अण्णाकाका आणि त्याचे अजून दोन भाऊ सगळे मिळून एकाच इमारतीत रहात होते, पण वेगवेगळ्या मजल्यांवर. अण्णाकाकाकडे अविला कधीच अगत्याचे वातावरण आहे असं वाटलं नाही. काकू, तिची मुलं, बाकी दोन्ही काका आणि त्यांची कुटुंबं हे सगळे कुत्सितपणे किंवा काहीशा असूयेने आपल्या सर्वांकडेच बघतात असं त्याला कायम वाटत असे. आपुलकीने आपण काही बोलायला जावं आणि त्यांची थप्पड मारल्यासारखी उत्तरं ऐकून घ्यावी हा अनुभव तर त्यांनी नेहेमीच घेतला होता. यावेळी तर आपण गप्पच बसून फक्त जे जे होईल ते ते पहायचं असं अविने ठरवलं होतं.
अण्णाकाकाने स्वागत जोरात केलं. "आलात का? या. या. वेळेवर आलात अगदी. अहोऽऽ, चहा आणा. चहा झाला, की आपण निघूच. सगळे तयार आहेत. आमचे विजू-विनू, दादाचा श्री तर सकाळीच गेलेत पर्ह्याला. कामं बरीच आहेत. अगदीच ऐनवेळी परक्यासारखं जाणं बरं दिसत नाही ना.." हा त्यांना मारलेला टोमणा होता, की साधं बोलणं होतं याचा अंदाज कोणालाच आला नाही. कोणी काहीच बोललं नाही.
अण्णाकाका अवि-अजूला उद्देशून पुढे म्हणाला, "तुम्हाला सांगितला आहे की नाही आजचा कार्यक्रम प्रभ्याने? अरे पर्ह्याचं नशीबच पालटलं प्रभ्या. पाच वर्षापूर्वी तिकडं प्रलयी पाऊस झाला आणि नदीचं पात्रच बदललं. पार आपल्या घरापर्यंत नदी आली! सोमेश्वर तर बुडालाच. पाऊस ओसरल्यानंतरही सोमेश्वरापासून वीस फुटावर पाणी असतं. म्हणून मग सरकारनेच वरच्या गावात जमीन दिली. देऊळ आपण बांधलं बरंका. आपण म्हणजे सोमेश्वर ट्रस्टनं. पण म्हणजे आपणच. विश्वस्तात मी, दादा आणि भाऊच आहोत, आणि गावातले आणखी काही. झक्कपैकी नवीन पद्धतीनं देऊळ बांधलंय. गुळगुळीत फरश्या, ट्यूबलाईट्स.. बघालच म्हणा तुम्ही आज. आणि चक्क सरकारने आपल्या आळीतल्या लोकांना नुकसानभरपाईही दिली आहे! कारण नदीच्या पाण्यात सगळीच घरं जाणार. आता राहतंय कोण पर्ह्यात, सांग पाहू? एरवी ओस पडलेलं असतं. कशीबशी सोमेश्वराला सोमवारी दिवा-बत्ती करतो दत्तू गुरव. पण पैसे मिळतात म्हटल्यावर सगळे आले की रे! सरकारी नोंदणीनुसार सर्व वारसांना भरपाई मिळणार आहे. तुझं बरं आहे प्रभ्या. तिथे कधी राहिला नाहीस, तरी वारस ना तू एक त्या घराचा, त्यामुळे तुझा हिस्सा आहे भरपाईत. अजून नोटीस आली नाही, पण आली की सांगेन तुलाही. सातार्यातल्या तहसीलदार कचेरीत प्रत्यक्ष जाऊन चेक मिळतो म्हणे प्रत्येकाच्या नावाचा. म्हणजे तुझा हिस्सा लाटायचा झाला, तरी लाटता येणार नाही कोणाला!" आपण फार मोठा विनोद केला आहे अशा आविर्भावात अण्णाकाका जोराने हसला.
