April 30, 2009

आता मी काय करू??

हानपणी आपण सगळ्यांनीच ती राक्षसाची गोष्ट वाचली असेल.. त्याला काम करण्याचा रोग होता.. त्याला सतत काम द्यायला लागायचे, तो त्याच्या मालकाला सतत विचारायचा- "मालक, आता मी काय करू?" आणि मालकाने काम दिले नाही, तर तो त्याला चक्क मारून टाकायचा! लांबचलांब असलेल्या शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची सुरूवात झाली, की हा ’आता मी काय करू?’ राक्षस तमाम मुलांच्या अंगात शिरतो! सुट्टी म्हणजे आराम असे कितीही म्हटले, तरी मुलांना कुठे स्वस्थ बसवतंय? त्यांना आवर्जून सांगितलं की आता लवकर उठू नका, की हमखास मुलं सकाळी रोजच्या वेळेच्याही आधीच उठणार! आणि मग होते सुरू भुणभुण- "आई, आता मी काय करू?" बरं, आई देईल ते एकही उत्तर त्यावेळी पसंत पडत नाही! हे आपलं विचारायचं म्हणून विचारायचं असतं, एक फॉर्मॅलिटी म्हणून! कारण आई म्हणाली- बॉल खेळ, की, आत्ता काय बॉल खेळायची वेळ आहे का? बरं बाबा, मग ठोकळे लाव, पत्ते खेळ, टीव्ही बघ- नाही! नाही!! नाही!!! काहीही पसंत पडत नाही! आई जर कशोशीने टाळत असेल मुलाला उन्हात खेळायला पाठवायला, तर मुलाला तेच हवं असतं! ’हे’ कर म्हटलं, की ’त्यापेक्षा ते करतो’, ’ते’ कर की ’हेच बरंय’ आणि सरतेशेवटी काहीच पसंत न पडून "आता मी काय करू???"

सर्वात अडचणीचं ठरतं ते तीन ते आठ वयाच्या मुलांचं. ही मुलं तशी एकटी कोणाकडे, कुठे जाण्याइतकी मोठी नसतात. पण त्यांना ’बोअर’ तर होत असतंच. तशी उन्हाळी शिबिरं अनेक असतात, पण सगळी तासादोन तासाची. रिकाम्या मुलांची दिवसभराची जबाबदारी कोण ’माईका लाल’ आपणहोऊन घेईल? तर, यांना दिवसभराचा काय उद्योग शोधायचा हा प्रश्न उरतोच! एरवी ज्या वेळेत मुलं शाळेला जातात, तो वेळ तर त्यांचा जाता जात नाही! मग घरात एखादं भावंडं असेल, किंवा शेजारी पाजारी त्याच वयाची मुलं असतील, तर जरा तरी वेळ जातो.. पण एकेकटी मुलं पार कोमेजून जातात बिचारी! त्यातून आई नोकरी करणारी असेल, तर जास्तीच. कारण त्या मुलांना दोन तासांच्या शिबीराला कोण ने-आण करणार? नाईलाजाने, दिवसभर पाळणाघरात रहायला लागतं, त्यामुळे मुलं नाखुश! पाळणघरातल्या मावशी काही हुंदडू देत नाहीत, की आवाज करू देत नाहीत. बाहेर ऊन इतकं असतं, की अंगण असलं तरी खेळता येत नाही. अर्थात, जी मुलं घरी असतात, तीही काही कमी त्रास देत नाहीत म्हणा! घरभर आवाज, पसारा, ओरडाआरडा.. मग आईचा आवाज.. मधेच लाईट जातात, अन आवडतं कार्टून, आवडती गेम बंद पडते.. मग रुसवेफुगवे! चालू असतो कल्ला! आणि इतकं सगळं असतानाही, प्रश्न येतोच, "आई, आता मी काय करू?"

सहज मी विचार केला, आपणही लहान असताना असेच होतो का? इतकं लहानपणाचं आठवत नाही खरं, पण मुलं चिकार होती आसपास.. आणि बहिणीच्या मागे मी सतत असायचे हे ही आठवतंय. तिची फार चिडचिडही व्हायची- माझं शेपूट कायमच बिचारीच्या मागे! पण काही असो, भातुकली, पत्ते, व्यापार, पुस्तक वाचन यात वेळ जायचा खरा. दुपारी आंबे खाऊन झकास झोप, संध्याकाळी लपंडाव, डबडा ऐसपैस, लगोरी, लंगडी.. रात्री परत आंबे.. मग मध्येच कधीतरी पर्वतीला जायची टूम, पोहायला जायची मोहिम, कधी बागेत किंवा असच काहीतरी.. मोठ्या मुलांमध्ये आम्ही चिल्लीपिल्लीही धमाल करायचो.. आईच्या मागे भुणभुण केल्याचं आठवत तरी नाहीये!

