June 1, 2011

Miss you.

लॅच उघडून विकी आत आला. बाहेरचा लोखंडी दरवाजा उघडा होता, म्हणजे अंकिता घरी आलेली होती. हे जाणवताच हळूहळू त्याचा पारा चढायला लागला.
अंकिता स्व्यंपाकघरात जेवणाची तयारी करत होती. तो तिथे गेल्यावर तिनेही त्याच्याकडे बघितल्यासारखं केलं, पण बोलली काहीच नाही.
घरात एक कृत्रिम शांतता पसरली. एक दबलेली शांतता. कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकेल अशी शांतता.
आजकाल सर्रास अशी शांतता पसरायची. भडका कधी उडेल, ह्याची वाट पाहणारी अस्वस्थ शांतता...
फ्रेश होऊन विकी जेवायच्या टेबलाशी आला. सवयीनं जेवायच्या प्लेट्स, पाणी, भांडी घेऊन खुर्चीवर अंकिताची वाट पहात बसला. तो आल्याचं कळून अंकिताही ओट्यावरून वरण-भाताचे डबे घेऊन आली. टेबलावर पॅटीसचा पुडा दिसत होता.
"पॅटीस? जेवायला? काकू आल्या नाहीत?"
"येऊन गेल्या असतील. मी आत्ताच आले."
"माझा आलेला फोन अटेन्ड केला असतास, आणि त्याला उत्तर द्यायचे कष्ट घेतले असतेस, तर मी लवकर आलो असतो."
स्फोट झालाच.
"जेवायला पॅटिस? श्या! एक धड जेवण पण घरचं मिळत नाही राव! कॅन्टीनचं जेवण बरं त्यापेक्षा! का नाही घेतलास फोन? बर बिझी असशील, तर तुला रिटर्न करता येत नाही कॉल? की नवर्‍याशी बोलायला लाजबिजही वाटायला लागली आता?"
"गप्प बस रे!" अंकिता वैतागली. "मी कॉलवर होते. आग लागलीये प्रोजेक्टमध्ये. कस्टमरने रिक्वायरमेन्ट्स बदललेत अचानक. डेडलाईन गळ्याशी आलीये. मी काय परिस्थितीत आहे! तू काय बोलतोयेस? मला अजिबात वेळ नाहीये फोनबिन घ्यायला. कारमध्येही मी महेशशीच बोलत होते. जेवण जेवण काय सारखं? खाली गेलास की काय वाट्टेल ते खायला मिळेल. प्रोजेक्टचं सांगायला, बोलायला तुझ्याबरोबर थोडा वेळ मिळेल म्हणून आले तरी मी घरी. तर परत कटकटच! का आले लवकर असं झालं! धड बोलताच येत नाहीये आजकाल कोणी! शिट! मला परत कॉल आहे दहाला! जे आहे ते खा. नाहीतर उपाशी रहा! जस्ट लीव्ह मी अलोन!" बोलता बोलता अंकिताचाही आवाज चढला.
"तेच करणाराय मी. I am going to leave you alone. Enjoy your work. रहा एकटी कामं करत. नाहीतरी तुला माणसं नकोच असतात, कारण त्यांच्यासाठी खस्ता खाव्या लागतात. वेळ द्यावा लागतो.."
"म्हणजे? एकटी रहा म्हणजे??" एक अनामिक भीती तिच्या शरीरातून पसरली.
"मी ऑनसाईट जातोय गेल्यावेळेसारखा. जर्मनीला. कमीतकमी दोन महिने. तिकिट मिळालं तर ह्या शनिवारी नाहीतर पुढच्या आठवड्यात कधीही. हेच सांगायला फोन करत होतो. तर.." विकीचा आवाज जरा नरम झाला.
"ओह." सगळं समजल्यासारखा अंकिताने चेहरा केला आणि एक सुस्कारा टाकत ती कॉल घ्यायला गेली.
--
गेले अनेक दिवस विकी-अंकितामध्ये काही ना काहीतरी सतत बिनसत होतं. ते नक्की काय होतं? का होतं? दोघांनाही ते खुपत होतं, पण त्याची नस सापडत नव्हती. दोघेही अतिशय हुशार. नामांकित संगणक कंपन्यात काम करणारे. करियरिस्ट्स. दोघांनीही डोळे उघडे ठेवून लग्न केलं होतं. अंकिता अतिशय हुशार, स्वावलंबी, धडाडीची. पड घेणं, गप्प बसणं स्वभाव नाही. घरचीही लाडावलेली. विक्रम त्या मानाने थोडा अधिक समजूतदार. कामाची टेन्शन्स, प्रेशर्स ह्याची दोघांनाही कल्पना होती. त्याखाली दबून जाणं हे सहजीवनासाठी किती मारक असतं, हेही स्वच्छ माहित होतं. तरीही विसंवादी सूरच लागत होते सध्या.
