आजही खाडकन लावलेल्या ट्यूबलाईट्च्या प्रकाशाने मला जाग
आली. दादावर मी
सॉलिड वैतागलो. पण
करणार काय? कूस
बदलून डोक्यावर पांघरूण ओढून परत झोपायचा प्रयत्न करायला लागलो. दादाची
दहावी आहे ना! सहन करावंच लागणार.
दादा उठला म्हणजे बरोब्बर साडेपाच वाजले असणार. एकही मिनिट मागे-पुढे नाही. दादा उठला म्हणजे आईही उठलेली असणार म्हणजे असणारच. पण
दादाबरोबर मीही उठलो की आई म्हणणार, “तू कशाला उठलास? आत्तापासून उठून लुडबुड करू नकोस.
जा झोप!” एकदा जाग आली की अशी मुळीच झोप येत नाही हे काय आईला माहित नसणार का? तरी
ती मला तिच्या, आणि महत्त्वाचं म्हणजे दादाच्या मार्गातून एखाद्या काट्यासारखा दूर
काढणार. कारण, दादाची दहावी!
दादाचा
दहावीचा क्लास सकाळी सव्वासहाला असतो म्हणून तो लवकर उठणार. मग त्याला शांतपणे आवरता
यावं म्हणून सुरुवातीला माझ्या गादीची उचलबांगडी आधी हॉलमध्ये झाली. पण हॉलमध्ये गादी
घालून जमिनीवर झोपल्यावर सोफ्याखालच्या त्या भयानक काळ्या अंधारातून बेडूक आणि साप
येतील असं मला सारखं वाटायला लागलं. दोनतीन वेळा मी मध्यरात्री घाबरून उठलो आणि रडतरडत
घर डोक्यावर घेतलं. मग माझी रवानगी झाली आई-बाबांच्या खोलीत. पण बेडवर आम्ही तिघं मावत
नाही म्हणून आई खाली गादी घालून झोपायला लागली. आपण एखादा दुष्ट राजा आहोत आणि प्रजेला
आपल्या पायाखाली तुडवत आहोत असं मला आईला बिचारीला खाली झोपलेली बघून वाटायला लागलं,
आणि मी निमूटपणे माझ्या आणि दादाच्या खोलीत परत बॅट्समन आऊट झाल्यानंतर पॅव्हिलियनमध्ये
जातो तसा परत गेलो.
त्यामुळे
दादाने साडेपाचला ट्यूब लावली तरी मला गप्प बसणंच भाग असतं. फार कटकट केली की आई त्याहून
जास्त बोलते मग, आणि ते खूप टोचणारं असतं. बाबाही कधी नव्हे ते रागावतात. पडल्यानंतर
खपली आली तरी ती जागा कशी हुळहुळत असते, तसा ’दादाचा अभ्यास’ आमच्याकडे सतत हुळहुळत
असते. जरा जरी धक्का लागला की रक्त वाहायला सुरूवात!
अर्थात,
मला काही रोज जाग येत नाही. अनेकदा पार साडेसात वाजले तरी मी मस्त झोपतो. दादा उठला
कधी, आवरलं कधी, गेला कधी... मला काहीही कळत नाही! पण असेही काही दिवस असतात जेव्हा
मला जाम झोप येत नाही. तसा आजचा एक होता. एरवी मी कूस बदलून झोपतो, पण आज उठल्यापासूनच
आई आणि दादामध्ये काहीतरी हळू आवाजात भांडण चालू होतं. मी ऐकायचा जाम प्रयत्न केला.
पण ते स्वयंपाकघरात होते, त्यामुळे नीट काही कळलं नाही. तरी, ’आई, मला जायचंय!’, ’नाही,
काही गरज नाहीये’ असे शब्द कानावर पडलेच. इतक्यात कधी नव्हे ते तणतण करत दादा खोलीत
आला आणि मी गच्च डोळे मिटून घेतले ते पार सातलाच उघडले. सात ही तशी आमच्याकडे शांत
वेळ असते. बाबा टेबलावर चहा पीत पेपर वाचत असतात. आई ओट्यापाशी काहीतरी करत असते. बाकी
आवाज नसतात. आईला वेळ असला की माझ्याकडे पाहून हसतेही कधीकधी. बाबाही, ’काय म्हणताय?’
विचारतात.
