July 7, 2009

वाडा!

पल्या पिढीपैकी बर्‍याच जणांचं बालपण वाड्यात किंवा चाळीत गेलं असेल. माझंही लहानपण आमच्या वाड्यात सुखाने गेलं..’आमचा वाडा’ म्हणत्ये मी.. म्हणजे कोणाला वाटेल की आमच्या मालकीचाच होता की काय! नाही, नाही आम्ही साधे भाडेकरू होतो, वाड्यातल्या इतर सहा भाडेकरूप्रमाणेच. मूळ बिर्‍हाड माझ्या आजी-आजोबांचं, पार १९५१ पासून. माझ्या वडीलांचं आणि आत्याचं शिक्षण, लग्न, त्यांच्या मुलांची बारशी सगळं इथेच. मग नोकरीनिमित्त आई-वडीलांनी पुण्याबाहेर काही वर्षं काढली आणि मी चार वर्षाची असताना पुन्हा आलो आम्ही ’आमच्या’ खराडे वाड्यात.

वाडा होता चांगलाच ऐसपैस, पण घरं लहान, तीन खोल्यांची. अंगणच भलं मोठं.. दोन भागात विखुरलेलं- मध्ये आणि आजूबाजूने घरं. घरांना भिंती कमी आणि खिडक्यांना जास्त- त्याजी गजाच्या.. त्यामुळे नुसती मान उंच केली, की शेजारघरी काय चालू आहे ते दिसायचं.. वाड्याला एन्ट्रीला भलामोठा दिंडी दरवाजा.. त्यामुळे तो लावला की ’व्होल वावर इज आवर्स’!! सर्वांचा मुक्काम घराबाहेरील अंगणातच. उन्हाळ्यात तर गाद्या घालून रात्रीही अंगणात!! या अंगणाने हरेक कुटुंबातील लग्न, मुंजी, बारशी पाहिली.. फक्त बिर्‍हाडकरूंची नाहीत, तर त्यांच्या नातेवाईकांचीदेखील!!

वाड्यात भरपूर मुलं होती.. आणि कोणाचं आजोळ म्हणून, कोणाचं बहिणीचं घर म्हणून अशी येणारी पाहुणी मुलंही सतत असायची.. त्यामुळे खेळगड्यांची कमी कधीच जाणवली नाही. त्यातून उपटणारे रुसवे-फुगवे, राग, मत्सर, भांडणंही अगदी सर्रास! त्यामुळे माझ्याच वयाच्या मृणालपेक्षा मला जास्त मार्क पडले, की मृणाल गीताला ’पूनम वाईट आहे, तिच्याशी बोलू नकोस’ अशी चिठ्ठी पाठवायची आणि त्याचंच प्रायश्चित्त म्हणून की काय, पण मृणालची आई मला त्यांच्या गावच्या जत्रेतून माळही आणायची! अंगण खूपच मोठं असल्याने मैदानी खेळ तर आम्ही चिकारच खेळलो.. लंगडी, डॉजबॉल, लपाछपी, डबडा ऐसपैस मध्ये तर तासनतास जायचे. तसंच दुपारच्या वेळात व्यापार, पट, सागगगोटे, अगदी स्टार ट्रेकही.. शेजारणींच्या पदार्थांची देवाणघेवाण, सगळ्यांनी मिळून केलेले सांडगे-पापड, एकमेकांच्या मुलांचे लाड.. अगदी साधं-सरळ, अकृत्रिम जिव्हाळ्याचं वातावरण होतं ते..

