December 29, 2017

पुस्तक जन्माला आले हो!


Time of Conception ;) 
 
मनोविकास प्रकाशनाचे ’परदेशी शिक्षणाच्या वाटा’ हे डॉ. श्रीराम गीत लिखित पुस्तक. त्याचे शब्दांकन मी केले होते. ते पूर्ण झाल्यावर प्रकाशक आणि सहाय्यक संपादक स्नेहा यांच्याबरोबर एक भेट झाली. प्रकाशनाची ’तुमचे आमचे सुपरहीरो’ अशी एक पुस्तक-मालिका आहे. या मालिकेत तुमच्या आमच्यासारख्या ’नॉर्मल’ घरांमध्ये जन्मलेल्या, पण आपल्या कर्तृत्वाने खूप मोठी झेप घेतलेल्या ’सुपरहीरो’ यांची ओळख असते. टार्गेट वाचक- वय वर्ष १० ते १४! प्रकाशकांना माझ्या आधीच्या कामाचा बरा अनुभव आला असल्यामुळे (:-)) त्यांनी मला या मालिकेकरता मी लिहिन का याची चाचपणी करण्याकरता बोलावले होते. भेटीदरम्यान मला कोणाविषयी पुस्तक लिहिता येईल असा विचार सुरू असताना अचानक मला अचानक स्नेहाने विचारले, “जे. के. रोलिंग या लेखिकेबद्दल तुला माहित आहे का?” मी मनातल्या मनात टुणकन उडी मारली आणि प्रत्यक्षात वयाला आणि स्थानाला न शोभेलशा उत्साहाने तत्काळ म्हणाले, “मी जरूर लिहिन तिच्यावर पुस्तक!” अशा रीतीने बीज रोवले गेले ;-)

Gestation Period 

“मला बाळ हवंय” असं नुसतं म्हणणं फारच सोपं असतं. प्रत्यक्ष बाळ ओटीत पडल्यावर सटपटायला होतं, हो की नाही? :-D माझंही तसंच झालं. जे.के. ही सुपरहीरो आहे यात वादच नाही. तिच्या पुस्तकांची आम्ही घरी पारायणं केली होती. तिचे सिनेमे आम्हाला तोंडपाठ होते. तिची गोष्ट सांगायची पद्धत, त्यात गुंफलेली फिलॉसॉफी, तिची कल्पनाशक्ती महानच आहे. शिवाय, ती फक्त हॅरी पॉटरपुरती सीमितही नाही.  खरं तर हॅरी पॉटरची सातही पुस्तकं लिहून झाल्यानंतर तिने एकही शब्द लिहिला नसता तरी चाललं असतं. पण ती हाडाची लेखिका आहे. ती आजही सातत्याने लिहित आहे, आपल्याच लेखनात नावीन्य आणते आहे, वेगवेगळे जॉनर्स हाताळते आहे. तिच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. पण ती पैशाकरता लिहित नाही, तर लिहिल्याशिवाय राहवत नाही, म्हणून लिहितेय! फार भारी आहे हे! तिच्यामागे कोणीही गॉडफादर नाही, तिला कोणत्याही उद्योगसमूहाचं बॅकिंग नाही. एका लेखिकेने केवळ स्वत:च्या कल्पनाशक्तीवर मिळवलेलं हे यश आहे. अर्थातच ती एक सुपरहीरो आहे.

Morning sickness and first trimester

बीज माझ्याकडे होतं. आता ते फुलवायचं होतं. माझ्या मनात एक पळही जे. के.च्या कर्तृत्वाबद्दल दुमत नव्हतं. गोंधळ होत होता तो मांडणीचा. मला ऑडियन्सचा विचार करणं गरजेचं होतं. शालेय मुलांना एखाद्या अज्ञात व्यक्तीचं चरित्र सांगायचं होतं. मुलांना त्याबद्दल interest वाटणं गरजेचं होतं. मांडणी अशी करणं आवश्यक होतं की तो interest शेवटपर्यंत टिकून राहिला असता. त्यामुळे काय लिहावं, कसं लिहावं, कसं मांडावं यात काही काळ गेला. खूप लिहिलं, परत ते खोडून टाकलं. कधीकधी एखादा मस्त फॉर्म सापडायचा, पण लिहिता लिहिता काहीतरी वेगळंच वळण घ्यायचा. ते बोअरिंग वाटायचं. मग पुनश्च: हरिओम! असं करत करत एकदाचा एक फॉर्म सापडला. बीज सेटल झालं आणि बाळसंही धरू लागलं. 