अविचं तोंड रागाने कडू झालं. सरकारी नियमानुसार पैसे येणार म्हणून बाबांना त्यांचा हिस्सा मिळणार. तसं नसतं तर पैसे किती आले आणि कोणाकडे गेले हे कधी समजलंही नसतं! काय वृत्ती आहे या माणसांची! ही जी इमारत आहे ती जमिनही या सगळ्या भावांनी त्यांची पूर्वापार असलेली जमिन विकून घेतली होती आणि मग त्यावर घर बांधलं होतं. त्यावेळीही प्रभाकरला पैसे, या जमिनीत हिस्सा नकोच असेल; किंबहूना त्याने तो मागू नये अशा पद्धतीनेच बाबांच्या कानावर घातलं होतं. बाबांनी क्षणभराचाही विचार न करता कोणताही हिस्सा नको म्हणून सांगितलं होतं. पण त्यांचा न्याय्य हिस्सा त्यांनी मागितला असता, तर चिकार वाद आणि भांडणं आणि कदाचित कोर्ट-कचेरीही झाली असती यात अविला
शंका नव्हती.
सरतेशेवटी सर्व मंडळी निघाली. त्यातही ’तुम्ही गाडीवाले, या आरामात. आम्ही जातो आमच्या फटफट्यांवर पुढे’ असा आहेर मिळालाच. पर्हे सातार्यापासून तीसेक किलोमीटरवर होतं, पण रस्ता खराब होता. शहराचं फारसं वारं लागल्याचं दिसत नव्हतं. कदाचित आता गाव पाण्याखाली जाणार म्हणून असेल किंवा तसं ते अगदीच एका बाजूला होतं, म्हणूनही असेल. पण एकूणात संपूर्ण गावालाच उतरती कळा लागल्याचं जाणवत होतं. गाडी घेऊन ते देवळाच्या अगदी जवळ जाऊ शकले. मोठा रम्य होता तो परिसर. पाऊस अजून सुरू व्हायचा होता, तरी
अण्णाकाका म्हणाल्याप्रमाणे नदीचं पाणी अगदी जवळ दिसत होतं. मध्येच देऊळ होतं आणि देवळाच्या आजूबाजूने जुनी घरं. हा गावाचा सखल भाग होता. ’वरचं गाव’ म्हणजे ह्या भागाला वळसा घालून जरा वरच्या अंगाला थोडी अधिक वस्ती, रस्ते, दुकानं अशी होती. तिथेच नवीन देऊळही बांधलं होतं. इथे येतायेता त्यांना ते ओझरतं दिसलं होतं.
आत्ता त्या सर्वच परिसरात भरपूर गर्दी होती. पुष्कळ गावकरी, त्यांच्यासारखे उपरे आलेले लोक सगळीकडे घोळके करून उभे होते. एक ढोल-ताशा पथक आलं होतं. त्यांच्या अंगात पिवळे टीशर्ट होते. त्यांची वाद्य जवळच काढून ठेवली होती. प्रत्यक्ष मंदिर म्हणजे एका बंदिस्त शहाबादी फरशी घातलेल्या छोट्या अंगणात बांधलेली जुनी दगडी वास्तू होती. त्याचा कळसही दगडीच होता आणि त्याची बरीच पडझड झाली होती. एखादं चुकार रोपही उगवलं होतं मध्येच. देवळाला सभामंडपही नव्हता. आवारात बाहेरच एक सजवलेली पालखी ठेवलेली होती.
दोन पायर्या उतरून थेट गाभार्यातच त्यांनी प्रवेश केला. गाभार्यात एक पणती पेटवलेली होती आणि एक पिवळा दिवा भगभगत होता. मध्यभागी काळीशार दगडी पिंड होती. बहुधा आज ती हलवायची म्हणून असेल, पण पिंड स्वच्छ होती, पूजा होऊन फुलं, गंध वगैरे ल्यायलेली होती. उदबत्तीचा मंद सुवास गाभार्यात रेंगाळत होता. तिथेच बांधलेली एक पिचकी घंटा वाजवून सगळ्यांनी मन:पूर्वक सोमेश्वराचे दर्शन घेतले. बाबा एकदम गप्प झालेले होते. न बोलता सर्व काही मनात साठवत होते. अविने कॅमेरा काढला. पण बाबांनी नजरेनेच त्याला ’नको’ असे खुणावले. अविला कारण समजले नाही. आज आता हे सर्वच नष्ट होणार आहे, तर फोटोरूपाने त्याच्या छबी आपल्याकडे असल्या तर काय हरकत आहे असं त्याने एरवी बाबांना नक्की विचारलं असतं. पण आजचा प्रसंग निराळा होता.