आज
मी उठून आमच्या खोलीच्या दारात आलो इतक्यात ’क्लास लावायचा म्हणतोय’ हे आईचं वाक्य
पडलं. आता मला नीट ऐकायला लागलो.
“इतका
मनापासून अभ्यास करतोय. काही गरज आहे का आता अजून एका क्लासची?”
“पण
त्याचं म्हणणं तरी काय आहे?”
“म्हणणं
काय असायचंय? तो आदित्य जातोय, केदारही जातो वाटतं, की हाही चालला त्यांच्या मागे.
पहाटे उठतो, क्लास, अभ्यास, शाळा करून थकून संध्याकाळी कुठे घरी येतो. रात्रीही बसतो
परत अभ्यासाला. बॅडमिंटन, फूटबॉल सगळं बंद केलंय. आता परत अजून एक क्लास? मला काही
पटत नाही बाई.”
“कसला
क्लास आहे हा? काही वेगळं आहे का? सकाळच्या क्लासमध्ये शिकवत नाहीत का ते?”
“सगळीकडे
सगळं शिकवतात हो. याचे उगाच हट्ट. बाकी घरात चित्र बघा... आई-वडील मुलांच्या मानगुटीवर
बसतात अभ्यास कर म्हणून. आणि इथे आपण त्याला म्हणतोय की अभ्यास कमी कर जरा!”
“ठीक
आहे. गरज नसेल तर काही नको क्लास. अबीर हुशार आहे, सिन्सियरही आहे. चाललाय तेवढा अभ्यास
पुरे आहे. समजावू त्याला संध्याकाळी.”
“खरंय.
हा एक असा, अती गुणी... आणि त्याचं दुसरं टोक म्हणजे आपलं शेंडेफळ!
माझा
उल्लेख! मी माझे कान टवकारले.
“जे
जे अबीरमध्ये नाही ते ते सगळं कसं काय हो अभंगमध्ये? मला तर नवल वाटतं! चंचल आहे, अभ्यासाची
गोडी नाही, सतत गुडघे फुटलेले...”
“असूदे
गं. अबीरसारखी मुलं कमीच असतात. अभंगसारखीच असतात जास्त करून. आपल्या डोक्यालाही थोडं
टेन्शन नको का?”
“मला
खात्री आहे, अबीरला कुठेही डोनेशन द्यावं लागणार नाही. याच्यासाठी मात्र आत्तापासूनच
सोय करावी लागणार आहे हळूहळू.”
“हं.
केलंय मी प्लॅनिंग. वेळ आहे पण त्याला अजून. सध्या तू त्याला उठव आता... वाजले किती?”
आई-बाबांचं
बोलणं ऐकता ऐकता माझा चेहरा हळूहळू छोटा होत गेला. दादासारखे मला भारी मार्क कधीच पडायचे
नाहीत हे खरं होतं. दर वेळी पेपर घरी आणले की दादा ’कसल्या फालतू चुका करतोस रे? बावळट!’
असं म्हणायचा आणि आई ’दादाकडून शीक काहीतरी’ असं वैतागून म्हणायची. बाबा काहीच म्हणायचे
नाहीत. फार तर ’अभ्यासात लक्ष द्यायला हवंय!’ इतकंच म्हणायचे. पण आज मला समजलं की मी
आई-बाबांसाठी टेन्शन होतो एक! मी दादासारखा हुशार नव्हतो याचं आज पहिल्यांदाच मला वाईट
वाटलं. मी निमूटपणे खोलीत परत येऊन पांघरूणाची घडी काढायला लागलो. इतक्यात आई आलीच
मला उठवायला. मी तिच्याकडे पाहिलंच नाही. पाठमोराच उभा राहिलो. आईही, ’अरे! उठलास का?
चल, आवर मग पटपट’ इतकंच बोलून गेली. रोजच्यासारखं प्रेमानी हाक पण नाही मारली. गोष्टीमध्ये
आवडती-नावडती राणी असते तसे दादा आणि मी आई-बाबांचे आवडते-नावडते मुलगे आहोत हे मला
पक्कंच समजलं. मला रडायला येणार असं वाटू लागलं. पण मी रडलो नाही.
