June 18, 2010

वय

रवाची गोष्ट- बाजारातल्या चिरपरिचित रस्त्यावरून जात असताना अचानक एक दुचाकी मागून येऊन, स्पीड कमी करत करत पुढे थांबली.. त्यावरच्या मुलीने माझ्याकडे वळून मागे पाहिले आणि विचारलं, "अगंऽऽ तू पूनम ना?"

हे विचारेपर्यंत त्या मुलीने गुंडाळलेला स्कार्फ काढला होता. थोडं निरखून पाहिल्यावर चेहरा ओळखू आला.. थोडीशी ओळख लागली.. "ओळखलंस का?" तिनेच पुढे विचारलं..

"अगं हो.. सुजाता ना?"
"सुप्रिया!"
हां! आता लिंक लागली. कॉलेजमधली ओळखीची मुलगी ही..
"किती वर्षांनी भेटतोय आपण अगं! मी तुला मागूनही ओळखली! जर्रादेखील बदलली नाहियेस हां.."
वा! हे ऐकून तर मूठभर मास चढलं (अं, नको, मास नको, कमी करायचंय ते आता, थोड्याच दिवसात 'तब्येत चांगलीच सुधारल्ये तुझी' हे डायलॉग येणारेत :(), मी हवेत तरंगायला लागले (हां, हे बरं ;))
पण हिलादेखील मी ओळखलं होतंच की, हे सत्य जाणवल्यावर मीही तिला हवेत खेचलं.."अगं तूही कुठे बदलली आहेस?" मग तीदेखील माझ्यासारखंच 'कसचं कसचं' म्हणाली आणि मग आमच्या पुढच्या गप्पा चालू झाल्या.. कुठे असतेस, काय करतेस, मुलं किती, आता आडनाव काय, ती ही आठवते का, ती ही इथेतिथे असते वगैरे वगैरे वगैरे.. थोडीफार देवाणघेवाण करून आम्ही परत आमच्या मार्गांना लागलो..

नंतर विचार करता खरंच गंमत वाटली.. शाळा, कॉलेज संपून तप उलटलं, तरी पुसटशा का होईना तेव्हाच्या मुली आठवतातच- मग त्या आपल्याच बॅचच्या असोत, की पुढच्या-मागच्या बॅचच्या. मग अशावेळी मधली गॅप कधीच अडसर ठरत नाही.. नावं लक्षात असतीलच असं नाही, चेहरे मात्र आठवतातच, आणि थोडा ताण दिला की एरवी अजिबातच विस्मृतीत गेलेली नावंही. कधीतरी असे रस्त्यावर, नाहीतर कुठेतरी मोठ्या ग्रूपमध्ये, पार्टीमध्ये, समारंभात असे उगाचच दोनचार चेहरे ओळखीचे दिसतात, त्यांनाही आपला चेहरा ओळखीचा वाटतो, नाव आठवत नसतं, पण 'एसपी का? कोणती बॅच?' असं म्हटलं की हमखास ट्यूब पेटून चेहरे उजळतातच. मग उगाचच 'तुमच्या बॅचचा हा माहित्ये का', 'ती होती ना' वगैरे सांधे जोडत जोडत ओळख पटते..

असाच एक प्रसंग मला लख्ख आठवतोय, मी सातवीत असेन. शाळेच्या बसने घरी येत होते संध्याकाळी.. अचानक जोराचा पाऊस आला होता.. स्टॉप जवळ येत होता, मी बसच्या दारात उभी होते आणि मला स्टॉपवर आई दिसली- छत्री घेऊन आली होती माझ्यासाठी. मला इतका आनंद झाला.. मी जोरात ओरडले, 'आई आलीये माझी..' बसच्या दारातच फक्त शाळेतल्या टीचर्सना बसायचा बाक होता. त्यावर त्या वर्षी नवीनच जॉईन झालेल्या जोगळेकर टीचर बसल्या होत्या- त्या कायम इंग्रजीत बोलायचा, केसांचा बॉयकट, आधी दिल्लीला होत्या वगैरे- माझी आरोळी ऐकून त्यांनी उत्सुकतेने बाहेर पाहिलं आणि त्यांनाही आई दिसली माझी.. अचानक उत्तेजित स्वरात आणि शुद्ध मराठीत त्यांनी मला विचारलं- 'ही तुझी आई आहे? ती छत्री घेऊन आहे ती?' मी इतकी दचकले..कशीबशी 'हो' म्हणाले.. इतक्यात स्टॉप आलाच.. आई मला घ्यायला थोडी पुढे आली.. मी उतरत असतानाच त्यांनी आईला हात केला.. 'अगं, ओळखलंस का?' त्यांनी तसंच बसमधून डोकावत विचारलं.. आईही एक क्षण ब्लँक आणि पुढच्याच क्षणात तिचाही चेहरा उजळला.. तिनेही त्यांना हात केला.. 'विद्या??' टीचरनी समाधानाने मान हलवली आणि बस हललीसुद्धा!!

