काही गाणी अशी असतात
की ती आठवल्यावर वेगवेगळ्या कारणांमुळे फार छान वाटतं. कधी त्या गाण्याचे शब्द असतात,
कधी चाल, कधी ते आवडत्या नायक/ नायिकेचं असतं म्हणून वगैरे वगैरे. ते गाणं आठवत बसलं
की एक वेगळीच हुरहुर लागते.
’हम दिल दे चुके सनम’ हा सिनेमा
काही अत्युच्च वगैरे नाही, हिंदी सिनेमांमधला मैलाचा दगडही नाही. कहाणीही तीच. मात्र
त्याला लाभला संजय लीला भन्साळीचा डोळा. तीच तीच प्रेमकथा अजून एका वेगळ्या नजरेने
भन्साळींनी भव्य पडद्यावर आणली. सलमान खान-ऐश्वर्या रायच्या प्रेमाच्या चर्चांना उधाण
आलं, त्यांच्यातल्या ’केमिस्ट्री’च्या वर्णनांनी गॉसिप कॉलम भरले. अजय देवगणने साकारलेला
साधा सरळ प्रेमळ पती त्याच्या आत्तापर्यंतच्या इमेजच्या विरुद्ध होता, तरीही भाव खाऊन
गेला. आणि त्यांना साथ मिळाली ती अप्रतिम संगीताची. या सिनेमातली अनेक गाणी गाजली. ’निंबूडा’ आणि ’ढोल बाजे’ या गाण्यांवर पुढे अनेक गॅदरिंगातले नाच पार पडले, ’आँखोंकी
गुस्ताखियां..’, मधल्या ऍशच्या वेणीचा फास अनेक जणांच्या गळ्यावरच बसला जणू, ’हम दिले
दे चुके सनम’ हे गाणं क्लायमॅक्सला तंतोतंत फिट्ट बसलं आणि ’तडप तडप’ मधली आर्तता काळीज
भेदून गेली.
मला मात्र यातलं सर्वात भावलेलं गाणं म्हणजे, ’झोंका हवा का..’ या सिनेमातली
इतर गाणी जराशी कर्कश, ’लाईव्हली’ अशी आहेत. हे गाणं मात्र पुरेपूर रोमॅंटिक आहे आणि
त्यामुळेच बहुधा अतिशय तरलही बांधलं गेलंय. प्रेमाच्या भावना त्यातल्या शब्दांमधून
अतिशय subtly व्यक्त झाल्या आहेत, त्याचं संगीत अतिशय हळूवार आहे आणि हरिहरनचा आवाज तर लोण्याहूनही
मऊ लागलाय.
गाण्याची सिच्युएशन अतिशय नाजूक
आहे आणि ती दिग्दर्शकाने हाताळलीही आहे अत्यंत तरलपणे. सिनेमात वनराज-नंदिनीचं लग्न
झाल्यानंतर एक विचित्र टप्प्यावर त्यांचं आयुष्य येऊन थांबलेलं आहे. एक शोध सुरू आहे-
प्रत्येकाच्या प्रेमाचा. समीर, नंदिनी आणि वनराज- प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे,
आपापल्या अभिव्यक्तीनुसार प्रेमात पडलेले आहेत आणि प्रेमातच राहू इच्छितात.
वनराज नंदिनीच्या आकंठ प्रेमात
पडलेला आहे. पण त्याचा स्वभाव आहे अबोल. तो भडाभडा बोलणार नाही, पण त्याची एकच कृती
एक हजार शब्दांइतकं बोलून जाईल अशी असते. नंदिनीही अर्थात प्रेमात पडावी अशीच आहे-
दिसायला रूपवान, सुरेख गाणारी, कलानिपुण तर आहेच- पण या गुणांबरोबरच किंवा त्याहीपेक्षा
जास्त, तो बहुधा तिच्यात असलेल्या हट्टीपणाच्या, रागाच्याही प्रेमात पडलेला आहे. म्हणून
त्याने तिची मूक पण खंबीर साथसंगत करायचं ठरवलं आहे.
समीर हा नंदिनीचा मनस्वी प्रियकर.
नावासारखाच अवखळ. तोही संगीतप्रेमी. मात्र त्याचं संगीत हे धीरगंभीर नाही, तर वेगळ्या
प्रकृतीचं आहे- वाहणारं, खळाळणारं. त्यानेही नंदिनीवर निस्सीम प्रेम केलेलं आहे. पण
ते प्रेम पूर्णत्वास जाणार नाही हे समजल्यावर ते दु:खही त्याने पचवलेलं आहे. नंदिनी
आता त्याची नाही, इतर कोणाचीतरी पत्नी आहे. त्यामुळे तो तिच्या स्मृतींवर प्राणपणाने
प्रेम करतो आहे. वरवर तो हसरा, आनंदी, कामात बुडालेला दिसत असला तरी मनातून तो कित्येक
मैल लांब असलेल्या नंदिनीशी बांधला गेला आहे. मनात त्याच्या सतत प्रश्न येत आहेत आणि
त्याचं मन दोलायमान होत आहे. त्याला नंदिनी सुखात असायला हवी आहे, पण त्याचबरोबर त्याला
ती त्याच्याशिवाय सुखी आहे हेही टोचतंय. ’माझं विश्व तू आणि तूच आहेस. पण तुला मी थोडासा
तरी आठवतो का गं?’ हा प्रश्न तो विचारतो आहे.
