’आमच्या काळी...’ या शब्दांपासून सुरू होणारी वाक्यं अजरामर असतात. स्थळ, काळ आणि वय या कशाचाही अडसर या शब्दांपासून सुरू होणार्या वाक्यांना होत नाही. पंच्याहत्तरीतल्या आजीबाई, पन्नाशीतल्या काकू, तिशीतली ताई, इतकंच कशाला एखादा नुकता ग्रॅज्युएट झालेला मुलगाही नुकत्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलाला ’आमच्या काळी..’चे डोस देऊ शकतो. नॉस्टॅलजिया कोणाला प्रिय नाही? हा हा म्हणता आपल्यातला प्रत्येक जण ’त्या काळात’ गुंततो. मग तो काळ कितीही जुना अथवा नवा असो. ’मोठे होऊन’ जगात वावरताना लक्षात येतं, की आपण ’खरे’ असे ’त्या काळीच’ होतो. नंतर पाहता पाहता कधी आणि केवढे बदललो ते लक्षातही आले नाहीये! बदल झाला तो चांगला, का वाईट हा मुद्दा अलाहिदा. ’बदल’ झाला हे महत्त्वाचं. असो.
’दुनियादारी’ या चित्रपटाचे प्रोमोज यायला लागले आणि या नॉस्टॅलजियाला ऊत आला. ज्या ज्या लोकांनी हे पुस्तक आपल्या कॉलेजजीवनात वाचले आहे त्या त्या तमाम लोकांवर त्या पुस्तकाची, त्या भाषेची, त्या पात्रांची आणि सु.शि.ची भुरळ पडली होतीच. त्या भुरळीवरची धूळ परत एकदा झटकली गेली. मग प्रोमोमधले श्रेयस, दिग्या आणि शिरिन पाहून त्यांची तुलना आपल्या मनातल्या श्रेयस, दिग्या आणि शिरिनशी केली गेली. जिथे ती जुळली, तिथेच सिनेमा पहायचा हे नक्की केलं गेलं. पण ’हा कसला श्रेयस?’ ’ही शिरिन होय!’ असे अपेक्षाभंगही झाले.
पुस्तक वाचताना आपल्या मनात आपण नकळत ते वातावरण, पुस्तकातली पात्र, त्यांचं दिसणं असं तयार करत असतो. त्यांच्या भावना जेव्हा उलगडतात, त्याबरोबर आपलेही मन त्यात थोडी गुंतवणूक करतं आणि फक्त आपलं असलेलं एक वेगळं जग आपण तयार करतो. सावकाशीने एकेक भाग वाचत, काही भाग परत परत वाचत, काही मोठे भाग सलग वाचत, शांतपणे आपल्या गतीने, ते वातावरण आणि ती पात्रं डोक्यात भिनवून घेत पुस्तकाचा आस्वाद घेतला जातो. हे वातावरण अचूकपणे चित्रपटात उतरवणं हे अतिशय अवघड काम आहे. हजारो वाचकांचं आपापलं जग असं सर्वसमावेशक एकच कसं होईल? कदाचित असे चित्रपट असतीलही, जे मूळ कथा किंवा पुस्तकापेक्षा सरस असतील. पण ’दुनियादारी’बाबत ते शक्य नाही असं वाटत होतं.. त्यातही, जर कादंबरीबरहुकूम चित्रपट काढला गेला असता, तरी ठीक होतं.. पण चित्रपटासाठी कथेत बरेच बदल केले गेलेत असं ऐकलं आणि खरंच चित्रपटातला रस संपला.
पण ’दुनियादारी’तला नाही! परत पुस्तक वाचायला घेतलं. गंमत म्हणजे पुस्तक वाचून किमान दहा वर्ष झाली होती, तरी महत्त्वाचे प्रसंग आठवत होते, आणि त्यांच्याशी रिलेट होता होत होतं- कदाचित त्या असोशीने नाही, पण डोळ्यासमोर घडत होते ते प्रसंग. एखादं पारायण केलेलं पुस्तक आपण जेव्हा परत कितव्यांदातरी वाचायला घेतो तेव्हा त्यातली गोष्ट, त्यातली पात्र यांबरोबर काहीतरी वेगळं गवसायला लागतं- असं काहीतरी जे आधी जाणवलंच नव्हतं. या वेळी ’दुनियादारी’ वाचताना कॉलेजमधल्या मुलांची गोष्ट एका ट्रॅकवर वाचत असताना, दुसर्या बाजूला पुस्तकात उल्लेख केलेल्या स्थळांवर आपसूक लक्ष जात होतं. ’उद्यान प्रसाद’, ’बादशाही’, ’रीगल’ आणि ’स्नेह-सपना’- शिरिन-प्रीतमचा बंगला- या बंगल्याचं लोकेशन सुशिंनी कुठे योजलेलं आहे हे त्या भागात वावरणार्याला सहज समजेल. जसजसे हे उल्लेख पुस्तकात यायला लागले तसतसं मी मनाने तिथे पोचत होते. तिथे जवळ रहात असल्यामुळे त्या जागांवर शेकडो-हजारोवेळा गेले आहे. पण पुस्तकात त्यांचे उल्लेख आल्यावर एकदम चमकायला झालं. खरंतर इतक्यांदा दुनियादारी वाचलंय, पण त्यातली स्थळं आज पहिल्यांदाच ’दिसली’. त्यातला स.प.चा कट्टा हा डोळ्यासमोर आणायला लागत नाही; त्या कट्ट्यावर कॉलेजमधली सर्व वर्ष वावरल्यामुळे तो डोळ्यासमोर असतोच. पण एकेकाळी एका मराठी आयकॉनिक पुस्तकात स्थान मिळवलेल्या हा वास्तू, आज कशा आहेत नक्की?
