आम्ही मुलांशी मोकळेपणाने वागलो, तरी मार्गदर्शनात कसूर केली नाही. उगाच ड्रामेबाजी, रडारड ही आपल्या मराठी 'सारेगमप'त कधीच होत नाही, कारण आपला भर गुणवत्तेवर असतो. हे सगळं ऑडियन्सपर्यंत पोचतं माहित्ये का.. त्यामुळे तशा प्रतिक्रियाही येतात. लोकांना आवडतंय, पटतंय, आपण योग्य मार्गावर आहोत हे समजलं, की प्रोत्साहन, शाबासकी मिळाल्यासारखी वाटते. 'सारेगमप'च्या निमित्ताने मला अक्षरशः हजारो पत्रं आली. कित्येक आजी-आजोबांनी पत्राने, फोनवर, मी लाईव्ह प्रोग्राम करते तिथे रांगेत उभं राहून वगैरे आवर्जून कळवलं, की 'छान समजावता हं मुलांना', 'ते आम्हांला आमच्या घरातलेच वाटतात' वगैरे.. हे पाहून तर मला भरूनच यायचं. बस, यापेक्षा चांगल्या कामाची अजून काय पावती मिळणार?

तू अनेक लाईव्ह कार्यक्रम करतेस, तो अनुभव कसा असतो?
वैशाली: आपल्याकडचे लाईव्ह कार्यक्रम खरोखर 'लाईव्ह' असतात.. दोन्ही अर्थी - पब्लिकची, श्रोत्यांची प्रचंड इन्व्हॉलव्हमेंट असते कार्यक्रमांत, गाण्यांत. शिवाय आपल्याकडे सर्व गायक ९९% वेळा लाईव्ह शोला लाईव्हच गातात. 'लिप-सिंक' अगदी अपवादात्मक - म्हणजे अगदीच वेगवेगळ्या मेलडी वापरल्या असतील, खूप वरच्या पट्टीतलं गाणं असेल तर. पण तेव्हाही शक्यतो स्वतःच गायचा प्रयत्न असतो. सर्व गाणी लिप-सिंक केली आहेत, असं होत नाही. आणि खरंच, आपला प्रेक्षक इतका चाणाक्ष आहे, की असलं काही केलं तर तो खपवूनही घेत नाही. एक किस्सा सांगते, आम्ही एका ईशान्येकडील राज्यात कार्यक्रम करत होतो - हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होता एका कॉलेजमध्ये. आमच्यासोबत होता एक पंजाबी गायक.. तो स्टेजवर गेला आणि रेकॉर्डवर गायला-नाचायला लागला की! बापरे! काय दंगा केलाय मुलांनी! चपलाच पडायच्या राहिल्या होत्या स्टेजवर! त्यांचं म्हणणं, 'गायला आला आहात, तर गा'. मग शेवटी 'शान' स्टेजवर आलापी घेत गेला. मुलांना कळलं, की तो स्वतः गातोय, तेव्हा शांत झाले सगळे. त्या गायकानेही माफी मागितली आणि मगच कार्यक्रम पुढे सुरळीत पार पडला.

मुख्य काय असतं, की परदेशातल्या लाईव्ह कार्यक्रमांत त्या गायकांनी नाचणं, प्रेक्षकांमध्ये उड्या मारणं, हे सगळं गातागाताच करणं अपेक्षित असतं. तो एक 'परफॉरमन्स' असतो, एक 'मैफल' नाही. त्या ऑडियन्सला त्याची सवयही असते, त्यामुळे लिप-सिंक कोणी मनावर घेत नाही. पण आपला प्रेक्षक गायकाला गायक म्हणून बघणंच प्रिफर करतो.

पण सध्या 'परफॉरमन्स'वर खूप भर दिला जातो, गायकाचं दिसणं हे गाण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं होऊ लागलंय का?
वैशाली: पूर्वी काय होतं, की पार्श्वगायक/गायिका हे खरोखर पार्श्वभूमीलाच असायचे. असे स्टेज शो, लाईव्ह कार्यक्रम कधी होते? लोक आवाजाने गायक/गायिका ओळखायचे. पण जसजसे हेही लोक लोकांपुढे यायला लागले, तसा त्यांच्या दिसण्यातही एक प्रकारचा नेटकेपणा आला. आजच्या टॉपच्या हिरॉइनसाठी 'ही' गाते म्हटल्यावर, 'हिचीही' एक प्रतिमा मनात निर्माण झालेली असते. लोकांसमोर आपण येतोय म्हटल्यावर कायम मागे असणारे लोक स्वतःच्या दिसण्याबद्दल थोडे जागरूक झाले. आणि त्यात काही चूकही नाहीये. आज अगदी आशाताईंनी एखादा लाईव्ह कार्यक्रम केला, तर त्यांच्या गाण्याबरोबर त्यांच्या साड्या, त्यांचे दागिने याबद्दलही चर्चा होते. त्यामुळे एका लिमिटपर्यंत हे ठीकही आहे. पण त्यामुळे 'गाणं मागे पडतं' हे काही खरं नाही. आम्ही आधी कलाकार आहोत. गाण्यामुळे आम्ही आहोत. लोक आम्हाला आमच्या गाण्यामुळे ओळखतात, दिसण्यामुळे नाही. तुम्ही दिसलात कितीही सुंदर, तरी शेवटी लोकांच्या मनांत तुमचं गाणंच राहणार.

