October 25, 2011

माफी

A friend is someone who accepts you as you are and still loves you हे असे भावूक वगैरे वाक्य कधीतरी टीनएजमध्ये वाचल्याचे आठवत आहे. तेव्हा ते तंतोतंत पटलंही होतं. डोळ्यासमोरच दोन जिवश्चकंठश्च मैत्रिणी होत्याही- ज्या त्या म्हणीला अगदी सार्थ करतील अशा होत्या. त्यातल्या एका मैत्रिणीने कॉलेजमध्ये नव्या मैत्रिणींना माझी ओळख- ’ही माझी बेस्ट फ़्रेन्ड आहे. माझ्यापेक्षा नेहेमीच जास्त मार्क मिळतात म्हणून मी जळते तिच्यावर, पण तरी माझी बेस्ट फ्रेन्ड आहे ती!’- अशी करून दिली होती. अशी ओळख करून देतात कोणाची? ध्यानीमनी नसताना कोणीतरी थोबाडीत द्यावी असं झालं होतं मला. ’अगं, मी मुद्दाम जास्त मार्क मिळवत नाही. मिळतात आपोआपच’ असं तिला विनवावंसं वाटलं होतं मला. तीन वर्ष आम्ही एका बेन्चवर बसत होतो. शेकडो पेपर दिले असतील शाळेत एकत्र आणि तिला असं काही वाटत असेल ह्याची मला कल्पनाही नव्हती. माझ्या मार्कांवर तीही खुश असायची असं मला वाटत होतं. पण तिला बरोब्बर उलट वाटत होतं आणि तिला ते तसं माझ्याबद्दल वाटतं हे तिने बिनदिक्कत काल ओळख झालेल्या मुलींना सांगूनही टाकलं होतं!

दुसर्‍या मैत्रिणीने अशीच काहीशी कबूली(?) एका कॉमन मित्राकडे दिली होती. ह्यावेळी मधे मार्क नव्हते, मीच होते. ’पूनमला वाटतं, की मी तिला सगळं सांगितलं पाहिजे. फारच डॉमिनेटिंग आहे ती’ अशी तक्रार होती. आता दोन मैत्रिणी एकमेकींना सगळं काही सांगतात अशी आपली माझी समजूत. तिला माझ्यापासून लपवून काही करायचं असेल असं मला खरंच स्वप्नातही वाटलं नव्हतं.

आज ह्या गोष्टींना खूप खूप वर्ष झाली. ह्या मैत्रिणींच्या संपर्कात आहेच. नीट छान बोलतोही. बोलताना मला हे काही आठवत नाही. मी आपली सरळ मनाने बोलतेही. त्याही बोलत असाव्यात. खूप खूप वर्ष मनातूनच कष्टी झाल्यानंतर, ’ते वय तसंच असतं, शिवाय माझं वागणंही चुकत असेलच की’, अशी समजूत आता मनाची घालता येते. तिथून खूप लांब आले असले, तरी ती आठवण काढली, की तो सल आता ठसठसत नाही, पण जाणवतो. त्याचा त्रास होत नाही. गंमत वाटते ती माझ्याच निरागसपणाची. I was naive really.

’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ ह्या सिनेमात एक सुंदर प्रसंग आहे. फ़रहान अख्तर आपले वडिल- प्रख्यात चित्रकार नसीरुद्दिन शाहला भेटायला जातो. त्याला एकच कुतुहल असतं- आपल्याला ’हा’ आपला बाप आहे हे नुकतं कळलं. तेव्हापासून आपल्याला त्याला भेटायची इच्छा स्वस्थ बसू देत नाहीये. तशीच इच्छा आपल्या बापाला कधी झाली की नाही? त्याला आपल्याबद्दल कल्पना तरी आहे का? तो तसं विचारतो, तर त्याचं उत्तर असतं, की हो, त्याला ती कल्पना असते. त्याला ठाऊक असतं, की आपल्याला एक मुलगा आहे. साहजिकच फ़रहान त्याला विचारतो, मग तुला कधी उत्सुकता वाटली नाही माझ्याबद्दल? मी कसा आहे? कोणासारखा आहे? अभ्यास नीट करतो का? तुझ्यासारखा चित्रकार आहे का वगैरे? नासीर उत्तरतो, उत्सुकता नाही वाटली फारशी. ती दाखवली असती, तर उगाच तुझं आणि तुझ्या आईचं विश्व कॉम्प्लिकेट झालं असतं. म्हणून मी लांबच राहिलो. फ़रहानला तेव्हा कुठे साक्षात्कार होतो, की अरे बापाला मुलाबद्दल कुतुहल, आच, तळमळ वगैरे वाटण्यासाठी, आधी तो आपला एक अंश आहे हे जाणवलं पाहिजे. त्याने त्याचा स्वीकार केला, तर बाकी प्रश्न! इथे आपल्या बापाने कधी आपल्यातलं अंतर कमी करायचा प्रयत्नच नाही केला. तो लांबच राहिला आणि त्यात त्याच्या दृष्टीने काही चूकही नव्हतं. मग आपण कशाला उगाच बाप बाप करत तडफडत आहोत? उलट जन्मदाता नसूनही ज्या माणसाने बापापेक्षा जास्त प्रेम आपल्याला दिलं, आपण त्याचं ऋणी रहायला हवं! हे जेव्हा त्याला स्पष्ट जाणवलं, तेव्हा त्याच्या मनावरचं केवढं तरी मोठं ओझं उतरलं. एक विषयच संपला. कायमचा.

