February 5, 2010

मुक्ती!

दोन दिवसांपूर्वी आईचा सकाळी सकाळी फोन आला-"आजीला कालपासून खूपच बरं नाहीये, असंबद्ध बोलणं चालू झालंय आणि तुझं नाव घेत आहे, तर भेटून जा.." अर्थातच धावतपळत मी गेले.. आजीला बघताच एक क्षण विश्वासच बसला नाही.. तिला मी हाक मारली, तर डोळे पूर्ण ब्लँक! मग पाच क्षण विचार करून तिने मला हाक मारली आणि जवळ घेतलं.. (म्हणजे स्मृती ठीक होती, त्यातही मला दिलासा मिळाला..) मला घट्ट पकडलं होतं तिने आणि म्हणाली, "मी बरी होणारे!"

मी खरोखर थक्क झाले!

आज माझी आजी नव्वद वर्षाची आहे. वाचनाचा प्रचंड नाद.. अजूनही तिच्या दोन लायब्रर्‍या आहेत! परवा परवापर्यंत रोजचं वर्तमानपत्र वाचत होती.. पण अचानक काहीच त्रास होत नसताना हे असं व्हायला लागलं- डॉक्टरचं म्हणणं की तिला काहीही होत नाहीये, फक्त वयोमानानुसार मेन्दूचा रक्तपुरवठा कमी झालाय, त्यामुळे हे असंबद्ध बोलणं- काय काय नाही बोलत ती? पार लहानपणापासूनच्या आठवणी, ती माणसं, त्यावेळेच्या जागा, ठिकाणं कधीकधी नुसतीच आवाज काढते- तिला भानही नसतं की आपण काही बोलतोय याचं.. फार चुटपुटल्यासारखं झालं मला तिची अवस्था पाहून..

माझी आजी म्हणजे एक अजब व्यक्तीमत्त्व! ’आजी’ साधारणपणे खूप मायाळू वगैरे असते असं मी दुर्दैवाने फक्त ऐकून आहे.. म्हणजे आजीने आम्हा नातवंडांवर प्रेम केलं, पण ती कायम एक अंतर ठेवूनच राहिली.. झोकून देऊन प्रेम, स्वत:ला विसरून, नि:स्वार्थ प्रेम असं करायचा स्वभावच नाही तिचा.. कायमच स्वत:चा आब राखून, स्वत:ची ’पोझिशन मेन्टेन’ करून होती ती..

तिचा जन्म, बालपण आणि तारूण्य ब्रिटिशकालीन. त्या काळात तिचे वडील सरकारी अधिकारी होते.. मोठ्या बंगल्यात रहायचे- तिला अजून पाच बहिणी आणि दोन भाऊ. ह्या सर्व बहिणींची लग्न सुस्थळी झाली. पण माझी आजी सर्वात नशीबवान. माझे आजोबा अतिशय देखणे, गोरेपान, राजबिंडे. पेशाने संस्कृतचे शिक्षक, त्यामुळे खूप मान होता त्यांना, आणि त्यामुळे आजीलाही. आजोबांच्या नोकरीमुळे ते पुण्यात रहात, आणि सासर सातारा. ती कधीच सासरी राहिली नाही.. त्यामुळे त्या काळी रूढ असलेला सासुरवास कधीच नाही झाला.. अर्थात असं ऐकून आहे की तिची सासू, म्हणजे माझ्या वडीलांची आजी अगदी गरीब स्वभावाची होती. त्यामुळे एकत्र रहात असते, तरी सासुरवास नसता केला त्यांनी.. एनीवे, सो त्या बाबतीत लकी. कायम स्वातंत्र्य- घराची सर्व सूत्र हिच्याकडे. आजोबांच्या प्रोत्साहनामुळे पुढे शिकलीही. आजोबांनी तिच्या सर्व हौशी पुरवल्या. ह्याच काळात तिच्या बहिणींचेही संसार सुरू होते. जवळजवळ प्रत्येक बहिणीच्या वाट्याला काही ना काही सांसारिक आपत्ति, अडचणी आल्या.. पण सुदैवाने आजीला कसलीच झळ पोचली नाही- या सर्वामुळे एक प्रकारचा ताठा तिच्यात आला- बहिणींपेक्षा मी वयाने नाही, तर मानाने, सुखानेही श्रेष्ठ आहे- असा.. त्याचवेळी इकडे सासरीही तीन जावांमध्ये हिचंच सर्वात बरं चाललेलं होतं, त्यामुळे त्या श्रेष्ठत्त्वावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं झालं.. आणि हाच आब तिने आयुष्यभर राखला.. त्याकाळीही आजीने पोळ्यासाठी बाई ठेवली होती ह्याचं मला आत्ताही कौतुक वाटतं! मला आठवतंय की मी खूप लहान असताना, माझे आई-वडील, मी आणि माझी बहिण वडीलांच्या नवीन नोकरीमुळे कायमचे पुण्यात आलो रहायला आजी-आजोबांबरोबर. वाड्यातलं ते छोटं घर, तीन खोल्यांचं. माणसं सहा. अडचणच व्हायची. त्यातही माझ्या आजीचं स्वत:च वेगळं असं एकटीचं गोदरेजचं कपाट होतं- आजही आहे ते. आजतागायत मला त्यात काय, कुठे आहे माहित नाहीये! मला आणि बहिणीला एक एक कप्पा कपड्यांसाठी आणि दोघीत मिळून एकच अभ्यासाचं टेबल आणि त्याच्या आजूबाजूचे खण होते पुस्तकांसाठी.. नंतर अभ्यास वाढल्यानंतर ती तेवढी जागा पुरायची नाही पुस्तकांना. एकदा तर मी चक्क भांडणही केलं होतं आजीच्या कपाटातल्या एका कप्प्यासाठी.. पण नव्हता मिळाला तो मला, इतकी आजीला आपली प्रायव्हसी प्रिय!

