ठरल्याप्रमाणे बरोब्बर पाच वाजता ती बांद्र्याच्या कॉफी शॉपमध्ये पोचली. काल रात्री ही भेट ठरली, तेव्हापासून चैनच पडत नव्हतं, त्यामुळे उशीर होण्याचा प्रश्नच नव्हता. पण तो येईल का? एक मन म्हणत होतं- येईल. नक्कीच येईल. एक मन हे असं म्हणत असल्यामुळे दुसरं मन ’नाही आला तर नाही.. अर्धा तास थांबायचं जास्तीतजास्त. मग जायचं निघून’ असं मुद्दामच म्हणत होतं. इतक्यात, पहिल्या मनाची सरशी झाली. तो आला होता.
त्याला पाहताक्षणी तिच्या चेहर्यावर रुंद हास्य पसरलं. तो हसायचं विसरला. नुसताच निरखत राहिला तिला.
**
"किती निर्व्याज हसतेस तू!" प्रेमानं तिच्या गालावरून हात फिरवत तो अनेकदा म्हणाला होता.
उत्तर म्हणून ती परत हसायचीच. अगदी तोंडभरून.
"हं? सांग ना. इतकं सुरेख कसं हसतेस तू?" तो हट्ट करायचा.
"मी तुझ्याबरोबर असले की इतकी आनंदात असते, आपोआप हसायला येतं.." ती काहीतरी सांगायची.
तो परत तिचा चेहरा निरखत बसायचा.
**
कालच पार्टीत जाणवलं होतं.. चेहरा तर फार काही बदलला नव्हता, पण अंगावर मात्र सुखवस्तूपणाची झलक दिसत होती त्याच्या. अंगाने भरला होता. जीन्स आणि टीशर्ट अशा त्याच्या नेहेमीच्या आवडत्या कपड्यात होता तो, पण त्या कपड्यांची उच्च अभिरुची कळून येत होती. हातात एक नाही, तर दोन मोबाईल फोन होते! तिला गंमत वाटली.. एका हातात मेटलफिनिशचं घड्याळ, तर दुसर्यात चांदीचं कडं होतं. त्याचं राहणीमान प्रचंड बदललं होतं ह्यात शंकाच नव्हती. आणि त्याचं अंतर्मन?
"हाऽऽऽय! कसा आहेस?"
ह्यावर आता मात्र तो हसला.
"काल इतके अचानक भेटलो. मला अगदी राहवलं नाही, म्हणून तुला फारसा विचार न करता इथे भेटायला बोलावलं.. काहीच माहित नाही मला आता तुझं.. कसा असतो दिवस तुझा? धावपळीचा असेल ना? सुट्टीवर असल्यामुळे दिवस बांधलेले असतील तुझे. आणि तू काय आता मोठा बिझी माणूस! वेळ आहे का मोकळा मला भेटायला, काय माहित?! तू हो म्हणलास खरा, पण तरी धाकधुक होतीच, येतोस की नाही ह्याची.." त्याला बोलायची संधी न देता ती सुरूच झाली.
आता मात्र तो खदखदून हसला.
आणि ती ओशाळली.
"तू अजूनही समोरच्याला बोलून देत नाहीस?"
**
"अरे बोल ना काहीतरी! मीच कधीची बडबडत सुटले आहे!" कधी कंटाळून, कधी चिडून, कधी वैतागून आणि कित्येकदा, आपणच बोलत आहोत, आणि हा नुसताच ऐकत बसला आहे, एखाददुसरी मार्मिक कोटी करत असं लक्षात आलं की ती म्हणायची.
"बरं चाललंय की हे.. तू बोल मी ऐकतो. तुलाही तसंच आवडतं ना?" असं तो मिश्किलपणे विचारायचा.
**
"छान दिसत आहेस, नेहेमीच दिसायचीस तशीच. जराशी जाड झालीस मात्र, पण छान दिसतेस, शेठाणी शोभतेस.."
"शेठाणी?" तिला नवल वाटलं त्याच्या टिप्पण्णीचं. "तुला कसं माहित?"
ह्यावर तो फक्त खांदे उडवत हसला.
"असूदे मी शेठाणी! तू तरी कुठे बारिक राहिला आहेस? चांगलाच सद्गृहस्थ झाला आहेस की. पण रुबाबदार दिसतोस आता." ती मनापासून म्हणाली.
"मग! दोन पोरांचा बाप शोभायला नको का!"
"तुलाही दोन्ही मुलगेच?" तिने हळूच विचारलं.
"म्हणजे तुलाही..?"
"एक."
"हं"
**
"आपल्याला जी मुलगी होईल ना, तिचं नाव मी ठरवलं सुद्धा! तुझ्या आणि माझ्या नावांची सरमिसळ केली, की एक गोड नाव तयार होतं.. तेच नाव असेल आपल्या मुलीचं! बघू बरं तुला ओळखता येतं का ते.." एका उत्कट क्षणी ती त्याला म्हणाली होती. प्रतिसाद म्हणून त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले होते फक्त.