ते दर्शन घेऊन बाहेर आले तर समोरच नंदी दिसला. आधी कसं काय आपलं लक्ष गेलं नाही याचं नवल वाटलं अविला. नंदीही त्याच्या मालकाप्रमाणेच उदास दिसत होता. तोही दगडी होता. आकाराने तसा लहान होता, आणि बराच झिजलेलाही होता. अवि त्याच्या जवळ जाऊन त्याला न्याहाळत होता. इतक्यात कोणीतरी गावकरी जवळ आला.
"नवीन देवळात नवीन नंदी बांदलाय. ह्यो न्हाई नेनार तिकडं. ह्यो हिकडेच ठिवनार येका बाजूला काडून.." त्याने माहिती पुरवली. नंदी एका चौथर्यावर बसलेला होता. त्याच्या लगतची फरशी थोडी उकरून ठेवलेली दिसली. म्हणजे त्यालाही हलवण्याची तयारी झालेली होती. अविला या नंदीबद्दल उगाचच जरा वाईट वाटलं. होता तो दगडच, पण नाही म्हणलं तरी आयुष्यभर त्याने त्या पिंडीची साथ केली होती. ती पिंड आज एका दिमाखदार देवळात जाणार आणि हा मात्र बिचारा मुळासकट उखडला जाऊन एका दुर्लक्षित कोपर्यात जाऊन पडणार.. आज या दगडात जीव असता, तर त्याला किती वाईट वाटलं असतं.. हे असं मुळापासून उखडलं जाणं किती क्लेषदायक असेल नाही? आपल्या घरातली उन्हाने सुकलेली रोपं, हा नंदी, पर्ह्याशी संबंध तोडून टाकलेले बाबा.. हे सगळेच त्याच्या डोक्यात एकदम फेर धरून नाचायला लागले. इतक्यात ताशावर कोणीतरी एक सणसणीत टिपरी मारली आणि तो भानावर आला.
इतक्यात एक मोठा जथाच मंदिरात घुसला. अण्णाकाका, भाऊकाका, दादाकाका, त्यांच्या बायका, अजून गावातले पुढारी, त्यांच्या भोवतीचा गराडा आणि मजूर असे सगळेच एकदम मंदिरात आले. ’चला चला. सगळ्यांनी दर्सन घ्येतलं न्हवं? चला, टायम झाला..’ असं त्यांच्या कानावर आलं. पिंड हलवण्याची शुभ घटिका जवळ आली होती. सगळे गाभार्यात घुसले. टाणटाण घंटा बडवली. ’जय सोमेश्वरा, जय शिवशंभो’च्या ललकार्या उठल्या आणि मजूरांनी पहिली पहार घातली. इकडे बाहेर ढोल-ताशे घुमू लागले. वातावरणात एकदमच जोश, उत्साह आला. चार मजूर पिंडीच्या आजूबाजूने खोदायला लागले, बाकी सगळे बघे आणि त्यांच्या प्रचंड सूचना. मध्येच ’जय सोमेश्वरा’चा गजर. ढोल तर गर्जत होतेच. तो एवढासा परिसर दुमदुमून गेला. बाबाही त्या जथ्यात होते. खोदकामाची सुरूवात बघून ते बाहेर आले. आई, अवि, अजू सगळे बाहेरच थांबून तो कालवा बघत होते. ढोल-ताशाच्या मोठ्या आवाजामुळे साहिल जरासा बावरला होता. बाबांनी त्याच्याकडे हसून पाहिले. "घाबरले काय साहिलशेठ?’ त्यांनी त्याला कडेवर घेत विचारले. त्यांच्या चेहर्यावर एक उदासीही होती आणि आनंदही दिसत होता. ते त्याच्याशी नवीन मंदिर, शंकर वगैरेबद्दल बोलायला लागले. त्याला घेऊन ते पथकाजवळ गेले. साहिलला तो आवाज सहन होत नव्हता, पण त्याचं आकर्षणही वाटत होतं.