आजकाल दोघांनाही एकमेकांमधल्या त्रुटीच ठळकपणे दिसत होत्या. दोघेही एकमेकांना कंटाळल्यासारखे झाले होते. अंकिता स्वभावाने बरीचशी प्रॅक्टिकल. गोड, लाघवी बोलणं, हसून प्रसंग साजरा करणं वगैरे तिला जमायचं नाही. तडकफडक काय ते बोलून विषय संपवून टाकणं तिला सोपं वाटायचं. विकी स्वभावाने हळवा, अंकिताबद्दल पझेसिव्हही. दिवसभर एस एम एस, ईमेल, फोन्स, चॅटवरून एकमेकांच्या संपर्कात राहणं ही त्याची गरज होती. कामाच्या रगाड्यात ते रोज, घड्याळ्याच्या काट्यावर जमत नसे, तरीपण ते जमवण्यासाठी तो कष्ट घेत असे, हेही खरं. अंकिता ह्या बाबतीत अगदीच बेफिकिर होती. अनेक जोडप्यांमध्ये असते तसेच, ह्याला जे अत्यंत महत्त्वाचे वाटे, ते तिला वाटत नसे आणि तिला जे महत्त्वाचे वाटे ते त्याला बिनमहत्त्वाचे. एकमेकांच्या न आवडणार्‍या गोष्टी दर वादात संबंध असो-नसो, पण डोकं वर काढायच्या. भांडणात मुद्दा बाजूला पडून ह्या एकमेकांच्या नकोशा वाटणार्‍या गोष्टींची उजळणी व्हायचीच. मग एकमेकांच्या वाग्बाणांनी पुरेसे विद्ध झाले, की पसरायची त्या छोट्या घरात एक उदास शांतता.
--
विकीला रविवारचं तिकीट मिळालं आणि त्याच्या तयारीला वेग आला. तसे दोघेही स्वत:च्या आणि एकमेकांच्या परदेशवार्‍यांना सरावलेले होते. कोणत्या गोष्टी लागतात, कोणत्या तिथे मिळतात, कपडे, सीझन, टाईम झोन- सगळ्याची कल्पना होती, त्यामुळे सामान भरायला फारसा वेळ लागणार नव्हता. त्या रात्रीनंतर अबोला नव्हता, पण वातावरण पूर्णपणे निवळलंही नव्हतं. प्रेमापेक्षा, माफीपेक्षा मनावर ईगोचं राज्य होतं. शिवाय, मनं मोकळं करण्यासाठी पुरेसा वेळही नव्हता. विकीची निघण्याची गडबड आणि अंकिताचं काम दोन्ही गळ्यापर्यंत आलेले होते. विकी आता नसणार आहे ह्या कर्तव्यभावनेनेच अंकिता त्याला मदत करत होती. बाजारातून काही वस्तू आणणे, एखादा पदार्थ करणे वगैरे. तिच्या मनात एक वादळ घोंघावत होतं. सगळी परिस्थितीच गोंधळाची झाली होती. आपलं नातं कोणत्या दिशेने चाललं आहे, आपल्यात इतका कोरडेपणा नक्की कशामुळे आला आहे ह्या सगळ्याचा लेखाजोखा घेण्यासाठी विकीची अनुपस्थिती म्हणजे एक तिच्या दृष्टीने एक चांगली संधीच होती. त्या निमित्ताने आपलं आयुष्य, आपली ध्येयं आणि आपला नवरा अशा आत्तापर्यंतच्या सर्वच प्रवासाचा वेध घेणार होती ती..
विकीही कमी दुखावलेला नव्हता. गप्प होता इतकंच. आजकाल त्याचं आणि अंकिताचं वागणं बोलणं नवरा-बायकोपेक्षा दोन एकत्र राहत असलेले इंजिनियर्स, रूममेट्ससारखं झालं होतं जवळपास. त्या विषयावर बोलायचं तरी काय असाही प्रश्न होताच. कारण बोलणं म्हणजे वाद, भांडण असंच समीकरण झालं होतं. नक्की काय बिनसत होतं हे समजत नव्हतं, पण ऑल वॉज नॉट वेल, हेही नक्की.