**
थोड्या
वेळानं आवरून मी टेबलापाशी नाश्ता करायला गेलो. सुमनकाकू कामाला आल्या होत्या. दादाही
क्लासहून आला होता. आई-बाबा दोघंही आंघोळ करून ऑफिसला जायच्या तयारीत होते. आई आम्हाला
नाश्ता देऊन मगच ऑफिसला जायची. जाता जाता रोजच्या शंभर सूचनाही द्यायची. तसंच तिचं
आत्ताही चालू होतं एका बाजूला. बोलता बोलता आईनं काम केलं तर चालतं. पण मी बोलता बोलता
अभ्यास केला की हीच आई आणि शाळेत बाई मला रागावतात. शाळेत तर शिक्षाही होते!
बोलता
बोलता आईनं मला धिरडं वाढलं. धिरड्यात मेथी होती! पहिल्याच घासाला मला ती लागली. मी
एकदम ओरडलो.
“आई,
मेथी घातलीस???”
आईने
एकदम जीभ बाहेर काढली. “आईगं! सॉरी रे राजा. आज साफ विसरले बिनमेथीचं पीठ बाजूला काढायला...
आज खातोस का तसंच प्लीज?”
“मी
नाही खाणार. मी का खाऊ? तुला माहिताय ना मला नाही आवडत मेथी?”
“अरे
हो. पण एरवी नाही का आठवणीने वेगळं काढत? आज खरंच विसरले. सॉरी. आज हेच खा हं, प्लीज
राजा... नवीन काहीतरी करायचं म्हणजे... मला उशीर होतो आहे रे...”
“मला
नकोय.” मी अजूनच ओरडलो. “दादाला काय आवडतं ते तुला बरोब्बर आठवतं. माझंच काही लक्षात
राहत नाही!” मी ओरडत-ओरडत रडायच्या बेताला आलो.
असं
मी म्हटल्याबरोब्बर समोरून दादा फिदीफिदी हसला आणि शेजारून बाबांचा आवाज आला.
“अभंग!
आवाज खाली!! आई म्हणाली ना ती विसरली म्हणून? आणि सॉरीही म्हणली ना? बास मग. समोर आहे
ते खा चुपचाप. रेणू, तू आवर तुझं. त्याच्यामागे लागू नकोस.”
बाबा
ओरडल्यावर काय विषयच संपला. आता मात्र मला खूप जोरात रडू आलं. सकाळपासूनचं आई-बाबांचं
बोलणं परत आठवायला लागलं. खरंच का मी आई-बाबांचा नावडता होतो? आईपण माझ्या आवडीनिवडी
विसरायला लागली? मला आणखीनच रडायला यायला लागलं.
**
आई-बाबा
ऑफिसला गेले. सुमनकाकूही थोड्या वेळानं गेल्या. दादा काय, बसला खोलीत अभ्यासाला. घर
परत शांत झालं. मी तसाच ओठ बाहेर काढून डायनिंग टेबलावर बसलो होतो किती तरी वेळ. इतक्यात
कधी नव्हे ते अभ्यासाची तंद्री मोडून दादा मला शोधत बाहेर आला.
“काय
रे, काय करतोयेस? नुसता बसलायस काय? आंघोळ नाही केलीस अजून? आज शाळेला जायचंय ना?”
मी
काहीच उत्तर दिलं नाही. मी का त्याच्याशी बोलू? दाद्या माझा शत्रू होता. आणि शत्रूशी
गप्पा मारायच्या नसतात! याच्यामुळेच मला सारखी बोलणी खावी लागतात! घरी, शाळेत, सगळीकडे.
सगळ्यांसमोर शहाणा असणारा दादा मला जाम त्रास देतो, खोड्या काढतो, मला चिडवतो, टपला
मारतो हे या मोठ्यांना माहितच नाहीये. किती तरी गोष्टी आहेत. मी ठरवलंच, की आज शाळेत
हे सगळं-सगळं लिहायचं आणि आई-बाबांचा दाखवायचंच... लिहून वरून आठवलं... आईशप्पत!!!
मॅथ्स आणि जॉग्रफीचा होमवर्क राहिलाय! मी उडी मारून उठलोच. दाद्याला वाटलं असेल की
मी त्याच्या शब्दाला मान दिला. असूदेत!
