May 14, 2009

लिमिटेड ममता!

पाळणाघर म्हणा, अथवा डेकेअर अथवा कोणतंही नाव द्या- आपण कामाला जाताना मुलाला अन्य कोणाकडे सोपवणं हे जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या कोणत्याही आईसाठी एक अवघड काम! त्या पाळणाघराची बाई आपल्या मुलाकडे व्यवस्थित लक्ष देईल ना, त्याला नीट खायला-प्यायला देईल ना, त्याला झोपवेल ना, त्याला बरं नसलं तर औषध-पाणी करेल ना? हजार प्रश्न! माझ्यावरही माझ्या आठ महिन्यांच्या मुलाला पाळणाघरात ठेवायची वेळ आली, तेव्हा माझीही अवस्था फार बिकट झाली होती. एक तर आम्ही राहतो, त्या भागात हे एकच पाळणाघर. त्यामुळे इथे आपलं, किंवा आपल्या मुलाचं पटलं नाही तर??? हा यक्षप्रश्न! बिचकत बिचकतच मी त्या पाळणाघरात चौकशी करण्यासाठी गेले.

’पाळणाघर’ म्हटल्यावर आपल्या घरी आलेल्या बायकांची मनस्थिती कशी असते, हे ’काकूंना’ माहिती असणारच ना! थोडंसं हसून स्वागत केलं तर आलेल्या बाईला धीरच येईल, हे काय वेगळं सांगायला हवं? पण बाईंचा चेहरा कोरा! "मी गेली वीस वर्ष पाळणाघर चालवत आहे. सगळीच मुलं थोडा त्रास देतात, नंतर रुळतात. ठेवा तुम्ही मुलाला. त्याचं खाणंपिणं, कपडे, सगळं पाठवा सोबत. दोन दिवस रडेल, मग राहील. अगदीच आक्रस्ताळा असेल, तर सांगेन तुम्हाला. पण जरा रडला, तर मऊ पडू नका.." बाई रोखठोक!

मला तसाही पर्याय नव्हताच. निमूटपणे सर्व सूचना मनात साठवून घेत लेक दुसर्‍या दिवसापासून काकूंकडे जायला लागला. या बाबतीत तो अगदीच गुणी. त्याला माणसांची आवडच. त्यामुळे जरी लहान असला, तरी त्याला तिथे सरावायला काहीच वेळ लागला नाही- या गोष्टीचं मला, आमच्या घरातल्यांना इतकं कौतुक! पण काकू निर्विकार! "रहातात हो मुलं, सांगितलं होतं मी तुम्हाला.." इतकंच म्हणून त्यांनी विषयावर पडदा पाडला. यथावकाश, लेक मोठा व्हायला लागला, शीशूशाळा, प्लेग्रूप इत्यादींबरोबर पाळणाघर अर्थातच चालू होतं. त्याला कळायला लागलं, तसं तिकडचं एकएक सांगू लागला.. तिथल्या मुलांबद्दल, त्यांचे खेळ, भांडाभांडी, खाऊबद्दल वगैरे. काकूंकडे मुलं चिकारच होती. त्यातली काही अगदी तान्ही होती- अगदी तीन महिन्यापासूनची. त्यातल काही मुलं कधीमधी काकूंच्या कडेवर, मांडीवर दिसत. एरवी त्या मुलांपासून लांबच असायच्या.. मुलांना बघायला दोन ’ताया’ होत्या. त्याच मुलांचं बघायच्या, काकू सूपरव्हिजन करायच्या. फार क्वचित कोणत्याही मुलाचं कौतुक केलं असेल त्यांनी. माझा लेक त्या पंगतीत असावा असं मला वाटायचं, कारण तो खरंच काहीच त्रास देत नसे. पण, तो इतका भाग्यवान नव्हता, हेच खरं!

