March 18, 2025

रंगपंचमी

 

एक वर्षाच्या आतली लहान बाळं आणि लग्नाला एक वर्ष न झालेल्या नवपरिणीत दांपत्यांची आमच्याकडे फार गोड पद्धतीने रंगपंचमी साजरी केली जाते. अगदी साधी पद्धत, पण त्यात आपुलकी खूप असते. 

 


 

रंगपंचमीच्या दिवशी बाळाला पांढरी शुभ्र, सुती किंवा मलमलची बंडी किंवा झबले घालायचे. आजकाल बंडी, झबले might be too old fashioned! हरकत नाही, पांढरा फ्रॉक किंवा शर्ट घाला. पण झगमग नको, सुती, साधा. झबल्याला कुंकवाचे बोट लावून बाळाला ते घालायचे. घराच्या आसपास जी एक वर्षाच्या आतली बाळं असतील, तर त्यांना आपल्याकडे बोलवायचे. आपल्या बाळाप्रमाणेच त्यांनाही पांढरे झबले द्यायचे. वरचे दूध पिणारी बाळं असतील, तर त्यांना केशर घातलेले थोडे दूध प्यायला द्यायचे. त्यांच्या हातापायाला आणि मुख्य कपाळाला चंदन उगाळून लावायचे. चंदन महत्त्वाचे, कारण बाळांना नैसर्गिकच घाम खूप येतो. केशर दुधात मिसळून तेही थोडे लावायचे. आणि त्यांना काकडी, बत्तासे, खडीसाखर असा त्यांना चालेल असा, छोटा, पण थंडोसा देणारा खाऊ खायला द्यायचा. झालं! बाळं नाजूक असतात. धुळवड तर ती खेळू शकत नाहीत, म्हणून त्यांचे असे लाड करायचे.

नवपरिणीत दांपत्य असेल, तर त्यांना पांढरे कपडे भेट द्यायचे. मुलगी/ सुनेला मोगऱ्याचा गजरा द्यायचा, चंदनाचा टिळा दोघांनाही लावायचा आणि केशरी दूध प्यायला द्यायचे. दूधाऐवजी वाळ्याचे सरबत देऊ शकतो. 

बस इतकंच 😊 तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे यात बदलही करू शकता. यात काही नियम वगैरे नाहीत. फक्त, उन्हाळा असल्यामुळे नैसर्गिक रंग, गंध आणि चवी यांवर भर असावा, कृत्रिम किंवा भडक काही नको.

घरात बाळ झालं किंवा नवीन लग्न झालं, की त्यांचे सण आपण वर्षभर साजरे करतो. हाही त्यातलाच एक घरगुती सण, असं म्हणू शकता 😊 माझ्या मुलाची अशी रंगपंचमी आम्ही केली होती. माझा मुलगा तेव्हा नऊ महिन्यांचा होता, एक दहा-अकरा महिन्यांच्या मुलीला बोलावलं होतं. तिने आल्या आल्या त्याची सगळी खेळणी ताब्यात घेतली होती, तेव्हा माझ्या मुलाला काही झेपलंच नव्हतं. तेव्हाचे ते फोटो पाहून फार छान वाटतं.

आजकाल सगळे सण, समारंभ ’मोठे’ करायचा प्रघात आहे. साधं हळदीकुंकूदेखील इव्हेंटसारखं होतं, ठीक आहे, प्रत्येकाची आवड, हौस, ऐपत असते. पण त्यातला ’कोअर’ साधेपणा लुप्त झाला आहे. धुळवडीला राज्यभर सुट्टी असते, त्यामुळे रंगपंचमी साजरी होणं तर जवळपास बंदच झालं आहे. पण तुमच्या घरी या “वयोगटा”तली बाळं किंवा दांपत्य असेल, आणि तुम्हाला या छोट्या सेलिब्रेशनची कल्पना आवडली असेल, तर तर तुम्हीही जरूर अशी रंगपंचमी साजरी करून पहा. छान वाटेल, नक्की.

****    

March 10, 2025

Mrs.