**
ती गायिका. तो कवी. वावराचा परीघ समसमान. ओळख जुळायला वेळ लागलाच नव्हता. तो मनस्वी, कमी बोलणारा. अबोल नाही, पण सतत विचारात असणारा. ती खूपच बोलकी. गोड आवाजाची. स्वभाव भिन्न असले, तरी एकत्र भेटलेले आणि एकमेकांत मिसळलेले प्रवाह. तो पुण्याचा, पण स्ट्रगलसाठी मुंबईला खोली घेऊन अजून दोन मित्रांबरोबर राहणारा. ती मुंबईचीच. एकमेकांबद्दल आधी गूढ, मग आकर्षण, मग प्रेम ह्या पायर्या त्यांनी कधी ओलांडल्या हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही.
तो सतत सिनेमा निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार ह्या वर्तुळात असायचा. जमेल तशी गाणी लिहायचा. डिमान्ड म्हणून ’कोणासाठी’तरीही लिहायचा. पैसे मिळवायचा. सुरूवातीला सगळ्याची मजा वाटत होती, आवडत होतं. पण ह्या क्षेत्रातली अनिश्चिती, ओठात एक आणि पोटात एक ठेवणारी माणसं ह्याचे जसजसे अनुभव यायला लागले, तसा तो आणखी गप्प व्हायला लागलेला.. सगळी धडपड कोणत्या दिशेने चालली आहे हे समजत नसल्याने आणिकच अंतर्मुख झालेला. भेटलेले कित्येक ’तू मराठीतला जावेद अख्तर’ म्हणायचे त्याला. त्यातले खरे किती आणि खोटे किती हे त्याला समजेनासं होई. आपल्या क्षमतेवर विश्वास होता. पण तिचं अंतिम ध्येय काय मानायचं? कवितेची पुस्तकं? सिनेमाची गाणी? अल्बम? हिंदी चित्रपटगीते? बर, हे सगळं सोडून द्यावं, तर शिक्षण जेमतेम पदवी. कोण देणार नोकरी? आणि काय म्हणून? आणि मग ती आत सतत झिरपणारी कविता?
तीही सिनेमाची गाणी गायला मिळावीत ह्यासाठी स्टुडियोंचे खेटे घालत होती. काही गाणी गायलीदेखील होती तिने, मात्र खूप मोठी पार्श्वगायिका व्हायची महत्त्वाकांक्षा होती तिची. तिलाही ’तू ह्या इन्डस्ट्रीची पुढची लता मंगेशकर’ म्हणणारे अनेक भेटले होते. पण नेमकी संधी मिळत नव्ह्ती. तिचा आवाज सुरेख होता. पण तेवढंच पुरत नव्हतं. योग्य दिशा दाखवणारा गुरू तिला भेटत नव्हता. लोक सर्व बाजूंनी बोलत. मूळ सावध स्वभावानुसार कोणावर विश्वास टाकायचा, कोणावर नाही, राजकारण किती, खरंच नशीबाचा भाग किती हे कळत नसे.
चाचपडणारे हे दोघे एकमेकांना भेटले आणि आधार सापडला. एकाच क्षेत्रात असल्यामुळे खाचाखोचा ठाऊक होत्या, कोणाचं काय चाललं आहे हे समजत होतं आणि पुढे कसं जायचं, काय करायचं हे आपसांत बोलता येत होतं. त्याचं मात्र स्पष्ट मत होतं की तिने ह्या इन्डस्ट्रीसाठी झगडू नये.
"तुझा आवाज सुरेख आहे. त्यालाही जर ही इन्डस्ट्री न्याय देऊ शकत नसेल, तर नको लागूस नादी तिच्या. तू तुझं गाणं सुरू ठेव, मैफिलीत गा. पण इथे इतकं लाचार होऊन कोणाच्या मागे लागावं हा तुझ्या आवाजावरच अन्याय आहे." तो मनापासून म्हणायचा.
शिवाय लोकांची लफडी, भानगडी कळायच्या, दिसायच्या. काही मामले आपखुशीचे, काही अपरिहार्य. त्याच्या मनाच्या तळात भीती असायची, ती तिला गमवायची. ती उत्तम गायिका होतीच. नावलौकिक तिला आज ना उद्या मिळणारच होता. प्रश्न त्याला स्वत:बद्दल पडत. काय होतं त्याचं ध्येय? तिच्या साथीने तिथवर पोचण्याइतकं ते देदिप्यमान होतं का? ह्या इन्डस्ट्रीत यावं, रहावं, फोफावावं ही एकुलती एक इच्छा होती त्याची, अगदी लहानपणापासून. पण इथल्या अपेक्षा, एकूण आवाका, हिंदीमध्ये शिरकाव होण्यासाठी लागणारा वेळ, सतत लोकांना भेटणे, त्यांच्या संपर्कात रहाणे, ’मेड टू ऑर्डर’ लिहीणे ह्या सर्वामुळे आपल्या आयुष्याचीच दिशा चुकली की काय असं त्याला मधूनच प्रकर्षाने वाटे.
"तू लिही ना माझ्यासाठी गाणी. आपण करू एकत्र काम.." ती एकदा असंच म्हणून गेली होती त्याला.
