March 20, 2013

पेन ऑफ द पेन!


जकालची शालेय मुलं शाईपेनानी लिहीत नाहीत म्हणे, तर आधुनिक तंत्रज्ञाच्या जेलपेनांनी लिहीतात! अरेरे!! प्रभू त्यांना माफ कर. ते काय करत आहेत त्यांना कळत नाहीये! शाईपेन, किंवा अगदी त्या करेक्ट भाषेत सांगायचं झालं, तर शाळेत असताना ’फाऊंटनपेनानं’ ज्या विद्यार्थ्यानं लिहीलं नाही तो खरा विद्यार्थीच नाही!! 

मला तर माझे पाचवीपासूनचे दिवस अगदी लख्ख आठवतात.. चौथीच्या शेवटापासून पाचवीची उत्कंठा वाटायची.. पाचवी म्हणजे माध्यमिक शाळा, पाचवी म्हणजे दुपारची शाळा- रोज सकाळी लवकर उठायची कटकट नाही, पाचवी म्हणजे वयाचा दोन आकड्यात प्रवेश, पाचवी म्हणजे रुढार्थानं ’बालपण’ संपलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाचवी म्हणजे फाऊंटनपेन!! 

मोठा भाऊ किंवा बहिण असेल, तर हमखास आपलं पहिलं फाऊंटनपेन हे आपल्याला त्याच्याकडून ’दान’ मिळालेलं असायचं. त्याच्या झाकणाची ती ’खिशाला अडकवायची सोनेरी पिन’ हमखास पडलेली असायची. कित्येकदा ’रंग ओळखलात तर बक्षिस’ असा उडालेला रंग असायचा पेनाचा. पण ’वारसाहक्काने’ तेच आपलं पहिलंवहिलं फाऊंटनपेन असणार हे निश्चित. बर ते देताना दादा/ ताई हमखास दमही भरणार- ’माझं आवडतं पेन तुला देतोय. नीट सांभाळून वापर!’ त्यांनी किती प्रेमाने ते वापरलंय ह्याचे ढळढळीत पुरावे समोर असूनही आपल्याला मान डोलावण्याशिवाय गत्यंतर नसायचं! 

पण मोठं भावंडं नसेल, तर परिस्थिती अजूनच बिकट!! कारण अशावेळी थेट वडिलांचं किंवा आजोबांचंच पेन हातात ’पहिलं फाऊंटनपेन’ म्हणून हातात पडणार हे नक्की! एका झटक्यात त्या पेनाच्या वजनात ’घराण्याच्या थोर आणि उज्ज्वल’ परंपरेचं वजन मिळायचं आणि एक भलतंच अवजड ओझं आपल्या नशीबात यायचं. ही पेनं, घड्याळं वगैरे चाळीस चाळीस वर्ष कशीकाय जपली जातात ह्याचं मला भयंकर कुतूहल वाटतं. अहो, त्या चिमुकल्या पोराचा काही विचार? संस्कार, मूल्य वगैरे देता ते ठीक आहे- ते असे वस्तूरूपात तरी दिसत नाहीत! हे असं ’घराण्याचा अभिमान’ टाईप काही थेट हातातच ठेवल्यानंतर त्या चिमुरड्याचं मन त्या पेनातून एकही शब्द लिहायच्या आधीच किती बिचकतं याची काही कल्पना? 

असो. तर असं परंपरेनुसार, पद्धतीनुसार कोणीतरी आधी वापरलेलंच फाऊंटनपेन आधी हातात पडायचं. फार तर फार शाईची दौत नवी मिळायची. मग हौसेने शाळेच्या वहीच्या उरलेल्या कोर्‍या पानावर फाऊंटनपेनाने लिहिण्याचा सराव सुरू व्हायचा. फाऊंटनपेनानं लिहिलेला पहिला शब्द आयुष्यात गिरवलेल्या पाटीवरच्या पहिल्या सरस्वतीपेक्षाही जास्त मौल्यवान वाटत असे! कारण, शाईने लिहीलेलं खोडता येत नाही हे पक्कं ठाऊक होतं. इतकी वर्षं पेन्सिलीने लिहीलेलं खोडून परत दुरुस्त करायची सवय. आता पेनानं लिहिलं की लिहिलं! काळ्या दगडावरची रेघच जणू!! खाडाखोड शक्य नाही. त्यावरून आठवलं, की ’शाई खोडणारी खोडरबरं’ही असायची त्याकाळी. पण त्याने बरेच वेळा कागदच फाटायचा. त्यामुळे ते बाद होतं आधीच. ’आता विचारपूर्वक लिहावं लागणार’ हा एक ऍडिशनल विचारही बालमनावर थोडासा प्रभाव टाकायला लागे. त्यात दादा/ताईच्या ’नीट लिहा आता, लक्ष देऊन, धांदरटपणा पुरे, मोठे झालात आता..’ची भरही पडायचीच. 

