October 20, 2009

वैशाली सामंतबरोबर साधलेला संवाद

नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर ’मायबोली’(www.maayboli.com)चा दहावा दिवाळी अंक प्रकाशित झाला. विविध प्रकारच्या साहित्याने नटलेल्या ह्या अंकात मला या वर्षी ’वैशाली सामंत’ची मुलाखत घ्यायची सोनेरी संधी मिळाली. ही मुलाखत इथे देत आहे. उर्वरित वाचनीय अंक जरूर ’मायबोली’वर येऊन वाचा..
------------------------------------------------

'वैशाली सामंत' - मराठी चित्रपटांच्या पार्श्वगायनामधलं आजचं आघाडीचं नाव, आजची 'स्टार'! तिचं नुसतं नाव जरी घेतलं, तरी एका पाठोपाठ एक कितीतरी लोकप्रिय गाणी आठवतात, 'सारेगमप लिटिल चँप्स'मधलं तिचं आश्वासक रूप आठवतं, एक कलाकार म्हणून चांगल्या गाण्याची असलेली आस जाणवते. तिची मुलाखत घ्यायची इच्छा होती, पण तिचा असलेला अतिशय व्यग्र दिनक्रम, ध्वनिमुद्रणं, गाण्याचे कार्यक्रम.. अर्धा तासही रिकामा सापडणं अवघड होत होतं. तरीही फोनवर दिलगिरी व्यक्त करत, पुढच्या तारखा देत देत, एके दिवशी थोडा वेळ मिळाला.



वैशालीला पाहिल्या पाहिल्या जाणवतं, ते तिचं अत्यंत साधं व्यक्तिमत्त्व.. ना वृथा मेकअप् ना भडक कपडे.. अगदी 'गर्ल नेक्स्ट डोअर'! "मला 'अगं'च म्हण," असं भेटल्याभेटल्या सांगितलं तिने मला. मुलाखत इतकी पुढे-पुढे गेली, याची माफीही मागितली. इतका मोकळेपणा पाहून मीच सेकंदभर अवघडले. अत्यंत गोड आवाज, साधी राहणी, आल्याआल्या चहा-कॉफी विचारत, एकीकडे मोबाइलवर महत्त्वाचे फोन घेत तिने सर्व प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरं दिली. अत्यंत मोकळ्या वातावरणात झालेला हा संवाद:

आज 'वैशाली सामंत' हे नाव घराघरांत पोचलं आहे. अवधूत गुप्ते यांच्याबरोबर केलेल्या 'ऐका दाजीबा..'ने या प्रवासाची सुरुवात झाली. या काळाच्या आधीची वैशाली सामंत कुठे होती, काय करत होती?
वैशाली: आधीची वैशाली सतत नवीन कामाच्या शोधात होती. फार आधीपासून मी ठरवलं होतं, की आपल्याला आपलं, स्वतःचं गाणं करायचंय, वाढवायचंय. त्यामुळे मी सतत नवीन संधीच्या शोधात होते. एक गोष्ट निर्विवादच आहे, की जुन्या लोकांनी - गायक, संगीतकार - या सर्वांनी अजरामर काम करून ठेवलंय. एकेक नाव जरी घेतलं, तरी नतमस्तक व्हायला होतं त्यांच्यासमोर. पण त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवूनदेखील मला सतत असं वाटायचं, की हे थोर लोक आपापलं काम करून गेलेत. त्यांना आपण त्यांच्या कामांमुळे ओळखतो. असंच आपलंही नाव व्हायला हवं. हं, अगदी सुरुवातीच्या काळात मीही मान्यवरांची गाणी गायली, तशी त्याकाळची गायकी आत्मसात करून घेत गायली. ते गाताना मला मजाही वाटली, पण त्याचबरोबर हे सतत ठाऊक होतं, की इथेच आपल्याला थांबायचं नाहीये. मी माझ्या स्वतःच्या कामाच्या चाचपणीत होते. त्यासाठी नवीन लोकांच्या शोधात, नवीन कामाच्या शोधात होते.