त्या टीचरची मोठी बहिण आणि आई पार शाळेतल्या मैत्रिणी!! ती एक ओळख, बास. शाळेनंतर आईचा त्या बहिणीशी काहीही कॉन्टॅक्ट नाही. बापरे! मध्ये किती वर्ष गेली असतील? पंचवीस तर सहज! आईचे कंबरेखालचे केस मानेवर येऊन पांढरे होऊ लागलेले, टीचरचे तर शुभ्र पांढरे आणि तोकडे.. बाह्यांगात इतका बदल, चेहरे बदललेले तरीही लिटरली दोन क्षणांत दोन तपांचं अंतर त्यांनी कसं पार केलं असेल?

मुलांचं मात्र तसं म्हणता येणार नाही हां.. विशेषतः शाळेतल्या, अकरावी-बारावीतल्या मुलांचं! शाळेत अगदी दहावीला असलेलीही मुलं दिसायला अगदीच सामान्य असतात.. ज्युनिअर कॉलेजला असतानाही चाचपडतच असतात, दिसण्याच्या बाबतीत. दिसायला गबाळी, साधारण कपडे घालणारी आणि स्पष्ट सांगायचं तर व्यक्तीमत्त्वच नसलेली मुलं जसजशी शिकतात, वयाने मोठी होतात, तसातसा आत्मविश्वास कमावतात.. त्यांचे चेहरेही निरागसपणा सोडून रापलेले, राठ, दाढीमिशीत लपलेले होतात आणि मुलांचे पुरुष होताना अक्षरशः त्यांच्यात आमूलाग्र बदल होतो. त्यामुळे शाळेनंतर एखादा मुलगा थेट दहा वर्षांनीच दिसला तर त्याला ओळखायला पूर्ण एक मिनिट लागेल, किंवा worse case तो अजिबातच ओळखताही येणार नाही!

बऽऽऽर.. बेनेफिट ऑफ डाऊट देऊया.. कदाचित दहा वर्षानंतर भेटला तर येईलही ओळखता.. पण वीस वर्षानंतर? थोडक्यात त्याच्या पस्तिशीत तो भेटला तर??? मग मात्र नो चान्स! गॅरन्टीड!! कारण अपवाद सोडता, तोवर टिपिकल मध्यमवयीन पुरुष झालेला असतो तो- पोट सुटलेलं, एकंदरच (शरीर)यष्टीचा चेंडू होऊ लागलेला, केस मागे सरकलेले, चष्मा, दुनियाभराचा अनुभव घेऊन चेहरा रूक्ष झालेला वगैरे वगैरे.. असा हा मध्यमवयीन अनोळखी पुरुष अचानक शाळेतल्या १५ वर्षाच्या मुलाचं रूप घेऊन डोळ्यापुढे येणं शक्य तरी आहे का? त्यामुळेच ऑफिसमध्ये नवीन जॉईन झाल्यानंतर एकाने अकरावीतली दिलेली ओळख मला अजूनही स्पष्ट झालेली नाहीये.. मी त्याच्याकडे उगाचच 'डाऊट'नेच बघत असते- 'खरंच 'हा' 'तो' आहे?' :)

गळ्यात मंगळसूत्र पडलं की 'मुली'ची 'काकू' होते- काहीच न करता! पण 'मुला'चा काका/ मामा होणं ही मात्र एक अख्खी प्रोसेस असते :)) त्यामुळेच जुना मित्र भेटला की बराच वेळ त्याची ओळख पटवण्यात जातो.. मग काही वेळ त्याच्या लहानपणीच्या विविध लीला आठवण्यात जातो, मग त्या गबाळ्या मुलाच्या ट्रान्स्फॉर्मेशनचं अवलोकन करण्यात काही वेळ जातो आणि तोवर निरोप घ्यायची वेळ येते!!