वाड्याचे मूळ मालक श्री. खराडे यांचं वाड्यावर अतिशय प्रेम. भाडेकरूंनाही त्यांनी आपुलकीने वागवलं. रहायचं भाडं फक्त द्यावं लागायचं, बाकी सगळं श्री. खराडेच पहायचे.. अर दोन वर्षांनी सर्व घरांना रंग, किरकोळ दुरुस्ती काही असेल- भिंतीला क्रॅक गेलेत, फरशी उखडली आहे- सगळं मालक स्वखर्चाने करत! त्यांना नुसतं सांगायचं. बरं, त्यांना त्रास नको, म्हणून आपण हे स्वत: केलं, तर ते त्यांना अजिबात आवडायचं/ चालायचं नाही! दर ठराविक काळाने नारळ उतरवायला माणूस, बागेची देखभाल करायला माळी, सार्वजनिक मोरी साफ करायला भंगी, वाडा झाडायला झाडूवाली बाई- सगळे त्यांनी नेमले होते. त्यामुळे सर्व भाडेकरू सुखात होते. आधी तर चक्क मातीचं अंगण होतं, पण १९६१च्या पूरानंतर फरशी घातली.. पूराच्यावेळी परिस्थिती गंभीर होती.. बारा फूट पाणी होतं वाड्यात.. वर्षाचं धान्य, चुलीचं लाकूड- भाडेकरूंचं फार नुकसान झालं! पण मालकांनी आपल्या वरच्या मजल्यावरच्या घरात सगळ्यांना ठेवून घेतलं, धीर दिला.

या वाड्यात आम्ही रहायला आलो, तोपर्यंत मूळ खराडे आजोबा गेले होते, आणि त्यांचा मुलगा सर्व कारभार पहात होता.. खरं तर पहात नव्हता, असंच म्हणावं लागेल.. सध्याचे खराडे काका कायमचे मुंबईला स्थाईक झाले होते आणि अगदी क्वचित वाड्यावर येत. जुन्या माणसांबरोबरच जुने दिवस, आपुलकीही संपली होती. आता देखभाल-दुरुस्ती ही भाडेकरूंनाच करायला लागत होती. मालक महिन्यातून एकदा भाडं घ्यायला यायचे.. नंतर तर तेही यायचे बंद झाले, त्यांचा माणूस यायचा फक्त. जुन्या काळाचे मजबूत बांधकाम होते, म्हणूनच वाडा तग घरून होता. किरकोळ दुरुस्तीव्यतिरिक्त काही करायला लागत नव्हते, पण हळूहळू एक उदास कळा यायला लागली होती वाड्याला..

एका पावसाळ्यात एक दुर्घटना घडली. आमच्या वाड्याला लागून तांबोळकर वाडा होता. त्याचं ओनरशिपचं काम सुरू झालं होतं. त्यामुळे पाडापाडी चालू होती. त्यांची आणि आमच्या राहत्या घराची एक भिंत चिकटलेल्या. त्यांनी तिकडची भिंत पाडली आणि आमच्या भिंतीला टेकूच नाही दिला!! झालं! त्याच रात्री मी आणि आजी झोपायचो त्या खोलीतलं छात चक्क खाली आलं! पहाटे ३चा सुमार. प्रचंड आवाज करत छत खचलं! छतावर तुळया होता.. वीटा, माती, तुळया- सगळं आमच्या अंगावरच चक्क धाडधाड आवाज करत येत होतं!! काळोखी अपरात्र, त्यात काही कळायच्या आतच हे असं काहीतरी! भान येईपर्यंत आम्हा दोघींच्या नाका-तोंडात माती, आजीच्या डोक्याला आणि माझ्या नाकावर वीटा पडलेल्या.. एकच बरं झालं त्यात की खोलीतल्या गोदरेजच्या कपाटावर एक तुळई पडल्यामुळे माझ्या आजीचा कपाळमोक्ष वाचला, नाहीतर तिचा काळ आला होता! पुढे ते सगळं निस्तरलं, त्या बिल्डरने सगळं पुन्हा बांधून दिलं, पण हा प्रसंग अजूनही आठवला की शहारा येतो अंगावर.