आणि 'ऐका दाजीबा'ने मराठी पॉप संगीत जन्माला आलं..
वैशाली: 'ऐका दाजीबा' इतकं प्रचंड हिट होईल, याची आम्हांला कोणालाच इतकी कल्पना नव्हती. ते प्रोजेक्ट खूप इंटरेस्टिंग, एक्सायटिंग होतं. काम करताना तर धमाल येत होती. सर्व टीम नवीन, तरूण होती. पण शेवटी लोकांना ते पसंत पडेल की नाही, ही धाकधूक होतीच. गाण्याची सीडी आली आणि त्यावेळेच्या ट्रेंडप्रमाणे त्यावर व्हिडिओही करायचे ठरले. खरी कमाल त्या व्हिडिओमुळे झाली. तो लोकांपर्यंत एका झटक्यात पोचला. त्या रीमिक्समधला ठेका, रिदम आणि चित्रीकरण एकमेकांशी पर्फेक्ट जुळलं आणि 'ऐका दाजीबा' हिट झाला.

सहसा गाणी गाताना असं जाणवलं आहे का, की उडत्या चालींची गाणी, अशी गाणी ज्यांचे शब्द काहीही असले, तरी त्यांच्या चालींत ठेका आहे, अशी गाणी हमखास चालतात? उदाहरणार्थ - 'कोंबडी पळाली..' हे गाणं..
वैशाली: नाही, असं जनरलायजेशन नाही करू शकणार आपण. 'कोंबडी पळाली..'चंच उदाहरण घेऊन सांगता येईल - वरवर पाहिलं, तर त्या शब्दांना काहीच अर्थ नाही असं वाटतं, पण त्यातल्या प्रत्येक शब्दात एक रिदम आहे. ठराविक शब्दांनंतर आपोआप एक लय येत जाते. शिवाय, चित्रपटात ते गाणं अगदी व्यवस्थित येत होतं - त्या चित्रपटातला हीरो कोंबड्या पाळत असतो, त्याला नीट बोलता येत नसतं, म्हणून तो कोंबड्यांचा आवाज काढत असतो - हे सगळं त्या गाण्यामधून येत होतं. नुसतेच एकामागून एक शब्द नव्हते ते. उलट त्या शब्दांमुळे गाणं आपोआप तयार होत गेलं. ते सगळं इतकं सोपं होत गेलं आणि म्हणूनच लोकांपर्यंतही अगदी सहज पोचलं. त्या गाण्यात त्याचे शब्द आणि गाण्याची चाल यांचं मोठं योगदान होतं.

पण म्हणून सगळीच अशी गाणी हिट होतील का? तर अर्थातच नाही. प्रत्येक गाणं स्वतःचं नशीब घेऊन जन्माला येतं. त्या कवीलादेखील हे माहीत नसतं, की ह्या गाण्याचं पुढे काय होणार आहे. तो चार शब्द लिहून जातो, संगीतकार त्याला एक चाल लावून जातो, पण शेवटी त्या गाण्याचं नशीबच त्याला तारून किंवा मारून जातं. असा हिट गाण्यांचा ठराविक फॉर्म्यूला असता, तर सगळं सोपंच झालं असतं ना? 'कोंबडी..' सारखंच तंतोतंत गाणं उद्या कोणी केलं, तर ते तितकंच चालेल असं नाही. आज इतक्या वर्षांनंतरही शांताबाई शेळके, सुरेश भट यांची गाणी, गझला आमच्याकडे पहिल्यांदा गाण्यासाठी येतात - त्या कविता त्यांनी कितीतरी आधी लिहून ठेवल्या आहेत, पण त्यांचं 'गाणं' आज होतंय. हे त्या गाण्याचं लक! आणि अशीसुद्धा कितीतरी गाणी आहेत, जी अप्रतिम आहेत - चाल, शब्द एकसे एक. तरी पण ती चालत नाहीत, लोकांना आवडत नाहीत. त्यामुळे आधी म्हटलं तसं, अमुक एक गाणं हिट होईल का, चालेल का, हे त्या गाण्याचं नशीबच ठरवतं. आपण फक्त त्यातलं आपलं काम मनापासून करायचं!

श्रोता 'तयार' करता येतो का? 'पब्लिकला हे आवडतं' असं म्हटलं जातं; त्या पब्लिकच्या आवडीत बदल करता येऊ शकतो का?
वैशाली: श्रोते तयारच असतात, त्यांना 'तयार' करायला लागत नाही. आपण काही वेगळं करून श्रोत्यांचा कल आजमावू शकतो. जे जे उत्तम, ते ते स्वीकारायला श्रोते कायमच तयार असतात. आत्ता कदाचित एका गीतप्रकाराला श्रोते नसतील, पण उत्तम प्रकारे ते गीत, तो प्रकार लोकांपुढे आणला, तर त्याला नक्कीच श्रोता, रसिक मिळतो हा अनुभव आहे. आत्ता आपण सहज म्हणून जातो, की 'हे पब्लिकला आवडणार नाही', पण योग्य वेळी ते लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोचवलं, तर लोक ते स्वीकारतील देखील! का नाही? 'तयार'च कोणाला करायचं असेल, तर ते आर्टिस्टला तयार करावं लागतं - श्रोत्यांना जे आवडतं ते त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी.

