पूर्वतयारी
केल्याने
देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार ।
शास्त्र,
ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार ।।
अशी
एक आर्या आहे. यातली पंडित मैत्री, सभेत संचार आणि शास्त्र ग्रंथ विलोकन करणं काही
आमच्यासारख्या सामान्यांना शक्य नाही. त्यामुळे चतुरपणा येण्याकरता त्यातल्या त्यात
आम्हाला करण्यासारखं आहे ते देशाटन. जे आम्ही जमेल तसं जरूर करतो. त्या प्रमाणे २०१७
साली दिवाळीच्या सुट्टीत परदेशवारी करायचं असं निश्चित झालं होतं. जायचं कुठे हे ठरवायचं
होतं.
युरोपला
नक्की जायचं नाही, हेही ठरलंच होतं. युरोप खंडातला प्रत्येक देश अगदी बघण्यासारखा
आहे. तो देश थोडा तरी कळावा, बघावा, यासाठी प्रत्येक देशात किमान चार दिवस तरी जायला
हवं. त्यामुळे रिटायरमेन्टनंतरच युरोपला जायचं आहे. २०१७ ला कुठे जायचं मग? पर्याय
होते; याच क्रमाने- श्रीलंका, मॉरिशस, दुबई, मालदीव्ज, न्यु झीलंड.
प्रत्येक
शाळेच्या वर्गात असा एक विद्यार्थी असतो, जो नववीपर्यंत कोणाच्या फारसा लक्षातही नसतो.
पण दहावी सुरू झाली की तो अचानकच पहिल्या परिक्षेपासून भरघोस गुण मिळवायला लागतो आणि
बोर्डात एकदम पंच्याण्णव वगैरे टक्के मिळवतो! न्यु झीलंडचं आणि आमचं अगदी असंच झालं.
न्यु झीलंडबद्दल खूप पूर्वीच आम्ही ’एकदा इथेही जाऊ’ एवढीच खूणगाठ बांधली होती. पण
तिथे जाणं कधीच अग्रक्रमावर नव्हतं. या वर्षीही पर्यटनाकरता श्रीलंका हा देश जवळपास
निश्चितही झाला होता. पण मास्तर जसे बरोब्बर गुणी विद्यार्थी शोधून त्यांची दहावीच्या
स्कॉलर बॅचकरता निवड करतात, अगदी तसाच मिलिंदने, म्हणजे माझ्या नव-याने यादीच्या तळाशी
असलेला न्यु झीलंड पहिल्या स्थानावर आणला आणि चौकशीला सुरूवात केली.
अनेक
पर्यटक ऑस्ट्रेलिया-न्यु झीलंड अशी एकत्र ट्रिप करतात. ऑस्ट्रेलिया हा खंड प्रचंड मोठा
आहे. पर्यटक म्हणून किमान नावाजलेली शहरं आणि स्थानं बघायची तरी १५ दिवस लागतात. मग
अशा वेळी न्यु झीलंडवर थोडा अन्याय होतो. कसेबसे ६-७ दिवस त्या देशाला दिले जातात आणि
मग धड कोणताच देश बघून होत नाही. त्यामुळे आम्ही फक्त न्यु झीलंडवर लक्ष केंद्रित केलं.
चौकशीला
सुरूवात करताच, अनेक मदतीचे हात पुढे आले. मिलिंदचा एक मित्र आणि माझी एक मैत्रिण न्यु
झीलंडवासीच होते. त्यांनी ताबडतोब निर्वाळा दिला, की इकडे याच, इकडेच या! काही आणखी
ओळखीचे लोक, नातेवाईक मंडळी नुकतीच तिथे पर्यटनाला जाऊन आली होती, त्यांनीही ’जरूर
जा’ असं सांगितलं. मग आम्ही उभयतांनी थोडा खर्चाचा अंदाज घेतला. हे उघडपणे लिहिणं मला
आवश्यक वाटतं, कारण पर्यटन हा चैनीचा विषय आहे. परदेशात तर बराच जास्त खर्च होतो. आणि
आम्ही मध्यमवर्गीय नोकरदार माणसं. त्यामुळे ही चैन करण्यापूर्वी खर्चाचा विचार करणं
भागच होतं. पण मिलिंदकडून ग्रीन सिग्नल मिळाला.आणि आम्ही उत्साहाने तयारीला लागलो.