त्या रात्रीनंतर त्यांच्याकडे चार दिवस आणि तीन रात्री होत्या. पण सर्व दिवस तुटक आणि रात्री अबोल गेल्या. ’काय बोलायचं एकमेकांशी?’ अशी कोंडी. शेवटी तडफड सहन न होऊन जायच्या आदल्या रात्री विकीने अंकिताला जवळ घेतले. अंकिता त्याच्या स्पर्शाने चक्क आक्रसली! तिने अंग आवळून घेतले. उद्यापासून तो दोन महिने नसणार होता. तरीही तिची इतकी अनिच्छा जाणवून तो हताश झाला, दुखावलाही गेला आणि संतापलाही! "खड्ड्यात जा!" धुमसत तो म्हणाला आणि रागाने टीव्हीसमोर जाऊन बसला. अंकिताला स्वत:लाही धक्का बसला. विकीचा स्पर्श आपल्याला नकोसा वाटेल ही कल्पना तिला स्वत:लाही नव्हती! आपण भांडतो, ओरडतो, वाद घालतो. पण तरीही विकी ’आपला’ आहे ही भावना होती आत्ताआत्तापर्यंत. तिच्याही नकळत ती विकीपासून इतकी लांब आली होती का? त्याला झिडकारण्याइतकी?
असह्य होऊन ती बाहेर आली. विकीशेजारी जाऊन बसली. हळूच तिने विकीच्या हातावर हात ठेवला. सर्रकन विकीने आपला हात काढून घेतला. "सॉरी.." अंकिताला अचानक भरून आलं. हुंदके देऊन हमसाहमशी रडायला लागली ती. विकीला सगळंच अनपेक्षित होतं. एरवीची अंकिता अशी त्याच्यामागे बाहेर नक्कीच आली नसती. शिवाय, बिनशर्त ’सॉरी’ही? तिच्या रडण्यानं मात्र तोही विरघळला. त्याने अंकिताला मिठीत घेतलं आणि त्यालाही दाटून आलं. कुठेतरी मनात ’सगळंच संपलेलं नाहीये’ असा दिलासाही वाटला. "लव्ह यू", तो तिच्या कानात पुटपुटला..
---

विकी जर्मनीला गेला आणि घर एकदम उदास उदास होऊन गेलं. अंकिता असायची फक्त रात्रीपुरती, तरी त्या घरातला ओसाडपणा तिच्या अंगावर धावून यायचा. वरवर पाहता सगळं ठीक चाललेलं होतं, पण आत खळबळ माजलेली होती. दोघांचेही काम ठरल्याप्रमाणे चालू होते. दुपारी अकराच्या सुमारास ती आणि विकी थोडं चॅट करायचे, एक दिवसाआड फोन चालू होता. हे दोन्ही मात्र अंकिता कटाक्षाने वेळ देऊन करत होती. परत एवढ्या कारणाने विकीशी भांडण करायची इच्छा नव्हती तिची. बाकी सर्व वेळ काम आणि काम. रात्रीच्या वेळी अंग टेकताना हमखास ’ती रात्र’ नजरेपुढे यायची. पण त्या सगळ्याबद्दल विचार करणं आत्ता ह्या क्षणी तरी नको होतं तिला. त्यापेक्षा कामात बुडवून घेणं, ऑफिसमधल्या लोकांबरोबर गप्पा, मजा, जोक्स मारणं हे सोपं आणि सोयिस्कर होतं.
पहिला आणि त्या नंतरचा वीकेन्ड मस्त आरामात गेले. मनावर कसलंही ओझं न बाळगता अंकिताने मित्रमैत्रिणींबरोबर सिनेमे, भटकणं, हॉटेलिंग, शॉपिंग असा आता रूटीनच झालेला प्रोग्राम एन्जॉय केला. विकीही तिकडे मजेत होता. तोही भटकत होता, ईमेलमधून फोटो पाठवत होता, चॅटवरून दर दैनंदिन कार्यक्रम कळत होतेच.

