September 29, 2017

पाडस

लेखिका- मार्जोरी किनन रॉलिंग्ज
अनुवाद- राम पटवर्धन



द इयरलिंग’ या १९३८ सालचं हे मूळ पुस्तक , ज्याचा ’पाडस’ हा मराठी अनुवाद पहिल्यांदा प्रकाशित झाला १९६७ मध्ये! म्हणजे हे पुस्तक मराठीत उपलब्ध होऊन यंदा बरोब्बर पन्नास वर्ष झाली! अतिशय गाजलेलं पुस्तक आहे हे, ’वर्ल्ड क्लासिक्स’ मध्ये ज्या कादंब-यांचा उल्लेख आवर्जून केला जातो, त्यातली ही एक कादंबरी. ज्यांच्याकडून ’पाडस’ बद्दल ऐकलं आहे त्यांनी त्याची केवळ तारीफच केलेली आहे. मला हे पुस्तक वाचायला बराच उशीर झाला. त्याला ठोस असं काहीच कारण नाही. पण देवाचे आभार की हे पुस्तक वाचायची सद्बुद्धी त्याने मला दिली, नाहीतर एका तरल, सुखद अशा वाचनानंदाला मी मुकले असते!

मलपृष्ठावर पुस्तकाची ओळख आहे, त्याप्रमाणे हे पुस्तक (आजचा काळ जमेस धरून) जवळपास दीड-पावणेदोनशे वर्ष जुन्या फ्लोरिडाच्या जंगलात घडतं. ’ज्योडी’ या बारा वर्षांच्या शेतकरी मुलाची ही गोष्ट आहे. ज्योडी, त्याचा बाप पेनी आणि आई ओरी फ्लोरिडामधल्या एका दुर्गम जंगलात एका जमिनीच्या तुकड्यावर शेती करत असतात. पेनी आणि ओरीचा जोडा विजोड असतो. पेनी एक हाडाचा शेतकरी, काटकुळा, तब्येतीने साधारणसाच, पण अतिशय अनुभवी. जंगल, जंगली प्राणी, निसर्ग, माणसांचे स्वभाव यांबद्दल पेनीची समज अतिशय प्रगल्भ असते. तो एक कुशल शिकारीही असतो. स्वभावाने शांत, चटकन न रागावणारा, ओरीच्या शब्दात ’हृदयाच्या जागी लोणी’ असणारा पेनी म्हणजे ज्योडीचा रोल मॉडेल. त्याच्या उलट ओरी ही आडव्या बांध्याची, मजबूत हाडापेराची, स्पष्ट बोलणारी, प्रसंगी कोरडी वाटणारी ज्योडीची आई. पेनी-ओरीला ज्योडी व्हायच्या आधी बरीच मुलं झालेली असतात आणि दुर्दैवानं ती सगळी दगावलेली असतात. पण त्यामुळे ज्योडीबद्दल त्या दोघांनाही खूप जास्त प्रेम असतं असं नाही, ओरी तर उलट थोडी अलिप्तच झालेली असते ज्योडीबद्दल. ज्योडी सतत आपल्या बापाबरोबर असतो, त्याचं निरिक्षण करून एक एक गोष्ट आत्मसात करत असतो. शिकार कशी करावी, अस्वल, लांडगे या शत्रूंचा माग कसा काढावा, बंदूक कशी चालवावी ही धाडसी कामं ज्योडी अगदी लहान वयातच बापाकडून शिकतो. त्याबरोबर शेतीची कामं म्हणजे नांगरणी, पेरणी, पाणी आणणं, लाकडं