March 31, 2026

लोगोकथा - यूट्यूब


“निर्मळ रानवारा” नावाचे एक बालमासिक वंचित विकासतर्फे दर महिन्याला प्रकाशित केले जाते. “वंचित विकास” ही पुण्यातली एक मोठी, जुनी समाजसेवी संस्था आहे. मुख्यत्वे शहरातल्या वस्त्या आणि ग्रामीण भागातली मुले-मुली यांचा शालेय अभ्यासक्रमापलीकडेही विकास व्हावा, या हेतूने ही संस्था कार्यरत आहे.
मी या मासिकात दर महिन्याला विविध “लोगों”बद्दल लिहित आहे. लोगो, ट्रेडमार्क हे विषय माझ्या अतिशय आवडीचे आहेत. कॉलेजमधल्या मुलांना कायद्याच्या कक्षेतून मी ते शिकवते, पण लहान मुलांना (आणि मोठ्यांनाही) त्यातली गंमत, त्यांचा उगम, त्यामागचा विचार समजावा, हा मुख्य हेतू आहे. प्रत्येक लोगोची गोष्ट अतिशय इंटरेस्टिंग आहे, आशा करते तुम्हालाही ती आवडेल 😊
जानेवारी, २०२६ च्या अंकात मी “युट्युब”च्या लोगोबद्दल लिहिले आहे. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. 
 

 
***************
लोगोकथा १.
 
लोगो म्हणजे काय?
 
असं समजा, की तुमच्या हातात एक मोबाईल फोन आहे. त्याच्या स्क्रीनवर खूप अॅप्स आहेत. त्यातलं तुम्हाला यूट्यूबचं अॅप शोधायचं आहे. ते तुम्ही कसं शोधाल? तुम्ही पटकन एक लाल चौकोन शोधता, त्यावर एक पांढरा आडवा त्रिकोण असतो. हा आहे “यूट्यूब”चा लोगो. तो विशिष्ट लाल रंग आणि त्यावरचा पांढरा बाण हे चिन्ह तुमच्या ओळखीचं असतं. अगदी २ वर्षांची मुलं, म्हणजे जी मुलं शाळेतही जात नाहीत, तीसुद्धा सहजपणे मोबाईल फोनवर यूट्यूब शोधू शकतात, कारण त्यांना लाल रंगाचा चौकोन ओळखता येतो. तसंच, तुम्हाला व्हॉट्सप वापरायचं असेल, तर तुम्ही हिरवा चौकोन आणि त्यात पांढऱ्या रंगाचा रिसिव्हर हे चित्र शोधता. असं प्रत्येक गोष्टीला एक एक चिन्ह असतं. त्याला म्हणतात ‘लोगो’. खरंतर, कायद्याच्या भाषेत त्याला ‘ट्रेडमार्क’ असं म्हणलं जातं, पण आता सगळीकडे लोगो हेच नाव प्रचलित झालं आहे.
तर, लोगो म्हणजे काय? तर लोगो म्हणजे तुमची, म्हणजे कंपनीची किंवा तिच्या उत्पादनाची ओळख. आपली कंपनी, तिची वस्तू कुठूनही ओळखता यायला हवी, यासाठी हे लोगो अगदी विचारपूर्वक तयार केले जातात. जे लोक ती वस्तू वापरणार, त्यांना पटकन समजेल, त्यांचं लक्ष बरोब्बर तिथेच जाईल असेच लोगो तयार केले जातात. त्यासाठी ‘डिझायनर’ लोक खूप कल्पना लढवतात.
 
यूट्यूबचाच लोगो नीट पाहू. त्यांनी लाल रंग निवडला आहे. लालच का माहीत आहे? कारण, लाल रंग हा सगळ्यात आकर्षक रंग आहे. प्रत्येकाचं लक्ष त्याकडे वेधलं जातंच. (तुम्हीच बघा, तुम्ही एखादं पेन, टीशर्ट किंवा खेळातली कार विकत घ्यायला गेलात, तर तुम्ही सहसा लाल रंगाचंच पेन, टीशर्ट किंवा कार घेता. बरोबर ना? पहा बरं, तुमच्याकडे किती लाल रंगाच्या वस्तू आहेत?) म्हणून यूट्यूबनेही लाल रंग निवडला. आणखीही एक कारण आहे. यूट्यूबचं स्पेलिंग सुरू होतं ‘वाय’ने. सहसा कोणताही क्रम लावायचा असेल, तर ए, बी, सी असा क्रम लावतात. मग त्यात ‘वाय’ तर पार शेवटी जातो. मग किमान शेवटी तरी सगळ्यांचं लक्ष जावं, म्हणूनही त्यांनी लाल रंग निवडला.
 

 
 
आता त्यावरच्या त्रिकोणाकडे येऊ. यूट्यूबवर काय दिसतं? तर सिनेमे, गाणी, कार्टून, मुलाखती इ. म्हणजेच, त्यावर या सगळ्या गोष्टी आपण ‘प्ले’ करतो. आणि, ‘प्ले’चं चिन्ह असतं, एक आडवा त्रिकोण. लाल रंगावर पांढरा रंग उठून दिसतो, म्हणून यूट्यूबच्या लाल चौकोनात वापरलं, ‘प्ले’चं पांढऱ्या रंगातलं चिन्ह. आणि, असा तयार झाला, यूट्यूबचा अगदी साधा, पण सोपा आणि प्रभावी ‘लोगो’. तुम्ही लॅपटॉप किंवा टीव्हीवर यूट्यूब सुरू केलं, तर त्याबरोबर ‘प्ले’ची आडवी रेषही दिसते. म्हणजे, तुमचा ‘स्क्रीन’ किती लहान किंवा मोठा आहे, त्यावरूनही लोगोमध्ये थोडा बदल होऊ शकतो.
 
यूट्यूबच्या लोगोमध्ये एकच रंग आहे. पण अनेक रंग, चित्र, शब्द वापरूनही लोगो तयार केले जातात. त्या प्रत्येक रंगाला, चित्राला आणि शब्दाला काही महत्त्व असतं. अशाच काही लोगोंची माहिती आपण पुढेही पाहणार आहोत. तुम्हाला वाचायला आवडेल ना? 😊
 
****
#logo #youtubelogo #trademark #लोगोकथा   

2 comments:

Mohana Prabhudesai Joglekar said...

छान आहे माहिती. लोगो म्हणजेच बोधचिन्ह असाही उल्लेख हवा होता. मराठी शब्दही मुलांना कळला असता.

poonam said...

धन्यवाद मोहनाजी _/\_
logo साठी छान शब्द सुचवलात. ’नाममुद्रा’ असेही म्हणतात. मला हाही शब्द आवडतो. ’चिन्ह’, ’संकेतचिन्ह’ असेही शब्द वापरले जातात. मी पुढच्या लेखात हे शब्द घालते. मुलांना मराठी प्रतिशब्द माहित असायला हवा, बरोबर आहे.