तिसर्‍या वीकेन्डला मात्र परत तेचते हॉटेलिंग आणि सिनेमा प्रोग्रामचा तिला मनापासून कंटाळा आला. गुरूवारी त्यावर चर्चा चालू होताच तिने सांगून टाकलं, "इस बार मैं नही आनेवाली.."
" ए क्यू? चल ना? रणबीरकी फिल्म है.. तुझे अच्छी लगेगी.." कोणीतरी आग्रह केला..
"नही यार.. बोर हो गया, हर वीकेन्डपे वही सब.."
"तो कही आऊटिंगपे चलते है.."
"ना रे.. मुझे इसबार कुछ नही करना है.. आप लोग एन्जॉय!"
"क्यू? घरपे बैठके सॅड साँग्ज गानेवाली है क्या?" कोणीतरी विनोद केला आणि सगळे फिस्सकन हसले. विकी इथे नाहीये हे टीमला माहित होतं एव्हाना..
तिला अचानक सगळ्यांचा राग आला. ह्यांना काय करायच्यात नसत्या उठाठेवी?? ती नंतर गप्पच बसली.

त्या दिवशी मात्र घरातला एकटेपणा अंगावर आला. विकी नसल्यावर आपण अगदी मस्तपैकी आरामात जगू हे गृहितक चुकायला लागलं होतं. ’विकी नाहीये’ ही जाणीव कुठेतरी सतत कुरतडायची. खरंतर ती आणि विकी दर वीकेन्डला काही ना काही करायचे असं मुळीच नव्हतं. उलट कामाचे इतके व्याप असायचे एरवी, की शक्यतो शनिवार-रविवार घरी कामं उरकत, गप्पा मारत, एखादा सिनेमा बघत मस्त वेळ जायचा. अचानक अंकिताला साक्षात्कार झाल्यासारखा झाला- विकी असताना आपल्याला कधीच कंटाळा येत नाही! हे असं रिकामपण तर कधीच नाही. आपण जरा अस्वस्थ असलो, की त्याला चैन पडत नाही. रूंजी घालत, आग्रह करत आपल्याला बोलतं करतोच तो. आणि आपल्यालाही त्याच्याशी बोललं की मगच बरं वाटतं.
मग हे असं असताना ते शेवटचे दिवस असे का गेले? तेव्हा तर विकी अगदी नकोसा झाला होता डोळ्यापुढे. कधी एकदा तो जातोय एकदाचा जर्मनीला असं झालं होतं. कसला इतका राग आला होता त्याचा? की प्रोजेक्टचं फ्रस्ट्रेशन त्याच्यावर निघालं? ऊप्स! असं व्हायला नको होतं. विकीवर राग काढायला नको होता. पण तो शरीराचा नकार? तोही त्या रागामुळेच? बापरे! इतका राग आहे आपल्यात? तोही आपल्या विकीवर?

आपण जरा पहिल्यापासून प्रॅक्टिकलच. हळूवारपणा, रोमॅंटिक वागणंबोलणं कधीच जमलं नाही. कोरडी म्हणता येईल इतपत अलिप्त ह्याबाबतीत. विकी अर्थातच उलट. एक्साईट होणारा, भावना दाखवणारा, खूप खूप हसणारा, बोलणारा, भरभरून प्रेम करणारा आणि हक्काने रागावणाराही. आपण कधीच आपल्या भावना इतक्या मोकळेपणाने व्यक्त करत नाही. विकीला पटकन लग्नाला होकार दिला, हे आश्चर्यच. कधी बिचार्‍याला गिफ्ट्स दिल्या नाहीत, की त्याने द्याव्या अशी अपेक्षा केली नाही. उलट सुरूवातीची त्याची एक्साईटमेन्ट म्हणजे पोरकटपणा वाटायचा. आपला indifference बघून बिचार्‍याने नंतर ते सगळं बंद केलं. He really loves me. But do I love him equally? Do I even love him? की आपलं नावं ठेवायला जागा नाही म्हणून चाललंय असंच?’
विचारच ते. सैरावैरा धावत सुटत. मग मात्र अंकिताचा जीव घाबरा होई. ते टाळण्यासाठी आजकाल ती सोफ्यावरच झोपत असे.. कोणतातरी सिनमा चालू ठेवून. कधीतरी टायमर संपला की टीव्ही बंद होई, तोवर झोप लागून जात असे.
---