फोडणं, कुत्री-गायी-शेळ्या-कोंबड्या यांची काळजी घेणं हेही त्याला येत असतंच. अतिशय दुर्गम भागात राहणा-या या बॅक्स्टर कुटुंबाला शेजार असा नसतोच. चार मैलांवर एक भलं मोठं फॉरेस्टर कुटुंब आणि त्यातले दांडगे सहा भाऊ हेच त्यांचे शेजारी. जंगलात एकटं राहताना माणसांची गरज भासतेच. पण विचित्र शेजारी असताना त्यांच्या कलानं कसं घ्यायचं, त्यांच्याशी कोणत्या बाबतीत समझोता करायचा आणि कोणत्या बाबतीत त्यांना लांब ठेवायचं याकरता पेनीचं अनुभवी शहाणपण कामी येतं. ज्योडी आपल्या साध्या छोट्या आयुष्यात अगदी आनंदी असतो. बापाबरोबर हिंडावं, काम करावं, आणि तीन वेळेला आईच्या हातचं उत्कृष्ट जेवण खावं, इतकं सरळ आयुष्य असतं त्याचं. पण ज्योडीला एका सवंगड्याची कमतरता कायम जाणवत असते. एक दिवस एका शिकारीत ज्योडीला मिळतं एक अगदी नुकतं जन्मलेलं पाडस- फ्लॅग. ज्योडी आणि फ्लॅगची जोडी जमते. एखादा प्राणी इतका मऊ, इतका गोंडस, इतका सुरेख, इतका ’आपला’ असू शकतो ही अनुभूतीच ज्योडीसाठी अगदी नवी असते. त्याचं आयुष्य बघता बघता फ्लॅगमय होऊन जातं. ’जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ या उक्तीने जिथे ज्योडी तिथे फ्लॅग हे समीकरणच होतं. आपण जगात कधीच कोणावरही इतकं प्रेम करू शकणार नाही जितकं आपण फ्लॅगवर केलं आहे ही जाणीव ज्योडीला होते. आणि हळूहळू ज्योडीमध्ये परिवर्तन व्हायला लागतं. तो वयाच्या त्या टप्प्यावर असतो जिथे ना धड तो मोठा असतो, ना लहान. त्याला अनेक गोष्टी कळत असतात असं वाटत असतानाच त्याच गोष्टी त्याला अचानक अनाकलनीय वाटायला लागतात. त्याला टोकाचा राग येऊ लागतो, त्याच्या अंगातली ताकद वाढू लागते, त्याची समज वाढू लागते. पेनी हे सर्व बदल शांतपणे निरखत असतो. आपलं आयुष्य जसं खडतर गेलं तसंच या मुलाचंही जाणार आहे हे त्याला माहितच असतं, त्यामुळे तो ज्योडीचं पोरपण शक्य तितकं जपण्याचा प्रयत्न करत असतो. पण काळ ही एकच गोष्ट असते, जी पुढे सरकत असते. काही अप्रिय घटना घडतात आणि हळूहळू का होऊना, पण एक दिवस ज्योडीचं पोरपण संपतं. छोट्या पाडसाचा एक पाडा होतो. ’पाडस’ ही कथा फ्लॅगची नाही, तर ज्योडीची आहे. त्याच्या पोरवय ते प्रौढवय या वयादरम्यानची आहे हे पुस्तक संपतासंपता अचानकच लक्षात येतं!

