#PCWrites महिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्या, त्याला चार दिवस झाले, तरी तो पूर्ण संघ आणि अमोल मुजुमदार अजूनही ट्रेंडिंग आहेत! मस्त वाटत आहे. जिंकल्याबरोबर हरमनप्रीतने अमोलचे पाय धरले आणि अमोल एकदम प्रकाशझोतात आला! त्याचा पूर्ण बायो-डेटा, रणजीतली खेळी, सचिन-कांबळी-गांगुली-द्रविड-लक्ष्मण इत्यादींमुळे हुकलेल्या त्याच्या संधी… सारं काही लोकांना कळलं. अमोलची लाटच आली जणू… त्याच्या अनेक मुलाखती झाल्या. अमोल मुजुमदार कसा बोलतो, तो किती ग्राउंडेड आहे, तो किती साधा आहे, भगवान के घर देर है, finally he got what he deserved… त्याच्याबद्दल खूप बोललं गेलं, अजूनही बोललं/ लिहिलं जातंय आणि तरीही त्याचा कंटाळा येत नाहीये. का माहित आहे? कारण, निमूटपणे आणि सातत्याने काम करत राहणाऱ्या, कोणतेही छक्के-पंजे न कळणाऱ्या, कार्यालयीन राजकारणात सामील न होणाऱ्या, कुशल असलेल्या, पोटेन्शियल असलेल्या तरीही मागे पडलेल्या त्याच्यासारख्याच करोडो लोकांचा तो प्रतिनिधी आहे!
नीट पाहिलं, तर आपल्या आसपास असे अनेक अमोल दिसतील. कदाचित तुम्हीही एक असाल. यांची गुणवत्ता, मेहनतीपणा, नम्रपणा कशातही खोट काढता येत नाही. तरीही नशीब त्यांच्यावर इतकं मेहेरबान होत नाही. त्यांच्याबरोबरचे आणि त्यांच्या पुढे जाणारे त्यांचे सहकारी काही वाईट, माजुरडे, वाट्टेल ते करून पुढे जाणारे नसतात.. अमोल मागे पडला, असं म्हणताना सचिन-गांगुली-द्रविड-लक्ष्मण वाईट होते का? ते कमी डिझर्व्हिंग होते का? नाही ना? पण लेडी लक नावाची एक चीज असते. कोणी कितीही नाकारो, कष्ट आणि गुणांना नशीबाची साथ लागतेच. असंच, या असंख्य अमोलांच्या बाबतीत होतं. तेही निराश होतात, पण चिकाटी सोडत नाहीत. झगमगाटाची अभिलाषा असते, म्हणून नाही, तर त्यांचा स्वभावच काम करत राहण्याचा असतो, म्हणून!
आता तर काळ असा आहे, की पुढे-पुढे करता आलं नाही, तर करियरच होऊ शकत नाही! एकवेळ गुणवत्ता नसली तरी चालेल, पण एकाचे हजार करून सांगता आले पाहिजेत. या रेट्यापुढे आपला कसा निभाव लागेल? आपल्या प्रामाणिक प्रयत्नांचं कौतुक कधीतरी योग्य लोकांकडून होईल का, असा विचार त्यांच्याही मनात कुठेतरी येऊन जातोच. पण या कुशंकांच्या आहारी न जाता, ते परत कामात बुडून जातात. आणि आयुष्यभर रुसलेलं नशीब दरवाजे उघडतं आणि अमोल मुजुमदारला कवेत घेतं, तेव्हा या कोट्यवधी अमोलांना मनापासून आनंद होतो. त्यांना नाही, तर त्यांच्यासारख्या एकाच्या मेहनतेची तरी दखल घेतली गेली ना! चला, नियती इतकीही निष्ठूर नाही, असं वाटतं. चला, एक दिवस आपल्याही बाबतीत असं काही होईल, अशी आशा वाटते.
या साध्या, प्रामाणिक, कष्टाळू पण नशीबाचं माप थोडं कमी पडलेल्या कोट्यवधींचे आशीर्वाद आणि शुभेच्छा अमोलच्या पाठीशी आहेत, म्हणून महिला वर्ल्ड कप जिंकून चार दिवस झाले, तरी अमोल मुजुमदार आजही ट्रेंडिंग आहे.
#womensworldcup #amolmujumdar





