August 10, 2016

ते एक वर्ष- ८मुंबई – पुणे – मुंबईएक वर्ष मी मुंबईत राहिले, पण मनाने तिथे कधीच रमले नाही. का कोणास ठाऊक! कदाचित मी जिथे रहात होते ते वातावरण त्याला कारणीभूत असावं. नोकरीच्या ठिकाणी रमले होते, कामही जमत होतं, लोकांशी थोडेफार बंध निर्माण झाले होते. पण नोकरीचे नऊ तास सोडता, पार्ल्यात मला करमतच नव्हतं. तिथे मला सतत उपरं वाटत असे. माझं पुण्यातलं घर आणि माणसं मुंबईत असती तर तीच नोकरी करत मी आनंदाने मुंबईत राहिले असते. पण अर्थातच हा विचार म्हणजे निव्वळ फॅन्टसी होती. त्यामुळे शनिवार उगवला रे उगवला की मी पुण्याला पळायचे. पुण्यात येऊन काही फार ग्रेट कामं असत वगैरे काही नव्हतं. पण ’आपल्या’ घरी यायचं एक वेगळंच सुख मिळायचं. पुण्यातलं घर ’माझं’ होतं, तर पार्ल्यातलं ’तडजोड’. माझ्या रूमीज मला चिडवायच्या, ’इथे मस्त फिरायचं दिलं सोडून सारखी काय पुण्याला पळतेस?’ पण त्यातली एक होती कोल्हापूरची आणि एक सांगलीची. त्यांना दर आठवड्याला घरी जाणं शक्य नव्हतं, मला होतं, म्हणून मी इमानेइतबारे प्रवास करत होते. अर्थात, कोणत्याच वीकेन्डला मी मुंबईत अजिबात राहिले नाही असं नाही. गिरगाव चौपाटी, दादरचं स्टेशनजवळचं मार्केट, मंत्रालयाची भव्य इमारत आणि त्यासमोरच असलेला मुंबईचा हीरो- समुद्र, वांद्र्याचं फुटपाथ मार्केट, व्हीटी स्टेशन अशा काही मुख्य गोष्टी मी दोन-चार weekends ना मुंबईत थांबूनच पाहिल्या. पण तितपतच. 

दर सहा दिवसांनी पुण्याला जायची यातायातच असायची. पण केली मी ती. ’हे आपलं घर नाही’ ही भावना प्रबळ होती. सुरूवातीला आम्हाला ’पास’ सिस्टिम असते याचा पत्ताच नव्हता. माझे वडील बिचारे पंधरा दिवसांचं ट्रेनचं बुकिंग करत असत. मुंबईहून रात्री निघायचं नाही- असं त्यांनी मला बजावलं होतं. त्यामुळे शनिवारी सकाळी ६.०५ची इंद्रायणी आणि रविवारी परत येताना संध्याकाळी ५.२०ची प्रगती असं बुकिंग फिक्स असायचं. मग ऑफिसात किशोरने मला ’पास’चं ज्ञान दिलं. मला सॉलिड आनंदच झाला. अगदीच नाममात्र पैशात लेडीज डब्यातून पास दाखवून प्रवास करता येतो हे माझ्या दृष्टीने फार भारी होतं. मी लगेच वडिलांना कळवून टाकलं आणि पास काढून टाकला. अर्थात, पास का घी देखा था मगर बडगा नही देखा था! वो भी लवकरच देखनेको मिलाच!     