 

 या नावाचा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे, मी पाहिला नाहीये, रिव्ह्यू वाचले. ते पाहून-वाचूनच मी इतकी वैतागले… शिकलेल्या सुनेकडून सासू-सासरे-नवरा यांनी स्वयंपाकाची, नव्हे चविष्ट स्वयंपाकाची अपेक्षा आता कोण ठेवतं? आणि ठेवली, तरी ती थोडीच ऐकणार आहे? ती लावेल की कामाला बाई. सासऱ्यांना ठणकावून सांगेल, की मला मदत हवीये, मी ती घेणार. प्लंबर स्वत:च बोलावेल की. कितीतरी बायका करतात हे. आताच्या काळातली नायिका इतकी पिचलेली आहे, हेच मला बोअर वाटलं.

हेच सगळं एका मैत्रिणीशी बोलले, तीही सहमत असेल असं वाटालं होतं. पण मी चमकले. ती म्हणाली, “अगं, इतकं सोपं नसतं. पुरुषप्रधान समाज अजूनही प्रबळ आहे, सासर या प्रकाराचं सुनांना टेन्शन येतं. मुलींना अजूनही सूनपणाचं दडपण असतं. सासूचं सहकार्य नसेल, तर संसाराची सुरूवात केल्याकेल्या कोणी इतके बदल लगेच करू शकत नाही. सिनेमात दाखवलेलं कसं चुकीचं आहे आणि त्यावर तिने काय करायला जवं होतं, हे आपण “आज” बोलतोय, पण आठव आपले संसाराचे सुरूवातीचे दिवस! कमीअधिक प्रमाणात हाच माझाही अनुभव आहे. पंचवीस वर्षापूर्वी माझं लग्न झालं. तोलामोलाचं स्थळ. दोन्ही बाजू संस्कारी, कुटुंबवत्सल, प्रगतीशील वगैरे. नवऱ्यापेक्षा माझं शिक्षण थोडं अधिकच होतं, लग्नाआधीच मी उत्तम नोकरी करत होते. पण ’ऑन पेपर’ प्रगतीशील असलेल्या सासरी माझ्या शिक्षणाचं कौतुक नव्हतं. सासऱ्यांना आणि त्यामुळे सासूलाही टिपिकल सूनच हवी होती. मी ऑफिसला जाण्याआधी केर काढले का, पोळ्या केल्या का, भाजी कशी केली याकडे त्यांचं रोज काटेकोर लक्ष असायचं. चवीत जरा जरी बदल झाला, तर लगेच नापसंती दर्शवली जायची. मला कुठे स्वयंपाक येत होता? पण ते कधीच कोणी समजून घेतलं नाही. सकाळी वर्तमानपत्र वाचण्यासाठी दोन कामं बाजूला ठेवली, तर टोमणे मारले जायचे. संध्याकाळी घरी आल्याबरोबर कूकर, कोशिंबीर, उद्याची तयारी, भाजी, पथ्य… चक्र सुरूच. एकदाही त्यांनी मला, “तुझं काम काय असतं”, “ऑफिसमधले लोक कसे आहेत, तिथे काय चॅलेंजेस असतात”, हे विचारलं नाही. कारण, ते त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं नव्हतंच. महत्त्वाचं होतं, मी घरी आल्याबरोबर स्वयंपाक करणं!

सासूबाई घरीच असायच्या. पण, ’सकाळी गडबड असते तेव्हा तू कर स्वयंपाक, संध्याकाळी तू दमून येतेस, तेव्हा मी बघेन’, असं कधी ऑफरसुद्धा केलं नाही! कारण स्वयंपाकाचं काम सुनेचं ना! कधी मला ऑफिसमधून कामामुळेच घरी यायला उशीर झाला, तर त्यांची चिडचिड व्हायची, कारण त्या दिवशी त्यांना काम करावं लागायचं. पण मला सहानुभूती नाही मिळाली कधी. ’कामाचं लोड असेल, तर घरचं टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत’, असा पाठिंबा कधी मिळाला नाही. आमच्याकडे पाहुणे सतत यायचे, मुक्कामीच यायचे. आत्ताप्रमाणे स्वयंपाकाला बायका नव्हत्या, आयते डबे मिळत नव्हते. सासूबाईंचीही अपेक्षा, की मी आयुष्यभर पाहुण्यांचं केलं, सुनेनेही त्यांचं सगळं केलंच पाहिजे. करियर करणारी कर्तबगार मुलगी म्हणून ना त्यांनी, ना त्यांच्या एकाही नातेवाइकाने कौतुकाचा चकार शब्द कधी काढला असेल! उलट, ’पाहुण्यांना नमस्कारच केला नाही’, ’नुसतं वरणच केलं, आमटी नाही केली’, ’कोशिंबीरीत कांदा घातला’, ’नेहेमी भाताचे प्रकारच करते, म्हणजे पोळ्या करायला नकोत’, असे ताशेरे मात्र ओढले. सतत गिल्ट द्यायचे. “तुला आवडणारे दोन पदार्थ “कधीतरी” करत जा, “स्वत:पुरते” इतकी सूट मात्र मोठ्या मनाने दिलेली होती! एखाद्या रविवारी कंटाळा आला, सुट्टीच्या दिवशी स्वयंपाकालाही सुट्टी देऊ, सगळेच बाहेर खाऊ वगैरेची मुभा नव्हती. मला माझा संसार नव्हताच, मत नव्हतं, संसार त्यांचा होता आणि तो फक्त त्यांच्याच पद्धतीने पुढे न्यायचा होता. मीही किती निरागस आणि बावळट होते. मला राग आला, नकोसं वाटलं तरी मीही तेवढ्यापुरतं बोलले, पण कायमस्वरूपी बदल करू शकले नाही.