हां, आता आपल्याकडे 'परफॉरमन्स' म्हणजे काय, तर लाईव्ह कार्यक्रमात गायकाने घट्ट एका जागी उभं राहून, समोरच्या कागदावरचं गाणं गाण्यापेक्षा, तो जर स्टेजभर फिरला, प्रेक्षकांशी अधूनमधून नजरानजर केली, त्यांनाही गाण्यात सामावून घेतलं, तर तो परफॉरमन्स नक्कीच जास्त रंगतो. पण यामुळे गाण्यातलं लक्ष कमी होणार असेल, तर त्याने नक्कीच तसं करू नये. गाणं डिलिव्हर करता करता त्याने हेही तंत्र आत्मसात करून घेतलं, तर कार्यक्रमात जास्त मजा येते, प्रेक्षकांनाही कार्यक्रमात एक इनव्हॉल्व्हमेंट जाणवते. म्हणून गाणं नुसतंच गाण्यापेक्षा परफॉर्म करणं चांगलं. त्यामुळे उत्तम गायकाने थोडं हेही अंग आत्मसात केलं, तर दुधात साखर.

लाईव्ह कार्यक्रमासाठी गाण्यांची निवड कशी करतेस?
वैशाली: कार्यक्रम कुठे आहे, त्याप्रमाणे गाण्यांची निवड थोडी पुढे-मागे होते. काही गाणी अशी आहेत, की ती प्रत्येक प्रकारच्या ऑडियन्समध्ये हिट होतात. त्याव्यतिरिक्त काही गाणी अशी आहेत, जी अमुक एका श्रोतृवर्गालाच आवडतात, त्यामुळे तशी गाणी आवर्जून घेतो. कधीकधी अजून जे गाणं मार्केटमध्ये आलेलं नाहीये, पण जे त्यांना आवडू शकेल असं वाटतं, तेही घेतो. रिहर्सल करताना अर्थातच आम्ही सर्व गाण्यांची तयारी करून घेतो, म्हणजे ऐनवेळी कोणतंही गाणं घेता येतं. कधीकधी ऑडियन्सचा मूड पाहून तयार गाण्यांच्या सीक्वेन्समध्येही पुढे-मागे करावे लागते. मी आधी म्हटलं ना, लाईव्ह कार्यक्रम म्हणजे एकदम लाईव्ह असतो.. पडद्यामागे आणि पुढे सतत काहीतरी होत असतं.

आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटनांचा लाईव्ह कार्यक्रमांत गाताना किंवा गाणं ध्वनिमुद्रित करताना किती प्रभाव जाणवतो?
वैशाली: गाण्याचं असं आहे, की कधीकधी अगदी अवघड गाणं एका दिवसात होतं, तर कधीकधी अगदी साधी फ्रेजही घ्यायला दोन-दोन दिवस लागू शकतात. त्याचा आणि मूडचा, किंवा इतर काही कारणांचा तो परिणाम असेल असं नाही. स्टुडियोमध्ये काय किंवा लाईव्ह काय, आम्ही सर्वच प्रोफेशनल आहोत, त्यामुळे त्या वातावरणात शिरताना, वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवूनच शिरतो. 'लाईव्ह' गाणं ही तर इतकी मोठी जबाबदारी असते, की एकदा तुम्ही त्या वातावरणात शिरलात, की बाकीचा काही विचार करायला फुरसत मिळत नाही. एका अर्थाने, तुमची मनःस्थिती ठीक नसेल काही कारणाने, तर उलट अशा कार्यक्रमांमुळे ती विसरायला मदतच होते.

तुझी आजवरची 'हिट' गाणी पाहिली, तर बहुतांशी आयटम साँग्ज म्हणतो, अशी सर्वाधिक गाजली.. अशा गाण्यांमुळे तशीच नवीन गाणी तुझ्याकडे येतात का, किंवा अशामुळे आपण एका प्रकारचीच गाणी गातोय असं वाटतं का?
वैशाली: मी सर्व प्रकारांची गाणी गाते. आयटम साँग्जचं काय होतं, की ती गाणी जास्त वेळ लोकांच्या लक्षात राहतात, म्हणून त्यांना प्रसिद्धी जास्त मिळते. पण मी अगदी सॉफ्ट, रोमँटिक गाणी, गझल्स ते पॉपपर्यंत सर्व गाणी गाते. सुदैवाने संगीतकारदेखील माझ्याकडून सर्व प्रकारांची गाणी गाऊन घेतात. मीही सतत नवीन प्रकारच्या गाण्यांच्या शोधात असते. गाण्यात एक्सपरिमेंटिंग मला आवडतं. ताल, ठेक्याची गाणीही तितकीच आवडतात, जितकी गझल, शांत गाणी.