**
कशीतरी
आंघोळ करून मी डायरी काढली. जॉग्रफीमध्ये सोलर सिस्टिम काढून रंगवायची होती. हां. हे
असले होमवर्क मला आवडतात. वेगवेगळ्या आकारांचे गोल काढायचे, वेगवेगळ्या प्लॅनेट्सना
वेगवेगळे रंग द्यायचे, शेडिंग करायचं... मस्त वेळ जातो. मॅथ्समध्ये डिव्हिजनची सम्स
होती. त्यांना वेळ लागला असता आणि मग ड्रॉइंग राहिलं असतं. सम्स नंतर केली तरी चालतील
असं मी ठरवलं. प्लॅनेट्स कलर करणं जास्त महत्त्वाचं होतं. मी बाहेर डायनिंग टेबलवर
सगळा पसारा घेऊन बसलो. मला कलरिंग करायला खूप आवडतं. माझं ड्रॉइंग चांगलं आहे असं टीचर
म्हणतात आणि आईही. आईने माझी चित्र घरात एका बोर्डवर लावलीही आहेत. आलेले पाहुणे (दादाच्या
अभ्यासाबद्दल आणि) माझ्या चित्रांबद्दल आई-बाबांना विचारतात तेव्हा मला मस्त वाटतं.
बोर्डवर सतत नवीन चित्र लावायलाही मला आवडतात. पण मी सतत ड्रॉइंग करत बसलो की मला चिडवतात,
’चित्रकार’! मला काही कळतच नाही. चित्र काढणं वाईट असतं का? चांगली येत असली तरी? इतक्यात
दादाची हाक आली,
“ओ
चित्रकार!”
मी
मान वर करून बघितलं. युनिफॉर्म घालून, सॅक घेऊन दादा रेडी! मी बाहेर रंगवत बसल्यामुळे
मला कळलंच नाही त्याने कधी आवरलं ते! आईशप्पत. मी भिंतीवरचं घड्याळ बघितलं!
“आज
काय चाल्लंय काय तुझं? शाळेत जायचं नाहीये का खरंच? बस येईल दहा मिनिटात. अजून ड्रॉइंगच
करत बसलायस. आईला फोन करू का?”
“नाही,
नाही, आलोच मी...” आईला फोन नको करूस प्लीज असं मनातच म्हणत मी पळालो. कसंबसं दप्तर
भरलं, युनिफॉर्म चढवला, केस विंचरणार होतो, पण चालतं एक दिवस... घाईघाईनं बाहेर आलो.
खिडक्या-दारं बंद करून दादा रेडीच होता. त्याने कुलुप लावलं आणि आम्ही शाळेला निघालो.
**
शाळा
मस्त असते. शाळेची बसही. सगळीकडे मित्र असतात आणि सगळे माझ्यासारखेच असतात. दंगामस्ती
करणारे. वैनिल, रेयान बसमध्ये आणि शंखनाद तर शाळेत माझा पार्टनरच. आई म्हणते तशी आमची
’माकडटोळी’ आहे. बसमध्ये बसलं की शाळा कधी येते मला कळतच नाही. शाळेतही मध्येमध्ये
टीचर्स येतात, पण आमचं लक्ष रिसेसकडे असतं. टिचर्स वर्गामध्ये असताना गप्प बसायचं,
त्या गेल्या की दंगा सुरू!
त्या
दिवशी पहिलाच पिरियड जॉग्रफीचा. आफळे टिचरनाही माहित आहे माझं ड्रॉईंग चांगलं आहे.
त्यांनी बुक मागून घेतली, ’गुड’ म्हणल्या. मला एकदम मस्त वाटलं. पूर्ण पिरियड मी सोलर
सिस्टिममध्ये अजून खूप प्लॅनेट्स असते तर अजून रंगवायला किती मजा आली असती याचाच विचार
करत होतो. आफळे टीचर जाऊन भिडे टीचर कधी आल्या मला कळलंच नाही. भिडे टीचर. मॅथ्सच्या.
एकदम स्ट्रिक्ट. खूप टोचून बोलायच्या. आईशप्पत!! डिव्हिजनचा होमवर्क राहिलाच. मी डोळे
गच्च बंद केले. संपलंच. पनिशमेन्ट मिळणारच.
“आपापल्या
होमवर्क बुक्स पुढे पास करा.” टीचरचा आवाज आला.
आमच्या
मागून वह्यांचा गठ्ठा आला. शंख्याने त्याची बुक ठेवली. मी गच्च डोळे बंद करूनच.
“अभ्या,
बुक ठेव ना.” तो कुजबुजला.
“वही
विसरलो.” मी त्याहीपेक्षा लहान आवाज काढला.