त्या दिवशी मात्र नेहेमीच्या वेळेवर विकी चॅट करायला आला नाही. This was definitely not Viki-like. विकी ह्या बाबतीत एकदम काटेकोर. एखाद्या दिवशी जमणार नसेल, तर आधी सांगणारा. अचानक काही काम आले, तरी ऑफलाईन का होईना, पण मेसेज ठेवणारा. पण त्या दिवशी काहीच नाही. अंकिताला चुकल्यासारखे झाले. परत परत तिने स्वत:चे नेट कनेक्शन, मेलबॉक्स, जुन्या मेल्स वगैरे चेक केल्या. ’आज जमणार नाही’ असं विकीने आधी सांगितलं होतं का? पण छे! काहीच नाही. आजचा दिवस रूटीन होत.. मग का बरं आला नाही? अंकिता बेचैन झाली. पण ’झालं असेल काहीतरी’ अशी स्वत:ची समजूत घालून तीही स्वत:च्या कामाला लागली. फोन कालच झाला होता, त्यामुळे आता पुढचा फोन उद्याच येणार होता.. संध्याकाळी कदाचित करेल कॉन्टॅक्ट असा विचार करून ती तिची कामं करायला लागली, आणि कामात जी बुडली, ते पार रात्री साडेसातपर्यंत. खाडकन तिला आठवले, अरे! इतका उशिर झाला, आणि विकीकडून काहीच खबर नाही? तिने परत मेल्स पाहिल्या, मोबाईल चेक केला.. अंहं. काहीच नाही. आता मात्र तिने ठरवले, की आपण काहीतरी केले पाहिजे.. तिने प्रथम त्याला एका ओळीची ईमेल केली. हॉटेलचा नंबर घरी होता, त्यामुळे घरी पोचलो, की हॉटेलला फोन करू असे ठरवले.

ऑफिसात उगाच वेळ न काढता, ती तातडीने घरी आली, तरी तोवर नऊ वाजलेले! तिने हिशेब केला. विकीचं काम संपून तो हॉटेलवर यायला अजून तास तरी होता. घरी येऊन तिने लॅपटॉपवरून परत ईमेल्स पाहिल्या- अजूनही विकीचे काहीच उत्तर नव्हते. ’गेला तरी कुठे हा?’ असा विचार करत तिने हॉटेलचा नंबर घेण्यासाठी त्याचा ड्रॉवर ढुंढाळायला सुरूवात केली. विकीच्या टापटीप स्वभावानुसार, ट्रिपचे सर्व डिटेल्स, हॉटेलांची नावं आणि पत्ते, तिकिटांचे प्रिन्ट्स सगळे इथे असणारच होते, अगदी 100%. पण आज मात्र तिला काहीच सापडेना.. असंख्य कागद होते, पण सगळे जुने.. ह्या ट्रिपचे काहीच नाही??
तिला परत एकदा आठवली, ती आदल्या दिवशीची रात्र! त्या अबोल्यात विकी विसरला की काय सगळे कागद घरी ठेवायला? म्हणजे? आज ह्या घडीला आपल्याकडे विकीचा पत्ताच नाहीये? छे छे! असं कसं होईल? कुठेतरी काहीतरी असेलच ना! अंकिताचं स्वत:शीच द्वंद्व सुरू झालं. घरातले सर्व कप्पे, ड्रॉवर तिने पालथे घातले. पण हाती काहीही लागलं नाही. सत्राशेसाठ बिलं, पावत्या, जाहिरातींची पत्रकं- जे नको होतं ते सगळं हाती आलं, पण ते कागद नाहीत. दुसरं काहीतरी बघायला हवं होतंच आता. सव्वादहा! ईमेलवरही पाठवतो विकी कधीकधी त्याच्या तिकिटांचे, हॉटेलचे डिटेल्स. तिने लॅपटॉप उघडून परत ईमेल्स पाहिल्या. अंहं. काहीच नाही. विकीच्या आधीच्या ईमेल्सवरही काहीच नव्हते. ’आता करायचे तरी काय? वाट पहायची नुसती? करेल उद्या फोन. नाही जमत एखाद्या दिवशी..’ तिने स्वत:ची समजूत घातली खरी, पण मनाला अजिबात पटत नव्हते. ठरवलेल्या, रोजच्या चॅटवर आला नाही, एकाही ईमलला उत्तर नाही, काही गडबड असेल, तर एकातरी वाक्याचं इन्टिमेशन नाही- हा विकीचा स्वभावच नव्हता. काही सिरियस होतं का?
--

