स्थळ : एका उपनगरातल्या नगरशेवकाचं एशी हापिस
१ : काय, झाली का तयारी?
२ : हा कदीच! यंदा येक काम फार भारी झालं. त्ये, रामनवमीलाच मिरवनूक निघली आनं पाठोपाठ हनमान जयंती लागली. त्यामुळं डीजे, साउंड शिश्टिम, लाइट, गानी आनं आपली शे सव्वाशे पोरं… यक्दम रेडी हेत. यंदा पांडरे कुडते आन निळ्या टोप्या बी आनल्यात पेशल पाच हज्जार.
१ : आन पोलिसांचं काय?
२ : पोलिसांचं कुटं काय दादा? (दोघंही हसतात)
१ : बरोबरे रामनवमीची लॉटरी लागली यंदा. चला, पूर्न सालाचं टायमटेबल बगू… कसं… प्ल्यानिंगला बरं पडतंय. मला बी पार्टी हापिसला बजेट सांगायला लागतं. त्यात आपले चार-दोन वाडवून द्यावं लागत्यात. आता डीजेचे पैसे, त्येची उपकरनं, पोरांसाटी बिर्यानी, पेट्रोल.. एक हे का हिकडं. राजकारन आस्तं त्ये. घेतलं नाई तर कोनी देनार नाई! हा, कसकसं प्ल्यानिंग हाय, बोला.. जानेवारीपासूनचं सांगा…
२: तर, जानेवारीत २६ जानेवारी अस्ती. डीजे अस्तो, पर सादी गानी लावावी लागत्यात. मऽऽ फेब्रुवारीत कायतरी गनपतीचं आस्तं जयंती भौतिक. तवा मिरवनूक आस्ती. न्हेमीपरमानं मोटी. रथ, डीजे, लायटिंग, नाचायला पोरं, पोरी. बायाबी येत्यात, गनपती आस्तो नं.
१ : बराय. लेडीज आसल्या की कोनी बोलत पन न्हाई. बजेट मिळालं तर पुडल्या वेळपसून संक्रांतीबरूबर हितंबी लेडीजची वटी भरू. आमच्या मिशेसना पन चान्स भेटंल. बर, पुडं- होळी कदी, मार्चमधीच येती ना?
२ : व्हय, मार्च यक्दम सेट ए. धुळवड, रामनवमी आन हनमान जयंती. कदी येप्रिलमदी आस्ती, पन लागोपाठच अस्त्यात, फार काई प्रॉब्लेम नाई.
१ : मंग येप्रिल! हा, आपला हक्काचा सन!
(दोघेही कानाला हात लावून आकाशाकडे बघत ’बाबासायेब’ म्हणतात. तीन वेळा नमस्कार करतात.)
१ : मे मदी काये?
२ : बुद्द पोर्निमा!
१ : वावाऽऽऽ काय महान सौंस्क्रुती हाय आपली. दर म्हयन्याला काय ना काय हाएच.
२ : म पुडं जून, जुलै जरा स्लॅक जातोय. पर पुडे सेट ए परत - आगस्टात १५ आगस्ट, सादारन सप्टेंबरात गनपती, ऑक्टोबरात नौरात्र, नव्हेंबरात दिवाळी आन डिसेंबरात नाताळ अन ह्यॅपी न्यू इयर!
१ : वावावावा, पोरांना या वयात नाचायला आवडतंयच. आन आपल्याकडं पोरांची काय कमी, नाय का?
२ : आन गर्दी वाडवायची आसंल, तर कोनत्याबी वार्डातून आनू शक्तोच आपन पायजे तेवडी पोरं. कॉन्टॅकच हायेत ना तेवडे.
१ : त्ये समदं ठीकाय. पर जून जुलैला शोदा मग कायतरी.
२ : सायेब, जुलैत रेन ड्यान्स अस्तोय कुटं कुटं गावाकडं. त्यो चालंल का?
१ : (आनंदाने) आरं! चालंल म्हन्जी! धावंल. ब्येस्ट काडलं हे! नाच गानी आन पाऊस आसं फर्स क्लास कॉम्बिनेशन. वावावावा, काय आयडिया काडली आं, बेश्ट. मंग जून तेवडा रहातो. पर चालंन. कायतरी निघलच. पन बारा म्हैने पार्टी व्हायला पायजेल! कसंय, लोकांना ट्राफिक दिस्तो, आवाजाचा तरास हुतो, पर आमी केवड्या लोकांचा हाताला काम देतो त्ये नाई दिसत. समाजशेवा म्हटली की ह्ये बी आलंच म्हना. कौतुक होतंय, शिव्याबी पडत्यात. आता एक काम करा. ही रेन ड्यान्सची आयड्या काडल्याबद्दल परवाच्या मिरवनुकीत पयल्या रथात तुमी बसाचं. वैनी, पोरं, शेजारचे, भावकीतले समदे चडवा रथावर, काय?
२ : (कृतकृत्य होत) आओ सायेब! एकदम येवडं!
१ : हा म! समाजशेवक हे आपन. आपल्या मानसांसाटी एवडं तर केलंच पायजे न. नायतर मंग आसं करू, अगदी पयल्या नगं, लोकांना मी लगीच दिसलो न्हाई तर बावरत्याल, काय? मी पयल्यात चडतो, तुमी दुसर्या रथात या पाठून. चालंल ना? अओ, पब्लिक शेंटिमेंट आस्ती. राजकारन म्हन्जी सगळं बघावं लागतं.
२ : (पाया पडत) सायेब, तुमी म्हनाल तसं!
१ : (हसत) आसूदे आसूदे. या आता, कामं हाय्त बरीच.
***
2 comments:
झकास
धन्यवाद :)
Post a Comment