हे गाणं आहे त्या दोन प्रेमात
पडलेल्या नायकांचं. पुरुष सहसा रांगडे, रागीट, ऍन्ग्री हीरो असतात. या गाण्यामध्ये
मात्र दिसते ती त्यांची हळवी, प्रेमळ बाजू.
गाणं सुरू होतं तेच मुळी नंदिनीच्या
खांद्याला गोळी लागून ती निपचित पडते तेव्हा. वनराज तिला सावरण्यासाठी तिच्या दिशेने
धावतो. त्याच क्षणी आपल्याच दुनियेत रमू पाहणार्या समीरच्या गाण्याच्या कागदावर वाईन
सांडते. तो तंद्रीतून जागा होतो. त्याला अघटिताची जाणिव होते आणि तीव्रतेने त्याला
आठवते ती नंदिनी.
आणि गाण्याचा प्रवास सुरू होतो-
झोंका हवा का आज भी जुल्फे उडाता
होगा ना
तेरा दुपट्टा आज भी तेरे सरसे
सरकतां होगा ना
बालोंमे तेरे आज भी फुल कोई
खिलता होगा ना
वनराजचं नंदिनीवर असलेलं पण
तो मुश्किलीने लपवू पाहणारं प्रेम आणि समीरचं तिच्या आठवणीत रडणं, हसणं आणि निराश होणं
हे दोन्ही एकाच वेळेला पडद्यावर दिसू लागतं.
ह्या ओळी नक्की कोण म्हणतंय-
वनराज की समीर? ऐकताना वाटतं की हे गाणं समीर नंदिनीच्या आठवणीत व्याकूळ होऊन गातो
आहे. पण वनराजच्या समोरच नंदिनी असूनही त्याचा आणि तिचा संवाद तरी कुठे आहे? दोघेही
एका अवघडलेल्या परिस्थितीत आहेत. म्हणूनच हे गाणं वनराजचंही आहे. बायकोचं लग्न आपल्याशी
तिच्या इच्छेविरुद्ध झालेलं आहे. तिचं दुसर्याच कोणावर तरी प्रेम आहे हे खुद्द तिनेच
त्याला सांगितलेलं आहे. ती त्याच्याबरोबर सुखात नाही हे त्याला दिसतंच आहे. म्हणून
केवळ तिच्या आनंदासाठी तो तिला त्याच्याकडे पोचवायला तयार आहे. हा सारा प्रवासच अद्भुत
आहे. या प्रवासादरम्यान हे सारेच एकमेकांना गवसत जातात.
थंडी हवाएं रातोंमें तुझको थपकिया
देती होगी ना..
चांद कि थंडक ख्वाबोंमें तुझको
लेके तो जाती होगी ना..
अघटिताची जाणीव झाल्यानंतर समीरला
हे प्रश्न पडत आहेत. नंदिनी, माझ्या रात्रींसारख्या तुझ्याही रात्री या निद्रेची वाट
पाहायला लावणार्या, न संपणार्या काळोख्या रात्री तर नाहीयेत ना? आभाळातल्या चंद्राच्या
साक्षीने तू तरी नीट झोपतेस ना? आणि याच ओळींमध्ये आजारी असलेल्या नंदिनीची काळजी वनराज
घेतो आहे असं दिसतं. रात्रभर तो तिच्या उशाशी बसलेला आहे- केवळ ती व्यवस्थित झोपली
आहे ना ते बघायला.
रात्रभर जागून नंदिनीला व्यवस्थित
झोप लागली आहे ना हे पाहणारा वनराज सकाळच्या सूर्याची किरणांमुळे तिची झोपमोड होऊ नये
म्हणून खिडकीचे पडदे हळूच ओढतो. समीरचाही रात्रभर डोळ्याला डोळा लागलेला नाही. सकाळ
होताना तो बघतो आणि त्याला परत आठवतो तो नंदिनीचा प्रसन्न चेहरा.
मेरे खयालों में सनम खुदसे ही
बाते करती होगी ना..
मैं देखता हूं चुपचुपके तुमको
महसूस करती होगी ना..
हा ओळी मात्र खास नंदिनीच्या.