न्यु
झीलंड हा पर्यटक-स्नेही देश आहे. या देशाला त्याचं सर्वाधिक उत्पन्न पर्यटनामधून मिळतं.
साहजिकच, या देशात पर्यटकांकरता आवश्यक अशा सर्व सोयी आणि सुविधा आहेत. प्रत्येक प्रकारच्या
पर्यटक आपल्याकडे आकर्षित होईल याची पुरेपूर काळजी न्यु झीलंडने घेतलेली आहे, असंही
म्हणायला हरकत नाही!
भौगोलिकदृष्ट्या,
न्यु झीलंड दक्षिण गोलार्धातला एक चिमुकला देश आहे जो चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला
आहे. अनेक शतकांपूर्वी जेव्हा गोंडवन हा प्रचंड खंड भूगर्भीय हालचालींमुळे फुटला आणि
अनेक खंड जन्माला आले, त्यानंतर ऑस्ट्रेलिया या मोठ्या भूभागापासून आणखी एक भाग फुटला
आणि न्यु झीलंडचा जन्म झाला. या देशात तेराव्या शतकापासून मानवी वस्ती आहे असा शोध
लावण्यात यश आलेलं आहे. ही दक्षिण गोलार्धातली सर्वात शेवटची मानवी वस्ती आहे. प्रामुख्याने
या देशाचे ’नॉर्थ आयलंड’ आणि ’साऊथ आयलंड’ असे दोन भाग पडतात. दक्षिणेला असल्याने,
तिथलं ऋतुमान हे भारताच्या संपूर्णपणे विरुद्ध- आपल्याकडच्या थंडीत, तिथे उन्हाळा आणि
उलट. आणि अर्थातच, हवामान आपल्यापेक्षा गारेगार! इथे समुद्राखालच्या भूगर्भीय हालचालींमुळे
अनेक नैसर्गिक आश्चर्य निर्माण झालेली आहेत. पर्यटकांना याच सौंदर्याची भूल पडते.
न्यु
झीलंड अतिशय निसर्गरम्य आहे. हा संपूर्ण देशच सुंदर आहे. अगदी चित्रातल्यासारख्या.
इथे कदाचित इतर देशांच्या मानाने मानवनिर्मित प्राचीन शिल्प अथवा इमारती कमी असतील,
पण त्याची कमतरता नैसर्गिक सौंदर्याने भरून निघालेली आहे. संपूर्ण देशात, या टोकापासून
त्या टोकापर्यंत समुद्र, डोंगर, बर्फ, नद्या, तळी, हिरवीगार कुरणं अशी मुक्तहस्ते उधळण
आहे. प्रदूषण नावालाही नाही. मानवी वस्ती विरळ. त्यामुळे हे नैसर्गिक सौंदर्य अनाघ्रात
आहे.
नुसतंच
निसर्गदर्शन एकसुरी होऊ नये, म्हणून न्यु झीलंडमध्ये मुद्दाम साहसी खेळ विकसित केलेले
आहेत. या देशाचं वैशिष्ट्यं असं, की डोंगर आहेत, पण फार उंच नाहीत. आणि तसं असूनही
त्यावर हिवाळ्यात बर्फवृष्टी होते! त्यामुळे स्किइंग, स्केटिंग या खेळांपासून ते बंजी
जंपिंग, स्काय डायव्हिंग, पॅरा सेलिंग, पॅरा जंपिंग, गन्डोला राईड्ज, सर्व त-हेचे वॉटर स्पोर्ट्स यांचीही रेलचेल आहे. प्रत्येकाच्या
तब्येतीला आणि साहसी वृत्तीला मानवेल असा एक तरी खेळ इथे आहेच, त्यामुळे पर्यटकांना
याचंही आकर्षण वाटतं.
न्यु
झीलंड ही मूलत: एक युरोपियन कॉलनी होती. त्यामुळे इंग्लिश ही इथली प्रमुख भाषा आहे.
पर्यटकांच्या दृष्टीने हा एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे. यामुळे आपण इथे आपापले, एकटेदुकटेही
सहज फिरू शकतो. काही अडलं, तर विचारू शकतो. भाषेचा अडसर येत नाही. तसंच, इथे फिरण्याचेही
अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक पर्यटन कंपन्या इथे त्यांच्या सहली आणतात. आपल्याला
त्यांच्याबरोबर येण्याचा पर्याय आहेच. पण त्यांचा आखीव कार्यक्रम नको असेल, तर आपण
स्वत:ची ट्रिपही आखू शकतो. पर्यटन कंपन्या आपल्या मागणीनुसार तशी ट्रिप आखून देतात.