पुस्तकाचं कथानक म्हटलं तर अगदी साधं आहे. शेती करत गुजराण करणा-या गरीब कुटुंबात काय वेगळं होणार? पण मार्जोरी यांनी इतक्या सुंदर, रोचक, थरारक घटना या गोष्टीत एकामागोमाग एक गुंफल्या आहेत की चकित व्हायला होतं. निसर्गात राहताना जंगली प्राण्यांशी संघर्ष अटळ असतो. पुस्तकात शिकारीची विपुल वर्णनं आहेत. शिकार ठरवणं, माग काढणं, प्रत्यक्ष शिकार करणं, नंतर ती साफ करणं, आतडी, चरबी, मांस यांची विल्हेवाट लावणं, ते मांस खाणं, तळण, सुकवणं यांचं साद्यंत वर्णन जागोजागी आहे, पण हे वर्णन शाकाहारी माणसालाही कुठे किळसवाणं वाटणार नाही. स्वाभाविकपणे ती वर्णनं त्यात येतात. तीच कथा आजूबाजूच्या माणसांची. गोष्टीत ओघाने अनेक पात्र येतात. त्यांचं वर्णन, स्वभाव हे अत्यंत मोजक्या शब्दात मार्जोरी यांनी केलं आहे. हुतो आजी, ऑलिव्हर, त्याची प्रेयसी ट्विंक, तिच्यावर डोळा असलेला लेम फॉरेस्टर आणि बक, मिलव्हिल हे त्याचे भाऊ या माणसांचंच नाही, तर ज्युलिआ कुत्री, सीझर घोडा हे प्राणीही ओळखचे वाटायला लागतात. ’थोटं अस्वल’ या पेनीच्या पुरान्या दुश्मनाचं वर्णनही इतकं खुबीने केलं आहे, की जणू ते अस्वल आपलंही शत्रू आहे आणि कधी एकदा त्याचा खात्मा होतो असं वाचता वाचता वाटून जातं. सर्वात हृद्य आहे ते पेनी-ज्योडी या बाप मुलाचं नातं. प्रत्येक बापाची, त्यातूनही पैशाने गरीब असलेल्या बापाची एकच इच्छा असते, ती म्हणजे आपल्या मुलाचं आयुष्य आपल्यापेक्षा बरं असावं. पेनी आपल्या लेकाला पैसे तर देऊ शकतच नसतो, आणि त्याला हेह माहित असतं की ज्योडीचं पुढचं आयुष्य त्याच्या आयुष्यासारखंच कष्टमय असणार आहे. त्यामुळे तो ज्योडीला एक आनंदी, निर्धोक बालपण आणि त्याला जगाने शिकवलेल्या
शहाणपणाची शिदोरी देतो. ज्योडीचे अनेक पोरकटपणे तो नजरेआड करतो, वेळप्रसंगी त्याला ओरीच्या रागापासून वाचवतो, जुन्या गोष्टी सांगून हसवतो आणि प्रत्यक्ष काम करून संस्कारही करतो. एकदा अशी वेळ येते की पेनी जगतो का मरतो अशी वेळ येते, तेव्हा ’पेनी नसेल’ या कल्पनेनेच ज्योडी उन्मळून पडतो. पण पेनी बरा होतो, तो आपल्या एकुलत्या एका लेकाकरता. ’भूक म्हणजे काय असते? एका शेतक-याला जगण्यासाठी काही कटु निर्णय का घ्यावे लागतात’ याची उत्तरंही ज्योडीला पेनीच देतो.

राम पटवर्धनांचा अनुवाद हा अनुवाद वाटतंच नाही. हे पुस्तक जणू त्यांनीच लिहिलेलं आहे, इतकी त्यांनी मराठी भाषा त्या दूरवरच्या फ्लोरिडातल्या एका खेड्यातल्या भाषेची समरस झालेली आहे. अनुवाद कसा असावा याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे ’पाडस’. हा अनुवाद इतका अस्सल आहे, की मूळ पुस्तक आणखी खूप वर्षांनी वाचलं तरी चालेल असं वाटतंय.


आपल्याला कितीही हवंहवंसं वाटत असलं तरी आपल्या प्रत्येकाचं बालवय आपल्याला सोडून जातंच. ते अटळच असतं. त्यानंतरचं मोठ्या माणसांचं आयुष्य जगताना त्यात निरागसपणा, अल्लडपणा, उनाडपणा यांना स्थान असूच शकत नाही. पण हृदयाचा एक कोपरा बालपणीच्या सुखद स्मृतींनी कायम भरून ठेवता येऊच शकतो ना? ज्योडीकरता पेनी हेच करतो. ’पाडस’ने माझ्याकरता हेच केलं आहे. या पुस्तकाने मला असा काही वाचनानुभव दिला आहे, माझ्या हृदयाचा एक कप्पा आनंदाने, निरागसपणाने भरून गेला आहे. कायमसाठीच!! 

1 comments:

मन कस्तुरी रे.. said...

अगदी.
मी ही इतक्यातच वाचलं हे पुस्तक. नि:शब्द व्हायला होतं एंड ला.
खूप सुंदर वाचनानंद देणारं पुस्तक!