तिला आम्ही चार नातवंडं- आम्ही दोघी बहिणी आणि माझे दोन आत्तेभाऊ. आमचे रूढ लाड तिने केले.. म्हणजे वाढदिवसाला पैसे/ खेळणी, आम्हाला गोष्टी सांगितल्या, पत्त्याचे डाव शिकवले, जुन्यापान्या आठवणी सांगितल्या.. माझी आई नोकरी करत असताना मला जेवायला वाढलं, आई-वडील गावाला गेल्यावर आम्हाला सांभाळलं- सगळं केलं. पण ह्यापेक्षा जास्त पण असतं ना एक काहीतरी? नातवंडांचा जिव्हाळा? त्यासाठी आम्ही क्वालिफाय नाही झालो कधी. असो.

मी सर्वात लहान असल्याने मी तिच्या सर्वाधिक संपर्कात आले. आणि हळूहळू समज वाढली तसं हे सगळं लक्षात यायला लागलं. आणि सर्वात खटकली ती तिची माझ्या आईशी असलेली वागणूक! सतत कुरबूर चालू आहे, अगदी अजूनही. तिला नक्की काय पसंत पडलं नाही आईमधलं हे मला अजूनही नाही कळलेलं- पण ते बहुधा ’कोणाची सत्ता’वरून असावं. कारण तिने स्वयंपाक करण्यातून कधीचीच निवृत्ती घेतली असली, तरी स्वयंपाकघरातून कधीच ती बाहेर आली नाही. अगदी आत्ताही तिला स्वयंपाकघरात कोणत्या डब्यात काय आहे, नवीन काय केलंय, काय संपलंय हे सगळं ठाऊक आहे. त्यामुळे आईवर सतत लक्ष. ती काय करत आहे, यावर, कुठे जात आहे यावर, कोणाशी काय बोलतेय, यावर, तिने काय आणलंय यावरही. बर जेवणावळी, केळवणं, डोहाळजेवणं सगळी आईच्या जीवावर! पण तिने काय करायचं हे तीच ठरवणार. त्यात बदल नाही. आत्तापर्यंतच्या आईच्या एकाही पदार्थाला तिने नावाजलेले मी ऐकले नाही. उलट अजूनही आमटीत चिंच घालायची की आमसूल अशा फुटकळ गोष्टींवरही घरी वाद झालेले आहेत!! त्यातही मऊ लागलं की कोपरानेही खणतात त्यातली गत- आई ऐकत गेली आणि ही गाजवत गेली.. हे सगळं मला कळत होतं आणि त्यामुळे आजीच्या कर्तृत्त्वाचा अभिमान वाटण्याऐवजी, तिच्या पुस्तकवाचनाचं कौतुक वाटण्याऐवजी, तिच्या टीपिकल सासूपणाबद्दल एक अढीच बसली मनात. आईने तिचं सगळं ऐकलं, ती म्हणेल तेते करत गेली, सतत रीपोर्ट केलं, तिच्या मनासारखं व्हावं याची शक्य तितकी काळजी घेतली तरी एकदाही आजीचं समाधान कसं काय झालं नाही याचं नवल वाटतं आणि रागही येतो.. मी आईला तर कित्ती वेळा म्हटलं असेल, की का इतकं करत्येस? तर ’भोग आपले’ म्हणून तिने कायमच विषय मिटवला..