'सारेगमप लिटिल चँप्स'चा अनुभव कसा होता?
वैशाली: खूपच छान. इतकं टॅलेंट आपल्याकडे आहे, हे पाहूनच थक्क व्हायला होतं. सगळीच मुलं गात तर अप्रतिम होतीच; पण इतकी निरागस होती, की कार्यक्रम आपोआपच रंगत गेला. मी आणि अवधूत खूप लहानपणापासून गात आहोत. हे स्टेज, तिथे गाणं, स्टुडियो, लाइट्स याचं नाही म्हटलं, तरी एक दडपण येतं. आम्ही त्यातून गेलो, तेव्हा आम्हांला समजावणारं कोणी नव्हतं, आम्ही आपापलेच शिकलो. पण त्या वेळी आपली अवस्था कशी झाली होती, ते तर आताही आठवतंय! त्यामुळेच ह्या मुलांना शक्य तितकं मोकळं करायचं, त्यांचं गाणं मुक्त करायचं यासाठी आम्ही मुद्दाम प्रयत्न केले. सतत त्यांना धीर देत, समजावत होतो, चक्क मैत्री झाली त्यांच्याशी. आणि ही मुलंही सगळी स्मार्ट होती. मला गंमत वाटते, आम्ही लहान असताना गात होतो, तेव्हा परीक्षकांशी मोकळेपणाने आपण बोलू शकू, ही कल्पनाही मनाला शिवत नव्हती! आणि आता ही मुलं बिनधास्त जवळ येतात, शंका विचारतात, गप्पा मारतात.. मस्त वाटतं बघायला.

एकंदर 'सारेगमप लिटिल चँप्स' हे पर्वच सर्वाधिक गाजलं..
वैशाली: हो, याचं कारण, या मुलांत असलेली गुणवत्ता! शिवाय इनोसन्स. आणि आम्ही मुलांशी मोकळेपणाने वागलो, तरी मार्गदर्शनात कसूर केली नाही. उगाच ड्रामेबाजी, रडारड ही आपल्या मराठी 'सारेगमप'त कधीच होत नाही, कारण आपला भर गुणवत्तेवर असतो. हे सगळं ऑडियन्सपर्यंत पोचतं माहित्ये का.. त्यामुळे तशा प्रतिक्रियाही येतात. लोकांना आवडतंय, पटतंय, आपण योग्य मार्गावर आहोत हे समजलं, की प्रोत्साहन, शाबासकी मिळाल्यासारखी वाटते. 'सारेगमप'च्या निमित्ताने मला अक्षरशः हजारो पत्रं आली. कित्येक आजी-आजोबांनी पत्राने, फोनवर, मी लाईव्ह प्रोग्राम करते तिथे रांगेत उभं राहून वगैरे आवर्जून कळवलं, की 'छान समजावता हं मुलांना', 'ते आम्हांला आमच्या घरातलेच वाटतात' वगैरे.. हे पाहून तर मला भरूनच यायचं. बस, यापेक्षा चांगल्या कामाची अजून काय पावती मिळणार?

