April 27, 2015

कृष्णकिनारारामायण आणि महाभारत ही प्राचीन महाकाव्यांचं गारूड कधीच ओसरत नाही. ही महाकाव्य अजरामर आहेत. आजच्या काळातही ती जुनी वाटत नाहीत याचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली मानवी नात्यांची आणि भावनांची गुंफण. मनुष्याने आदर्श आचरण कसं ठेवावं याचा वस्तूपाठ म्हणजे रामायण कथा, तर त्याने आदर्श आचरण सोडल्यावर तो कोणत्या थराला जातो याचं दर्शन महाभारतात घडतं. रामायणामध्ये मुख्य पात्र म्हणजे अर्थातच राम. परंतू महाभारतामध्ये असंख्य मुख्य पात्र असली, तरी महाभारताचा नायक मात्र होता कृष्ण!

कृष्ण हा शब्दच भूल पाडणारा आहे. कृष्ण एक पूर्ण पुरुष होता असं मानलं जातं ते त्याच्याकडे असलेल्या अलौकिक गुणांमुळे. अचाट धैर्य, अफाट बुद्धीमत्ता, आयुष्याचं तत्वज्ञान कोळून प्यायलेला, पराक्रमी योद्धा असलेल्या कृष्णाचं हृदय प्रेमाने आणि कारूण्याने ओथंबलेलं होतं. त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्या सान्निध्यात आलेल्या अनेक स्त्रियांबरोबर त्याचं एक अनामिक नातं तयार झालं होतं ते या प्रेमभावनेमुळेच.

कृष्णकिमारा हे अरुणा ढेरेंचं पुस्तक कृष्णाची एक अस्पर्श बाजू उलगडतं. या पुस्तकाची अर्पणपत्रिका अरुणा ढेरेंनी अतिशय मोजक्या शब्दात, चपखलपणे लिहिली आहे. हे पुस्तक त्यांनी ’स्त्री-पुरुषांमधील सर्जक, सुंदर आणि समर्थ नात्याला’ अर्पण केलं आहे. स्त्री आणि पुरुष ही प्रकृतीची दोन रूपं- एकमेकांपासून वेगळी, तरीही एकमेकांना पूरक. एकमेकांपासून दोघांनाही विलग करणं अवघड इतकी ही गुंफण नाजूक आणि गुंतागुंतीची आहे. स्त्री-पुरुष नात्याला असंख्य पैलू आहेत. मानवी जीवनाला ज्ञात असलेल्या सर्व भावना स्त्री-पुरुष नात्याला अनुभवता येतात. वात्सल्य, माया, ममता, ओढ, प्रेम, आसक्ती, वासना, भक्ती, विरक्ती या भावनांच्या हिंदोळ्यांवरूनच स्त्री-पुरुषाचं नातं प्रवास करतं. जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांशी तादाम्य पावलेले असतात तेव्हा त्यांच्यातल्या सुंदर नात्याला कोणत्याही नावाची वा विशेषणाची गरज पडत नाही इतकं ते पवित्र असतं. 

पूर्ण पुरुष असलेल्या कृष्णाच्या आयुष्यात आलेल्या तीन नायिकांचं- राधा, कुंती आणि द्रौपदीचं मनोगत म्हणजे कृष्णकिनारा. राधेशी कृष्णच्या बालपणीची नाळ जुळलेली आहे, कुंतीच्या विलक्षण आयुष्याचा तो साक्षीदार आहे आणि द्रौपदीचा तर तो जीवाभावाचा सखा आहे. या तिघींच्याही आयुष्याला त्याने स्पर्श केला आहे आणि आयुष्याच्या अखेरीला त्यांनीही आपलं देणं कृष्णाला देऊन टाकलेलं आहे. असं देणं प्रत्यक्ष दात्यालाच देताना या तिघींच्याही मनात कोणते विचार आले असतील? या विचारांच्या आंदोलनातून आणि कृष्णाच्या मनोगतातून उलगडतो तो त्यांच्या नात्याचा प्रवास. 