पण काही म्हणा, हा सगळा प्रकारच फार मजेशीर आहे.. आपल्यातला प्रत्येक जण आपल्या भूतकाळाशी घट्ट जोडलेला असतो. त्याची एरवी जाणीव होत नाही, पण जुने चेहरे नवीन होऊन समोर आले की अशा वेळी ती पानं कुठेतरी सळसळतातच. आणि त्याच भूतकाळात कोणाचातरी हात धरून जायलाही मस्त वाटतं.. चाकोरीत फिरणारं रूटीन काही मिनिटं त्या नॉस्टॅलजिया लेनमध्ये चक्कर मारून येतं आणि काहीच विशेष घडलेलं नसतानाही फ्रेश होऊन जातं एकदम.. अशावेळी वाढलेली वजनं, बदलेलेले चेहरे, आधी नसलेले पण आता चढलेले चष्मे, एखादी जुनी कुरबूर, त्यावेळी फारशी नसलेली मैत्री काही काही मध्ये येत नाही.. जगलेला एक समान काळ हाच धागा पुरेसा घट्ट असतो.. आजच्या संदर्भात बदललेली असते ती फक्त तारीख, माणूस मात्र तोच असतो..

त्यामुळे, मला खात्री आहे, मी कितीही जाड झाले, माझे केस पांढरे झाले, मला कंबरेमधून बाक जरी आला, तरी अशाच एका वळणावर एखादी मैत्रिण मला बघून थबकेलच आणि म्हणेल, "अगंऽऽ तू पूनम ना? जर्रादेखील बदललेली नाहीयेस.."

आणि मीही म्हणेन, "अगं, तू तरी कुठे बदलली आहेस?"

15 comments:

Anonymous said...

Hallo, Aga tu Punam na....? olakhlech nahi. kiti badalli ahes.
aani mala visarlis ki kay..?

Unknown said...

खुप भारी, मी माझ्या एका मैत्रिणीला भेटलो होतो जवळपास १२ वर्षांनी आणि (४ थी नंतर direct TY ला) आणि तीचा चेहरा तसाच होता, मुलींचा चेहरा बदलत नाही हे मात्र खरे, मुल खुप बदलतात. सही झालाय लेख...

Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...
This comment has been removed by the author.
Harshad said...

Sahi.. Aavadla! Yashti cha Chendu. Mast!

aativas said...

ओळ्ख विसरत नाही सहसा अस म्हणताना आपल्याला नक्की काय आठवत असा मला नेहमी प्रश्न पडतो.. मला तर अजिबात असे जुने लोक ओळखता येत नाहीत. आणि एकदा ओळ्ख पटली तरी आपल्याला वेगळ्याच गोष्टी आठवतात एकमेकांच्या हे ध्यानात येतं...

गजानन said...

मस्त लिहीलय...

Anonymous said...

khoop mast.

Dk said...

Hmmmm so true :)

प्राची said...

कितीही जाड झाली, केस पांढरे झाले , कंबरेतून वाकलीस तरीही आव्वाज्जssss तस्साच असेल ना.. मग कुठेही ओळखेन तुला मी :डोमा:

तृप्ती said...

किती गोड लिहिलस पूनम. खूप आवडलं :) (मुशो...मुशो :))

ratraani said...

masta!!

Anonymous said...

Chhaan liile aahes. Nehemi sarakhech halake-phulake aani khare-khure :)
Aaj khoop divasanni aale tujhya blogvar :)
-Ashwini

Jaswandi said...

तुला मावसभाषेतल्या कवितांचा खो दिलाय