उद्यान प्रसाद! एकेकाळी मस्त चालणारं कार्यालय होतं ते. माझ्या नातेवाईकांपैकी अनेकांची लग्न तिथे लागली आहेत. कॉलेजमध्ये असताना जात होते त्या एका क्लासचा एक मोठा कार्यक्रमही उद्यानमध्ये झाला होता. अजूनही तिथे तुरळक कार्यक्रम होतात. पण नवीन झालेल्या आधुनिक, सुसज्ज हॉलच्या तुलनेत उद्यानला आता ’स्टेटस’ नाही राहिलेले, हेही खरंच.
’रीगल’ची जागा एकदम परफेक्ट आहे. टिळक रस्त्याची सुरूवात.. पैज म्हणून श्रेयस आणि शीला नवाथे एसपी ते रीगल हातात हात घालून चालत जातात.. तसं ते अंतर बरंच आहे. इतकं कोण चालतं आताशा? आणि तेही कॉलेजकुमार?- हे लक्षात येऊन गंमत वाटली. दहावी कशीबशी होते न होते तोवर हातात स्मार्टफोन आणि दुचाकीच्या किल्ल्या हे इतकं कॉमन, सहज झालंय, की कॉलेजला, नुसतंच भटकायला चालणं हे आता अविश्वसनीय वाटतं. ’अलका’ला एखादा सिनेमा बघितल्यानंतर रीगलकडे जाणार्या लोकांकडे आम्ही कुतुहलाने पहात असू. आता ’अलका’तही जाणं होत नाही. रीगलचा तर प्रश्नच नाही! चुकून तिथल्या सिग्नलला उभं रहायला लागलं तर सुटका कधी होईल आणि कुठून होईल हेच एकमेव लक्ष्य असतं. त्याच चौकात असूनदेखील रीगलकडे लक्षही जात नाही.
’वंदन’ आहे तिथेच आहे, थोडं आधुनिक होतं अधूनमधून, पण आहे तिथेच. ’बादशाही’ मात्र अजूनही सुशि काळातली ओळख जपून आहे! त्याच जागी, त्याच ठिकाणी, आहे त्याच अवतारात, फक्त मेनूच्या किंमती वाढलेल्या. चवही तीच. महाराष्ट्र मंडळाचे ग्राऊंड, बादशाही, एसपीचे कळकट पोस्ट ऑफिस, टिळक स्मारक, व्हाईट हाऊस या त्या भागातल्या इमारती अजूनही त्यांचं तेच रुपडं टिकवून आहेत. याबद्दल हायसंच वाटतं. ’उदय विहार’ मात्र डोक्याला ताण देऊनही आठवत नाहीये. म्हणजे ते कुठे होतं ते समजलं, पण कसं होतं दिसायला हे जाम आठवत नाहीये. तिथे आता कॉलेजकुमारांसाठी स्वस्तातले कपडे, बूट, सोडा शॉप असे गाळे असलेली इमारत आहे. त्यामुळे मूळचं उदय विहार पार विस्मृतीत गेलंय. टिळक स्मारक चौकातून अजून खाली आलं की एकाशेजारी एक अनेक कपड्यांची दुकानं आहेत आता. कहर म्हणजे त्या जागी तिथे आधी काय होतं ते मुळीच आठवत नाहीये! टिळक रस्ता हा अजिबातच पर्याय नसलेला रस्ता. असं काही नाही, की त्या रस्त्यावरून जाणंच होत नाही. जी काही जुनी दुकानं गेली, जुन्या इमारती पडून नवीन झाल्या आणि त्या जागी नवीन दुकानं थाटली गेली, ते सर्व काही येताजाता नक्कीच पाहिलेलं आहे. तरीही नवीन काही आल्यावर, त्या जागी असलेले जुने जे काही होते ते पार पुसले गेले आहे.. आठवू म्हणलं तरी आठवत नाही. स्मृतीतून या गोष्टी कायमच्याच हद्दपार झाल्या की काय हे जाणवून भयंकर अस्वस्थ व्हायला झालं!