“आईशॉट.
मेलास तू!” शंख्याने भविष्यवाणी केली.
मला
ते माहित होतंच.
सगळ्या
वह्या टेबलावर पोचल्या.
“हं.
कोणी कोणी होमवर्क बुक सबमिट केली नाहीये? रेज युअर हॅन्ड्ज.”
आमच्या
शाळेत प्रामाणिकपणाला फार महत्त्व आहे. मी हात वर केला. हात वर करणारा मी एकटाच (दुर्दैवी)
होतो. टीचरनी माझ्याकडे रोखून की कायसं बघितलं. राक्षसालाही जाळून खाक करू शकणारी नजर
होती ती.
“अभंग
पोतदार. हं. एक्स्पेक्टेड. कम हिअर.” वर्ग चिडिचुप. मी घाबरलेला.
“काय
झालं? वही का दिली नाही?”
माझ्या
तोंडातून शब्दच बाहेर पडला नाही.
“डोन्ट
जस्ट स्टॅन्ड देअर. आन्सर मी. कुठंय बुक?
“विसरलो.”
मी कसाबसा म्हणालो.
“डबा
विसरतो का कधी? आं? होमवर्क बुक कशी विसरते नेमकी? सम्स तरी केली आहेत का? का तीही
विसरली?”
“हो
टीचर. केली आहेत.” मी थोडा अप्रामाणिक झालो. पण त्याच क्षणी आज घरी गेल्या गेल्या होमवर्क
करूनच टाकायचा मी निश्चय केला.
“काय
हे अभंग? आय फील सो बॅड अबाऊट यु. तुझा भाऊ बघ. अबीर पोतदारचाच भाऊ ना तू? ही इज सच
अ ब्रिलियन्ट स्टुडन्ट. बोर्ड एक्झाम्समध्ये आऊट ऑफ मार्क्स मिळतील त्याला मॅथ्समध्ये.
कुठे तो! आणि कुठे तू! कधी वही विसरायची, तर कधी होमवर्क. क्लासमध्ये सतत चुळबुळ चालू
असते, चुका तर किती असतात सम्समध्ये! अभ्यासात मुळीच लक्ष नाहीये तुझं. अबीरचा भाऊ
शोभत नाहीस अजिबात. गो नाऊ. स्टॅन्ड आऊटसाईड द क्लास फॉर टेन मिनिट्स.”
“सॉरी
टिचर.” मी कसाबसा म्हणालो आणि वर्गाबाहेर आलो. मला परत रडायला यायला लागलं. आई-बाबाही
असंच म्हणत होते सकाळी. अबीरचा भाऊ शोभत नसलेला अभंग. सगळ्यांचाच नावडता अभंग. मी मान
खाली घालून रडायला लागलो.
**
इतक्यात
माझ्या शेजारी कोणीतरी उभं राहिलं आणि मला म्हणालं, “मिळाली का पनिशमेन्ट?” मी तटकन
वर बघितलं. दादा उभा होता. हाच तो दादा ज्याच्यामुळे मला सतत बोलणी खावी लागत होती.
मी काहीच बोललो नाही. तोच म्हणाला, “चल.” त्याच्या हातात माझी बुक होती. मी परत काहीच
बोललो नाही. “माझ्याकडे होती बुक. चल आत, मी सांगतो टीचरना.”
“पण
मी होमवर्कही केला नाहीये.” आता मात्र शाळेच्या शिकवणीप्रमाणे मी खरं बोललो.
“माहितेय
मला. मी केलाय. चल आता...बावळट!” मला एक टप्पल मारत, थोडासा हसत दादा क्लासच्या दारात
उभा राहिला.
आईशप्पत!
त्या क्षणी माझा शत्रू वाटणारा दादा मला गोष्टीतल्या देवदूतासारखा वाटला. दाट धुकं
पडलंय आणि शुभ्र पांढ-या कपड्यातला देवदूताच्या पायापाशी मी बसलो आहे आणि तो माझ्यावर
कृपा करतो आहे असंच दिसलं मला डोळ्यासमोर. मी न बोलता त्याच्या मागे गेलो फक्त. टीचर
त्याच्याशी गोड बोलल्या आणि मला मात्र त्यांनी नुसतं मानेने ’जा जागेवर बस’ असं सांगितलं.