हाच धागा पकडून त्याने खरंच झपाटल्यसारख्या तिच्यासाठी कविता लिहील्या होत्या. काहीं कवितांना त्याला लिहीतालिहीताच चाली सुचल्या होत्या. त्या जेव्हा त्याने तिला दाखवल्या होत्या, तेव्हा तिला स्वर्ग अक्षरश: दोन बोटं उरला होता. ते एकत्र असले, की सतत ती तेच गुणगुणत बसायची. खरंतर ती गाणी कोणाही म्युझिक कंपनीला विकली असती, तर प्रचंड चालली असती इतकी ती गोड होती. पण तरीही ती गाणी कोणाला विकायची नाहीत हे न बोलताच त्यांनी ठरवून टाकलं होतं. तो फक्त त्या दोघांचा ठेवा होता.
ह्यानंतर मात्र ते अधिक जवळ आले होते. एकमेकांशिवाय काही सुचत नव्हतं. पहाटेची वेळ त्याला मनापासून आवडायची. मनातलं कागदावर उतरवायची सर्वात सुंदर वेळ. तीही तिच्या घरी पहाटेच रियाझ करायची दररोज. एकमेकांना आठवत आपल्याला आवडणार्या सर्वात अनमोल गोष्टी करणं हा एक शब्दातीत अनुभव असे. त्यानंतर ते स्टुडियोत भेटायचे. काम असेल तर थांबायचे, नाहीतर हातात हात घालून भटकायचे. मुंबईच्या टळटळीत दुपारी, घामेघूम करणारी हवा, गर्दी, किचकिचाट काहीही त्रास द्यायचं नाही. तो ज्या खोलीवर रहायचा, ते दोन्ही मित्र बिचारे नोकरदार होते, त्यामुळे त्यांना हवाहवासा एकांत अगदी सहज उपलब्ध होता. भारलेले दिवस होते ते. नुसता तो लांबून येताना दिसला की एक शिरशिरी तिच्या अंगावर उठायची. तो जास्त बोलत नसे, त्याची भरपाई त्याचे स्पर्श करत. साधा लोकलने प्रवास करताना त्याने सहज खांद्यावर टाकलेला हात, त्याने प्रेमाने घेतलेला गालगुच्चा, डोक्यावर मारलेली टप्पल हेही तिला अप्रूपाचे वाटे. त्याच्या मौनाचे निरनिराळे अर्थ तिला समजू लागले होते. त्याचा चेहरा ती वाचायला लागली होती. ते एकत्र असत तेव्हा त्याचे डोळे प्रेमाने तिच्याकडे मिचकावून बघत. जेव्हा त्याचा लिहायचा मूड असे, तेव्हा त्याचे डोळे हरवलेले दिसत. जेव्हा एखाद्या प्रसंगाने तो उद्विग्न होई, तेव्हा तो जरी काही बोलला नाही, तरी त्याच्या मनातली तडफड त्याच्या चेहर्यावर दिसे. आपल्याइतकं दुसरं कोणी त्याला इतकं नीट ओळखत नाही असा विश्वास तिला होता. तिने स्वत:ला त्याला अर्पणच केलं होतं. तिच्या आयुष्यात आल्यापासून तिच्या हरेक मिनिटाचा तो अविभाज्य भाग झाला होता.
आणि मग तो अचानक अलिप्त झाल्यासारखा वागायला लागला. तसे ते भेटत होते रोजच, नेहेमीप्रमाणे. पण त्याच्यात काही सूक्ष्म बदल झालाय हे तिला जाणवत होतं. पण त्याला त्यावरून छेडलं की तो सरळ उडवून लावत असे. तिने रुसवा, अबोला सर्व अस्त्र वापरली. पण ह्यावेळी कशाचाच उपयोग झाला नाही. मध्येच तो अचानक दोनचारदा पुण्याला त्याच्या घरी जाऊन आला. त्याच्यानंतर अधिकाधिक अबोल, विचारी वाटला. पण ’काही नाहीये गं, तुला उगाच वाटतंय’ हेच उत्तर तिच्या कोणत्याही प्रश्नावर मात्र कायम राहिलं त्याचं.
एक दिवस ती त्याच्या खोलीवर पोचली, तर आतून बोलण्याचे आवाज आले. दार ढकलून ती आत आली. आत एक सुंदर मुलगी बसली होती, त्याच्या कॉटवर. सुंदर म्हणजे निव्वळ सुंदर. मॉडेलच जणू. मासिकामधून बाहेर पडून थेट तिच्या समोर आल्यासारखी. तिचा चेहरा पर्फेक्ट गोल होता, हलका मेकअप केलेला, अंगावर व्यवस्थित बसणारी जीन्स आणि सुरेख पांढरा कुडता. तिचे केस चक्क चॉकलेटी होते. ती तिच्याकडे संमोहित झाल्यासारखी पहातच राहिली. प्रथमच तिला आपल्या जराशा सावळ्या रंगाची आणि साधारण चेहर्याची पुसटशी खंत वाटायला लागली. त्याने तिला हाक मारली, तशी ती भानावर आली.