अर्धा-पाऊण तास झाला. पुरेसं खोदून झालं. आता पिंड उचलायची आणि पालखीमध्ये ठेवून वाजतगाजत नवीन मंदिरात न्यायची. पिंड लहान असली, तरी अखंड आणि दगडी होती. ती उचलून पालखीत ठेवायला नवीन धट्टीकट्टी मुलं सरसावली. पुन्हा एकदा ’जय सोमेश्वरा’चा गजर झाला आणि त्यांच्या खांद्यांवर पालखी उचलली गेली. अनेक जण झपकन पुढे झाले. पिंडीला हात लावायला लोक धडपडत होते. साहिलला पटकन अविकडे देऊन बाबा गर्दीत घुसले. गर्दीत त्यांनी एकाच्या खांद्यावरून पालखीचा एक दांडा आपल्या खांद्यावर घेतला. हे त्यांनी इतकं अचानक केलं की आई-अवि-अजू एकदम अवाक झाले. ’बाबाऽऽ’ म्हणत पटकन अजू पुढे धावला. पण बाबांनी त्याला हातानेच दूर केले. काही अंतर चालून गेल्यावर त्यांनी अजून कोणाकडेतरी ती जबाबदारी दिली आणि ते माघारी आले. त्यांच्या चेहरा घामाने डवरला होता.
"अहो, काय हे धाडस अचानक? काही झालं असतं म्हणजे?" आईने नापसंती व्यक्त केली.
"काय होणारे? सोमेश्वरासाठी एरवी काही केलं नाही. ही सेवा करायची शेवटची संधी होती.. चार पावलं तर चाललो असेन बरोबर. तेवढंच.." बाबांनी आईचं बोलणं फारसं मनावर घेतलं नाही.
"अहो पण.."
"जाऊदे ना आई.. बाबा तुम्ही ठीक आहात ना?" अजूने मध्यस्थी केली.
तोवर पालखी रस्त्यापर्यंत पोचली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक सुरू झाली. ते सगळे देबळाच्या आवारातच थांबून ते दृष्य बघत होते. हळूहळू मिरवणूक लांब गेली, आवाजही कमी झाले आणि गर्दीही. सगळे लोक नवीन देवळाकडे गेले आणि इथे एकदम शांतता पसरली. देवळात हे पाच जणच उरले. सोमेश्वरला लांब जाताना पाहून बाबांना वरचेवर कढ येत होते, पण ते दर्शवत नव्हते. इतक्यात मगाचचे मजूर नंदीपाशी आले. त्यालाही हलवून टाकले की त्यांचे काम संपले असते. थोडीशी पूर्वतयारी केलेली होतीच. नंदीच्या चौथर्यापाशी त्यांनी पहारीचे घाव घालायला सुरूवात केली. हे सगळे गप्पपणे नुसते बघत होते काय चालू आहे ते. चार-पाच मजूर सवयीने घाव घालत होते. हळूहळू खालची ओलसर माती दिसू लागली. तो चौथरा आणि त्यावरचा नंदी हे एकाच दगडातून केलेले होते सगळे. तो अखंड दगडच एकदम हलवायचा होता. सगळं मिळून तीनेक फूटाचा असेल, फार जड असेल असे वाटत नव्हते.