(आईमुळे मला अशी मानेच्या हालचालींची भाषा नीटच समजते.) बेंचवर बसल्यावर शंख्या मला
हळूच म्हणाला, “कडेलोट होऊनही जिवंत राहिलेला तू एकटाच.” शंकाच नाही!
**
त्यानंतर
दोन पिरेड आणि रिसेसही झाली. सिनेमात कसं हीरो एकाच जागी असतो आणि मागची लोक हलत असतात
तसंच मला वाटत होतं. काहीही डोक्यात शिरत नव्हतं. दादाचा ’ऍक्ट ऑफ काइंडनेस’ माझ्या
मनातून जातच नव्हता. रिसेस संपल्याबरोब्बर इंग्लिशचा पिरेड होता. आज आम्हाला ’माय फॅमिली’
हा एसे लिहायचा होता. मागच्या पिरेडलाच टीचरने सांगितलं होतं, “यु आर इन सिक्स्थ नॉव.
दुसरीतल्या मुलांसारखे आय लव्ह माय फॅमिली असं नुसतं लिहू नका. राईट सम मोअर, समथिंग
बेटर.” मी खरंतर सकाळीच ठरवल्याप्रमाणे आई-बाबा मला कसे रागावतात, दादा मला कसा त्रास
देतो आणि मी कसा कोणालाच आवडत नाही याबद्दल प्रामाणिकपणे लिहिणार होतो. पण दादाने वही
दिल्यामुळे सगळंच बदललं. मला सगळं वेगळंच आठवायला लागलं. आई सतत करत असलेली काळजी,
बाबांचा स्ट्रिक्ट तरी गमत्या स्वभाव, दादा मला त्रास देत असला तरी त्याचं माझ्याकडे
असलेलं लक्ष, आणि सिन्सियर होताच तो... माझा दंगा, खोड्या, आळशीपणा, अभ्यासाचा कंटाळा
हेही मला आठवायला लागलं. गोष्टीत असतं ना- जेव्हा आपण एक बोट दुस-याकडे दाखवतो तेव्हा
तीन आपल्याकडे असतात- अगदी तसंच.
शाळा
संपली आणि आम्ही घरी आलो. बसमध्ये मी दादाकडे ’कृतज्ञतेच्या’ नजरेने बघत होतो. त्याने
माझ्याकडे नेहेमीप्रमाणेच काहीही लक्ष दिलं नाही तरी आज मी खट्टू झालो नाही. आम्ही
घरी आल्यानंतर साडेसहाला आई येते. बाबा अजून उशीरा. आज मी माझी सगळी कामं केली. युनिफॉमची
घडी वगैरेही घातली. दप्तर जागेवर ठेवलं. दादाने दूध दिलं तेही पिऊन टाकलं. दादा दुपारबद्दल
काही बोलेल असं मला वाटलं होतं. पण तो विसरलाही होता बहुतेक. घरी आल्याआल्या आवरून
तो परत अभ्यासाला बसलाही! कसं जमतं त्याला? मलाही जमायला हवं असा निश्चय करून मीही
त्याच्या शेजारी बसलो. मला बघून दादाच्या भुवया उंच झाल्या.
“काय
रे? खेळायला नाही का जायचं?”
“नाही,
मीही आजपासून तुझ्यासारखा अभ्यास करणार आहे.” मी निश्चयी स्वरात उत्तर दिलं.
माझं
उत्तर हसून दादा खो-खो हसायलाच लागला. मग म्हणाला, “उगाच नाटकं करू नकोस. नाही सांगणार
मी आईला काही.”
“नाही,
म्हणून नाही. खरंच मी करणार आहे अभ्यास आता तुझ्यासारखा.”
“जेव्हा
सकाळी वेळ असतो अभ्यासाला तेव्हा नाही का आठवत हे? बावळट! माझी दहावी आहे म्हणून मी
करतोय अभ्यास आत्ता. नाहीतर मी जात होतोच की संध्याकाळी खेळायला. तू फारतर नव्वीपासून
कर हां माझ्याइतका अभ्यास. आई आली की पळ खेळायला रोजच्यासारखा. जा. आणि खोलीचं दार
लाव जाताना. मला डिस्टर्ब करू नकोस.”
दादा
माझ्याकडे पाहून परत मिस्किल हसला. मी परत एकदा दादाकडे कृतज्ञ नजरेने पाहिलं.