मग सुट्टी संपून पटकन उगवणारा शाळेचा पहिला दिवस येई. त्या वर्षी नवीन दप्तर, गणवेश, बूट असो नसो, मन खट्टू व्हायचं नाही, कारण नवं फाऊंटनपेन सगळ्याची कसर भरून काढत असे. त्या दिवशी काय शाळेची घाई नसे. पाऽऽर दुपारी बाराला शाळा. सकाळपासून लगबग करायचं कारण नसायचं. निवांत आवरायचं. उगाच एक दोन पुस्तकं, रफ वही वगैरे घ्यायची आणि आठवणीनं घ्यायचं ते फाऊंटनपेन- शाईने काठोकाठ भरलेलं. सोबत गतवर्षीची आठवण म्हणून एखादी टोक झिजलेली पेन्सिलही. ती बिचारी दिसायची आपल्या शाईपेनापुढं. पण काय करणार? आता पाचवी ना?- असे काहीसे विचार करत शाळेत जायचं. शाळेचा पहिला दिवस म्हणजे नुसती मज्जा. सगळे मित्र मैत्रिणी दोन महिन्यांनी भेटणार. मग त्यांच्याबरोबर दप्तर पाठीला तसंच ठेवून उड्या, पळणं, मारामारी असं सगळं करून तासाची पहिली घंटा व्हायची. ’सेकंडरी’च्या कडक बाई वर्गशिक्षिका म्हणून वर्गावर यायच्या. त्यांची वर्गावरची एन्ट्रीच, "मुलांनो तुम्ही आता मोठे झालात. चौथीपर्यंत भरपूर मजा केलीत. मात्र आता पाचवीपासून अभ्यासाला सुरूवात, अगदी पहिल्या दिवसापासून!" अशा पहिल्या दिवसाची सगळी गंमतच घालवणार्‍या वाक्यांनी व्हायची. वाकडे, आंबट चेहरे करत कम्पॉस बॉक्स उघडली जायची, आणि त्यानंतरचे काय ते दृष्य!! कम्पॉसमध्ये खाली घातलेला पांढरा शुभ्र नवा कागद निळ्याभोर शाईने माखलेला, पेनाच्या झाकणातून शाईचे टपोरे थेंब बाहेर येऊन पेनालाच चिकटलेले, शेजारची आधीच काळवंडलेली पेन्सिल निळाईने न्हाऊन अधिकच केविलवाणी झालेली आणि तो सर्व नजारा पाहून आपला पडलेला, घाबरलेला, धक्का बसलेला, विश्वासघात झाल्यासारखा झालेला चेहरा! त्या क्षणी शाईपेनाला ’फाऊंटन’पेन का म्हणतात हे कोडं विनासायास सुटायचं. शाईचा फाऊंटन उडवणारं पेन ना ते! आयुष्यातलं पहिलंवहिलं शाईपेन गळणारच, हीही अजून एका काळ्या दगडावरची रेघ!!

आणि मग ते रूटीनच व्हायचं.. कितीही हळूवारपणे हाताळलं, तरी गळणारं पेन, ते गळू नये म्हणून योजलेले नानाविध अयशस्वी उपाय, पेनाची गळकी शाई पुसण्यासाठी घाणेरड्यातली घाणेरडी फडकी, हात, पाय, गणवेश इत्यादींवर पडलेले भरेथोरले शाईचे डाग, मध्येच डोक्यावरच्या केसांनाही पुसलेली शाई, लिहिता लिहिता मध्येच गळल्यामुळे अचानक संपणारी शाई, मैत्रिणींनी खडूसपणा करून उधार न दिलेलं पेन, पेनाच्या विचित्र वागण्यामुळे आपली खाली गेलेली मान आणि शाईच्या पेनाचं संपलेलं कौतुक! 

मध्येच टूम निघायची ती पेनाचं निब साफ करायची. त्यासाठी चक्क टोपाझचं ब्लेड वापरलं जाई. निबच्या मध्यापासून टोकापर्यंत ते ब्लेड निबची कत्तल करत जाई आणि त्यात अडकलेला कचरा साफ होऊन, सुंदर अक्षर येई म्हणे! (ते तर कधी आलं नाही, म्हणजे दोष निबचा, माझा नाही!) असं करत करत, कधीतरी एकदा निबचे खरंच दोन तुकडे होत. मग निब बदलायचं. त्यासाठी आधी चक्क पकडीने ते पेनात घुसलेलं जुनं निब ओढून काढायचं! काय एकेक उद्योग खरंच!!