या प्रसंगानंतर आमचं घर मजेशीर दिसायला लागलं- एक खोली नवीन, प्लास्टर केलेली चकाचक, आणि दोन तश्याच जुन्या- मातीचा गिलावा असलेल्या.. शिवाय शेजारीच ओनरशिप झालं, आता आपलं कधी होणार? असे वेध लागायला लागले -एकाएकी हे घर जुनं, अपुरं वाटायला लागलं. एव्हाना कॉलेजमध्ये पाऊल पडलं होतं, शिंगं फुटली होती. कॉलेजम्ध्ये मित्र झाले होते, शाळेत नव्हत्या अश्या टोटली नवीन मैत्रिणीही झाल्या होत्या- या सगळ्यांना ’घर जुनं’ म्हणून घरी बोलवायला संकोच वाटायला लागला.. वाडासंस्कृतीनुसार प्रातर्विधी करण्यासाठी घराबाहेर काही अंतर जावं लागायचं- यामुळे मैत्रिणीला घरी रहायला बोलावता येत नाही, म्हणून आईकडे कटकट व्हायला लागली होती.. ’नवीन घर असतं ओनरशिपचं तर काय मज्जा असती, पण आपलं वाड्यातलं जुनं-पुराणं घर’ ही जणीव सतत मनात घर करून रहायला लागली..

आणि ते वारं ओळखूनच की काय, पण मुंबईहून ’आपल्या वाड्याचंही ओनरशिप होणार’ अशी बातमी आली!! पुरुष माणसांनी सावधपणे आणि मुलांनी आनंदात या बातमीचं स्वागत केलं.. कोणाला किती जागा मिळणार, कोण किती खोल्यांचा ब्लोक घेणार- चर्चा रंगू लागल्या.. मुलं तर आपल्या खोलीची सजावटही करू लागली मनातल्यामनात.. आणि एक दिवस फुगा फुटला! ज्या बिल्डरला ते काम देणार होतो, तोच बँकरप्ट झाला! सगळं पुन्हा थंडावलं.. असे दोन बिल्डर झाले- आले नी गेले- काही ना काही कारणाने त्यांना आमच्या वाड्याचं काम हाती घेता आलं नाही.. वाड्यातली जुनी-जाणती ’थोरल्या खराडेंची’ पुण्याई म्हणून या गोष्टीकडे पहात होते.. नवीन, आधुनिक घराचं सगळ्यांनाच आकर्षण जरी असलं, तरी तो वाडा पडणार, संबंध पूर्वीसारखे रहाणार नाहीत याची चमत्कारिक जाणीव उगाचच सगळ्यांना व्हायला लागली होती..

एक दिवस अजून एका बिल्डरची बातमी आली. त्याने आल्या आल्या वाड्यात एक मोठी पूजा केली- थोरल्या खराडे आजोबांच्या आशीर्वादासाठी म्हणे! आणि त्यामुळेच की काय, पण पटापट सगळी सूत्र फिरली. प्लॅन संमत झाले, ज्या लोकांना जागा नको होत्या, त्यांना त्यांच्या मनासारखा मोबदला मिळाला. आमच्यासारखे भाडेकरू जे परत त्या जागी येणार होते त्यांना पर्यायी जागा मिळाली.. हळूहळू एक एक जण वाडा सोडून जाऊ लागला आणि वाड्यामधली शांतता एकदम अंगावर यायला लागली.. वाडा खरोखर उदास भासू लागला.. एकेमेकांचे जड अंत:करणाने, पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप घेतले गेले.. आणि अश्याच एका दिवशी आम्हीही बस्तान हलवलं!

नवीन घरात थोडं स्थिर झालो, आणि त्याच वेळी ’टायटॅनिक’ हा चित्रपट ’अलका’ला लागला. तूफान चालत होता सिनेमा.. मी आणि माझे वडील पहायला गेलो, ऍडव्हान्स बूकिंग केलं.. खेळ सुरू व्हायला बराच अवकाश होता.. मला राहवेना.. बाबांच्या मागे लागलागून आम्ही वाड्यापाशी आलो!