तू अनेक लाईव्ह कार्यक्रम करतेस, तो अनुभव कसा असतो?
वैशाली: आपल्याकडचे लाईव्ह कार्यक्रम खरोखर 'लाईव्ह' असतात.. दोन्ही अर्थी - पब्लिकची, श्रोत्यांची प्रचंड इन्व्हॉलव्हमेंट असते कार्यक्रमांत, गाण्यांत. शिवाय आपल्याकडे सर्व गायक ९९% वेळा लाईव्ह शोला लाईव्हच गातात. 'लिप-सिंक' अगदी अपवादात्मक - म्हणजे अगदीच वेगवेगळ्या मेलडी वापरल्या असतील, खूप वरच्या पट्टीतलं गाणं असेल तर. पण तेव्हाही शक्यतो स्वतःच गायचा प्रयत्न असतो. सर्व गाणी लिप-सिंक केली आहेत, असं होत नाही. आणि खरंच, आपला प्रेक्षक इतका चाणाक्ष आहे, की असलं काही केलं तर तो खपवूनही घेत नाही. एक किस्सा सांगते, आम्ही एका ईशान्येकडील राज्यात कार्यक्रम करत होतो - हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होता एका कॉलेजमध्ये. आमच्यासोबत होता एक पंजाबी गायक.. तो स्टेजवर गेला आणि रेकॉर्डवर गायला-नाचायला लागला की! बापरे! काय दंगा केलाय मुलांनी! चपलाच पडायच्या राहिल्या होत्या स्टेजवर! त्यांचं म्हणणं, 'गायला आला आहात, तर गा'. मग शेवटी 'शान' स्टेजवर आलापी घेत गेला. मुलांना कळलं, की तो स्वतः गातोय, तेव्हा शांत झाले सगळे. त्या गायकानेही माफी मागितली आणि मगच कार्यक्रम पुढे सुरळीत पार पडला.

मुख्य काय असतं, की परदेशातल्या लाईव्ह कार्यक्रमांत त्या गायकांनी नाचणं, प्रेक्षकांमध्ये उड्या मारणं, हे सगळं गातागाताच करणं अपेक्षित असतं. तो एक 'परफॉरमन्स' असतो, एक 'मैफल' नाही. त्या ऑडियन्सला त्याची सवयही असते, त्यामुळे लिप-सिंक कोणी मनावर घेत नाही. पण आपला प्रेक्षक गायकाला गायक म्हणून बघणंच प्रिफर करतो.

पण सध्या 'परफॉरमन्स'वर खूप भर दिला जातो, गायकाचं दिसणं हे गाण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं होऊ लागलंय का?
वैशाली: पूर्वी काय होतं, की पार्श्वगायक/गायिका हे खरोखर पार्श्वभूमीलाच असायचे. असे स्टेज शो, लाईव्ह कार्यक्रम कधी होते? लोक आवाजाने गायक/गायिका ओळखायचे. पण जसजसे हेही लोक लोकांपुढे यायला लागले, तसा त्यांच्या दिसण्यातही एक प्रकारचा नेटकेपणा आला. आजच्या टॉपच्या हिरॉइनसाठी 'ही' गाते म्हटल्यावर, 'हिचीही' एक प्रतिमा मनात निर्माण झालेली असते. लोकांसमोर आपण येतोय म्हटल्यावर कायम मागे असणारे लोक स्वतःच्या दिसण्याबद्दल थोडे जागरूक झाले. आणि त्यात काही चूकही नाहीये. आज अगदी आशाताईंनी एखादा लाईव्ह कार्यक्रम केला, तर त्यांच्या गाण्याबरोबर त्यांच्या साड्या, त्यांचे दागिने याबद्दलही चर्चा होते. त्यामुळे एका लिमिटपर्यंत हे ठीकही आहे. पण त्यामुळे 'गाणं मागे पडतं' हे काही खरं नाही. आम्ही आधी कलाकार आहोत. गाण्यामुळे आम्ही आहोत. लोक आम्हाला आमच्या गाण्यामुळे ओळखतात, दिसण्यामुळे नाही. तुम्ही दिसलात कितीही सुंदर, तरी शेवटी लोकांच्या मनांत तुमचं गाणंच राहणार.

हां, आता आपल्याकडे 'परफॉरमन्स' म्हणजे काय, तर लाईव्ह कार्यक्रमात गायकाने घट्ट एका जागी उभं राहून, समोरच्या कागदावरचं गाणं गाण्यापेक्षा, तो जर स्टेजभर फिरला, प्रेक्षकांशी अधूनमधून नजरानजर केली, त्यांनाही गाण्यात सामावून घेतलं, तर तो परफॉरमन्स नक्कीच जास्त रंगतो. पण यामुळे गाण्यातलं लक्ष कमी होणार असेल, तर त्याने नक्कीच तसं करू नये. गाणं डिलिव्हर करता करता त्याने हेही तंत्र आत्मसात करून घेतलं, तर कार्यक्रमात जास्त मजा येते, प्रेक्षकांनाही कार्यक्रमात एक इनव्हॉल्व्हमेंट जाणवते. म्हणून गाणं नुसतंच गाण्यापेक्षा परफॉर्म करणं चांगलं. त्यामुळे उत्तम गायकाने थोडं हेही अंग आत्मसात केलं, तर दुधात साखर.

