’तमाशा’चा अर्थ- रंगमंचावरून सादर केलेली कला. हा रंगमंच म्हणजे नक्की कोणता? समोर दिसतो तो नट-नट्या काम करत आहेत तो रंगमंच? जग म्हणजे एक रंगमंच आणि आपण नियतीच्या हातातली कठपुतळी पात्र असाही व्यापक अर्थ या तमाशाचा घेता येईल. इम्तियाझ अलीने तरी हाच व्यापक अर्थ घेतला आहे. रंगमंचावर नाचवल्या जाणार्या कठपुतळ्या निर्जीव असतात. त्यांना मन आणि इच्छा नसतात. त्यांच्या दोर्या ज्याच्या हातात असतात त्याच्या इच्छेप्रमाणे त्या बोलतात-हसतात-नाचतात. पण एक माणूस म्हणून जगाच्या रंगमंचावर जगताना आपणही नियतीच्या हातातल्या निर्जीव बाहुल्यांप्रमाणे असतो का, का आपल्याला काही दुसरे पर्याय असतात? या प्रश्नाभोवती ’तमाशा’ फिरतो.
लहानपणापासून फॅन्टसीच्या जगात वावरणार्या वेदची ही कथा आहे. राजपुत्र-राजकन्येमधलं प्रेम, हटकून त्यांच्या प्रेमात बिब्बा घालणारे व्हिलन, राजपुत्र आणि राक्षसाची लढाई आणि शेवटी सत्याचा आणि न्यायाचा होणारा विजय या फॉर्म्युलाशी त्याची ओळख एका गोष्ट सांगणार्या बाबांनी केलेली असते. जगाच्या पाठीवर कुठेही, कोणत्याही काळात प्रत्येक कथा ही अशीच घडते. वेदला ही फिलॉसॉफी प्रचंड प्रिय असते. तो तिच्याशी ’रिलेट’ करू शकतो. पण गोष्ट संपल्यावर काय? घर, वडील, नातेवाईक, शाळा, शिक्षक, गणित या वास्तव जगात त्याचा श्वास कोंडतो. कारण या जगाचा फॉर्म्युला काहीतरी वेगळाच आहे. इथे प्रेम, राजकन्या वगैरेंना स्थान नाही. इथे चालू आहे एक कधीनी न संपणारी शर्यत- अस्तित्वाची शर्यत. अभ्यास, मार्क, खूप मार्क, नोकरी, पगार, खूप पगार मिळवण्यासाठी जिथे धावावं लागतं ती शर्यत. या शर्यतीमध्ये तुम्हाला धावावंच लागतं. इथे दुसरा पर्यायच नाही. तुम्हाला ती आवडते का, तुम्हाला त्यात मनापासून भाग घ्यावासा वाटतो का हा प्रश्नच इथे गौण आहे. जगायचं आहे? व्यवस्थित जगायचं आहे? मग धावा. जीव खाऊन धावा.
या शर्यतीतून एकदाच ब्रेक घेऊन वेद ’कोर्सिका’ नावाच्या एका दूरच्या फ्रेन्च गावात जातो. जिथे त्याला कोणी म्हणजे कोणीही ओळखत नाही. इथे कसंही वागलं, काहीही बोललं, काहीही केलं तरी कोणालाही कळणार नाही. इथे ’नियती’ एक गंमत करते आणि वेदची गाठ पडते ताराशी. तारा वास्तव जगातली एक अत्यंत आदर्श मुलगी आहे. हुशार, श्रीमंत, स्मार्ट, आपलं काम न कंटाळता करणारी एक आदर्श तरुणी. जगण्याच्या शर्यतीत जे पहिले पाच नंबर लागतात ना, त्यापैकी एक नंबर तारा नेहेमीच पटकावत असते. या शर्यतीत धावत असूनही तारा उघड्या डोळ्यांनी जग बघू शकते. त्यामुळेच ती बंधनमुक्त वेदच्या प्रेमात पडते. हे असंही जगता येतं- उत्फुल्ल, मनासारखं, चिंतामुक्त, शांत, समाधानी याचा साक्षात्कार तिला वेद करवून देतो. पण वास्तव जगातल्या या राजकन्या आणि राजपुत्राची ताटातूट होते. त्यांनी तसं ठरवलेलंच असतं. रेसपासून तुम्हाला तात्पुरती सुटी मिळू शकते, मुक्ती नाही!
What happens in Corsica stays in Corsica असं ठरलेलं असलं तरी तारा कोर्सिका आणि वेदला आपल्या जगात घेऊन येते. नकळत, पण निश्चितपणे. सरळ चालणार्या रेषेला कधीतरी गंमत म्हणून वेडं-वाकडं जायला आवडत असेल ना? आवडत असेल की. आपण रेष सरळच जाणार असं इतकं गृहित धरलेलं असतं की तिलाही वळणं घ्यायला आवडत असेल हा विचारच आपल्या मनात येत नाही. असो. तर तब्बल चार वर्ष वेद ताराच्या मनात राहतो. तिचं एरवीचं आयुष्य उत्तमपणे चालू असतं, पण तरी एक कोपरा वेदची वाट बघत असतो. नियती परत एकदा तिच्यावर खुश होते. तारा आणि वेद परत एकदा भेटतात. पण हा वेद नसतोच. म्हणजे, वेद असतो तरी वेद नसतो. वेडंवाकडं, गोल, तिरकं, वाटेल तशी चालणारी वेदची रेषा आता एकदम सरळ झालेली असते. अशी एक रेष जी दिसायला सुंदर, नीटनेटकी असते. कुठे गडबड नाही, गोंधळ नाही. आपलं काम चोख करणारी. हजारो-लाखो रेषांच्या रेसमधली आणखी एक रेष. अशी रेष जिला इकडेतिकडे बघायची परवानगीच नाहीये, किंबहुना तिला ती परवानगी नकोच आहे. कारण एकदा सरळपणा सुटला, तर परत तिकडे येणं मुश्किल. त्यापेक्षा झापडं लावावी, म्हणजे मोहच होत नाहीत कसले. जगाच्या सरळ रेषांच्या शर्यतीत वेदने स्वत:ला ठोकूनठोकून बसवलं आहे.