पास काढल्यानंतरच्या पहिल्या शनिवारी मी पहाटे दादरला पोचले. इंद्रायणी आली. आता मी लेडीज पासहोल्डर्सच्या डब्यात दिमाखाने शिरले. आत शिरता शिरताच जाणवलं की इथे प्रचंड गर्दी आहे आणि दादा(ताई)गिरीदेखील! आत शिरते तोवर नेहेमीच्या बायकांनी सर्व बाक भराभरा अडवले. रुमाल, पर्सेस टाकून जागा पकडल्या. विन्डो सीट्स तर बघता बघता भरल्या आणि ट्रेन सुरू होईपर्यंत काही बायका चक्क संपूर्ण बाकावर आडव्या झोपल्यादेखील! तीनही सीट्स अडवून!!! मी आणि कित्येक बायका उभ्याच होतो. पण त्यांना उठवायची हिंमत माझ्यात काय, कोणातच नव्हती. त्या बायका ज्या पद्धतीने एकमेकींशीसुद्धा गुरगुरत बोलत होत्या ते पाहून मी विझलेच! असा थोडा वेळ गेला आणि मग टीसी आला. तो आला म्हटल्यावर या बायका उठल्या आणि काही लकी बायकांना बसायला मिळालं. मला अर्थातच नाही मिळालं. मी नवखी होते. माझी ओळखही नव्हती आणि वशीलाही. मी आपल्या रेग्युलर बावळटपणाने फक्त बघत राहिले. प्रवास चालू राहिला. बायकांची गर्दी दर स्टेशनला वाढतच राहिली. हळूहळू गोंगाटही वाढायला लागला. उभंही धड राहता येत नव्हतं. सगळ्या बायकाच. त्यामुळे बिनदिक्कत धक्काबुक्की करत खाणं इकडून तिकडे पास करणे, स्वत:च इकडून तिकडे जाणे वगैरे प्रकार सुरू होते. पार कर्जत आल्यावर माझ्यावर देवाची कृपा झाली. कर्जतला बराच डबा रिकामा झाला आणि मला बसायला जागा मिळाली. तोवर मेंदू आणि पाय दोन्ही बधीर झाले होते.

दुस-याच दिवशी परत येताना तर आणखीच कहर! ५.२० ला ट्रेन सुटायची. मी ५ वाजेपर्यंत पोचायचे. तशीच गेले. पासहोल्डर्सच्या डभात शिरते तर डबा खच्चून, म्हणजे लिटरली खच्चून भरलेला होता. चार-चार बायका एका बाकावर बसलेल्या होत्या आणि डब्यात अक्षरश: पाय ठेवायला जागा नव्हती. मी थक्क झाले. परत एकदा दोन सीट्सच्या मध्ये उभी राहिले. अशा उभ्या असलेल्या बायकांना बसलेल्या बायकांचे अतिशय तुच्छ कटाक्ष मिळतात. रेल्वे कशी नालायक आहे, क्षमतेपेक्षा कसे पास जास्त दिले जातात, सगळ्यांना कसे पैसे हवे आहेत, कोणीही उठून आजकाल पास काढतं (ही कमेन्ट विशेषत: उभ्यांकडे बघून) असं सगळं जोरजोरात बोलणं कोणाचाही विचार वगैरे न करता चाललं होतं. ट्रेन सुरू झाली. मी परत एकदा उभं रहायची मनाची तयारी केली. एक मुलगेलीशी बाई, स्वत:चं बाळ घेऊन टॉयलेट्स असतात तिथे जवळच वर्तमानपत्रावर बसली होती. तिने मला खूण केली आणि शेजारी बसायला बोलावलं. कदाचित मी एकटीच होते, आणि माझ्या चेह-यावर लॉस्ट लुक होता, म्हणून असेल! मला मात्र तिथे टॉयलेटजवळ बसायचा धीर होईना. मी तिला ’नको, ठीके’ असा हात केला. लगेच दुसरी एक माझ्यासारखीच मुलगी तिथे बसली. प्रवास चालू राहिला. हळूहळू खाऊचे डबे उघडले गेले, पदार्थांची देवाणघेवाण चालू झाली. माझ्याकडेही डबा होता, पण उभ्याने खायचा कसा? आता मात्र मला ती जागा न घेतल्याचा पश्चाताप व्हायला लागला. आधी मला तिथे बसायच्या कल्पनेनेदेखील कसंतरीच होत होतं पण भूक लागल्यावर ती जागाही बरी वाटायला लागली! पोटासाठी माणूस काहीही करायला तयार होतो, नाही? 
    