प्रियकराच्या शोधार्थ ती चक्क नवर्याबरोबरच निघालेली आहे. आजवर तिला ’वनराज’ म्हणजे
कोणी खास वा वेगळी व्यक्ती वाटलेली नाहीये कारण समीरसाठी ती वेडीपिशी झालेली आहे. तिच्या
मनात फक्त तोच आहे. त्याला भेटायचा हट्ट मात्र पुरा करतोय तो वनराज. या अशा विचित्र
पेचातही साथ देणारा नवरा, आपण चिडलो, हरवलो, वेड्यासारखे वागलो आणि आता परक्या देशात
हॉस्पिटलमध्ये परावलंबी होऊन पडलो तरीही केवळ हा आपली साथच देतो आहे, न चिडता हे तिला
आता कुठे हॉस्पिटलच्या बेडवर परावलंबी होऊन पडल्यानंतर जाणवतं आहे. हा माणूस केवळ नावाचा
नवरा नाही. याच्याबरोबर सात जन्म एकत्र घालवायचं लग्नात घेतलेलं वचन तो कसोशीनं पाळतो
आहे. आपल्या प्रेमाकडे धावत असताना याच्यावर अन्याय तर करत नाहीयोत ना? ज्याच्या वागण्या-बोलण्याची
आजपर्यंत दखलही घ्यावीशी वाटली नाही त्याचं अस्तित्वच आज आपल्याला व्यापून टाकू पाहतंय
का? हे जे सिंदूर, अर्थात सौभाग्याची निशाणी आपण आपल्या भांगात भरतो आहे हे केवळ नावादाखल
आहे, की खरंच वनराजबद्दल आपल्याला कोणत्याही पत्नीला आपल्या पतीविषयी वाटतो तसा आदर
आणि प्रेम वाटायला लागलं आहे? आपल्याला याच्याबद्दल काहीही वाटत नाही हे त्याला माहित
आहे तरी हा आपल्यावर इतकं निस्सीम प्रेम कसं करू शकतो आहे? आपलं काही चुकत तर नाहीये
ना? न संपणारे कितीतरी प्रश्न आणि केवळ प्रश्नच!
प्रेम हा विषय कोणत्याच चौकटीत
बसवता येण्यासारखा नाही. ती एक अतिशय सुंदर भावना आहे आणि त्या भावनेच्या प्रवाहाबरोबर
फक्त वाहायचं असतं. असंच वाहत असताना जो मुक्काम येईल तो त्या प्रेमाइतकाच सुंदर असणार
आहे हा दृढ विश्वास मात्र असावा लागतो. वनराज-समीर-नंदिनी तिघंही प्रेमसागरात आकंठ
बुडालेले आहेत. तिघांच्याही भावना या एकाच गाण्यात अगदी समर्पकपणे चित्रित झाल्या आहेत.
आशय, मांडणी, चित्रिकरण- हे गाणं कुठेच कमी पडत नाही. म्हणूनच हे माझं अत्यंत आवडतं
गाणं.
5 comments:
खूप सुंदर लिहिलं आहेस पूनम.. अगदी हृद्य असं!
हा सिनेमा खूपच आवडला होता, त्याचं मुख्य कारण म्हणजे वनराजची भूमिका!
अजय देवगण ह्या सिनेमापासून आवडू लागला होता.
धन्यवाद मंजू :)
अजय देवगण आवडायला लागलेला नाही मला अजूनही, पण त्याची भूमिका सुरेख होती. सलमान खानही आवडला होता या सिनेमात.
अर्र पूनम, ’हम दिल दे चुके सनम’ ! काय मस्त गाण्याची आठवण काढलीस. तू म्हणतेस तसा अत्युच्च नसला तरी ह्या चित्रपटाची भट्टी अगदी सॉलिड जमून आलीय हे निश्चित. विशेषत: मध्यंतरानंतर तर फारच ! गाणी फार सुरेख आहेत आणि पडद्यावर तितकीच देखणी होऊन साकारली आहेत. तू म्हणतेस तसं ’झोका हवा का’ हे सगळ्यात तरल, हळुवार गाणं ह्या चित्रपटातलं. त्या गाण्याची सुरुवातीची धून वाजली की ती सांडलेली रेड वाईन आठवतेच आणि नंदिनीला निपचित पडलेलं पाहून होणारी वनराजची व्याकुळ अवस्था !
उर्मी, छान लिहिलं आहेस :) धन्यवाद!
Hello Poonam
Khoop chhan lihile aahes. Vachayla khoop maja aali. Pan mala marathit type karayche aahe tujhyasarkhe. Manatali sagli expressions nahi deta yet english madhe. Please saang na tu itke sunder marathi typing kashi karu shaktes.
PURNIMA
Post a Comment