आज आजी इतकी थकली.. मध्ये पाय अधू झाला, कंबरेचं एक मोठं ऑपरेशन झालं- धावाधाव करायला कोण होतं? आईच ना? माझे वडील पहिल्यापासूनच यातून अलिप्त- कदाचित सासू-सूनेच्या भानगडीत पडायला नको म्हणूनही असेल.. त्यामुळे आजीच्या तोंडी सतत आईचंच नाव! प्रचंड अटेन्शनसीकर आहे ती आणि तिला आईच लागते सर्व लाड पुरवायला.. आईही थकली आता, तिचंही वय झालंय. आणि दुर्दैवाने तिला नाहीये कोणी सून अशी पळापळ करायला.. तिचा विचार कोण करेल? आजीने धड असतानाही तिने कधी नाही केला.. आता काय करेल?

इतकं संपन्न आणि प्रदीर्घ आयुष्य जगलीये माझी आजी.. आणि अगदी एक वर्षापर्यंत अत्यंत आरोग्यपूर्णही.. तिची एकही इच्छा अशी नाही जी अपूर्ण राहिली. तिच्या मुलांचं, नातवंडांचं, पतवंडांचं देवकृपेने उत्तम चालू आहे. आईरूपाने सेवेत खंड नाही. पैशाचंही पाठबळ लाभलं. चिकार वाचलं, बघितलं, भ्रमण केलं. त्यामुळेच अजूनही, ’मी बरी होणारे’ हे मी ऐकलं आणि खरंच थक्क झाले!

कसली ही जीवनेच्छा? आता अजून काय राहिलं असेल अपूर्ण ज्यामुळे संभ्रमावस्थेतही ’मला जगायचंय’ची इच्छा अजूनही कायम आहे? संपूर्ण सुखी, तृप्त आयुष्य जगून झाल्यानंतरदेखील कोणता तो चिवट दोर आहे ज्यापासून नाही मिळत याही वयात मुक्ती? जीवाचे हाल सोसत, वेळाकाळाचं भान नाही, अंगावरच्या कपड्याचं भान नाही, जेवलोय की नाही हेही जिथे लक्षात नाही, पूर्ण परावलंबित्व असताना कोणती अशी आशा आहे जी मृत्यू स्वीकारण्यापासून रोखतेय? अर्थातच तिच्या वाट्याला जितकं आयुष्य आहे तितकं ती जगेलच, पण विधात्याची, विधीलिखिताची गंमत वाटते.. एक पूर्ण जीवन जगलेला आत्माही तर पंचतत्त्वात विलीन होण्यासाठी उत्सुक नसेल, तर आत्म्याच्या मुक्तीसाठी खरंच कोण देवाला मनापासून आळवत असेल?

12 comments:

नीरजा पटवर्धन said...

पूनम,
शब्दच नाहीत. अतिशय प्रांजळ आणि सहज. शेवटचा प्रश्न.. अगदी अगदी...

अनामिक said...

पूनम, तुमचा लेख वाचला आणि शब्दागणिक माझ्याच घरातली सद्य परिस्थिती आहे कि काय असं वाटून गेलं. माझी आजी आज ९५ वर्षांची आहे, कित्येक वर्ष आईला तिची सेवा करताना बघतोय. पण केल्याच कौतुक सोडा जेवढं केलं त्यातही कमतरताच दिसते तिला. ४ महिन्यापुरवी घरीच पाय घसरून पडली, ऑपरेशन झालं.... आता बेडवर आहे सगळं. कामवाल्या बायका काही धड करत नाही म्हणून आईच करते सगळं(पॉटी साफ करण्यापासून). कधी कधी वाटतं कधी संपनार हे... तिने जरी कधी मुक्ती मागीतली नाही तरी तिला लवकर मुक्ती मिळावी असं मनापासून वाटतं.