सकाळी आठ वाजेपर्यंत अंकिता कशीबशी थांबली. विकीच्या एका कलीगचा नंबर सुदैवाने तिच्याकडेही होता. तो कोणत्या प्रोजेक्टवर होता, विकीबरोबर आता काम करत होता का, तिला काहीच माहित नव्हतं, पण किमान त्याच्यामार्फत विकीचा ठावठिकाणा नक्की लागला असता. पहिल्यांदा फोन उचललाच नाही त्याने. अंकिता अजून अर्धा तास थांबली. परत फोन केला, परत खूप रिंग्ज. धीर संपत असतानाच, फोन घेतला गेला..
"हॅलो.. अमित?"
"Yes, Amit here. कौन?"
"अमित, मैं अंकिता, मिसेस विकी, विक्रम इनामदार.."
"ओह! हां भाभीजी. कहिये?"
"सॉरी, मैने इतनी सुबह फोन किया.. पर आपको पता है ना, विकी जर्मनी गया हुआ है.."
"हां हां, कब गया है वो?"
अंकिता निराश झाली! म्हणजे ह्याला काहीच माहित नव्हतं! तरी नेटाने तिने विचारलं,
"अ‍ॅक्च्युअली, मुझे उसके मॅनेजरका नाम और मोबाईल नंबर दे सकते हो आप? कंपनीमें सब इन्फर्मेशन तो रहेगी ना? वो, विकीसे कॉन्टॅक्ट नही हो पा रहा है.. तो उससे पूछना था.."
"ओह अच्छा, अच्छा. नो प्रॉब्लेम भाभीजी. मैं अभी देता हूँ.. एक मिनट, मुझे कनेक्ट करने दीजिये.."
मधलं एक मिनिट अंकिताला असह्य झालं..
"जी, ये लिजिये- मनोहर दास, और ये उसका नंबर..."

आठ चाळीस. अंहं. मॅनेजर लेव्हलच्या माणसाला फोन करण्याची ही वेळ नाही. किमान दहापर्यंत तरी थांबावे लागणार. तिने स्वत:चा लॅपटॉप उघडून काम सुरू केले. दहा वाजल्याबरोब्बर मनोहरला फोन केला. एन्गेज! शिट!! आता मात्र काम करवेना तिच्याच्याने. तिने घड्याळाची पाच मिनिटे तिने मोजून घरातच येरझार्‍या घातल्या. परत तोच नंबर. ह्या वेळी सुदैवाने त्याने फोन घेतला आणि व्यवस्थित उत्तरही दिले. तिने सर्व कहाणी त्याला सांगितली आणि विकीचा पत्ता आणि नंबर मागितला, तो त्याने दिला. मात्र नंतर त्याने जे सांगितलं, ते ऐकून मात्र अंकिता हादरली. "Actually, there seems to be some problem there with Vikram, because he has not been online since yesterday morning. He has not reported any problem to us yet. He is the only guy from our Company here, but we have already started asking around with our client. Even we are puzzled. Just have patience Mrs. Inamdar. Now that I have your contact number, I will get back to you as soon as there is any update. Don't worry, just give us some time."