"आत ये ना. तिथेच काय उभी राहिलीस?" तिचा चेहरा त्यानेही वाचलाच होता. वातावरणात खेळीमेळी आणण्यासाठी तो मुद्दामच मोठ्या, कृत्रिम आवाजात म्हणाला. काहीशा अनिच्छेनेच ती आत शिरली. कशाहीपेक्षा, ही मुलगी कोण, हे कुतुहल जास्त मोठं होतं.
"मी ओळख करून देतो.. रोली, ही हेमांगी, एक उत्तम गायिका.. आणि हेमांगी, ही रोली.. मुंबई फिरायला आली आहे. हिचं खरंतर नाव स्वराली. पण आमच्यासाठी ही रोलीच.. माझी बालमैत्रिण आहे गं ही. लहान असताना होती चांगली रोलीपोली.." असं तो म्हणताच तिने एक चापट त्याच्या खांद्यावर मारली आणि दोघेही एकमेकांना टाळ्या देत हसले.
एरवीचं ’हेमू’ टाळून त्याने घेतलेलं तिचं पूर्ण नाव, त्या दोघांची एकमेकांशी असलेली घनिष्ठ मैत्री, तिचं सौंदर्य ह्या सगळ्या गोष्टी एकदम तिच्या मनावर कोसळल्या आणि तिला एका क्षणात एकदम परकं असल्याची जाणीव झाली. बालमैत्रिण? हिच्याबद्दल तर एक अक्षरही बोलला नाही कधी? असूयेची एक जबरदस्त लाट तिच्या मेंदूवर धडकली.
"कधी ऐकलं नाही हिच्याबद्दल तुझ्याकडून.."
"मी युरोपमध्ये असते.. ऑस्ट्रियाला.." ती थेट तिच्याकडे बघत अतिशय स्थिर आवाजात उत्तरली.
"ओह.."
"अगं, आम्ही खूप लहान असताना ते सगळेच ऑस्ट्रियामध्ये गेले. आमचा फार काही कॉन्टॅक्ट नव्हता. आताआताच परत सुरू झालं बोलणं. ती सुट्टीसाठी खूप वर्षांनी आलीये इकडे. वीस वर्ष सहज झाली असतील ना गं?" तो स्पष्टीकरण देण्यासाठी धावून आला.
"हो, पण कॉन्टॅक्ट नसला, तरी काही बिघडत नाही, ना?" रोली त्याच्याकडे पहात उत्तरली. "आता भेटी होतंच राहतील.."
तिला एकदम ह्या सगळ्याचा कंटाळा, उबग आणि राग आला. एका झटक्यात ती उभं रहात म्हणाली, "मी स्टुडियोत जातोय, तू येणारेस?"
तो उत्तर द्यायच्या आधी घुटमळला. आणि त्याचं उत्तर तिला मिळालं.
त्यानंतरचा पूर्ण एक आठवडा तिचा अतिशय वाईट गेला. त्याचा तिच्यासाठी घरी फोन आला नाही, की तो कुठे बाहेर भेटला नाही. त्याच्या खोलीवर परत ती जायचा प्रश्नच नव्हता. ती स्टुडियोत गेली तेव्हा तिला कळलं की काही दिग्दर्शक, काही संगीतकार ह्यांच्याबरोबर आधीच ठरलेल्या दोन-तीन भेटींनाही तो आलेला नव्हता, त्याने न येण्याबद्दलही काही कळवलं नव्हतं. तो असा नक्कीच नव्हता. कामाच्या बाबतीत इतका बेफिकीर, तिच्या बाबतील असा बेपर्वा.. छे, नाहीच! मग का? राग, अपमान, दु:ख, वैफल्य ह्या सर्वात ती तडफडत राहिली. अनेक प्रश्न पडत राहिले. कुठे काय चुकलं? आत्ताआत्तापर्यंत एकत्र घालवलेल्या सोनेरी दिवसांच्या वाटेवर ती परत एकदा जाऊन आली. तेव्हाचा तो खरा, की आत्ताचा हा खरा? एक सुंदर, गोरी सुरेख मुलगी काय येते आणि तिची मोहिनी पडून तो सर्व काही विसरून जातो? कविताही? मलाही? कुठे, काय, कोणाचं चुकलं? आणि गोष्टी ह्या थराला येईपर्यंत आपल्याला अंधूकशी जाणिवही कशी झाली नाही? हे असे प्रश्न होते, ज्यांना फक्त तोच उत्तरं देऊ शकणार होता.
आणि तो उत्तरं द्यायला आला. पण त्याने ठरवलेली. तिच्या मनातली वादळं शमल्यावर तो आला. तो वरवर तरी शांतच होता.
"मी न सांगता गायब झालो, ह्याची आधी माफी मागतो. पण वेळच तशी होती. मी स्वत:च सैरभैर झालो होतो, माझं मलाच समजत नव्हतं.. कोणाला काय सांगणार होतो मी तरी?" असं म्हणून तो क्षणभर थांबला. मग मनावरचं ओझं असह्य होऊन एकदाचं त्याने सांगून टाकलं, "मी ऑस्ट्रियाला जातो आहे. स्वरालीशी लग्न करून."