-अनामिक

Naniwadekar said...

> आईने तिचं सगळं ऐकलं, ती म्हणेल तेते करत गेली ...
> तरी एकदाही आजीचं समाधान कसं काय झालं नाही
> मी आईला तर कित्ती वेळा म्हटलं असेल, की का इतकं करत्येस?
>
तुम्ही कधी आजीला तिच्या अधिकार गाज़वण्याबद्‌दल विचारलं होतं का?

लेख छान आहे. 'प्रेमळ आजी' आणि 'आदर्श बाप' या विषयांवर वाचून कंटाळा आला आहे. माझ्या एका (दूरच्या) मित्रानी त्याच्या व्यसनी वडिलांना पलंग घेऊन दिला, तर यांनी तो एका दुपारी विकला आणि ते पैसे दारूत घालवले. मुलगा हवालदिल. असे पराक्रमी बाप ब्लॉगविश्वात दिसतच नाहीत. चारचौघांना सांगावी अशी ही गोष्ट नाही, हा भागही आहेच. एव्हाना ते काका वर पोचले असावेत, हीच काय ती समाधानाची गोष्ट. त्यांनी घरच्यांना सळो की पळो करून सोडलं होतं.

Abhi said...

अगदी मनापासून लिहिलंयस.. शेवट तर केवळ.. पण तरी काही गोष्टी पटल्या काही नाही.. :)

sayonara said...

avadla poonam
kharach kay rahila asel ata mage?

Bhagyashree said...

oh god.. same my mom's and ajji's story !! inclding last para...

chhan lihles..

Anonymous said...

khoop chaan lekh...manatala lihilat..ase anek aaji , ajoba me sadhya baghate aahe...

Anonymous said...

पूनम,काय प्रतिक्रिया द्यावी ? अगदी खरं आहे तुझं. ह्या विषयावर लिहायचं माझ्या अगदी कालच मनात आलं होतं. लिहू का ?
-अश्विनी गोरे.

poonam said...

सर्वांचे मनापासून आभार! मी जे आहे, जसं आहे त्यात शब्दाचीही अतिशयोक्ती न करता लिहिलं. अनेकांना हे धक्कादायक वाटलं, उद्धटही. पण हा माझा अनुभव आहे, अगदी खरा.

माझं माझ्या आजीवर प्रेम आहे, तिने जगलेल्या आयुष्याचा मला हेवा वाटतो, खरंच. हे असं जीवन आपल्या धकाधकीच्या रूटीनमध्ये आता आपल्या वाट्याला येईल का, शंकाच आहे. तरीही त्या क्षणाला मनाला इतका तीव्र धक्का बसला की आवेगाने हे लिहून काढलं. मला समजून घेणार्‍या सर्वांचे परत एकदा मनापासून आभार!

Anonymous said...

पूनम , आमच्याकडचे चित्र सुद्धा असेच . माझी आजी खरं तर अतिशय गरिबीतून वर आलेली , आजोबांकडून सुद्धा पैशांचा फारसा सपोर्ट नसल्याने पापड , लोणची इ. करून विकून त्यात मुलांची शिक्षणे केली तिने . त्याचा फार अभिमान होता तिला . पण माझ्या आईशी वागणे असेच , तू लिहिलेस तसे . तिला नंतर डोळ्यांनी दिसत नसे पण आईने तिला द्यायच्या चहा , नाश्ता , जेवण ह्याच्या वेळा ठरलेल्या होत्या , जरा लेट झाला तरी प्रश्नांची सरबत्ती सुरु होत असे . :)
हे सगळे अचानक आठवले आज .
संपदा

Raina said...

प्रांजळ आणि प्रामाणिक आणि अबाधित सत्य ते हेच.

Anonymous said...

Hey Poonam,
Aajach tuza blog wachnyat ala...
faar apratim lihila ahes ga.. Agadi khar tech..
Khoop mothi comment dyayachiye, pan dnt hav words...