आजकाल सर्व बुकिंग्ज इंटरनेटचा वापर करून ऑनलाईनही करता येतात, त्यामुळे आपण घरबसल्याही
स्वत: हे करू शकतो. अतिशय सोपी आणि सुटसुतीत स्थानिक दळणवळण सेवाही इथे पुरवली जाते.
पर्यटकांच्या सोयीला प्रत्येक ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. शहरांच्या मध्यवर्ती भागात
स्थानिक बसेसची माहिती मिळते. सर्व लोकप्रिय पर्यटक स्थानांवर या बसेस सांगितलेल्या
वेळी सुटतात. त्याचं बुकिंग अगदी जाण्याचा आदल्या दिवशीही करता येतं, किंवा एक महिना
आधी, ऑनलाईनही करता येतं. बर, तुम्हाला आणखी थोडी साहसी मजा अनुभवायची असेल, तर संपूर्ण
न्यु झीलंड देश हा चक्क एखादी कार भाड्याने घेऊनही फिरता येतो! भारतीयांना तर हे अतिशय
सोपं जातं, कारण इथे ’लेफ्ट हॅंड ड्राइव्ह’, म्हणजेच आपल्यासारखीच वाहतूकीची पद्धत
आहे. तसं करण्याकरता हव्यात फक्त दोन गोष्टी- चारचाकी चालवण्याचा तुमच्या देशातला वैध
परवाना, जो किमान एक वर्षापूर्वी काढलेला असेल आणि एक क्रेडिट कार्ड! बस्स, या दोन
गोष्टी असल्या की आपण विमानतळावर उतरल्यानंतर थेट आपल्या गाडीत बसून पर्यटनाला सुरूवात
करू शकतो!
त्यामुळे,
निसर्गसौंदर्य, साहस, सेवा, सुविधा, सुटसुटीतपणा, भाषा आणि महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितता-
या सर्वच कसोट्यांवर न्यु झीलंड उत्तीर्ण होतो. आम्हाला जसजशी ही माहिती मिळत गेली,
तसतसे आम्ही जाण्याच्याही आधीपासून या देशाच्या प्रेमात पडायला लागलो! मिलिंदने अनेक
जणांशी बोलून ’इटिनररी’ तयार केली. विमानाची तिकिटं आमची आम्हीच काढली. तिकडचं हॉटेलांचं
आरक्षण, स्थानिक बसेसचं आरक्षण याकरता आम्हाला एक न्यु झीलंडमध्येच राहणारा ’जोशी’
नावाचा एजन्ट सापडला! जोशी प्रोफेशनल टूर एजन्ट आहेत, त्यामुळे हे त्यांचं कामच होतं.
पण आम्हाला उगाचच आनंद झाला तो परदेशात एक भारतीय सापडल्याचा! माझी एक मैत्रीण ऑकलंडमध्येच
स्थायिक झालेली आहे. सर्व प्राथमिक गोष्टी पूर्ण झाल्यावर आमचे व्हॉट्सॅप मेसेजेस आणि
फोन कॉल्स सुरू झाले. तिने परत एकदा ’ये ये’ असं प्रेमाने आमंत्रण दिलं. तारीख ठरली,
आरक्षणं झाली, माहिती काढून झाली. आता वेध लागले प्रवासाचे. एक नवीन देश पाहण्याचे,
जो आम्हाला म्हणत होता, ’किआ ओरा’, अर्थात, वेलकम!
-क्रमश:
(आम्ही २०१७ च्या दिवाळीत न्यु झीलंडला जाऊन आलो, त्या अनुभवाबद्दल ही लेखमालिका आहे. ती दर महिन्याला ’मेनका प्रकाशन’ च्या ’मेनका’ या अंकात प्रकाशित होत आहे. हा लेख मेनकाच्या फेब्रुवारी, २०१८ च्या अंकात प्रकाशित झाला आहे.)
1 comments:
छान! पुढील भाग सुद्धा वाचायला आवडतील. धन्यवाद. -मिलींद
Post a Comment