आता मात्र अंकिताचा धीर सुटला. ती त्याच्या बोलण्याचा अर्थ, त्यातले गर्भित आणि न बोललेले अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करत जागेवरच सुन्न बसून राहिली. इतक्यात सेल खणखणला. अक्षरश: तंद्रीतून बाहेर आल्यासारखी दचकली ती. अत्यंत आशेने नंबर पाहिला, तर महेशचा होता. ऑफिसला वगैरे जाणं शक्यच नव्हतं. कसंबसं तब्येतीचं कारण देऊन तिने फोन बंद केला. फोन ऑफ करता येत नव्हता, विकीचा आला असता ना?
’काय झालं असेल? विकी ठीक असेल ना? त्याचं काही कमी-जास्त...’ भलत्या शक्यतांच्या वाटांवर जाऊन ती परत येत होती. ’कुठे फ़िरायला गेला आणि अपघात झाला असेल का? कोणी लूटमार वगैरे केली असेल? मारहाण? तब्येत ठीक असेल ना? आजारी पडून झोपला असेल का? आई-बाबांना कळवावं का? जर्मनीलाच जावं का उठून? आपण उगाच हायपर होतोय? किती वेळ नुसतीच वाट पहायची? त्याच्या कंपनीत जाऊन प्रत्यक्ष मनोहरलाच भेटावं का?’ नुसतेच प्रश्न फेर धरत होते, पण एकाचंही धड उत्तर अंकिताकडे नव्हतं. हताश झाली ती आणि काहीच सुचल्यामुळे ती विकीच्या कपाटासमोर उभी राहिली. अर्थातच कपाट शिस्तशीर लावलेलं- शर्ट, टीशर्ट, पॅन्ट्स, जीन्स सगळं वेगवेगळ्या ढीगांमध्ये नीट रचलेले. ड्रॉवरमध्ये फाईल्स, त्यावर लेबल्स. ते बघूनच तिला भडभडून आलं. ’हा इतका व्यवस्थित माणूस! कशी ह्याची गाठ आपल्याशीच पडावी ना! आपला सगळाच मनमानी कारभार! मनाला येईल तसे वागावे, वाट्टेल ते बोलावे आणि ह्या बिचार्‍याने प्रेमाने सगळं सांभाळून घ्यावं.’ मनावरच्या असह्य ओझ्याखाली ती हमसून हमसून बांध फुटून रडायला लागली. आत्ता या क्षणी विकीच्या मिठीत शिरावं अशी तीव्र इच्छा झाली तिला, त्याचा स्पर्श तिने अनुभवला. त्या उमाळ्यात मागल्या महिन्याची सर्व जळमटं, मळभं सगळी वाहून गेली.. त्यांच्यात कितीही मतभेद असले, ती कितीही प्रॅक्टिकल असली, हट्टी असली, तरी आपलं विकीवर अतिशय प्रेम आहे हे सत्य आता कुठे उमगताना दिसलं तिला.. एखाद्याशी जीव जडणं म्हणजे काय असतं, एखाद्यावर जीव ओवाळून टाकणं म्हणजे काय असतं, एखाद्याशिवाय जगणं म्हणजे अधूरं कसं असतं, स्वत:ला विसरून दुसर्‍यामध्ये विरघळून जाणं म्हणजे काय असतं.. एखादाच क्षण येतो जो लख्खपणे अनेक जाणीवा जागृत करून जातो.. हा तो क्षण असं अंकिताला वाटलं.. तिला प्रेमाची जाणीव करून देणारा..
आत्तापर्यंत हे असं इतकं तीव्रपणे विकीबद्दल तिला कधी जाणवल्याचं आठवत नव्हतं! विकी छान होता, तिला आवडायचा, तिचा आदर करायचा, कोणतीही गोष्ट तिच्यावर लादायचा नाही.. बस एवढंच. आज हे जे काही जाणवत होतं, ते अद्भुत होतं. ’Love, Commitment' ह्या शब्दांचे अर्थ आज, लग्न होऊन दोन वर्ष होऊन गेल्यावर कळत होते. नकळत विकी आपली गरज झाला आहे, हे आज साक्षात्कारासारखं समजलं होतं!
हे सगळं शब्दबद्ध करून त्याच्या मिठीत पडून त्याला सांगायला मिळेल ना आपल्याला? Is it too late? ती घाबरी झाली. विकी खुशाल असेल ना? इतक्यात सेल खणखणला..
----