अचानक माझ्या नवऱ्याची बदली झाली, मलाही बदलीच्या जागी नोकरी मिळाली आणि मी तिथून बाहेर पडले. स्वत:चं बिऱ्हाड केल्यावर मग मला कुठे थोडं भान आलं. स्वयंपाक करायला माझा कधीच आक्षेप नव्हता, आक्षेप होता तो कंपल्शनला, त्यात नसलेल्या स्वातंत्र्याला. सासरी चर्चेला वावच नव्हता, प्रयोगशीलतेला परवानगी नव्हती. माझ्या घरी, माझ्या स्वयंपाकघरात मग मी रमले. मला काय येतं, जमतं, करावंसं वाटतं, करावंसं वाटत नाही हे माझं मी ठरवायला लागले. नवऱ्याची भूमिका आधीही तटस्थ होती आणि आता त्याला बोलण्याचा काही अधिकारच मी दिला नाही. तशीही त्याला तक्रारीला जागा कुठे होती? त्याला आयतं जेवायला मिळत होतंच. माझ्या मनावरचं स्वयंपाकाचं  दडपणच गेल्यावर मी नोकरीही बिनधास्त करू शकले. माझ्या मुलांना मी स्ववलंबी केलं. पण विचार कर. मी स्वतंत्र संसार थाटू शकले नसते तर? तरचा विचार करूनही मी शहारते. कारण मी नक्कीच बंड केलं नसतं. त्यांच्याच मनाप्रमाणे फक्त स्वयंपाक, सण, मुलं, आला-गेला हेच करत बसले असते, हे अगदी नक्की. कदाचित दोन मुलं झाल्यावर संसाराच्या वाढीव अपेक्षांखाली मी नोकरीही सोडली असती आणि आता पस्तावले असते! सुदैवाने, यातलं काही झालं नाही. योग्य वेळी बाहेर पडालो बाबा! संसार, नोकरी, मुलं सगळं नीट निभावलं, देवाची कृपा.”

मी गप्पच झाले. तिच्या बोलण्यात तथ्य होतं. सून ही सूनच असते. ती बाहेर काय करते, यापेक्षा ती घरात काय करते यालाच महत्त्व असतं. तिला सूट मिळत नाही, सहानुभूती मिळत नाही. एखादं काम केलं नाही, तर ’तसं का’ हे समजून घेण्यात कोणालाही रस नसतो. मीही हे अनुभवलेलं आहे.

आता दिवस बदललेल्त. किमान शहरातल्या घरांतून सुनेचं भरपूर कौतुक होतं, लाड होतात, करियरची कदर होते. मुलगेही संसारात सहभाग घेतात. तरी सासरच्या लोकांकडून अपेक्षांचा अदृश्य धागा असतोच, तक्रारीसाठी काही ना काही सापडतंच. म्हणूनच आजच्या काळातही “मिसेस”सारखे केवळ स्वयंपाकघराभोवती फिरणारे, रिग्रेसिव्ह वाटणारे सिनेमे इतक्या बायकांना जिव्हाळ्याचे वाटतात.