इतक्यात
बेल वाजली. आई आली. तिच्या हातात नेहेमीप्रमाणे दोन पिशव्या होत्या. मी पटकन पुढे झालो,
पिशव्या घेतल्या. आई माझ्याकडे पाहून हसली. ती स्वयंपाकघरात आली आणि बाकी सामान ठेवून
हात धुवून टेबलावर बसली. मी तिला रोजच्यासारखं पाणी आणून दिलं आणि तिथेच उभा राहिलो.
आईनेही दादासारख्याच भुवया उडवून माझ्याकडे बघितलं. मला काही सांगायचं असलं की मी न
बोलताही तिला आपोआपच कळतं.
“काय
विशेष आज अभंगबुवा?”
“आई,
सॉरी.” मी हळूच म्हणलो. “सकाळी मी ओरडायला नको होतं.”
आईनं
झटकन हातातलं भांडं खाली ठेवलं आणि मला जवळ घेतलं.
“अरे,
मीही सॉरी. मीही विसरले नाही का तुला मेथी आवडत नाही ते? जाऊदे. झाली आपली फिट्टंफाट.
मी आत्ता हक्का नूडल्स करणार आहे. तुझ्या आवडीचे.”
मला
एकदम खूप आनंद झाला. आईच्या भाषेत- कळी खुलली!
“आई,
मी ठरवलं आहे की दादासारखा खूप खूप अभ्यास करायचा आणि तुला आणि बाबांना मुळीच त्रास
द्यायचा नाही.”
“अरे
पण सोन्या, तू आत्ताही कुठे त्रास देतोस? हां, अभ्यासात मात्र लक्ष द्यायला हवं आहेस.
पण बाकी, माझा गोड मुलगा आहेस तू. माझी काळजी करणारा. सगळ्यांवर प्रेम करणारा. मला
पाणी द्यावं असं दादाच्या कधी लक्षातच आलं नाही. पण तुझ्या येतं. तुझा दादा वेगळा,
तू वेगळा. त्याच्यासारखा होऊ नकोस. त्याच्यासारखा अभ्यास मात्र कर बाबा! रोज फक्त एकच
तास पण नीट अभ्यास कर. बाकी पर्फेक्ट आहेस बघ तू!”
हे
ऐकून माझ्या खुललेल्या कळीचं फूलच झालं एकदम.
इतक्यात
डबल बेल वाजली. बाबा आले! मी उड्या मारतच दार उघडलं. ते हसू माझ्या चेह-यावर तसंच होतं वाटतं, कारण दार उघडल्या उघडल्या
बाबा म्हणाले,
“काय
अभंगबाबू, आज खुश दिसताय? मी पेन आणलेलं आधीच कळलं की काय?”
“अं?
पेन? इंक पेन? खरंच बाबा?” मी बाबांच्या अंगावर उडीच मारली. त्यांनी बॅगमधून मला पेन
काढून दिलं हातात. मस्त होतं. ग्रीन कलरचं.
“आज
सकाळी शेंडेफळाचा मूड ऑफ झाला होता, म्हणून म्हणलं मूड ठीक करावा. दादालाही आणलं मग
एक पेन. नाहीतर तो रागवायचा, काय? आम्ही आपले एकदा याची समजूत घालतोय, एकदा त्याची!”
असं म्हणत बाबा जोरात हसले आणि आत गेले आवरायला.
आम्ही
चौघं जण चार खोल्यांत होतो. पण असं वाटत होतं की एकत्रच बसलोय. एकमेकांची काळजी घेतोय.
अगदी निबंधामध्ये असते तशीच!
आय
लव्ह माय फॅमिली.
समाप्त.
12 comments:
mastch jamaley. agadi majhe baalpan aathawale :P
Mastay gosht Poonam.. (y)
Thanks so much Prachi, Gauri :)
अग कसल क्यूट लिहिलयस
कित्ती छान… डोळ्यातून पाणीच ओघळू लागलं शेवटाकडे जाताजाता...
kasal goad lihilay.. mast...
Khupach mast!!
अवनी, धनू, पल्लवी, केब्या- Thanks! :)
फारच छान माय साइट www.kathasahity.com
Khupach chhan ahe
अगदी गोड आहे, प्रसन्न, सकारात्मक...
किती गं छान आहे हे कुटुंब! मस्तच लिहितेस तू.
Post a Comment