August 23, 2011

जमणार का?

आंदोलनात सहभागी होऊ, लाक्षणिक उपोषणही करू, घोषणा देऊ, मोर्चे काढू.. पण आंदोलनाचा मूळ विषय- भ्रष्टाचार निर्मूलन करणं जमणार का? सरकारी कर्मचारी, मंत्री सोडा, आपल्यासारख्या सामान्य लोकांना तरी जमेल का स्वच्छ जगणं? भ्रष्टाचार इतका बोकाळण्याचं किमान पन्नास टक्के पातक आपल्यासारख्या सामान्य लोकांकडूनच घडलंय ह्याही सत्याला आता ह्या निमित्ताने सामोरे जाऊ. साधी वाहतूकीची शिस्त आपण पाळ्त नाही. आताशा सिग्नलना ’सेकंद’ दर्शवणारे इन्डिकेटर असतात. त्यात दहा सेकंद राहिलेले दिसल्यापासूनच लोक गाड्या दामटवायला लागतात. इथे भ्रष्टाचाराचा थेट संबंध नाही, पण वृत्ती दिसते- आहेत ते नियम तोडायची. बर, हे नियमही आपल्याच सुरक्षिततेसाठी केलेले, दुसर्‍यासाठी नव्हेत! तरी, ते धाब्यावर बसवायचे. आणि पकडले, की सुरू गयावया किंवा चिरीमिरी. पण self realisation, आपण काही चूक केली आहे, ह्याची जाणिव होते का मनातून? ती झाली, तरच ही चूक पुन्हा होणार नाही.

हे असे प्रत्येक सरकारी कार्यालयात आपण करत नाही? रेशन कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, वाहतूक परवाना, आयकर खातं.. सरकारी कार्यालयात जायचं म्हणजे आधी आपल्याला नको वाटतं! कारण तिथे आपलं काम होणार नाहीच- अशी खात्री! गेलोच, तर ’पटकन काय ते उरकून टाका’ असा आपला आविर्भाव. समोरचा कर्मचारी खरंच काही पूर्तता करण्यासाठी अजून काही मागत आहे, की उगाच नाडत आहे, ह्याची काहीएक शहानिशा न करता आपण ’करून टाका साहेब’चा धोशा लावणार. भ्रष्टाचाराला कोण लावतंय हातभार?

इतक्यात दहीहंड्या झाल्या, गणपती उत्सव येतोय, पाठोपाठ नवरात्र- मांडव घालायचे, वाहतूकीला अडथळा येईल अशा कमानी टाकायच्या, सर्व आदेश डावलून स्पीकरच्या भींती उभारायच्या, सामान्य माणसाला होणार्‍या त्रासाची पर्वा करायची नाही आणि हे सर्व करण्यासाठी वर दबाव आणायचा आणि पैसा ओतायचा. सार्वजनिक कार्यक्रमात तर नगरसेवकच पुढे असतात. नियम आणि ह्यांचा तर काही संबंध कधीच नसतो. ह्यांचे कार्यकर्ते तर ह्यांच्याही वरताण असतात. मग्रूरी आणि माज ह्याशिवाय ह्यांना तिसरी भावना नाही. ह्याच लोकांचे आण्णा समर्थनार्थ रॅलीत यथेच्छ ओरडून झाले असेल. पण ह्यातला एकही गणेशोत्सवात एकही स्पीकर कमी करायचं नाव काढणार नाही, की दमदाटीनं वर्गणी गोळा न करण्याची शपथ घेणार नाही!

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले- ऐकली आहे ही म्हण? घोषणा देणं सोपं आहे हो. आज रॅलीमधल्या प्रत्येकाला ’मी सर्व नियम कटाक्षाने पाळेन’ अशी शपथ घ्यायला आणि ती पाळायला सांगितली, तर किती जण ती निष्ठेनं पाळू शकतील? हे व्रत फार अवघड असतं हो. स्वच्छतेचा मार्ग काट्याकुट्याने भरलेला असतो- संयम, ठामपणा आणि पराकोटीची चिकाटी लागते त्यासाठी. आजकालच्या झटपट जमान्याला ते सहनच व्हायचे नाही. काहीही झालं तरी एकाही सरकारी कार्यालयात लाच देऊन काम करून घेणार नाही. त्यासाठी मी माझी कागदपत्र नीट ठेवेन, सर्व दाखले जोडेन, लागेल तितके खेटे मारेन, साहेबांना भेटेन, पण सरळ मार्गानेच माझं काम करेन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नियमबाह्य काम करून घेण्यासाठी मी सरकारी कार्यालयात पाऊल ठेवणारच नाही.- असं जमेल? जमवायला हवं. तरच ह्या नारेबाजीला अर्थ आहे. समोरचा माणूस शंभर टक्के चूक असेल, पण त्याला बोलायचा आपल्याला काय अधिकार आहे, हेही तपासायला हवेच ना? भ्रष्टाचाराची सुरूवात ही आपल्यासारख्या सामान्य माणसानेच काहीतरी तडजोड करवून घेण्यासाठी केली आहे. नंतर त्याची सवय झाली- सगळ्यांनाच. आणि आता हा न झेपणारा राक्षस कसा आवरायचा असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. पण आपण मन:पूर्वक प्रयत्न केले, त्याला कायद्याची आणि नियमांची पुरेशी जोड दिली, तर थोडी तरी प्रगती निश्चित होईल.

6 comments:

sheetal said...

Kharach...agadi patat aahet tumache wichar.

Prof. Sumedha said...

का नाही जमणार ?लहान मूल भूक लागली की रडून ते जाणवून देते . मोठे झाल्यावर स्वत:च्या गरजा ओळखून वागू लागते .परीक्षेत उत्तम यश मिळवायचे असेल तर पुरेपूर अभ्यास करावा लागतो , तो आपण करतो . आयुष्यात कित्येक गोष्टी साध्य करण्यासाठी आपण सतत झगडतच असतो . मग भ्रष्टाचार मुक्त वातावरण मिळवण्यासाठीही तेच करू शकतो .

aativas said...

कायदा आवश्यक असतो पण तो पुरेसा नसतो हे आपल्या देशाच्या अनुभवावरून सहज लक्षात येत. तुम्ही म्हणता ती 'स्वत:ला बदलायची' गोष्ट अवघड असते, म्हणून सगळे वार दुसा-यांवर करायची आपली एक पद्धत पडून गेलीय .. दुर्दैवाने ती या आन्दोलनातही चालू आहे पुढे तशीच.

Ravi said...

या आंदोलनाच्या निमित्ताने प्रत्येक शहरात भ्रष्टाचार विरोधी ग्रूप तयार झालेत. त्यांनी फक्त इथेच न थांबता, या इतर मुद्द्यांना पण हात घालायला हवा. कायदा आहेच, पाठपुरावा गरजेचा आहे.. समाज म्हणाल कि उडदामाजी काळे गोरे आलेच.. पण आपण जर कायद्याचा सदुपयोग करून घेतला तर दुष्प्रवृत्तीना वाचक बसेल.

poonam said...

धन्यवाद शीतल. सुमेधा, आतिवास, रवी- अशाच सकारात्मक विचारांची अपेक्षा आहे सगळ्यांकडून. तरच ह्या आंदोलनाचा थोडा तरी प्रभाव पडेल.

Rakesh said...

Lekhat mandlele vichar agdi patat aahet, pan at least kuchh nahi to kuchh sahi -- survat tari zaliye, agdi Tata tea jagore pasun Anna Hazaren paryant lokani sath diliye ha positive change aahe..tyamule nakki jamel!!