आठवी किंवा नववीत गेल्यावर अत्युच्च कौतुक व्हायचं आई-बाबांकडून ते ’हीरो’चं पेन देऊन. भयानक क्रेझ होती त्या पेनाची. ते पेन आपल्या मालकीचं असणं म्हणजे आपल्या चांगल्या वागणूकीचं प्रशतीपत्रच. जणू आपणच ’हीरो’ झालो. ते पेन मात्र जीवापाड जपलं जायचं. त्यातली शाई भरायची टेक्निक वेगळीच असायची. त्यात पंप असायचा. ड्रॉपर वगैरेची भानगड नाही. निबही बारिक, नाजूक. कॅम्लिनच्या पेनांसारखं जाडं नाही. हीरोचं पेन वापरणं म्हणजे खानावळ सोडून एकदम पंचतारांकित हॉटेलातलं जेवण करणं. ’क्लास अपार्ट’ पेन. 

मग दहावीला मात्र बॉलपेन वापरायची परवानगी मिळायची, कारण शाईपेनं दगा देणाच्या कॅटॅगरीतली! कधी शाई संपेल, कधी नीट उठणार नाही, कधी गळेल- नेम नाही. बॉलपेन त्या मानानं सेफ. दहावीला आपल्या पाल्याने पेपर नीट लिहावा, यासाठी काय वाट्टेल ते केलं असतं पालकांनी. सोन्याचं पेन मागितलं असतं, तर तेही दिलं असतं बहुतेक. पण तेवढी ऐपत कोणाची नसायची, त्यामुळे सोन्याच्या पेनाऐवजी स्वस्त आणि सुटसुटीत असं बॉलपेन हाती पडायचं. एकदा बॉलपेनाची सवय लागली, की कोण बघतंय मग फाऊंटनपेनाकडे? नायलॉन, सिफॉनच्या झुळझुळीत, स्वस्त, टिकाऊ आणि अमाप टिकणार्‍या साड्या आल्यानंतर कॉटनच्या साड्यांची पीछेहाट जशी झाली, तसंच ते! मग मात्र शाईपेनं स्वच्छ, कोरडी करून ड्रॉवरमध्ये जायची ती जायचीच.. बालपणीच्या रम्न्य दिवसांच्या आठवणी जाग्या करण्यासाठी अजून एक साधन म्हणून. 

आणि हल्लीची मुलं शाईपेनानी लिहित नाहीत, तर आधुनिक तंत्रज्ञाच्या जेलपेनांनी लिहीतात! अरेरे!!

-समाप्त

9 comments:

raju said...

मस्त आहे. लेख आवडला. जुने दिवस आठवले, जुने ते सोने.

Gouri said...

माझं हिरोचं पेन अजून जपून ठेवलंय बरं! नंतर मोठ्यमोठ्या नावंच्या कंपन्यांची पेनंही भेट मिळाली असतील, पण अजूनही तेच पेन प्रेमाचं आहे! :)

Yogini said...

कसलं गोड लिहिलयस !!!!

जुन्या आठवणी जाग्या झाल्या .. आम्हाला शाई पेन २री तच च मिळालं होतं .

शाई पेन मी अजून ही वापरते पण .. कारण शाई पेन ची सर पार्कर पेन ला ही येत नाही




Shardul said...

Nice!!
ekadam junya athawani tajya zalya :-)

Hero che soneri topan asalele pen.. Raynolds che 10th waparalele pen..
Mastach :-)

Mi 6wi madhye ek shai-pen waparayacho..tyacha naw wisaralo.. wooden rang asayacha ani tasach lakada sarakha look asayacha...Aai mhanayachi ki tichya kali pan te famous hota pen :-)

Cheers,
Shardul

poonam said...

धन्यवाद बॉब, गौरी, योगिनी, शार्दुल :)

गौरी: हो, माझंही हीरोचं पेनच लाडकं आहे. माझं हिरवं आहे, तुझं? :)

योगिनी: सेम पिंच. मीही शाईपेन वापरायला लागले आहे गेल्या वर्षापासून. कॅमलची दौत, ड्रॉपर, फडकं वगैरे साग्रसंगीत लवाजम्यासह! :)

शार्दुलः हो, रेनॉल्डजचीही मोठी क्रेझ होती. त्याची जाहिरात एकदम मस्त होती.

manish said...

Ek number..!

Vaishali said...

मस्त लिहिलंय एकदम. जुने दिवस आठवले. खरच पेन च गळण थांबाव म्हणून झटण, नीप बदलण हे भारी असायच एकदम.... ते सगळ पुन्हा एकदा आठवल....

आशा जोगळेकर said...

एकदमच ३० -३५ वर्षांपूर्वी नेऊन सोडलंस बाई. ह्या कोण आजीबाई असं म्हणू नकोस हं, आम्ही पण पाहिलीत शाळा कॉलेजं अन फाउन्टेन पेनं.

Unknown said...

नमस्कार,
लेख खूप छान झालाय. आपल्याशी संपर्क साधायचा असल्यास इमेल आयडी मिळू शकेल का?