काकूंनी पाळणाघर चालू केलं, त्या अर्थी त्यांना मुलांची थोडी तरी आवड असेल असा माझा तरी समज होता. मुलांना सांभाळणं, त्यांचं सगळं व्यवस्थित करणं हे निव्वळ व्यावसायिक होऊ शकत नाही. या ’व्यवसायात’ human touch असावाच लागतो- अशी माझी मतं काकूंचं वागणं बघता चुटकीसरशी बदलली. एकूण मुलगा तिथे रहात होता. प्रेम, ममता जरी तिथे नव्हती, तरी दुर्लक्षही नव्हतं. मुलांवर लक्षं असायचं त्यांचं, पण त्यांनी कधी ते फारसं अंगाला लावूनही घेतलं नाही, एक प्रकारचा कोरडेपणा म्हणा, की अलिप्तपणाच अनुभवला त्यांच्या वागण्यातून. मुलांमध्ये बसावं, त्यांना गोष्टी सांगाव्यात, त्यांना खेळ वगैरे शिकवावे, किंवा नुसतं त्यांच्या विश्वात रममाण तरी व्हावं वगैरे त्यांना पटण्यासारखं नव्हतं. मुलं नुसतीच त्यांचे आई-वडील येईस्तोवर पाळणाघरात असायची- ना आनंदी, ना दु:खी, नुसतीच वाट पहाणारी. पाळणाघर बदलावं असा विचार अनेक वेळा मनात आला. पण सर्वांना सोयीचं पडेल असं पाळणाघर जवळ नव्हतं आणि लांबून का होईना, पण मुलावर लक्ष रहातंय म्हणून तो तिथेच जात राहिला.

आणि एक दिवस सोडायला गेल्यावर काकूंच्या काकांनी सांगितलं, की काकूंची तब्येत बरी नाहीये, त्यांचं पोटाचं ऑपरेशन करावं लागणार आहे, तर उद्यापासून पाळणाघर बंद राहील! त्यांच्या तब्येतीची चिंता वाटलीच, पण व्यक्तीगत स्वार्थापायी ’मुलाचं काय करायचं?’ ही मोठी चिंता मानेवर बसली. दुसरं घरापासून बरंच लांब असलेलं पाळणाघराबद्दल ऐकून होते. ’लांब’ म्हणून त्याचा विचार कधी केला नव्हता. पण आता इलाज नव्हता, म्हणून जाऊन आले तिकडे. मुद्दाम लेकाला सोबत घेऊन गेले होते. त्याला ती जागा आवडली, कारण तिथे sand pit, doll's house होतं, आणि मला ते चालवणार्‍या मावशी आवडल्या कारण त्या छान बोलल्या. दुसर्‍या दिवसापासून मुलाचं ते रूटीन सुरू झालं! तो तिथेही लगेचच रुळला. उन्हाळी सुट्टी असल्याने खूप मुलंही होती, दोन ओळखीचीही निघाली, त्यामुळे गडी खुशही झाला!

काही दिवसांनंतर असं वाटलं की काकूंच्या तब्येतीची चौकशी करावी. त्यांचं ऑपरेशन होऊन साधारण एक महिना झाला होता. थोडी तब्येत सुधारली असेल, हिंडत्या-फिरत्या झाल्या असतील या अंदाजाने मी आणि लेक गेलो विचारपूस करायला एका संध्याकाळी. दार काकूंनीच उघडलं. दार उघडल्याबरोब्बर पुन्हा चेहरा गूढ! मी मुलाच्या निमित्ताने आज पाच वर्ष जातेय त्यांच्याकडे.. पण आजवर मला त्यांच्या चेहर्‍याकडे बघून, त्यांना मुलं आणि त्यांच्या आया आलेल्या आवडतात/ चालतात की नाही याचा पत्ता लागलेला नाही!!

मी गेल्यागेल्याच तब्येतीची चौकशी केल्यानंतर त्यांना थोडं हायसं वाटलं! मग स्वत:बद्दल बोलू लागल्या.. ऑपरेशन, नंतरची काळजी, औषधं, पथ्य सगळंच.. मग म्हणाल्या, ’आता पाळणाघर बंदच ठेवणार आहे. मुलांना बघायचं म्हणजे फार त्रास होतो.. फार लक्ष द्याव लागतं. आता मुलं (त्यांना दोन मुलगे) म्हणत आहेत, इतकी वर्ष दुसर्‍यांच्या मुलांना पाहिलंस, आता जरा स्वत:च्या मुलांकडे बघ!’ ही हिन्ट मी घेतली आणि ’तब्येतीची काळजी घ्या’ असं सांगून त्यांचा निरोप घेतला!