अं? तिला ह्या वाक्याचा अर्थच समजायला काही क्षण लागले. समजल्यानंतर ती सुन्न झाली. तो बोलतच होता.
"पहिल्यापासून सांगतो. माझ्या घरी कोणालाच मी ह्या क्षेत्रात येणं पसंत नव्हतं. पण माझ्या मनात असायची फक्त कविता. शाळा, कॉलेजमध्ये माझ्या कविता गाजल्यानंतर ठरवलं की हेच करियर करायचं. हे क्षेत्र अस्थिर आहे, बेभरवशाचं आहे हे माहित होतं. तरी त्यात उडी घ्यायची तयारी होती, कारण आपलं नाणं खणखणीत होतं. पण इथे उडी मारल्यानंतर ह्यातलं राजकारण लक्षात आलं. इथे केवळ गुण असून चालत नाहीत. लोकांशी घसट ठेवावी लागते, त्यांचे ईगो जपावे लागतात आणि त्याचबरोबर आपल्याइतकंच टॅलेन्ट असलेले इतर लोक आपल्यापुढे जाऊ नयेत म्हणूनही डावपेच खेळावे लागतात. तरी टिकून होतो नेटाने. हट्टाने. दुसरा पर्यायच काय होता? मला काहीच येत नाही दुसरं, तुला ठाऊक आहेच! आपण भेटल्यावर मी अजून आशावादी झालो होतो. तू माझ्यासाठी लकी आहेस. गेल्या दोन वर्षात बर्यापैकी काम केलं. पण तीन आठवड्यापूर्वी प्रमोद शहाचं प्रोजेक्ट गेलं माझ्या हातून.."
तिच्याही नकळत तिच्या तोंडून आश्चर्याचा उद्गार निघाला. प्रमोद शहा एक नावाजलेला निर्माता होता. त्याचा एक भव्य संगीतपट येऊ घातला होता. एका गायकाची प्रेमकथा होती, त्यामुळे गाण्यांना महत्त्व असणार होतं. त्याने ह्या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतली होती, शहांबरोबरही भेट झाली होती खरंतर..
"त्यांना माझं नाव नको होतं, फक्त गाणी हवी होती. श्रेय कोणी प्रस्थापित घेऊन जाणार होता. ह्यानंतर मात्र मी गंभीरपणे विचार केला ह्या सगळ्याचाच.."
"आणि मी? माझा विचार केलास का?" ती अचानक किंचाळलीच! "कोण कुठली एक गोरी मुलगी आली आणि तिची भुरळ पडून तू सगळ्यावरच पाणी सोडायला तयार आहेस? तिच्यासाठी कविता सोडतोयेस? का? तिच्याकडे पैसा आहे म्हणून? आणि मी? मी काय करू? कोणाकडे जाऊ? ह्या परिस्थितीचं काय हेच एक उत्तर आहे? पळून जाणे? मी आहे ना तुझ्यासोबत सदैव. करू आपण काहीतरी. लढू. जमेल तसं जगू, पण इथेच राहू. एकत्र. असा शरण का जातोस?" बोलता बोलता ती अगतिक झाली.
तिच्या प्रश्नांवर उत्तरं नव्हती त्याच्याकडे. अतिशय हताश आवाजात तो म्हणाला..
"मला पर्यायच नाहीये दुसरा काही! माझं मन उडालंय कवितेवरूनच! हे बोलायलाही मला किती यातना होत असतील ह्याची कल्पना येतेय ना तुला? आई-वडिलांच्या दृष्टीने कविता म्हणजे खूळ. माझं इथे काही होत नाहीये. जे होईल ते करायची माझी तयारी नाहीये. मग पुढे करायचं काय? स्वरालीच्या वडिलांना खूप मोठा व्यवसाय आहे. माझ्या बाबांनी त्यांच्याकडे शब्द टाकला. तेही मला तिकडे न्यायला तयार झाले. पण जावई म्हणूनच. माझ्या घरच्यांना हा फायद्याचा सौदा पसंत पडला. कवितेला सोडल्याक्षणी मी विकलो गेलो!" तो विषण्ण स्वरात म्हणाला. कोणत्याही क्षणी तो कोसळला असता.
त्याचा मार्ग त्याने शोधला होता, तो ह्या सगळ्यामधून कधीच बाहेर पडला होता हे तिला लख्खपणे जाणवलं.
"मी स्वार्थी विचार करतोय. मला माहित आहे. पण मी तुझ्याशी प्रतारणा नाही केली हेमू. तसं असतं तर मी तुझ्यासमोर उभाच राहू शकलो नसतो. पण मी माझी उमेदच हरवून बसलो आहे. तुला तरी स्वप्नं कोणत्या बळावर दाखवू? माझी कविता संपली. मीही संपलो. आणि आपणही. मी माफी मागत नाही, आणि शक्य असेल तर तूही मला कधीही माफ करू नकोस."
**
दोघेही गप्पच होते. भेटल्यावर खूप काही बोलायचं असं ठरवलं होतं, पण ऐनवेळी तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता.
