May 10, 2011

स्वप्न

माझ्या मुलाला सध्या पोहणं शिकायला घातलंय- उन्हाळ्याच्या सुट्टीतले उद्योग. ह्या वर्षी तो एका नवीन तरणतलावात पोहणं शिकायला जातोय. हा तलाव अत्याधुनिक बांधणीचा, ’ऑलिंपिकचे टॅन्क’ असतात त्या लांबी-रूंदीचा वगैरे आहे. एकदम मोठा, स्वच्छ निळं पाणी असलेला आणि मुख्य म्हणजे कमी मुलं असलेला आहे. तलावाकाठी उभं (राहून सूचना करायला) रहायला पालकांना परवानगी नाही. त्यांच्यासाठी वर भली मोठी गॅलरी बांधलेली आहे. तिथे बसून तलावाचा आणि मुलांचा ’पॅनोरॅमिक व्ह्यू’ मिळतो. पोहणं शिकवायला मास्तर आहेत. पोरं वाह्यातपणा करायला लागली की ते असा ’एऽऽऽ’ म्हणून आवाज लावतात, की पहिल्याच दिवशी माझी त्यांच्या क्षमतेबद्दल खात्री पटली! त्या मास्तरांच्या कृपेने मुलगा पंधरा दिवसातच सुटा पोहायला लागला की! काल सरांनी गेल्या गेल्या चक्क त्याचं बखोट पकडलं आणि दिलं पाण्यात भिरकावून. इकडे मी गॅलरीतून खालीच पडायच्या बेतात होते. म्हटलं रडायला लागणार हा आता! पण काय आश्चर्य. तो आधी खाली गेला, मग वर येऊन न घाबरता हात पाय मारायला लागला चक्क. त्याच्या चेहर्‍यावर भीतीचा लवलेशही नाही!! शिकवल्याबरहुकूम हात-पाय मारत होता. दम लागला, की काही सेकंद थांबत होता, मास्तरांची आरोळी आली, की परत सुरू. हे अर्धा तास चालू होतं. दम लागत होता, हात पाय अर्थातच अजून तितक्या सफाईनं चालत नव्हते, पाणी तोंडात जात होतं, पण तरी तो न कंटाळता, न घाबरता पोहत होता हो, तेही सुटा!

मला अचानक टीव्हीत दिसणारे ते सो कॉल्ड रीएलिटी शोज आठवले. विशेषत: लहान मुलांचे शो! मुला/मुलीचं कौतुक केलं की आईवर क्लोजप. ती माता बिचारी रडत असणार. मग तिला बोलतं करणार. ती म्हणणार- ’ह्याला बघून खूप अभिमान वाटतोय, माझं स्वप्न आज ह्याने पूर्ण केलं!’ आपण मान डोलावणार. आणि चॅनलचं टीआरपी वाढवणार. पण काल तलावावर कॅमेर्‍याने कोणी शूट करत असतं ना, तर माझ्यावरचा कॅमेरा त्यांनी हटवला नसता. माझा मुलगा तोडकं मोडकं का होईना पोहतोय हे बघून मी चक्क माझ्याही नकळत घळाघळा रडायला लागले होते!!

मला अजूनही स्वप्न पडतात, की मी पोहतेय मस्तपैकी.. त्या पाण्याशी मैत्री करून, त्याला अंगावर घेत, त्याला दूर लोटत, विहरत, आपल्याच मस्तीत सगळं जग विसरून पाणी कापतेय.. हे माझं अतिशय cherished स्वप्न आहे. अगदी लहानपणापासून. मी लहान असताना माझी तमाम मित्रमंडळी पोहायची. माझे भाऊ पट्टीचे पोहोणारे. मी ह्या सगळ्यांबरोबर उत्साहाने तलावावर जायचे. पण पाण्यात कधीच नाही उतरले. माझ्या पालकांनी माझं नाव शिकाऊ पोहणार्‍यांच्या यादीत कधीच का नाही घातलं आणि मला पोहण्याचं इतकं आकर्षण असूनही मीही कधी त्यांच्यापाशी हट्ट का केला नाही, ह्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आज नाहीत. पोहायला शिकले नाही हे खरं. पण सगळ्यांचं बघून हात कसे मारायचे, पाय कसे मारायचे हे सगळं पाठ. थियरी पर्फ़ेक्ट. तलावात उतरण्याआधी शॉवर कुठे घेतात, कॉस्च्युम कुठे मिळतात, तलावात कुठे किती खोल पाणी आहे- सगळं माहिती. पण बाहेरूनच. मला पोहायचं इतकं आकर्षण होतं की मी घरी गादीवर हात, पाय मारायचे. बाकी मी कोरडीच.