चौथर्याखाली आणि बाजूने सुमारे फूटभर खणून झाल्यावर तो उचलता येण्यासारखा झाला. मजूरांनी खोदायचे काम थांववले. दोन मिनिटं विसावा घेऊन त्यांनी नंदी हलवायला सुरूवात केली. दोन बाजूंनी चार मजूर भिडले. तिथल्यातिथे चौथरा हलवून अंदाज घेऊन एकच मोठी आरोळी ठोकत त्यांनी तो नंदी उचलला. त्यांच्या अंदाजाप्रमाणेच तो फारसा काही जड नव्हता. उचलल्यावर दोनच मजूरांनी तो पेलत देवळाच्या गाभार्यात नेला. त्याचा धनी तिथून आधीच हलला होता. तो त्याच्या रिकाम्या जागेची सोबत करायला गाभार्यातल्याच एका कोपर्यात ठेवला गेला.
नंदी उचललेली जागा भकास दिसत होती आता. फरशीच्या बांधीव अंगणात मध्येच उकरलेल्या मातीचा ढीग तसा विद्रूपच दिसत होता. एव्हाना ऊनही बरंच चढलं होतं. आता निघून नवीन देवळात जावं असा विचार अवि करत होता. इतक्यात त्या मातीत उन्हाची तिरिप पडून काहीतरी चमकलं. सगळ्यांचंच लक्ष गेलं. बाबा तीरासारखे पुढे गेले आणि वाकून पाहू लागले. त्यांनी काहीतरी उचललं आणि त्या वस्तूकडे बघताच मात्र आता त्यांचा बांध फुटला. त्यांचं सारं अंगं हुंदक्यांनी गदगदत होतं. ’सोमेश्वरा, सोमेश्वरा’ असं पुटपुटत रडतच ते खाली कोसळले.
"आता चोरीही करायला लागलास? सोमेश्वरा! कुठे फेडशील ही पापं? वेळेला दोन घास गिळायला मिळत आहेत हे पुरत नाही वाटतं! आईवेगळ्या मुलाला सांभाळतोय याचं हेच का फळ!"
"चोर! चोर! प्रभ्या चोर! प्रभ्याचा होणार बट्ट्य़ाबोऽळ!"
"अरे मेल्या! आई-बापाला खाल्लास तो खाल्लास. आता आम्ही पोसतोय तर आमच्यावरच उलटायला बघतोस! चालता हो या घरातून!"
"प्रभाकर, अरे काय केलंस हे? प्रत्यक्ष घरातला देव चोरलास? का केलंस रे असं?"
"भाऊसाहेब, प्रभाकराची सोय करता येईल सातार्याला नादारीवर. वसतीगृहही आहे तिथे. त्याला तिथे राहूदे."
"तोंड काळं कर. आणि तिथे नीट रहा मेल्या. आमची अब्रू घराबाहेर तरी जप. तिकडून एक जरी वाकडा शब्द ऐकू आला तर तू आम्हाला मेलास!"
पन्नास वर्षापूर्वीची वाक्य जशीच्या तशी त्यांच्या कानात गजरासारखी वाजू लागली. त्यांनी हातातल्या तांब्याच्या विष्णूपादाकडे बघितलं. त्यांचं निर्दोषत्व सिद्ध करणारा तो पुरावा आज त्यांच्या हातात होता. घरातले देव चोरल्याचे आरोप त्यांच्यावर कोवळ्या वयात केला गेला होता. काका-काकू-चुलत भाऊ कोणालाच आपण आवडत नाही हे माहित होतंच, पण त्यांच्याविरुद्ध कट करून त्यांना चोर सिद्ध करण्याइतका तिरस्कार कोण करत होतं? कोणीतरी देवघरातलं तो विष्णूपाद उचलून इथे नंदीपाशी लपवला होता हे आता, इतक्या वर्षांनी उघडकीला आलं होतं. पण ते कोण होतं? हा प्रश्न आजही अनुत्तरित होता. आता तर त्या उत्तराची गरजही नव्हती. तांब्याच्या विष्णूपादाची किंमतही कितीशी असणार होती? ते चोरण्याचं आणि विकण्याचं धैर्य त्या लहान मुलात होतं का? या कशाचीच शहानिशा न करता निर्दयपणे त्यांच्यावर आरोप तेवढे ठेवले गेले. इतकं नीच पातळीवरचं कृत्य आपलं नाही हे माहित तर होतं, पण ते सिद्ध करता येत नव्हतं. त्यांच्या बाजूचं एक सोमेश्वर सोडला तर कोण होतं? पण ती एक मुकी पिंड. ती काय बोलणार? तिच्याच साक्षीनं त्यांचं त्या घराशी, त्या गावाशी असलेलं मूळ मात्र कापलं गेलं होतं ते मात्र कायमचंच.