हे पुस्तक ज्या कालखंडात सुरू होतं त्या काळात महाभारतातलं विनाशक युद्ध संपलेलं आहे. तरूण, पराक्रमी योद्धे वार्धक्याकडे झुकले आहेत. युद्ध जरी संपलेलं असलं तरी त्याचे भयानक परिणाम सर्वत्र जाणवत आहेत, वातावरणात एक खिन्नता आहे. अशा वेळी, आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर पोचलेली वृद्ध राधा श्रीकृष्णाचे शेवटचे दर्शन घ्यायला येते. तिच्या अचानक आगमनाने कृष्णही अस्वस्थ होतो, पण हे अटळ आहे हेही तो जाणून आहे. तसं पाहिलं तर राधेचं आयुष्यही विलक्षणच होतं. राधा ही एक सामान्य संसारी स्त्री. त्रास देणारी सासू, दुर्लक्ष करणारा नवरा, सांसारिक कटकटी या चरकातून जाणारी. कृष्णाने तिच्या विटलेल्या आयुष्यात रंग भरले. प्रेमाच्या वाटेवर तिला नेऊन ते रस्ते किती मोहक आहेत याचं दर्शन तिला घडवलं. मनाने त्याची झालेली राधा तनानेही त्याची झाली. या नात्याला भक्तीचीही किनार होती. कृष्णाच्या केवळ जपाने राधेला तिचं सांसरिक दु:ख झेलायचं बळ मिळत होतं. एक सामान्य संसारी स्त्री इतकं धाडस करू शकली ते कोणत्या आणि कोणाच्या बळावर? तरूण कृष्ण नंतर गोकुळ कायमचंच सोडून गेला, त्यानंतर राधेनं तिचं आयुष्य कसं ढकललं असेल? राधा ही कृष्णाची पहिली प्रेयसी. या नात्याने राधेचा अन्य कोणापेक्षाही कृष्णावर अधिक हक्क होता; अगदी रुक्मिणी आणि सत्यभामेपेक्षाही. राधेने बाल्यावस्थेपासून कृष्णाला पाहिले होतं. वयाच्या या टप्प्यावर पोचल्यावर राधेला आता मुक्ती हवी आहे. ही मुक्ती केवळ कृष्णच देऊ शकतो. कृष्णाच्या स्पर्शाने तिच्या आयुष्याचं परीस झालं, पण तिला एकच सल आहे. तोच सल पुसून टाकण्यासाठी पुढच्या जन्मासाठी ती कृष्णाला मागते वात्सल्याचं वरदान.

कुंती हे महाभारतातलं असंच गुंतागुंतीचं पात्र. कुंतीभोजाची ही लाडकी पृथा. आडव्या बांध्याची, सुदृढ देहाची. राजाची पत्नी होऊन त्याच्या अनेक धट्ट्याकट्ट्या मुलांना जन्म देण्याची सक्षमता असलेली. पृथेला वरदानही मिळालं ते अनोखंच. आणि त्या वरदानाचा उपयोगही झाला तो तिच्या नव-याच्या साम्राज्यासाठीच. तिचं कर्तव्यच होतं ते. राजसिंहासनासाठी, राज्यविस्तारासाठी युवराजांना जन्म देण्याचं कर्तव्य. मात्र कर्तव्यपालन करत असताना स्त्रीच्या गाभ्यामध्ये असलेल्या भावना कुठेतरी दुर्लक्षित राहिल्या का? जे कुंतीच्या पतीच्या, पंडूच्या, तिच्या पराक्रमी पाच मुलांच्या ध्यान्यातही आलं नाही ते कृष्णाला मात्र उमजलं होतं. कुंतीला एक नाही, तर तब्बल सहा पुत्र झाले, एकाहून एक सरस, देखणे आणि पराक्रमी. पण तिच्यातली पत्नी मात्र दुर्लक्षित राहिली. सहा पुरुषांकडून सहा पुत्र मिळाले, पण पतीचं प्रेम एकाकडूनही नाही. पती पंडूकडून पत्नीत्व मिळालं, पण अपत्यसुख नाही! किती विचित्र अवस्था. अशा अवस्थेत महाराणी म्हणून, माता म्हणून केवळ कर्तव्य करत राहिली ती. पंडू आणि माद्रीचा मृत्यू झाल्यानंतर केवळ मुलांसाठी एक प्रदीर्घ आयुष्य जगताना तिला ही खंत कधीच वाटली नसेल का? विदुराबरोबरच्या हळव्या नात्याविषयीही कुंती अबोलच राहिली. अखेरीस तिच्या बरोबर होती गांधारी- तीच गांधारी जिच्या पुत्रांमुळे महाभारत घडलं. पण दैवयोग असा, की या दोघीच एकमेकींसाठी उरल्या. कर्ण ही तिच्या आयुष्यातली अखंड भळभळती जखम राहिली. ज्या समाजात नियोग पद्धत मान्य होती, तिला कुमारी माता मान्य करता आली नसती का? पण इतका विचार करण्याइतकं वय आणि धैर्यही तिच्या अंगी तेव्हा नव्हतं. कुतुहलापोटी घडलेली चूक तिने आयुष्यभर सोसली. युद्धात कर्णाला अर्जुनाने मारल्यानंतरच तिने तिच्या अन्य मुलांना हे रहस्य सांगितलं आणि त्यानंतर जणू तिचं आईपण रितंच झालं. द्रौपदीची शक्ती मात्र तिने जोखली होती. आपल्या पाच पुत्रांना एकत्र ठेवायचं सामर्थ्य तिच्यात आहे हे तिने जाणलं होतं. पती असूनही एकाकी असलेल्या स्त्रीचं मन ती चांगलंच जाणून होती. वानप्रस्थाश्रम स्वीकारून अरण्यात पेटलेल्या वणव्याला कुंती रित्या मनाने, पण ताठ मानेने सामोरी गेली. 