अर्थात, हे अगदी पहिले प्रवास होते. मी होते संपूर्णपणे अननुभवी आणि पासधारक बायका अगदी मुरलेल्या! त्यांच्यासमोर माझा निभाव लागणं शक्यच नव्हतं. पण नंतर मीही सराईत झाले… धावत जाऊन विन्डो सीट पटकवायला लागले, कल्याणपर्यंत झोपून जाऊ लागले, चौथी सीट उभ्या असलेल्या बायकांना ऑफर करू लागले... वगैरे. पण इतपत प्रगती होण्यासाठी मात्र एका अत्यंत अपमानकारक प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. झालं काय, की एकदा पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी डब्यात चढले. नेहेमीप्रमाणे गर्दी होतीच. आता काही चेहरे ओळखाचे व्हायला लागले होते. तेव्हा डब्यामध्ये दोन अत्यंत लठ्ठ मुली, ज्यांना obese म्हणता येईल अशा असायच्या. कोणावर कमेन्ट म्हणून नाही, पण खरंच त्या खूप जास्त लठ्ठ होत्या. त्या नेहेमी समोरासमोरच्या विन्डो सीट्स पटकावून बसायच्या. त्यांच्या शेजारी बसायला एकच जागा उरायची. त्यामुळे एरवी बाकांवर चार-चार बायका बसलेल्या, पण यांच्या बाकावर मात्र दोघीच. पण त्या जरा विचित्र होत्या. आपल्या आकारमानाच्या जोरावर भरपूर मवालीपणा करायच्या, आपसातच जोक्स, कमेन्ट्स करायच्या, त्यांना पसंत पडतील अशाच बायकांना हाका मारमारून आपल्याजवळ बसायला बोलवायच्या. त्यामुळे सहसा त्यांच्या शेजारी एखादी अगदीच आजारी, किंवा मूल घेऊन प्रवास करणारी अशी एखादी ’अडलेली’ बाई बसत असे. एकदा मला कुठून बुद्धी झाली कोण जाणे! त्यातल्या एकीच्या शेजारी मी बसले. दुसरी समोरच होती. तिच्या शेजारीही एक मुलगी होती. एरवी चिकटून चिकटून प्रवास करायला लागायचा. त्या मानाने आज मी मोकळी बसलेले होते- या आनंदात असतानाच समोरची दुसरी मुलगी कुठल्यातरी स्टेशनला उतरली. त्या दुस-या जाड्या मुलीच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक! ती झटकन उठली आणि माझ्या शेजारी येऊन मला दाबून बसली! वर, माझ्यावरून विन्डोच्या जाड्या मुलीला म्हणाली, ’आज जरा गंमत बघू गं’! मी अक्षरश: त्या दोन मुलींमध्ये चिरडले गेले होते. हे मला इतकं अनपेक्षित होतं, की मी तिला काही बोलूही शकले नाही. बर, समोरचा बर्थ रिकामा झाल्यावर तो लगेच चार उभ्या बायकांनी पटकावलाच. अख्खा डबा माझे हाल बघून हसत होता… त्यांना काय फुकट करमणूकच झाली ना. आता मी काय करते?- याकडे सर्वांचे डोळे होते. शरीराने मी चिरडले जात होते, मला ठरवून बकरा बनवलं होतं आणि मी मुखदुर्बळ काही बोलूही शकत नव्हते. अशा वेळी कोणीही मदतीला वगैरे येत नसतं. सगळ्या बायका एकतर बघत होत्या किंवा फिदीफिदी हसत होत्या. त्यांना पाहून त्या दोघी जरा जास्तच सैलावल्या. माझ्या दोन्ही बाजूंना त्यांच्या शरीराचे घट्ट किळसवाणे स्पर्श होत होते. अपमानाने मला काही सुचेनासं व्हायला लागलं. खूप वेळाने, मनाची प्रचंड तयारी करून मी शेवटी उठले. ’हौस फिटली गं’ असं त्यातली एक जोरात ओरडली. मी कशीबशी शेजारच्या बर्थपाशी गेले. तिथे तिघीच होत्या. मानेनीच त्यांना मी जागा देण्यासाठी विनवलं. तर त्यांनी चक्क शेजारी त्या दोघींकडे बोट केलं- मला जणू त्या सांगत होत्या- तिथे बस. मग मात्र मी कुठे पाहिलं नाही. सरळ दारात जाऊन उभी राहिले. अपमान सहन होत नव्हता. तेव्हाच ठरवलं की बस, हा असला घाणेरडेपणा परत सहन करायचा नाही. तोंड उघडायचं. मग जे होईल ते होईल. सराईतपणा येण्यासाठी प्रत्येकालाच काही ना काही सहन करावं लागतं. मला हे सहन करावं लागलं. 