इतरांना पडतात तशी स्वप्न मला नेहेमीच पडतात. परिक्षा आहे आणि मला काही येत नाहीये, कुठेतरी जायचं आहे आणि मी ट्रॅफिक जॅममध्ये अडकले आहे, कोणीतरी माझा पाठलाग करतंय वगैरे. ही स्वप्न त्या त्या वेळेला पडतात आणि नंतर विसरलीही जातात. मात्र मी माशाप्रमाणे सराईतपणे पोहतेय, कादंबर्‍यांमध्ये असतो तसा जलविहार करतेय एकटीच हे मला वारंवार पडणारं स्वप्न आहे. हे स्वप्न मला अतिशय सुखावतं. माझ्या मनात असलेलं, मी भावंडांचं पाहिलेलं सर्व प्रकारचं पोहणं ह्यात करून घेते. जे ते करतात, ते मलाही येतं ह्याचा आनंद स्वप्नातही माझ्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत असतो.

शिकायचं असतं, तर काय अजूनही शिकता येईलच म्हणा. लेडीज बॅच असतात सगळीकडे. त्यांना उत्तम लेडीज कोचही असतात. पण नेमक्या वेळा जमत नाहीत, आता तेवढा आत्मविश्वासही नाही. किंवा मी टाळतेय असंही असू शकेल. कधी कधी असं होतं ना, की सगळं असूनही, एका छोट्या गोष्टीसाठी रुखरुख लागून राहते. जे करायची मजा लहानपणीच होती, ते आज करायला कदाचित तितकी मजा नाही येणार. मला कदाचित नीट शिकताही नाही येणार. काय माहित? माझ्या स्वप्नात माझ्या चेहर्‍यावरून जो आनंद ओसंडून वाहत असतो, त्या ऐवजी कदाचित चेहरा घाबरलेला असेल. सगळंच अज्ञात.

आणि म्हणूनच जेव्हा आज माझा मुलगा पोहतो, त्या जागी मी स्वत:ला पाहते. त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद माझा असतो. खरंतर उन्हाळ्यात प्रत्येक तलाव मुलांनी भरलेला असतो. सगळेच पोहायला शिकतात. आमच्या ऑफिसच्या वेळा सांभाळत आम्हाला त्याला फक्त हा एकच क्लास लावता येतो, हाही एक योगायोगच. त्या हजारो मुलात माझाही एक आहे, हा आनंद, हे समाधान माझ्यासाठी वेगळंच आहे. नो वन्डर, त्याला पोहोताना पाहिलं, की माझीही ’रीएलिटी मम्मी’ होऊन जाते!

आता मी वाट बघतीये, तो कधी अठरा वर्षाचा होईल आणि गिअरची गाडी चालवायला लागेल. :)

9 comments:

Anagha said...

:D आवडली पोस्ट ! खूप छान झालीय ! म्हणजे मी पण केलेत ना हे सगळे उद्योग...लेकीला पोहायला शिकवताना ! म्हणून अधिकच ! :)

Yogini said...

hehehehheheh..
jaam bharee.. :)

Rakesh said...

Mast!!

Mag kay 'Bournvita' chya add la tayar na?

श्रद्धा said...

mast!

Dk said...

I loved this post! :D :D

Nachi, congo!

Pohane mi hi shilklo naahi baba, kaka pattiche pohanaare asunhi :(

शिकायचं असतं, तर काय अजूनही शिकता येईलच म्हणा.>> Yes! nakkich.

Dk said...

shaiiich post aahe :D

Congo Nachi :) :)

pohayala shikaaych raahunch gele! navhe mich shiklo naahi :( baba, kaka pattiche pohnaare asunhi...

शिकायचं असतं, तर काय अजूनही शिकता येईलच म्हणा.>> yes! nakkich

mau said...

मस्त पोस्ट !!!
माणसाने अंतिम श्वासापर्यंत शिकत रहावे..ज्याला खरी खुरी शिकण्याची इच्छा आहे त्याने जास्त विचार करु नये...अजुनही शिकु शकतेस...

Dr. Sayali Kulkarni said...

mast!! avadala :)

भानस said...

सेम पिंच गं! मलाही पोहायला जेमतेमच येतं असं मी म्हणते पण एकदा का पाय जमिनीला टेकत नाही म्हटल्यावर नक्की तरंगेन ची खात्री तरंगत असूनही मला नसते. :D:D

त्यामुळे लेकाला फार फार लवकर पाण्याशी सलगी करायला शिकवलं. इवलासा होता... अगदी कुत्र्याच्या पिलासारखा डोकं वर काढून पोहायचा पठ्ठ्या.:)

पोस्ट एकदम आवडली.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.