तू स्वतः एक संगीतकार म्हणूनही काम केलं आहेस..
वैशाली: मी अगदी 'अचानक संगीतकार' झाले! ठरवून नाही. काही वर्षांपूर्वी केदार शिंदेबरोबर बसले होते, तेव्हा त्याने 'यंदा कर्तव्य आहे'ची पटकथा ऐकवली. ती ऐकता ऐकताच 'वी आर हनीमूनर्स' हे गाणं मला सुचलं, अगदी शब्द न् चालीसकट! केदारनेही ते गाणं सिनेमात घेतलं. हे माझं पहिलं गाणं - एक संगीतकार म्हणून. त्यानंतर 'गलगले निघाले' आणि आता रमेश देव प्रॉडक्शन्सचं एक पिक्चर येतंय, ज्यात चार गाणी केली आहेत. संगीत देण्याआधी मी खूप विचार करते, त्या कथेबद्दल, पात्रांबद्दल, गाणं कुठे येणार आहे त्या सीनबद्दल.. खूप वेळ देऊन मनापासूनचा प्रवास असतो तो, जो मला बेहद्द आवडतोय. याशिवाय काही अल्बमदेखील करत आहे. हे चक्र डोक्यात सतत फिरत असतं, पण संगीत देणं एक हॉबीच आहे सध्यातरी. मी आधी एक गायिका आहे, त्यानंतर एक संगीतकार.

सध्या गाण्याचं ध्वनिमुद्रण करताना द्वंद्वगीत असलं तरी गायक-गायिका वेगवेगळे येऊन, आपापले ट्रॅक गाऊन जातात. यामुळे गाण्यातली केमिस्ट्री कमी होते असं वाटतं का?
वैशाली: आता बहुतेक संगीतकारांशी आणि गायकांशी इतकं व्यवस्थित ट्युनिंग जमलंय, की एकत्र जरी गायलो नाही, तरी साधारण अंदाज येतो, की ही जागा किंवा या ओळी हा गायक कसा घेईल आणि त्याप्रमाणे आपल्या गाण्यात सहजपणे छोट्या जागा, हरकती घेता येतात. एखाद्या गायकाबरोबर आधी काम केलं नसलं, तरी त्याची इतर गाणी ऐकूनही असा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे एकत्र गायलो नाही, तरी फरक पडत नाही.

सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान तू स्वतः किती वापरतेस? तुझे स्वतःचे संकेतस्थळ आहे का?
वैशाली: इंटरनेट या माध्यमाचा मी बराच वापर करते. इंटरनेट हे आजच्या जगातलं अत्यंत ताकदवान प्रसारमाध्यम आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. असे आमचे कित्येक श्रोते आहेत, जे लोकांमध्ये आमच्या नेहेमीच्या माहीत असलेल्या गाण्यांपेक्षा वेगळी गाणी इंटरनेटवरून डाऊनलोड करून ऐकतात, व आम्हांला प्रतिक्रियाही देतात. हा इंटरनेटचा श्रोताही थोडा वेगळा आहे. अधिक शिक्षित, उच्चभ्रू, गाण्याची ठराविक आवड जोपासणारा, नव्या कल्पनांचं स्वागत चटकन करणारा असा. माझी स्वतःची वेबसाईट अजून सुरू नाही केलेली मी, कारण मला तिला पूर्ण वेळ द्यायचा आहे. पण नाव रजिस्टर करून ठेवले आहे, लवकरच ती सुरू होईल. याशिवाय ईमेलवर मी नेहमी असते, बरेच काम तिथूनही करत असते.

'मायबोली' या मराठी संकेतस्थळाबद्दल माहिती आहे का?
वैशाली: हो तर. मी स्वतः मायबोलीची सदस्य आहे. मायबोलीवरच्या कविता विभागात मी जमेल तेव्हा चक्कर मारत असते. कित्येक सुंदर कविता तिथे लिहिलेल्या असतात, ज्या मी आवर्जून वाचते. विवेक काजरेकर, वैभव जोशी या मायबोलीकरांबरोबर तर मी अल्बमही केले आहेत. तुमचे दिवाळी अंकही मी पाहिलेत. सही साईट आहे तुमची. एकदम गुणी, कलाकार लोक दिसत आहेत तिथे. सर्व मायबोलीकरांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

2 comments:

Mahedra said...

छान जमली आहे मुलाखत. पण अजुनही नविन काय करणार? लोक संगितामधे कॉंट्रिब्युशन करण्याबद्दल वैशालीची काय मतं आहेत? मराठीचा उपयोग हिंदी मधे कामं मिळण्यासाठी करणार का- की मराठी मधेच पुढे जाणार ? हे प्रश्न राहिलेत असं वाटतं..

poonam said...

धन्यवाद महेन्द्र.. बरोबर आहेत तुमचे प्रश्न.. ह्या प्रश्नांनी अजूनच मजा आली असती, पण आम्हाला फारच अपुरा वेळ मिळाला, आणि गडबडही फार झाली :( तरीही मुलाखत आवडल्याचं सांगितल्याबद्द्ल आभार