बाहेर पडले तेव्हा माझं डोकं गरगरत होतं. चहापाण्याची मी त्यांच्याकडून अपेक्षा करतच नव्हते, पण जी काही दहा मिनिटं आम्ही त्यांच्याकडे होतो तेव्हा त्यांनी साधी चौकशी, की ’अचानक पाळणाघर बंद करावं लागलं, तुमच्या मुलाची काय सोय केली आहेत आता तुम्ही?’ केली नाही! माझा मुलगा निदान मोठा तरी आहे, पण जी वर्षा-दोन वर्षांची मुलं होती, त्यांना दुसर्‍या जागी रुळायला किती वेळ लागला असेल? त्यांची कसलीच जबाबदारी नव्हती हेही मान्य, पण किमान उपचार म्हणून एक साधी चौकशीही नाही? आणि सर्वात चाट मी अजून एका गोष्टीने पडले.. माझा मुलगा माझ्या बरोबर होता, तोच तर आमच्यामधला मूळ दुवा होता.. नाहीतर कशाला माझा आणि त्यांचा संबंध येणार होता? पण माझ्या मुलाची एका शब्दाने चौकशीही केली नाही!! रोज जात होता तो त्यांच्याकडे, पण त्याच्याकडे ढुंकून पाहिलंही नाही त्यांनी! प्रेम, माया नाही पण साधा शिष्टाचारही नाही? इतकं मश्गूल असावं एखाद्याने आपल्याचमध्ये? इथे येताजाता ओळखीच्या मुलाशीही आपण एखाददुसरा शब्द बोलतो, त्याच्या गालाला हात लावतो, काहीतरी gesture दाखवतो.. इथे माझा मुलगा जवळजवळ त्यांच्या डोळ्यादेखत मोठा झाला होता.. त्याच्याशी ’सुट्टीचा काय करतोस आता? शाळा कधी सुरू?’ असे निरर्थकच, म्हटले तर, पण आवश्यक असे प्रश्नही नाहीत?? त्यांचा आणि माझ्या मुलाचा आता संबंध संपला, पाळणाघर आता बंद झालं म्हणून इतकं टोक? जी काही बांधिलकी होती, ती केवळ पाळणाघराच्या वेळात आणि पैशापुरतीच होती? इतकी लिमिटेड?

प्रचंड अस्वस्थ झाले मी तिथून बाहेर पडले तेव्हा. माणसांचे अजब नमूने नेहेमीच अनुभवायला मिळतात आपल्याला, पण एक पाळणाघर चालवणारी बाई असं वागू शकेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं! शेवटी, मला गरज असताना त्यांनी माझ्या मुलाला त्यांच्याकडे ठेवून घेतलं, दिलेल्या पैशाचा मोबदला व्यवस्थित चुकवला असंच म्हणायचं. पैशाने त्यांचं लक्ष माझ्या मुलासाठी मी विकत घेतलं होतं हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं! त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करून मी तो विषय कायमचा संपवून टाकला!

4 comments:

मन कस्तुरी रे.. said...

खरं आहे. मी सुद्धा अशा काही नमुन्यांना भेटले आहे.
त्या इतक्या ’सिझन्ड’ असतात की आपले बारीक सारीक डाउट्स मनावरच घेत नाहीत. प्रत्येक मूल (आणि त्याचे पेरेंट्स) वेगवेगळं असतं, त्याच्या भावनिक गरजा वेगवेगळ्या असतात हे त्यांना कोण सांगणार?

सर्किट said...

अगदी पटलं. आणि तुला वाटलेली बोच ही पुरती जाणवली. येत्या काही महिन्यांत हा प्रश्न आमच्याही पुढे उभा रहाणार आहे, कसं जमवायचं, आणि मनाची तयारी कशी करायची हे अजून समजत नाहीये.

त्यात अशी कोरडी माणसं पाहिली की, सगळं जग तसंच असताना उगाचच अघळपघळ चांगलं वागत सुटणारे आपणच ऍबनॉर्मल आहोत की काय असं वाटायला लागतं!

SHRIMAT said...

CHAAN TUZE NIRIKSHAN FAR STRONG AAHE.
BESIDE U CAN ALSO VISIT-
WWW.SHRIMAT.BLOGSPOT.COM

Anonymous said...

फार अस्वस्थ वाटलं तुझा लेख वाचून ! पैशाने विकत घेतलेली असली तरी त्यात ममतेचा, जिव्हाळ्याचा भाग हवाच ना. इथे तर मायेचा म ही दिसला नाही.
माझी लायब्ररी असलेल्या बिल्डिंगमध्ये खाली एक पाळणाघर होतं. संध्याकाळी आई-बाबांची वाट बघत असणारी पिल्लं पाहिली की पोटात खड्डा पडायचा. पण एकदा पाळणाघरातल्या मावशींना प्रेमाने "नको गं सोनू अशी वाट बघत उभी राहू. चल आपण खेळू काहीतरी." असं म्हणताना ऐकलं आणि खरंच खूप दिलासा वाटला.
-अश्विनी जी.