June 21, 2016

ते एक वर्ष- ४

ऑफिस ऑफिस (२)

तर त्या एमडींकडच्या मीटिंगबद्दल मी सांगत होते. एमडी त्या दिवशी घरीच होते. शिवाय ज्यांच्याबरोबर वाटाघाटी चालू होत्या तेही त्यांच्या घरीच भेटणार होते. म्हणून सर्व कागदपत्र घेऊन त्यांनी आम्हालाही घरीच बोलावलं होतं. आम्हाला न्यायला त्यांची गाडी आली. तेव्हा फॅशनमध्ये असलेली भयंकर महाग अशी गाडी होती ती. हे सगळंच मला नवीनच होतं. मी पुण्यातही काम केलं होतं. पण घरी-बिरी काही आम्हाला कोणी बोलावलं नव्हतं बुवा कधी. कार वगैरे तर आमच्या सरांकडेही नव्हती तेव्हा. मुंबईचा प्रकारच वेगळा होता. तर पुढे ड्रायव्हर, त्याच्याशेजारी शहा, मागे मी आणि सुनिथा असे निघालो. एसी गाडी होती. आम्ही कुठे जात होतो कोणास ठाऊक? मी आपली मान खाली घालून कागद पुन्हापुन्हा तपासत होते, नीट करत होते. सुनिथा मला काय-काय विचारत होती त्याला मी हं, येस, या इतकंच उत्तर देत होते. तिचं आणि शहांचं बोलणं चालू होतं, मी ऐकत होते. शेवटी तीच मला म्हणाली, ’We are going to Pali Hill. Been there before?’ काय येडी की काय? असं अर्थातच मनातल्या मनातच म्हणाले मी. मान मात्र जोरात हलवली. ’It’s a beautiful place. But lots of traffic on the way’. खरंच होतं. दीड तास लागला. पण शोफर ड्रिव्हन कारचं सुख काय असतं मला त्या दिवशी कळलं. 

शेवटी वळणावळणाचा एक वर वर जाणारा रस्ता घेत आम्ही घरी पोचलो. भारी लोकॅलिटी होती. एमडीचं घर कसलं ते? बंगला होता. बागेसकट. मी वेडीच झाले होते. ही मुंबई होती? हे मुंबईमधलं घर होतं? साईड बिझनेस म्हणून सिनेमांना शूट करायला दिलं असतं घर तर शब्दश: घरबसल्या कमाई झाली असती. हॉलमध्ये गेलो. काय ती भव्यता!! पांढ-या शुभ्र भिंती, पांढरे शुभ्र सोफे, शोकेसेस, त्यातल्या नाजूक वस्तू… हॉलची उंची भरपूर होती. दोन संगमरवरी खांबांनी ती पेलून धरली होती. माझे डोळे बटाट्याएवढे झाले असणार नक्की ते सगळं पाहताना. पण दीड तासांचा प्रवास आणि एसी यामुळे रेस्टरूमची निकडीने आवश्यकता होती. विचारायचं कसं? पण सुनिथालाही गरज होती. मी हुश्श केलं. मला स्त्री बॉस मिळाली आहे यासाठी मी देवाचे आभारच मानले. बाथरूमही संगमरवरी, सुगंधित. पार्ल्यातल्या घरातली पुढची खोली होती, तेवढी तर नक्की होती ती बाथरूम. मला तर रडूच यायच्या बेतात होतं. असो. 

मीटिंग पार पडली. मला बोलायचं काही कामच नव्हतं. वाटाघाटी चालू होत्या. ऍग्रीमेन्ट, क्लॉजेज यावर चर्चा झाली. सह्या मात्र झाल्या नाहीत. त्या नंतर कधीतरी होणार होता, मग जेवण!! तेही तिथे होतं? देवा. मला परत एकदा कॉम्प्लेक्स आला. भव्य डायनिंग टेबलवर आता आम्ही गेलो. एमडीची सुंदर, सुरेख, मेक-अप केलेली बायकोही सामील झाली. जेवण वाढायला नोकर होते. ती त्यांना मस्त हुकूम सोडत होती. असूयाच वाटली मला तिची, खरं सांगते. परत एकदा पांढ-या शुभ्र ताटल्या, कटलरी, पाणी प्यायला काचेचे ग्लास आदी समोर आले. मध्ये एकदा (तिकडे वाटाघाटी टेबलवर बसलेलो असताना) शुभ्र पांढ-या आणि एकच सोनेरी नाजूक किनार असलेल्या कपांतून चहा झालाच होता. सगळं पांढरंशुभ्र पाहून डोळे पांढरेच होत होते माझे (हो अगदी क्लिशे उपमा आहे, माहितेय, तरी.) लोक at ease होते. कोणी माझ्याकडे विशेष लक्ष देत नव्हतं. माझ्या मनात मात्र उगाचच हा ग्लास फुटला तर किती नुकसान होईल वगैरे सॅडिस्ट विचार येत होते. जेवण मस्त होतं. मी नेहेमीइतकीच जेवले, तरी उगाचच आपण खूप तर खाल्लं नाही ना हा गिल्ट वाटत राहिला. जेवताजेवता मी परत- ही मिसेस एमडी थोडीच स्वयंपाक करतेय? नोकर आहेत हाताखाली. एखादा सण आला की आई बिचारी सकाळपासून एकटी खपत असते, तिला दोन नोकर मिळाले असते तर?- असलेच विचार करत बसलेली.

शेवटी निघालो बाबा एकदाचे तिथून. मजल दरमजल करत परत अंधेरीला आलो. उतरताना शहा म्हणाले, ’Come to my office tomorrow.’ आणि हसले.
ते का हसले हे मला दुस-या दिवशी कळालं.

****

Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

2 comments:

raju said...

Interesting Turn ghetla kathene!

Unknown said...

मध्यंतरी जेव्हा पुण्यात स्वाईन फ्लू ची साथ आली होती तेव्हा ४ खाजगी शाळांतील मुलांच्या लसीकरणाकरीता एके ठिकाणी गेलो होतो. या शाळांचा ट्रस्टी कोणी बंगाली "चॉटर्जी" होते. लसीकरण संपल्यानंतर त्यांच्या घरी आम्हाला जेवणाकरीता निमंत्रण होतं. त्यांच्या घरी गेल्यानंतर कळलं श्रीमंती काय असते. डिट्टो असाच सरंजाम सगळा. घरच काय माणसं देखील 'मार्बल'ची वाटावित अशी. "पांढरे" हातमोजे घालून सर्व्ह करणार्या तिथल्या कूक ची ईंग्रजी ऐकून जाम कॉम्प्लेक्स आला पण. ईथे फरक मात्र हा होता की आम्ही भिडभाड न ठेवता रेटून हाणलं सगळं.
छान जमलिये कथा!