…आणि प्रवास चालूच राहिला. शुक्रवारी रात्री मला झोपच येत नसे. गजराचं घड्याळ नव्हतं, मोबाईल नव्हते (त्याकाळी), त्यामुळे सतत दचकून जाग येत असे. पहाटे चारला उठून, पार्ल्याहून पाचची लोकल पकडून दादरहून सहाची ट्रेन घेऊन मी पुण्यात घरी सकाळी दहापर्यंत पोचत असे. आई-वडिलांशी तासभर गप्पा मारल्यावर मग आंघोळ वगैरे. दुपारी आईच्या हातचं जेवण, मग झोप असा अतिशय शांत दिवस जात असे. माझी आई नोकरी करत होती तेव्हा आणि तिला रविवारी सुट्टी नसायची. ती सकाळीच माझ्यासाठी रात्रीचा स्पेशल डबा, आठवड्याच्या खाऊ असं तयार करून जाई. एकही रविवार असा गेला नाही की मी आई जाताना रडले नाही. ’आता मुंबईला जायचं’ या विचाराने गलबलूनच यायचं. वडिल स्टेशनवर सोडायला येत असत. तेव्हाही मी त्यांच्याकडे न बघता झटकन स्टेशनमध्ये शिरत असे. आजीने मला एकदा विचारलं, ’दरवेळी रडतेस, तर जातेस तरी का? एक तर पुण्यात नोकरी शोध, नाही तर रडणं बंद कर आणि आनंदाने जात जा.’ तेव्हापासून मी त्यांच्यासमोर रडणं बंद केलं आणि ट्रेनमध्ये रडायला लागले. लेडीज डबा त्यासाठीच तर होता. ठराविक टोणग्या बायका सोडल्या तर बहुतांश बायका एकमेकींना अबोलपणे का होईना, पण धीर देत असत. प्रत्येक बाई कुठली ना कुठली मजबूरी म्हणूनच तर दुस-या गावी जात होती. तिथे कोण्णी कोण्णाला ’का गं बाई रडतेस?’ असं विचारत नसे. उलट समजून घेत असत. अशाही बायकांचे हृद्य अनुभव आले. ओळखदेख नसताना एकमेकींची विचारपूस होत असे, समजूतीखातर स्वत:चा डबा पुढे केला जात असे, दोन धीराचे शब्द बोलले जात. मी सराईत झाल्यानंतर मीही काही मुलींशी माफक का होईना संवाद साधू शकले, एकदोघींच्या पाठीवर जेन्युइनली हात फिरवू शकले हेच त्या ट्रेनप्रवासाचं समाधान.  
*******

Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.
 

1 comments:

Mohana Joglekar said...

मस्त. मलाही माझा कांजूरमार्ग - दादर - चर्चगेट प्रवास, नवखेपण, मुरणं सारं आठवत राहिलं.