तो मोबाईलशी सतत चाळा करत होता. त्याला अधूनमधून कॉल्स येत होते, मेसेजेस येत होते, तो उत्तरं देत होता.. बाकी अबोल. तीही शांत बसून होती, जुने दिवस आठवत.
"शेठाणी कसं म्हणालास?" तिने न राहवून विचारलंच.
तो परत हसला.
"बिझनेसमध्ये बरेच कॉन्टॅक्ट्स होत असतात. मला अपघातानेच कळलं होतं. तुमचं लग्न ठरलं, त्यानंतर लगेच. तुलाही वाट सापडली, किमान तू एकटी राहिली नाहीस हे समजलं. पुरेसं होतं. सो? तुमची काय स्टोरी आहे?" त्याने ताण हलका करण्यासाठी विचारलं.
"स्टोरीबिरी नाही काही रे काही. माझ्याही हातात गाण्याशिवाय काहीच नव्हतं. जमेल तसं गात होते. अधूनमधून काम मिळत होतं. तशातच एक अल्बम केला होता, त्यात सहा गाणी माझी होती. माझा आवाज दीपेशला खूप आवडला. अल्बमचा निर्माता आणि तो मित्र होते. त्याने ओळख करून दिली. डिसेन्ट होता तो. ओळख झाली. मैत्री झाली. दीपेश माझ्या प्रेमात आकंठ बुडाला होता.."
"आणि तू?" तिला तोडत त्याने विचारलं..
एक श्वास थांबून तिने उत्तर द्यायचं टाळलं. "त्याच्यात नाकारण्यासारखं काही नव्हतं. तो सिंधी आहे, ही बारिकशी गोष्ट त्याचं प्रेम आणि त्याचा पैसा ह्यामागे लपली. एरवी आई-बाबांना चाललं नसतं. पण तू गेल्यानंतर मी इतकी उध्वस्त झाले होते, की माझं लग्न तरी होईल का नाही अशी चिंता होती त्यांना. आणि त्यात हे आपणहोऊन चालत आलेलं स्थळ! मी होकार दिल्यावर सगळ्यांना प्रचंड आनंद झाला होता. आई-बाबांच्या आनंदात सुटकेचे नि:श्वासही होते. दीपेश मात्र खरंच खूप खुश होता.."
**
एका ग्रिटिंग विकणार्या मोठ्या दुकानात ते दोघं सहज गेले होते. विविध प्रकारची ग्रिटींग्ज तिथे हारीनं मांडलेली होती. लाल बदामांची सजावट ठिकठिकाणी होती. पोस्टर्सवर प्रेमी युगुलांची चित्र होती. त्यातच एक सुंदर चित्र होतं..
अश्रू ढाळत असलेली एक सुंदर मुलगी.. तिच्या शेजारीच हृदयाचा दुभंगलेला आकार. कोपर्यात लिहीलं होतं.. अशा व्यक्तीवर प्रेम करा जी तुमच्यावर निस्सीम प्रेम करते, कारण तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही!"
तिने कोपर्याने ढोसून त्याचं लक्ष त्या चित्राकडे वळवलं होतं.
’तू मला कधीच सोडून जाणार नाहीस ना?’ ती त्याच्या कानात कुजबुजली होती. त्याने तिला आणखी जवळ ओढलं होतं.
**
"काय करतोस मोबाईलवर सारखं टाईप?" तिने शेवटी विचारलंच..
"सतत काही ना काही चालू असतंच गं. एक पुरत नाही म्हणून दोन फोन घेतले. तरीही पुरत नाहीतच. मेसेजेस, रिप्लाईज, ईमेल्स, त्यांची उत्तरं, निरोप, फोनवरच्या भेटीगाठी.. चालूच असतं. आणि हा फोन पासवर्ड प्रोटेक्टेड आहे- म्हणजे सतत तो टाईप करावा लागतो, त्याशिवाय फोन चालू होत नाही.. "
"हो हो समजलं. आम्हीही मोबाईल वापरतो म्हणलं! त्याचे उपयोग, गरज मलाही ठाऊक आहे!" ती त्याला चिडवत म्हणाली. "ते राहूदे. तुझ्याबद्दल सांग, काय व्यवसाय आहे तुझा? जीडी म्हणतात ना तुला आता? तेवढं समजलं मला.."
"हो, त्या लोकांना आपले उच्चार जमत नाहीत. त्यापेक्षा जीडी सोपं. रोलीच्या वडिलांचं दुकान आहे भारतीय मालाचं, तेच चालवतो मी. म्हणजे सोप्या शब्दात किराणामालाचा दुकानदार आहे बघ आणि सॉफिस्टिकेटेड शब्दात सांगायचं, तर इम्पोर्ट-एक्स्पोर्टचा बिझनेस आहे माझा!" तो मोठ्याने हसत म्हणाला, तशी तिच्या हृदयात एक कळ उठली. "माझ्या सासर्यांचा बिझनेस एकदम मस्त चालू होता. रोली त्यांची एकुलती एक मुलगी. त्यांना वारसदार हवाच होता. ते भारतात आले, आणि रोली आणि मी भेटलो.. पुढे काय झालं तुला ठाऊकच आहे. मी काही शिकलेलो वगैरे नव्हतो. पण दुसरं काही करण्यासारखंच नव्हतं, म्हणून हे काम जमलं. आता तर मी त्यांना अजून दोन वारसदार देऊन माझं कर्तव्यही पार पाडलं आहे आणि त्यांनाही कृतकृत्य करून टाकलं आहे! तिकडे नेमक्या किराणामालाच्या पुड्या नसतात, सगळं चकाचक पॅक्ड असतं, त्यामुळे कागदाच्या पुड्यांवर कविता करण्याइतका संबंधही उरला नाही कवितांशी. तो हात सुटला तो सुटलाच! हां, नाही म्हणायला, रोलीची एक कविता देसाई म्हणून मैत्रिण आहे, ती आली की कविता आठवते!" तो परत जोरात हसला.