Sonography


मी जरा सेटल झाले, लिहायला थोडा हुरूप आणि उत्साह यायला लागला. थोडं लिहूनही झालं. आणि स्नेहाचा ’रूटीन चेकपला कधी येतेस?’ असा फोन आला! जेवढं लिहून झालंय ते घेऊन ये, एकत्र वाचू आणि ’फील’ घेऊ आणि काही सजेशन्स असतील तर तीही देता-घेता येईल असा उद्देश होता. माझ्या पोटात गोळा आला. या ’चेकप’ आणि ’सोनोग्राफी’त काही भलतंसलतं निघालं तर? सगळं व्यवस्थित असेल असं आशा असतेच, पण तरीही नको त्या शंकाही येतातच. लिहिलेली पहिली दहा पानं धडधडत्या हृदयानं तिच्याकडे सुपूर्त केली. आणि रिपोर्टची वाट पाहत बसले. स्नेहाची सराईत नजर झरझर फिरत होती आणि मी तिच्याकडे एकटक बघत बसले होते. एकदाचं तिचं वाचून संपलं. एकच शब्द म्हणाली, “करेक्ट चाललंय”. अक्षरश: हृदय धप्पकन जागेवर येऊन पडलं. तिने आणखीही काही सजेशन्स दिली. जी अर्थातच पटण्यासारखी होती.

Second Trimester

सगळं काही आलबेल आहे म्हणताच मी जोमाने लिहायला लागले. यात माझी खूप इच्छा होती, की प्रत्यक्ष जे.के.शी बोलावं, गेलाबाजार तिला ईमेल लिहून तिने मला प्रत्युत्ततर धाडावं. प्रश्न साधेच होते- तिला कोणाची लेखनशैली आवडते, रिकाम्या वेळात तिला काय करायला आवडतं, तिला स्वत:मधलीच एखादी गोष्ट डाचते का… असे साधे प्रश्न. पण अशी पृच्छा करताच आम्हाला असं कळलं की JKR is not open for personal questions. In case of any question regarding her stories or characters she will send an answer. इथे थोडी खट्टू झाले. पण म्हटलं ठीके. मग तिच्या लेखनशैलीवर आणि फिलॉसॉफीवर लक्ष केंद्रित केलं. मला असं नेहेमी वाटतं, की प्रत्येक लेखनात ’लेखक’ दिसायला हवा. हे जे.के.चं चरित्र आहे, तिची ओळख आहे. पण ती मी करून देते आहे, त्यामुळे तिच्यात विशेष काय आहे- माझ्या दृष्टीने हे मी सांगायला हवं. त्यामुळे लेखनाला तसं वळण दिलं. असं करत करत पुस्तक लिहून पूर्ण झालं. मग ते आणखी एका उपसंपादकांकडे गेलं. त्यांनी बराच वेळ घेतला आणि ब-याच दुरुस्त्या सुचवल्या. त्या दुरुस्त्या पाहून मी खरं सांगते, हिरमुसले होते. पण त्यांच्या सुचवण्यांना मान देऊन मी ते फार प्रयासाने, पण positively घेतलं. काही भागाचं पुनर्लेखन केलं, काही भाग नव्याने लिहिला. परत एक ड्राफ्ट सुपूर्त केला. परत थोडा वेळ मध्ये गेला. मग मात्र त्या उसंकडूनही हिरवा कंदील दाखवला गेला आणि मी हुश्श केलं! 

Third Trimester
आमचं बोलणं सुरू झालं डिसेंबर २०१६ मध्ये. पुस्तक दुरुस्त्यांसह पूर्ण लिहून झालं ते ऑगस्ट २०१७ मध्ये. म्हणजे तसं सगळं एकदम वेळेत झालेलं होतं. मग नियती थोडी हसली. म्हणाली ’अब देखो मजा.’ या वर्षी दिवाळी होती ऑक्टोबरच्या मध्याला. पण सप्टेंबरमध्ये दिवाळी अंकांचे काम सुरू झाले आणि माझ्या पुस्तकाची मांडणी करणारे आर्टिस्ट कमालीचे अडकले. त्यामुळे ’लेखनाचं पुस्तक होणं’ ही संपूर्ण प्रक्रियाच कमीतकमी दोन महिने पोस्टपोन झाली :-( मी हात चोळत बसले फक्त. फारच कष्टाने इतर सांसारिक कामांकडे मन वळवलं. 

Wait, the wait is not over yet!