पण आज न्याय मिळाला होता. त्या पिंडीनं शेवटचा आशीर्वाद त्यांना दिला होता. तो एकच डाग जो कोवळ्या मनावर पडला होता तो आज अगदी स्वच्छ झाला होता. संपूर्ण आयुष्यात ते एकच किल्मिष होतं, ते आज अगदी अनपेक्षितपणे साफ झालं होतं.
"बाबा,
बाबा.. तुम्ही बरे आहात ना? काय झालं तुम्हाला? इकडे या, हे पाणी घ्या. काय आहे हे?" अवि-अजूचे प्रश्न त्यांच्या कानावर पडले आणि ते भानावर आले. मग अगदी शांत शांत होत त्यांनी पत्नी-मुलांना तो कधीच न सांगितलेला भूतकाळ सांगितला. हातातलं विष्णूपाद सगळ्याचं साक्षीदार होतंच.
"नक्कीच आण्णाकाकाच असेल तो. तो नेहेमीच तुमचा द्वेष करत आला आहे.." अवि भडकून म्हणाला.
"अवि, आता तो विषय नको. मला उत्तर नको आहे. मला जे पाहिजे होतं ते मिळालंय.. आज मी शंभर टक्के समाधानी आहे."
अविने भारावून बाबांकडे पाहिलं. त्याला वाटलं, गेल्या चार-पाच दिवसात दिसलेले बाबा काही वेगळेच आहेत. इतक्या वर्षांच्या बाबांपेक्षा काही वेगळेच. आपल्या अंतरंगातल्या जखमा कधीही अगदी आपल्या बायको-मुलांसमोरही उघडे न करणारे, केवळ आपल्या मुलांच्या सुखासाठी प्रयत्नशील असणारे, आपलं शल्य कोणापाशीही बोलून न दाखवणारे बाबा नक्की कसे आहेत? आपण त्यांना नीट ओळखलेलंच नाही. आपल्याला आत्तापर्यंत सर्वसाधारण वाटणारे बाबा खरंतर विलक्षण व्यक्तीमत्त्वाचे आहेत.
इतक्यात साहिलचं लक्ष आवारात असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाकडे गेलं.
"बाबा, ते बघा केवढं मोठं झाड! त्या झाडाची रूट्स केवढी मोठी असतील ना? बघता येतील मला?"
"नाही रे बाळा. कोणत्याही झाडाची मुळं अशी सहजासहजी दिसत नाहीत. खूप खोल गेलेली असतात ना ती. अपघातानेच त्यांचं दर्शन होतं.." तो बाबांकडे पहात उत्तरला.
समाप्त
5 comments:
खूपच सुंदर..मन भारावून टाकणारी कथा...
’बाबा’ तर राहूच दे, पण तुमच्या अवि इतकीही समजूतदार मुलं आजकाल दुर्मिळ आहेत!
त्यामेळे ’रुट्स’ ही जुन्यांबरोबर मातीतत गाडली जाणार.
धन्यवाद आंबट-गोड!
गाडली नाही जाणार हो. जगात पुष्कळ सहृदयी माणसं असतात!
agadi mast :), nehami pramane.
Kiti diwasani post kelit aaj.
Regards,
Shilpa
आपल्या ब्लॉग वरील वाचकसंख्या वाढविण्याकरिता आपला ब्लॉग 'मराठी ब्लॉग लिस्ट' या साईटवर जोडा.
लिंक- http://marathibloglist.blogspot.in/
अप्रतिम. मस्तच. पुरुष पात्र पण छान तन्मयतेने वटवता. म्हंजे डाऊट येतो कि तुम्ही male आहात की female. इतर पोस्ट पेक्षा ही पोस्ट वेगळी वाटली.
Post a Comment