आपण त्यातून काही बोध घेतो का, हे अधिक महत्त्वाचं आहे. आता नात्यांमध्ये संवाद सहजपणे होऊ शकतो. सूनेकडून काय आणि किती अपेक्षा आहेत, हे सासू सुनेला सांगू शकते. तिला त्या पूर्ण करणे शक्य आहे का नाही, हे ती सासूला सांगू शकते. एक सून म्हणून तिला कोणती कर्तव्य करायला आवडतील आणि कशासाठी स्वातंत्र्य हवं आहे, हेही ती सासूला सांगू शकतो. गैरसमज न होता, इमोशनल ब्लॅकमेल न करता, उलट या संवादसेतूचा फायदा घेऊन त्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी आचरण करणं आवश्यक आहे. कारण, यशस्वी संसारासाठी कर्तव्य आणि स्वातंत्र्य ता दोन्हीचा बॅलन्स महत्त्वाचा असतो. नाहीतर, कोणतीतरी एक बाजू नेहेमीच लंगडी राहील आणि हे असे सिनेमे पुढेही येतच राहतील.  

November 8, 2024

meiyazhagan / मैयाळघन

#PCWrites खरेतर एखाद्या सिनेमाबद्दल प्रचंड रेकमेन्डेशन आले, की सहसा तो मला आवडत नाही, म्हणून मी तो बघत नाही. पण मैयाळघन बघितला, कारण चित्रपट हळवा आहे, क्लीन आहे असे मात्र सगळ्यांनी सांगितले होते. असो, पाहिला. आणि… ठीक वाटला! जेवढे कौतुक होत आहे, तितका काही खास वाटला नाही. संथ सिनेमे मला आवडतात, पण हा उगाच लांबवला आहे, अनेक लूपहोल्स आहेत, त्रुटी आहेत. पण एका बाबतीत मात्र प्रचंड रिलेट झाला… बालपणीच्या जखमा! लहान, कोवळ्या वयात मनावर कसलेही आघात झाले, तर पुढे जाऊन माणूस तो संपूर्ण कालखंडच बंद करून टाकतो. त्यात invariably चांगल्या आठवणींचीही आहुती पडते, पण त्याला नाईलाज असतो.

माणसाचा मेंदू चांगल्या घटना लक्षात ठेवतो, पण वाईट घटना आणखी ठळकपणे लक्षात ठेवतो. त्यामुळे अरुलला त्याचे गाव मनाविरुद्ध सोडायला लागल्यावर त्याने तो सगळा कालखंडच मनाच्या कप्प्यात बंद केला, हे मात्र अगदी पटले. घरातली सुबत्ता, पै पाहुणे, अगत्य, दंगामस्तीचे निरागस बालपण आठवायला गेले, की नातेवाईकांनी केलेला कपटीपणा, वडिलांची हतबलता, पूर्वजांच्या घरातच कायम राहण्याचं भंगलेलं स्वप्न हे आठवणारच. नकोच ते. चांगलेही नको आणि वाईटही नको.

पण तंजावर सुटल्यानंतर मद्रासमध्ये स्थिरावण्याचा भाग आणखी दाखवायला हवा होता. एकदा मुळं उपटल्यानंतर दुसऱ्या जमिनीत रुजताना, ती कितीही सुपीक असली तरी वेळ जातोच. तो तिथे कसा रुजला, स्थिरावला आणि तंजावरपासून कसा मुक्त झाला हा भाग आणखी यायला हवा होता. बैलाची शर्यत आणि ’त्या’चे संवाद थोडे कमी चालले असते! किती बोलतो तो! बापरे.

 


 

असो. सगळेच लिहितात, म्हणून मीही हात धुवून घेतले आहेत. बालपणीच्या माझ्याही चांगल्या-वाईट स्मृती आठवल्या. मला दोन्ही अनुभव आलेले आहेत. वाईट अधिक का चांगले अधिक याबद्दल मी न्युट्रल आहे. सहसा मी चांगले लक्षात ठेवते, त्याबरोबर वाईटही येतात, पण ते साहजिक आहे. आज माणूस म्हणून जी काही तयार झाले आहे, त्यात दोन्हींचा हात आहे. त्यामुळे कशालाही नाकारण्यात अर्थ नाही, असे वाटते. असो. पोस्ट मैयाळघनबद्दल आहे! आणि अरविंद स्वामी मात्र भयंकर adorable आहे.