मग आताच्या मुलांचा का बरं वेळ जात नाही? त्यांना जास्त ऑप्शन आहेत, म्हणून का? मुलांना टीव्ही, काँप्यूटर, व्हिडीयो गेम्स- कितीही द्या, पुरत नाहीत. ही मुलं हुशारही आहेतच.. एकाच गोष्टीत तासनतास रमत नाहीत.. आपसात खेळतात, पण दिवसचे दिवस नाही.. काहीतरी कुठेतरी खटके उडतात, की इवलं तोंड करून येतात घरी, "आई, आता मी काय करू?" या प्रश्नासकटच! घरातल्या माणसांचाही पेशन्स संपला आहे मुलांच्या कलाने घ्यायचा? आई-बाबांना वेळ नाही, आजी-आजोबाही निवृत्त असले, तरी त्यांनी स्वत:च्या वेळाची व्यवस्थित आखणी केलेली असते. मुलं "आता मी काय करू" वरवर म्हणत असतील, पण त्यांना "आई/ बाबा, मला वेळ देता थोडा?" असं तर विचारायचं नसेल? पण वेळच सापडत नाही ना! मुलांना शाळेला सुट्टी असते, तशी आई-बाबांना ऑफिसाची उन्हाळी सुट्टी असती तर किती बरं झालं असतं! एरवी मुलांना वेळ देता येत नाही म्हणून हळहळणारे पालक मुलांसोबत मूल होऊन नक्कीच राहिले असते. पण अशी सुट्टी हे एक विशफुल थिंकिंगच!

त्याऐवजी, पालक काही ना काही मार्ग शोधतात, मुलांना कुठे ना कुठे गुंतवून ठेवतात, जमेल तसे त्यांच्यातच एक मूल होऊन खेळतात. सध्याच्या काळाचे ’बाबा’ही मुलांच्या गोष्टीत सहभाग घेतात.. मुलाच रिकामा वेळ सत्कारणी लागावा ही धडपड सगळेच आपल्या परीने करतात..

सध्या तरी सुट्टीचा एक महिना संपला आहे. एकापाठोपाठ एक उद्योग मागे लावून दिल्याने हे दिवस तरी गेले.. आता अजून एकच महिना! मे महिना आजी-आजोबांकडे, एखाद्या छोट्या ट्रिपमध्ये करत घालवायचा.. जमलं तर एखाद्या छंदवर्गात अडकवायचं मुलाला.. मुलगा मोठा होऊन, आपापलं वाचू शकत नाही, एखाद्या घराजवळच्या ठिकाणी आपापला जाऊ शकत नाही, तोवर अश्या कसरती करत रहायचं! अश्या वेळी "आई, आता मी काय करू?" हा प्रश्न कधीही कानावर पडेल याची तयारी ठेवायची आणि स्वत:ची पूर्ण कल्पकता लढवून दर वेळी एखादं नवं, त्याला पटेल असं उत्तरही द्यायचं! सुट्टी झिंदाबाद!

5 comments:

Manali..... said...

"मुलांना शाळेला सुट्टी असते, तशी आई-बाबांना ऑफिसाची उन्हाळी सुट्टी असती तर किती बरं झालं असतं!"

मस्तच आहे ही कल्पना….
खरतर मुलान्ना फ़क्त आई बाबान्चा वेळ हवा असतो…..आणि नेमका तेवढाच नसतो त्यान्च्याकडे….
खरच मला असे वाटते की जर खरच गरज नसेल तर निदान आई ने तरी ५ वर्ष नोकरी करु नये….पाहता पाहता मुल मोठी होतात…
नन्तर आहेच की पुर्ण आयुष्य….
अर्थात हे माझे मत झाले….
मनाली

सर्किट said...

:-)

manali cha mhanana patala. nahitar aai ne saraL Central Govt chi nokri dharavi.

pratyet baLasathi aai la 3 varshe rajaa milate. ani hi raja baaL (??) 18 varshacha hoi paryant kevhahi, kadhihi gheta yete.

bichare central govt madhale bayakanche saaheb! ;-)

poonam said...

मनाली, मूल मोठं झालं की त्याला नुसते आई-बाबा पुरत नाहीत. खेळ, डोक्याला खाद्य पुरवायला लागतं कायम.. त्यामध्ये आई-बाबांचा बराच वेळ जातो! :)

सर्किट, अगदी अगदी! पोरांची बारावी होईस्तोवरची सोय केलीये सरकारने! ’साहेब’ दुप्पट कामं करत असतील की- ओव्हरटाईमसकट ;)

shrimat said...

hi poonam,
chaan lihal aahes,

अभि said...

पूनम, एकदम परफेक्ट लिहिलं आहेस!! सध्या अगदी हाच अनुभव घेतोय!! काय करू? ला भरीस भर म्हणून सारखं "मी कंटाळलीय" ची पुरवणी पण असते आमच्यात :)