भकास! एकच शब्द सुचतो मला.. दिंडी दरवाजा अजून तग धरून होता.. इकडे तिकडे बघतच आत शिरलो.. आणि ते दृष्य अगदी अंगावर आलं.. आमचं घर जमीनदोस्त झालं होतं.. नारळाच्या झाडापाशी खोल खणलं होतं किमान दहा फूट तरी.. त्याची मूळं इतकी प्रचंड विस्तारली होती खाली.. जणू अजून एक वृक्षच जमिनीखाली तयार झालाय.. मध्यभागातली दोन मजली घरं होती, ती उतरवत होते.. लाकूड मजबूत आणि चांगलं होतं- तुळया सगळ्या एका जागी मोळी बांधल्यासारख्या एकत्र ठेवलेल्या.. खिडक्या उतरवलेल्या, त्यांचे गज वेगळे केलेले.. एकेकाळची नांदती घरं आता लाकूड, वीटा, लोखंड आणि इतर कचरा- अशी विभागली गेली होती.. करकरीत संध्याकाळची वेळ आणि वाड्याचं हे रूप- मला भयानक भिती वाटली, खूप रडू आलं, मी बाबांचा चटकन हात धरला.. ’आईगं! किती वाईट दिसतोय वाडा!’ खिन्न असून ते म्हणाले, ’पाडायला सांगितला आपणच, हे अटळ आहे.. इथे नवीन इमारत उभी राहिली, की सगळं विसरशील’.

पण मी नाही विसरले, अजूनही. त्यानंतर आम्ही दोन वर्षांनी त्याच जागेवर बांधलेल्या नवीन, कोर्‍या, सेल्फ-कन्टेन्ड ब्लॉक मध्ये रहायला आलो, त्यानंतर मी मुंबईला राहिले एक वर्ष, लग्नानंतर तर चक्क बंगल्यात आले.. या घरांत रमले नाही, ती आवडली नाहीत असं काही नाही, उलट सोय, हवेशीरपणा, मोकळीक सगळंच होतं, पण मनात अजूनही आहे तो वाडाच.. एरवी दिसत नाही तो, पण स्वप्नात जेव्हा जेव्हा घर येतं, तेव्हा मी चक्क वाड्यातल्या त्या आमच्या जुन्या छोट्या घरात असते, नेहेमीच. आताची माणसं, जी तेव्हा माझ्या आयुष्यात नव्हती, तीही तिथेच निवांत विसावलेली दिसतात अंगणात.. तेव्हाच्या घटना, नवीन-जुन्या आठवणी, काही झालेले, न झालेले प्रसंग, सगळ्यांना एक रूप येतं स्वप्नात- वाड्याच्या पार्श्वभूमीवर.. तेव्हाचे खेळगडी, त्यामानाने तरूण आजी, आई-बाबा आणि आताचे लोक सगळे त्या वाड्याने आपल्यात सामावून घेतलेले दिसतात मला.. तेव्हा छोटी, अडचणीची वाटणारी जागा आता इतकी माणसं असूनदेखील ऊबदार, मायाळू असते..

माझं घर तर वाड्यात होतंच, पण आमचा वाडाही मनात ’घर’ करून बसलाय माझ्या, कायमचाच!!

9 comments:

Satyajit said...

chhan lekha

Anonymous said...

waa farach chan

pravin said...

Mast aahe lekh.. Khup aavadala :-)

कोहम said...

agadi manatala. khup chaan vaTala vachun..

KC said...

majhi aai rastapethet eka vadyat rahat hoti. ti amhala nehimi vadyabaddhal ani tyatlya lokann badhal sangat aste. sanganta ekdam rangun jate athvanit. ti loka kuthe disli ki ajun avdi ne javal yetat, ashi ki kadhi laamb gelich navti

Unknown said...

पूनम.. जुन्या आठवणी ऐकताना / वाचताना नेहमीच छान वाटते. ते ऐकताना जी हुरहुर लागते ती शब्दात व्यक्त करणं खरंच खुप कठीण असतं. तुझा लेख त्यामानानं तुझ्या भावना व्यक्त करायला यशस्वी झालाय. खुपच नॉस्टॅल्जिक व्हायला झालय. मी पण अशीच सदाशिव पेठेतल्या वाडा-कम्-सोसायटी मधुनच राहिलेली आहे. त्यामुळेच हे ललित जास्त भावलय. :-) लिहित रहा अशीच त्यामुळे आमच्यापण भावनांना वाट मिळते.

Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

sundar!! sagaLyaa junyaa aaThavani jaag karnar...

varsha said...

Hi Poonam, Love your blog. Reading it continuously from last 2 days. Maaze balpan pan dombivlitlya vadyat gele. Tu je varnan kele aahes tasech. tyach sumarache