ताराला हा वेद परका वाटतो. वेद जगाशी, आसपासशी फटकून आहे म्हणूनच तो वेगळा आहे. इतर लाख-कोटी रेषांप्रमाणे सरळ होणं हे त्याच्यासाठीच घातक आहे. तारा वेदला याची जाणीव करून देते आणि वेद हादरतो. भयानक द्वंद्वात अडकतो. आपण मुळात कसे आहोत आणि आपण स्वत:ला बदलून कसे झाले आहोत याचा तो प्रथमच विचार करतो. परत एकदा तो लहानपणी गोष्टी सांगणार्या बाबांकडे जातो. बाबा म्हणतात, बाळा मी काय सांगू? मी कसं सांगू? ही गोष्ट तुझी आहे. तूच हीरो आहेस. तूच आहेस राजपुत्र, तू ठरव, काय करायचं आहे तुला? कसं जगायचं आहे तुला? वेदने चढवलेली झापडं झटकन गळून पडतात. हजारो-लाखो समांतर रेषांना छेद देणार्या आणि त्यामुळेच सर्वात लक्षवेधक ठरणार्या त्याच्या आडव्या रेषेचा प्रवास सुरू होतो.
इम्तियाझ अली याचे सिनेमे प्रेक्षकाच्या ’अंतरंगाचा शोध’ घेणारे असतात. समोर चाललेली गोष्ट बघताबघता आपणही तिच्याशी रिलेट होत जातो. ’तुम्हाला जे आवडतं तेच करा’ असा ’संदेश’ देणारे अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. पण इम्तियाझचे काहीच स्ट्रोक्स असे जबरदस्त बसतात की वाह रे वाह! काहीच मोजके प्रसंग
१) लहानग्या वेदला सतत दिसणारे राम, रावण, सीता हे त्याच्यासारखेच स्वेटर घालतात.
२) वेदचा मशीनप्रमाणे झालेला दिनक्रम. हा इतक्यांदा दाखवलेला आहे आणि त्याच प्रिसिजनने, की आपल्यालाही वेदला विचारावंसं वाटतं, काय झालंय तुला?
३) ताराच्या प्रेमात असूनही, तिच्या घरातून निघताना वेद हमखास रोज घड्याळात वेळ बघतो, अगदी न चुकता.
४) मानसिक द्वंद्वाची जाणीव झाल्यानंतर प्रेझेन्टेशन्स करताना वेद नकळत तारासारखं बोलतो- चार इंग्लिश वाक्यांमध्ये एखादा हिंदी, माप काढणारा शब्द.
५) आपल्या वडिलांना गोष्ट सांगणारा वेद ताराचा उल्लेख करतो त्या आधी एकच क्षण थांबून एक मोठा श्वास घेऊन आधी सावरतो; मग पुढे बोलतो.
इथे इम्तियाझ अली दिसतो.
सिनेमावर नि:संशय ’रॉकस्टार’ची छाप आहे. पण रॉकस्टार हे वेड आहे, तर ’तमाशा’ हे एक साकार करता येण्याजोगं स्वप्न आहे.
तरीही, तरीही एक प्रश्न उरतोच. वेदसारखे टोकाची पॅशन असलेले असे आपल्या आसपास किती असतात? खुद्द आपण तरी असतो का? ती पॅशन, ते वेड, ती आवड असलेले अगदी मोजके असतात. पाच टक्के वगैरे. आणखी एक वर्ग असतो ज्यांना दुर्दैवाने चॉईस नसतो. समोर जे येईल ते निमूटपणे नियती त्यांना स्वीकारायलाच लावते. असे असतात दहा टक्के. आणि मग उरतो आपण. तब्बल पंच्याऐंशी टक्के. आपल्याला अनेक गोष्टींची आवड असते, पण पॅशन नसते. आपण अगदी निर्बुद्धही नसतो, आपण अत्यंत बुद्धीमान वेडेही नसतो. आपण फार तर सजग असतो. हृदय आणि पोट यांच्यामधला मार्ग आपण काढतो. जमेल तसे हृदयाचे आणि मनाचे लाड करतो; पोट भरल्यानंतर; किंवा तशी तजवीज केल्यानंतर. आपण आहोत त्या ’रिक्षावाल्या’सारखे- गाण्याची आवड असलेले, बर्यापैकी गाताही येणारे, पण संसारासाठी रिक्षा चालवणारे.
म्हणून हा सिनेमा अधिक भिडतो. मला भिडला. कारण ती रिक्षा मीही रोज चालवते आहे. असे वेदसारखे पॅसेंजर अधूनमधून येऊन जातात. तेच आनंदाचे, समाधानाचे क्षण.
5 comments:
लेख चांगला वाटला परंतु चित्रपट नाही आवडला
Thanks Bob! :)
खूप छान. .
Thanks Sanket!
नमस्कार,
पोस्ट छान आहे. मला संपर्कासाठी तुमचा इमेल मिळू शकेल का?
Post a Comment