नोव्हेंबर महिना उजाडला. नॉर्मल डिलिव्हरी तर पुढे गेली. आता सिझेरियनची तारीख काढायची होती. आर्टिस्टने वेळ दिला. ते प्रोफेशनल असल्याने आणि पुस्तक छोटेखानी असल्याने त्यांनी झटपट काम संपवलं. माझ्या मनाने परत उचल खाल्ली. पण परत एकदा निराशा! आणि यावेळी घनघोर. कारण पेचच तसा होता. मी प्रकाशकांना ’कधी छापणार ?’ असं विचारायच्या आधी त्यांचाच मला फोन आला. जे.के. हा आता ब्रॅन्ड झालेला आहे. त्यामुळे तिच्यावर लिहिलेल्या पुस्तकाकरता तिची परवानगी हवी असा त्यांचा आग्रह होता. मजकूर नुकताच फायनल झाला होता. त्यामुळे आता तिची परवानगी घेण्याची वेळ आलेली आहे असं त्यांचं म्हणणं पडलं. प्रकाशनाचा विचार करता ते योग्यही होतं. पण अडचण अशी, की आपलं पुस्तक मराठीत. तिला मजकूर कळवणार कसा? संपूर्ण पुस्तक अनुवादित करून पाठवायचं की काय? शिवाय एकदा तिला परवानगी विचारायचं पत्र पाठवलं की आपल्या हातून डावच सुटला ना! तिने परवानगी नाकारली किंवा worse, तिने उत्तरच नाही दिलं तर? मग आपल्या पुस्तकाचं भविष्य काय? अनेक valid प्रश्न पडले. पण त्यांना उत्तरं नव्हती. मग तिला एक तपशीलवार ईमेल तयार केली. त्यात सगळा इतिहास-भूगोल लिहिला. पुस्तकात काहीच आक्षेपार्ह नसून, उलट तिचं खूप कौतुकच केलेलं आहे, त्यामुळे तिने परवानगी द्यावीच अशी कळकळीने विनंती केली आणि ईमेल धाडली. तिला म्हणजे तिच्या एजन्टला. आणि परत एकदा थांबले. थांबलो. सगळेच.

या काळात मी खचले होते. माझ्या किंवा कोणाच्याच हातात आता काही नव्हतं. The waiting game was still on! हे बाळगलेलं बीज आता असंच अर्धवट राहणार अशी जणू खातरीच पटली माझी. निराश झाले. नशीबाला बोल लावला, रडले, देवाला दोष दिला, वगैरे वगैरे सगळं काही केलं.

The date is set!

आणि ईमेलने उत्तर आलं! तीनच दिवसांत आलं. मी थकून गुडघे टेकले आणि आलं. एजन्टाने काही किरकोळ अटी आणि शर्ती घातल्या आणि परवानगी दिली हो दिली. आनंदीआनंद झाला. सगळे जण परत उत्साहाने कामाला लागले. परत एकदा आतली सजावट, मजकूर, अलाइनमेन्ट असे सोपस्कार झाले आणि पुस्तक छापखान्यात admit झालं. यथावकाश delivery झाली. पुस्तक झाले हो, पुस्तक झाले! सुंदर, गोडगोमटं पुस्तक हातात आलं. जन्मतारीख होती १० डिसेंबर, २०१७! 

आज बरोब्बर वीस दिवस झाले. पण अजूनही पुस्तक हातात घेतलं की भारी वाटतं. ऊर भरून येतो. ही सगळी कहाणी आठवते. मी भाबडी असेन कदाचित. हा काही एकमेवाद्वितीय अनुभव नाही. पण तरी, ’आपला तो बाळ्या’च ना? :-) आणि प्रत्येक आईला आपल्या प्रत्येक मुलाच्या जन्माचे किस्से अगदी तोंडपाठ असतात, नाही का? तशीच हीही… माझ्या या पहिल्यावहिल्या बाळाची जन्मकथा!

  

5 comments:

Unknown said...

जन्मकथा आवडली.. खरंच एखादी कलाकृती डोक्यात आल्यापासून वाचक/प्रेक्षकांपर्यंत पोचेपर्यंत किती स्थित्यंतरातून जात असते..
आता पुस्तकसुद्धा लवकरात लवकत वाचेन..
तुझं मनापासून अभिनंदन..

जयश्री said...

पूनम.... खूप खूप अभिनंदन गं..,किती छान लिहिलंयस ... आता पुस्तक बघायची उत्सुकता आणखी वाढलीये 😃

cheap tales! said...

Great! It was great reading..

Mohana Prabhudesai Joglekar said...

बाळाच्या जन्माची कथा छान उतरली आहे. अभिनंदन सगळं सुरळीत पार पडून बाळ - बाळंतीण सुखरुप :-).


poonam said...

जयू, चीप टेल्स, मोहना: मन:पूर्वक धन्यवाद! :)