द्रौपदी म्हणजे एक लखलखती, तेजस्वी रूपगर्विता. अलौकिक केशसंभार मिरवणारं तिचं दर्शन होताच भलेभले मंत्रमुग्ध होत असत. प्रत्यक्ष अग्नीचीच ही मुलगी मात्र या अग्नीचीच दाहकता सोसत राहिली. ज्या काळामध्ये एका राजाला अनेक पत्नी असू शकतात हे मान्य होतं, त्याच काळातलं हे एकमेव उदाहरण जिथे एका स्त्रीला अनेक पती होते. यामुळेच द्रौपदीचं आयुष्य म्हणजे एक अखंड कुतुहल होतं. तिचे पती एकमेकांचे भाऊ जरी असले, तरी पती म्हणून आपला भाऊ आपल्यापेक्षा सरस आहे का, चांगला आहे का, आपल्या सर्वांमध्ये द्रौपदीचं प्रेम सर्वाधिक कोणावर आहे याचं कुतुहल त्यांना होतंच. याज्ञसेनीनेही आपले पाचही पती स्वाभाविकपणे सांभाळले… त्यांच्या गुणदोषांसकट. एकापेक्षा एक सरस असे पाच भाऊ एकत्रच राहिले याचं कारण द्रौपदी हेच होतं. कृष्ण हा तिचा सखा. त्यांच्यातलं नातं हेवा वाटावं असं होतं. कृष्ण सगळं जाणायचाच. मनं वाचायची हातोटी त्याच्याकडे होती. अन्य कोणापाशीही जे बोलता यायचं नाही ते द्रौपदी त्याच्यापाशी बोलायची. द्यूतसभेत तिची जी विटंबना झाली तेव्हाही तिचा सन्मान वाचवला तो कृष्णानेच. यानंतर प्रवास झाला तो सूडाचा. कुष्णनीतीने अनिष्टाचा अंत झाला. दुर्योधन, दु:शासन, शकुनी सगळे मारले गेले. पण मन:शांती मिळाली का? सूडाचं चक्र पूर्ण होताना तिनेही तिचे पाच पुत्र गमावलेच. हेवा वाटावं असं लावण्य, हेवा वाटावा असे पती, हेवा वाटावा असा सखा मिळूनही द्रौपदीचं आयुष्य समाधानात व्यतीत होऊ शकलं नाही.

कृष्णाच्या आयुष्यातले हे तीन तुकडे- राधा, कुंती, द्रौपदी. त्यांच्याबद्दल दर वेळी वाचताना, दर वेळी विचार करताना नवीन काहीतरी सापडत जातं. या तिघींच्या दु:खाशी एकरूप होताना कुष्णाचं अस्तित्व मात्र अपरिहार्यपणे जाणवत राहतं. या तिघींच्याही आयुष्यातल्या अनेक अप्रिय घटना घडण्यापासून कृष्ण थांबवू शकला असता कदाचित. पण तसं न करता त्यांच्याबरोबर त्यांच्या दु:खात सहभागी झाला तो. अखेरीस या तिघींनीही आपले भोगही त्याला अर्पण केले आणि मुक्त मनाने पुढच्या प्रवासाला गेल्या.

शंभर पानांच्या छोटेखानी पुस्तकामधून अरूणाताई जो आशय पोचवतात त्यातून त्यांची शब्दावरची पकड समजते. एका अनोळखी प्रदेशात त्या वाचकाला अलगद घेऊन जातात आणि विचारांच्या आवर्तनात हलकेच सोडून देतात. पुस्तकातली चारही चित्र म्हणजे एकेक गोष्ट आहे. रंगरेषांचा सुरेख वापर बुवा शेटेंच्या समर्थ कुंचल्यातून होतो. एकेक चित्रापाशी आपण थबकतोच. त्या त्या स्त्रीच्या आयुष्याच्या पटच त्या चित्रामधून समर्थपणे आपल्यासमोर येतो. या तीन स्त्रिया म्हणजे केवळ उदाहरणं आहेत. अजून कितीतरी स्त्रिया असतील ज्यांची आयुष्य अशीच रिती राहिली असतील. त्यांच्या व्यथांना तर कधी वाटही मिळाली नसेल कदाचित. बावीस वर्षापूर्वी लिहिलेलं ’कृष्णकिनारा’ आपल्याला आजही वारंवार थबकून आपली गृहितकं तपासायला भाग पाडतं.
 


2 comments:

Manjiri Kanhere said...

किती सुरेख लिहिलं आहेस पूनम.. खूप आवडलं. पुस्तक मुद्दाम मिळवून वाचायला हवं.

Unique Rohit said...

कुंतीला एक नाही, तर तब्बल सहा पुत्र झाले.....

>>>> पांडव आणि कर्ण यातले फक्त चारच (कर्ण, युधिष्ठिर, भीम, अर्जुन) कुंतीचे पुत्र होते. नकुल व सहदेव हे माद्रीचे (कुरू सम्राट पांडूची द्वितीय पत्नी) पुत्र होते.