तो बोलताना हसत असला, तरी ऐकताना तिला अतिशय वेदना होत होत्या. आणि त्यालाही होत असणार हे उघड होतं. असा जोराजोरात हसणारा नव्हताच तो. आणि किती सहजपणे बोलत होता. नक्कीच अजूनही जखम ओली होती. किंवा भरलीच नव्हती कधी. तिने एक सुस्कारा सोडला.
"आणि तू सांग. तू गातेस की नाही? का माझ्यासारखंच..."
"अधूनमधून गाते.." ती पुटपुटली.
दोघांमध्ये एक अस्वस्थ शांतता पसरली.
"काय साला गंमत आहे बघ! मी कवितेशिवाय, तू गाण्याशिवाय आणि आपण एकमेकांशिवाय जगू शकणार नाही असं एकेकाळी आपल्याला वाटायचं! पण काय झालं? सगळे ईमोशनल ड्रामे असतात! बघ, आपण मस्त जगतोय. मी कवितेशिवाय, तू गाण्याशिवाय आणि आपण एकमेकांशिवाय! काय?"
तिने सहन न होऊन डोळे मिटले.
"काय अडलं आपलं? काऽऽही नाही. मी श्रीमंत आहे, भरपूर पैसा कमावतो, जगभर फिरलो, अधूनमधून इकडे सुट्टीला येऊन जातो; आई-बाबांना खुश करून टाकतो. तूही सुखात आहेस, सेटल झालीस. दोघांनाही मुलगे आहेत, दोघांचेही पार्टनर व्यक्ती म्हणून चांगले आहेत. और क्या लगता है जीने केलिये? काल अचानक केसवानीच्या पार्टीत भेटलो, नाहीतर कोण जाणे एकमेकांची शेवटची आठवण कधी आली होती!"
तसं नाहीये! पदोपदी सतत आपल्या आठवणच असते मी! तिला आक्रंदून हे त्याला सांगावसं वाटलं तिला. पण तिने मोठ्या मुश्किलीने आपल्या मनाला आवर घातला.
"पण अधूनमधूनच का गातेस? तू माझं ऐकलं नाहीस.. तुझ्या गुरूंकडे राहिली असतीस, तर आज ख्यातनाम शास्त्रीय गायिका म्हणून नावलौकिक कमावला असतास! काय करतेस मग दिवसभर? हाऊसवाईफ आहेस?"
"नाही." ती हसून म्हणाली. माझं कॉफीशॉप कम म्युझिक स्टोअर आहे अंधेरीला. लग्न झाल्यानंतर लगेचच सुरू केलं मी ते. मराठी-हिंदी-इंग्रजी सगळे नवीन अल्बम्स, जुनी दुर्मिळ गाणी, वेगवेगळी कलेक्शन्स आहेत. संगीताचे छोटे कार्यक्रम करू शकू अशी जागा आहे. शिवाय, कस्टमर्सना विरंगुळा म्हणून थोडे खायचे प्यायचे पदार्थ ठेवते बेकरी भागात. मॅनेजर ठेवला आहे एक. पण रोजची देखरेख मीच करते. दीपेशने नुकतंच एका स्टुडियोच्या मालकाबरोबर भागीदारी केली आहे. तेही काम मीच बघेन.."
त्याच्या चेहर्यावर कौतुक पसरलं.. "ग्रेट! गाणं सोडलंस, तरी गाण्याला सोडलं नाहीस. ग्रेट जॉब!"
"हं. करत रहायचं काही ना काहीतरी.. जमेल तसं.."
अचानक दोघांमधलं बोलणंच संपल्यासारखं झालं. एकमेकांना डोळाभरून पाहिलं, ख्यालीखुशाली विचारली. मनातलं ओठावर येणं शक्यच नव्हतं.. ह्याही अस्वस्थतेचा शेवट त्यानेच केला.
"चला मग, निघूया? थँक्स मला कॉफी पाजल्याबद्दल. छान वाटलं तुला भेटून. खरंतर आपण कधी भेटू हेच मला वाटलं नव्हतं. भेटलो, तर तुझ्यासमोर मी येऊ शकेन का, तुझ्याशी बोलू शकेन का ह्याबद्दल सतत अपराधी वाटत होतं. पण काल तू नेहेमीसारखीच समजूतदार वागलीस. मला धीर आला, म्हणून आज येऊ शकलो. थँक्स. ही भेटही कायम स्मरणात राहील.. सी यु अगेन असं मुद्दामच म्हणत नाही.. नकोच ते. नाही का?"