मग वाटलं, मी तरी तेव्हा कशी होते? आणि आता कशी आहे? काही प्रमाणात स्वभाव, दिसणं, राहणीमान, प्रगल्भता यात बदल झालेच ना काळानुरूप? या तर वास्तू. व्यवसायासाठी अधिकाधिक शोभिवंत केलेल्या, बदललेल्या, आधुनिक केलेल्या. त्या वास्तूत एकेकाळी जे रहात असतील, त्यांनी त्या वास्तूतल्या आठवणी जपून ठेवल्या असतीलच नक्की. ज्या घरात मी बालपणी रहात होते, ते मला अजूनही मुद्दाम आठवावंसं वाटतं. त्यातल्या जुन्या पद्धतीच्या खिडक्या, दारं, कड्या, कोनाडे, खुंट्या आणि त्याच बरोबर मध्येच आगंतुकासारखं आणलेलं नवीन फर्निचर, कमी जागा असल्यामुळे निगुतीनं लावलेलं सामान, गळणारं छत आणि गळून गेल्यानंतर छतावर उठलेल्या विविध आकाराच्या रांगोळ्या- हे सर्वच मला अतिशय प्रिय आहे. तसंच त्यांनाही असेल.
मन विचित्र असतं. त्याला सतत धावायचं असतं. नवीन गोष्टींच्या मागे लागताना जुन्याही जपून ठेवाव्याशा वाटतात, काहीच सोडवत नाही. मेंदू मात्र हळूच नको ते डिटेल्स पुसून टाकतो. नकळत. वहिवाटीचा टिळक रस्ता डोळ्यांदेखत बदलला, माणसं बदलली, वृत्ती बदलल्या, मी स्वत: बदलले आणि बदलले माझ्या आसपासचे जगही. सगळं तेच आणि तसंच राहील असा भाबडा आशावाद नव्हताच. पण जेव्हा तो बदल असा थेट डोळ्यापुढे आला तेव्हा बावचळायला झालं खरं! मग ती हक्काची नॉस्टॅलजियाची पानं चाळून आले. शाळेचे, कॉलेजचे दिवस फिरून आले. कित्येक विस्मृतीत गेलेले चेहरे, आठवणी आठवल्या. सगळंच काही हातून सुटलं नाहीये हे लक्षात आलं आणि हायसं वाटलं.
माणसाने सतत गतकाळात राहू नये हे खरंच, पण one trip down the memory lane is worth it!
5 comments:
छान लिहिलं आहे..बदल हे आयुष्यातील एक अपरिहार्य सत्य...दुसरं काय!
मी पुस्तक अजूनतरी वाचलं नाहीये. असं काही पुस्तक होतं आणि त्याला ७०-८० च्या दशकांत कल्ट स्टेटस होतं हे चित्रपट आला तेव्हाच कळलं.मी परवा चित्रपट बघायला गेले तेव्हा कथा माहीत नव्हती. एक कॉलेजमधला ग्रुप असतो आणि त्यांची कहाणी आहे इतकंच माहीत होतं. पण चित्रपट आवडला. हिंदीच्या तोडीस तोड अभिनय,सतत कलाटणी असणारं वेगाने घडणारं कथानक, तांत्रिक कौशल्य आणि निर्मितीमूल्यं मराठीत बघून बरं वाटलं. आता पुस्तक वाचायची इच्छा झाली आहे!
धन्यवाद मानसी :) पुस्तक जरूर वाच. पण सिनेमाचा पगडा कमी झाल्यानंतरच. सिनेमॅटिक लिबर्टीसाठी पुस्तकातल्या कथेपेक्षा बरेच बदल केले गेले आहेत. ह्या दोन्ही स्वतंत्र कलाकृती आहेत हे लक्षात ठेवून पुस्तक वाच. तुला पुस्तक कसं वाटलं हे जाणून घ्यायला मला आवडेल :) शक्य झाल्यास, कळव इथेच.
अग्गं कसलं भारी लिहिलं आहेस पूनम... एकेक वाक्य वाचताना मीही मला माहिती असलेली ती ती ठिकाणं फिरून, कल्पनेत पुन्हा एकदा अनुभवून आले.
एके ठिकाणी 'दुनियादारी'बद्दलचं मत 'सपक भाषा आणि सवंग कथानक' असं वाचलं. To each his own...
मला तरी ती कादंबरी वाचली त्या वयात आवडली होतीच, पुन्हा इतक्यात एक दीड वर्षापुर्वी वाचली, तेव्हाही अगदी पहिल्याइतकी नाही, पण आवडलीच. चित्रपट बघण्याची इच्छा नाही, कधी टिव्हीवर लागला तर बघेन पण त्याआधी पुन्हा एकदा कादंबरी वाचेन.
पुस्तक मी एका झटक्यात वाचून काढलेलं. नंतर पुन्हा पुन्हाही वाचलं. मधूनच कुठलही पान उघडून वाचायचं.. लिंक लागलेलीच असायची.
सिनेमा अजून पाहयला मिळाला नाहीये. सिनेमा चांगला घडवलाय हे ऐकून आहे. अर्थात पुस्तकाला तो मात देऊ शकेल असे वाटत नाही.
तुझा परामर्ष आवडला. बाकी, आमच्यावेळी किंवा आयुष्यभर... अगदी १०/१२ वर्षाच्या मुलांनाही हे शब्द वापरताना ऐकले की खूपच मजा वाटते. :)
thank you for this one! I am not from pune but wanted to know about these places when i read "Duniyadari" :)
Post a Comment