"अंकिता...?"
विकीचा आवाज. ओह्ह्ह. विकी.
"विकी..." तिला अनावर रडू यायला लागलं.. "विकी, कसा आहेस तू? बरा आहेस ना तू? कुठे होतास इतक्या वेळ? काय समजायचं मी इथे?" अगतिकपणे तिने विकीला विचारलं..
"मी? मी बराय की. तुला काय झालंय पण? असा काय आवाज येतोय? तुलाच बरं नाहीये का? चॅटवर आली नाहीस ते? डॉक्टरकडे आहेस का? की मीटिंगमध्ये?"
अं? अचानक अंकिताला भान आलं. ती अजूनही घरीच होती, तिच्या, अंहं, त्यांच्या घरात, सोफ्यावर, टीव्हीसमोर. पटकन तिने घड्याळाकडे पाहिलं.. सकाळचे सव्वाअकरा वाजले होते.. ’इतका वेळ झोप लागली? की ग्लानी आली? तापबिप आलाय का? तिने कपाळ चाचपून पाहिलं. छे! नॉर्मल वाटत होतं. मग हे सगळं काय होत? एक दु:स्वप्न?’ एका झटक्यात उठून तिने विकीचं कपाट उघडलं. जर्मनीचे पेपर- हॉटेलचा पत्ता, क्लायन्ट ऑफिसचा पत्ता, ई-टिकेट्स सगळ्याचे प्रिन्टआऊट्स वरच होते. ’म्हणजे विकी काहीही विसरला नव्हता. तो ठीक होता. आजचा दिवस नेहेमीसारखाच होता.’ नाही, नक्कीच नाही. आजचा दिवस काहीतरी नवी जाणीव घेऊन आला होता..

"नाही, मी.. मी ठीक आहे विकी.. Just, missing you a lot.. लवकर ये.." तिने पहिल्यांदाच मनापासून म्हटलं..

17 comments:

Dhananjay said...

Nice!

हेरंब said...

जबरदस्त.. अक्षरशः अंकिता बनून अनुभवली कथा इतकं जिवंत वर्णन !! प्रचंड आवडली !

Rakesh said...

Mast ha...... Swapna vagaire aadi Serial cha touch aalay....pan aavadli mala.

अपर्णा said...

ब्लॉगवर कथा वाचायचा पेशंस नाहीये म्हणून खर तर जास्त कथा वाचल्या नाहीयेत मी पण ही मात्र एकदा सुरु केली आणि कुठेतरी सूर जुळल्यासारखा एका दमात संपवली...मस्त लिहितेस ग तू...

आय टी मध्ये काम करणाऱ्या जोडप्यांनी नक्की वाचायला हवी...

Unknown said...

kharach apratim.............

sachin kaulgekar said...

khup chaan, very natural flow of writing ...

श्रद्धा said...

sundar... I actually felt like being 'Ankita'... very nice.. keep it up!

poonam said...

मन:पूर्वक धन्यवाद धनंजय, हेरंब, राकेश, अपर्णा, मंदार, सचिन आणि श्रद्धा :)

Suhas Diwakar Zele said...

अप्रतिम.... निव्वळ अप्रतिम !!

टोप्या उडवल्या :) :)

Blogman said...

खूपच सुंदर...

Anonymous said...

khupach chan...flow mast ahe kathecha

poonam said...

धन्यवाद सुहास, ब्लॉगमॅन, क्रियेटिव्ह माईंड!
ह्या कथेला खूप चांगले प्रतिसाद मिळाले अनेकांकडून. मी खरंच सगळ्यांची आभारी आहे!

manini said...

mast Poonam...khuup chaan lihites tu.....

Anonymous said...

Simply awesome....!!!!!!

Nisha said...

Apratim katha !!

aruna said...

आजच्या तरुण पीढीचा प्रश्न अगदी कुशल पणे मांडला आहे.
सुन्दर कथा.

क्षितिज देसाई said...

मस्त ! सुंदर कथा आहे. खूप छान !