"हो. खूप बरं वाटलं, तू आलास, भेटलास, बोललास. एक वर्तुळ पूर्ण झालं." ती मनापासून म्हणाली. "निघूया? कसा आला आहेस तू? कुठे सोडू तुला? माझ्याकडे ड्रायव्हर आहे.."
"छे! मी टॅक्सी घेतो ना.. तू हो पुढे.."
तिला पाठमोरी चालताना त्याने एकदा डोळे भरून पाहिलं. इतक्यात त्याला मेसेज आला. तो वाचण्यासाठी त्याने पासवर्ड टाईप केला- 'gaurangi'.
ती कारपाशी पोचली. तिचा ड्रायव्हर आत बसून तिची वाटच पहात होता. ती बसल्या बसल्या तिला म्हणाला, "मॅडम, फोन आला होता मॅनेजरचा. अर्जंट बोलावलंय कॉफीशॉपमध्ये.. कोणीतरी भेटायला आलंय म्हणले.."
"त्च! खरं तर सरळ घरी जायचं होतं! कोण आलंय असं अचानक? बर, घ्या मग ’गौरांगी’कडे.. बघूया कोण आलंय.."
**
"नाही ना ओळखलंस? अरे..तू गौरव. मी हेमांगी. मग आपल्या गोड मुलीचं नाव असेल गौरांगी!"
-
समाप्त.
25 comments:
छान आहे कथा. गौरव, हेमांगीच्या मनातील चलबिचल, स्वप्न, त्याचं विझलेपण सुंदर व्यक्त झालं आहे.
खूपच छान.......
अप्रतिम... फकत एवढच पुरेस आहे.
अप्रतिम शेवट !! तुमच्या कथा वाचताना एकदम गुंतून जायला होतं !सुरेख..
सुरेख!
:) Very nice story.
मोहना, सुनील, केदार, हेरंब, आदित्य, विद्या- धन्यवाद मित्रांनो :)
(परागची कॉमेन्ट वाचली, पब्लिश का झाली नाही, माहित नाही :()
पराग, नाही, आताशा एमबी वर टाकत नाही काही. ही कथा कालच पोस्ट केली इथे ब्लॉगवर.
mastach :)
Apratim... khupch aavdli katha....
mast aahe kathaa. aavadalee.
Khup khup khup khup chan!
Masta ahe katha..!!
Comment disali nahi karan me ti dusatya kathevar takali hoti :)
आवडली कथा. माझ्या कथा तुम्हाला वाचायला द्यायची इच्छा आहे. एक लिंक देतो -http://www.manogat.com/diwali/2011/node/76.html
वास्तविक जगतात एखाद्या प्रेमी युगुलांची वास्तववादी कथा आहे, ह्यात
चुकूनही ह्यात फिल्मीपणा नाही.
अश्या कथा प्रेमाचे होलसेल दुकान चालवणाऱ्या जोहर किंवा चोप्रा विभूतींच्या का बरे सापडत नाहीत.
कथा संपली आणि डोक्यात ह्या गाण्याच्या ओळी आल्या.
सैयारा तू सैयारा सैयारा मे सैयारा
सितारोके के जहान में मिलेंगे अब [यारा
सैयारा ह्या उर्दू शब्दाचा अर्थ इंग्रजीत लोनली प्लेनेत असा होतो.
दोन एकाकी जीव ह्या वास्तविक जीवनात कधीही एकत्र येऊ शकणार नाहीत.
मात्र आता भेट तार्यांच्या जगात ज्याला काही लोक स्वर्ग किंवा जन्नत म्हणतात,
मृत्यू नंतर नवीन जीवन जगण्याची आशा धरणारे ...
भूतकाळात ओघाने जाणे आले.
भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे चिमुरी, नंदिनी, जाधवराव, पराग, निनाद.. अननोन, तुमचेही आभार :)
केदार, वाचते तुझी कथा.. दुव्यासाठी धन्यवाद.
अप्रतिम शेवट !!
किती गं सुंदर लिहितेस!
Mastach zaliye katha ...shevat far aavadala ..
अप्रतिम......!!!
निस्सीम कथा आवडली.कथेचे शीर्षक समर्पक आहे. शेवट सुद्धा चांगला आणि गोड आहे.
tumchya katha khup avadtat..Heramb mule ha duwa sapadla so tyache aabhar maninach. Kathetlya pahilya 2-3 vakyamadhech purna guntun jayla hota....ani shevat javal ala ki kathetach ankhi kahi kaal rengalun magach shevatakade java asa vatata! Thanks for writing so nice stories!
Kharach apratim!
गोड कथा आहे. फॉर्म पण सही वापरला आहेस. :)
मस्त जमलीय कथा
आवडली
मन:पूर्वक धन्यवाद शैलेश, इनिगोय, राकेश, वैशू, श्री. लोणीकर, राहुल, श्रीराज, साजिरा, स्वाती.
असाच लोभ राहूद्या! :)
Post a Comment