असं एक ओझं मीही काही वर्ष बाळगत होते. (अजून) एका मैत्रिणीबरोबर काहीतरी गैरसमज झाला. जो गैरसमज झाला तो बराच दुर्दैवी होता. त्या आधी मी आणि ती भरपूर गप्पा मारून एकमेकींना चांगल्या ओळखू लागलो होतो. ती सर्वार्थाने माझ्यापेक्षा मोठी होती. समज, प्रतिभा, मॅच्युरिटीने. अल्प अवधीतच ती माझी आयडॉल बनली. तीही तिच्या बाजूने प्रतिसाद देत होती, छान हसत बोलत होती. आणि निमित्त झाले एका तीट लागण्याचे. काही गैरसमज झाले, पण ते ह्या पद्धतीने व्यक्त झाले, ते दुर्दैवी होते खरंच. मला माझ्या मैत्रिणीचं काही पटत नसेल, ती चुकत असेल तर तिला मी कसं सांगेन? काय शब्द वापरेन? कसं बोलेन? जेव्हा आपण एखादीला आपली मैत्रिण समजतो, तेव्हा साहजिकच तिची समजूत घालायची पद्धत निराळी असते, नाही का? आमच्या बाबतीत मात्र तसं घडलं नाही. जी काही समजूतीत गफलत झाली, जे काही मिसकम्युनिकेशन झालं त्याने त्या नुकत्याच जमलेल्या मैत्रीलाच सुरुंग लावला थेट. नंतर हात पुढे करून तो प्रसंग विसरण्याची आश्वासने दिली-घेतली. पण ते संपलंच तिथे. टवका उडाल्यासारखं. ह्या प्रसंगाने माझ्या मनाला प्रचंड व्यथित केलं. इतकी वर्ष झाली तरी अजूनही तटस्थपणे मी त्याकडे बघू शकत नाही. आमची मैत्री अजूनही असती तर काय बहार आली असती, अशी कल्पनारम्य स्वप्नंही मी अनेक पाहिली. ती खरी होऊ शकत नाहीत म्हणून नव्याने उसासले.

आणि अगदी आत्ताआत्ता ती साक्षात्काराची वेळ आली. ह्या वर उल्लेख केलेल्या तीन मैत्रिणी. खरंच मला मैत्रिण मानत होत्या का? मनापासून? एकीला माझ्या मार्कांचा कॉम्प्लेक्स, एकीला माझ्या स्वभावाचा आणि एकीला माझं तिला चिकटणं आवडत नसावं बहुधा. मीच त्यांच्या मागे मागे करत होते, माझ्या मनात त्यांना मी त्या त्या वेळी ’बेस्ट फ्रेन्ड’चं स्थान दिलं होतं. पण मी त्यांची बेस्ट फ्रेन्ड नव्हतेच कधी! मग त्यांनी ’मला काय वाटेल’ ह्याची काळजी करायचं कारणच नव्हतं. त्या त्या प्रसंगात त्या नासीरच्या जागी होत्या- इतकी इन्व्हॉल्व्हमेन्ट नव्हतीच कधी, आणि मी कायमच फ़रहान. व्यर्थ सर्व तडफड.

वेळोवेळी आपण खूप त्रास करून घेत असतो आणि तोही अकारण. घटना/ माणसं ’माफ करणं’, ’सोडून देणं’ हे करायला फार मोठी मानसिक ताकद लागते. क्षुल्लक कारणांपायी मी माझ्या मनाची अनेकदा तगमग करून घेतली आहे, घेत आहे. मग दिवसचे दिवस बेचैनी, तोचतोच विचार करत बसणं आणि सर्व काही निरर्थक आहे म्हणून परत त्याच चक्रात अडकणं. आता विचार करता, असं वाटतं की त्यापायी मी किती ऊर्जा वाया घालवली? ज्या घटना कधी बदलता येणार नाहीत, त्याच रि-व्हिजिट करून, आणि दु:ख उगाळून मी काय मिळवलं? परत परत माझंच मन दुखावणं हे एक सोडल्यास, काय निष्पन्न झालं? मी ज्यांना दुखावलं आहे, ते मला कधी माफ करतील की नाही, माहित नाही. मला ज्यांनी दुखावलं आहे, त्यांना माफ करण्याइतपत मी मोठी नाही. हां, मात्र आज मला माफी मागायची आहे, ती माझ्या मनाचीच! अनेकदा मूर्खासारखं वागून झाल्यानंतर मनात चुटपुट लावून घेतल्याबद्दल, जे माझ्या हातात नाही, त्यामुळे हताश झाल्याबद्दल, रॅश वागण्या-बोलण्याचा परिणाम काय होईल हे माहित असूनही तसं करून नंतर मनाला अपराधी वाटून घेतल्याबद्दल आणि अजून अनेक गोष्टींसाठी. अर्थातच ही लिस्ट काही इथे संपत नाही. मी माफी मागितली, म्हणजे मनही मला लगेच माफ करून टाकेलच असंही नाही. पण आपण सुरूवात करायची. त्यानेही मनाला बरं वाटतं, माहित्ये?

4 comments:

आरती said...

chhaan lihila aahes ... aawadal :)

तृप्ती said...

:) avaghaD aahe paN tU suruvaat tar kelees :)

Nisha said...

Khupach sundar lihilay Poonam !! Khara tar mazya manala pan mi asach tras det asate aani tyamule tuza ha lekh farach bhavala manala :) Mi pan aata mazya manachi maafi magnare aani tyala kamit kami tras denare :)

Ash said...

shevatachaa para malaa agadi tantotant laagu hoto :( mhaNun likhaan khup aat pochala. jyaa lokaanchi did damdichi laayaki naahi tyaanni manaalaa dilelaa traas aathavat basnyaat anek kshan ghalavlet aani kahar mhanje tyaatahi kuthe aaplich tar chuk navhati naa?haa vichaar hi karane :(