लाईव्ह कार्यक्रमासाठी गाण्यांची निवड कशी करतेस?
वैशाली: कार्यक्रम कुठे आहे, त्याप्रमाणे गाण्यांची निवड थोडी पुढे-मागे होते. काही गाणी अशी आहेत, की ती प्रत्येक प्रकारच्या ऑडियन्समध्ये हिट होतात. त्याव्यतिरिक्त काही गाणी अशी आहेत, जी अमुक एका श्रोतृवर्गालाच आवडतात, त्यामुळे तशी गाणी आवर्जून घेतो. कधीकधी अजून जे गाणं मार्केटमध्ये आलेलं नाहीये, पण जे त्यांना आवडू शकेल असं वाटतं, तेही घेतो. रिहर्सल करताना अर्थातच आम्ही सर्व गाण्यांची तयारी करून घेतो, म्हणजे ऐनवेळी कोणतंही गाणं घेता येतं. कधीकधी ऑडियन्सचा मूड पाहून तयार गाण्यांच्या सीक्वेन्समध्येही पुढे-मागे करावे लागते. मी आधी म्हटलं ना, लाईव्ह कार्यक्रम म्हणजे एकदम लाईव्ह असतो.. पडद्यामागे आणि पुढे सतत काहीतरी होत असतं.

आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटनांचा लाईव्ह कार्यक्रमांत गाताना किंवा गाणं ध्वनिमुद्रित करताना किती प्रभाव जाणवतो?
वैशाली: गाण्याचं असं आहे, की कधीकधी अगदी अवघड गाणं एका दिवसात होतं, तर कधीकधी अगदी साधी फ्रेजही घ्यायला दोन-दोन दिवस लागू शकतात. त्याचा आणि मूडचा, किंवा इतर काही कारणांचा तो परिणाम असेल असं नाही. स्टुडियोमध्ये काय किंवा लाईव्ह काय, आम्ही सर्वच प्रोफेशनल आहोत, त्यामुळे त्या वातावरणात शिरताना, वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवूनच शिरतो. 'लाईव्ह' गाणं ही तर इतकी मोठी जबाबदारी असते, की एकदा तुम्ही त्या वातावरणात शिरलात, की बाकीचा काही विचार करायला फुरसत मिळत नाही. एका अर्थाने, तुमची मनःस्थिती ठीक नसेल काही कारणाने, तर उलट अशा कार्यक्रमांमुळे ती विसरायला मदतच होते.

तुझी आजवरची 'हिट' गाणी पाहिली, तर बहुतांशी आयटम साँग्ज म्हणतो, अशी सर्वाधिक गाजली.. अशा गाण्यांमुळे तशीच नवीन गाणी तुझ्याकडे येतात का, किंवा अशामुळे आपण एका प्रकारचीच गाणी गातोय असं वाटतं का?
वैशाली: मी सर्व प्रकारांची गाणी गाते. आयटम साँग्जचं काय होतं, की ती गाणी जास्त वेळ लोकांच्या लक्षात राहतात, म्हणून त्यांना प्रसिद्धी जास्त मिळते. पण मी अगदी सॉफ्ट, रोमँटिक गाणी, गझल्स ते पॉपपर्यंत सर्व गाणी गाते. सुदैवाने संगीतकारदेखील माझ्याकडून सर्व प्रकारांची गाणी गाऊन घेतात. मीही सतत नवीन प्रकारच्या गाण्यांच्या शोधात असते. गाण्यात एक्सपरिमेंटिंग मला आवडतं. ताल, ठेक्याची गाणीही तितकीच आवडतात, जितकी गझल, शांत गाणी.

तू स्वतः एक संगीतकार म्हणूनही काम केलं आहेस..
वैशाली: मी अगदी 'अचानक संगीतकार' झाले! ठरवून नाही. काही वर्षांपूर्वी केदार शिंदेबरोबर बसले होते, तेव्हा त्याने 'यंदा कर्तव्य आहे'ची पटकथा ऐकवली. ती ऐकता ऐकताच 'वी आर हनीमूनर्स' हे गाणं मला सुचलं, अगदी शब्द न् चालीसकट! केदारनेही ते गाणं सिनेमात घेतलं. हे माझं पहिलं गाणं - एक संगीतकार म्हणून. त्यानंतर 'गलगले निघाले' आणि आता रमेश देव प्रॉडक्शन्सचं एक पिक्चर येतंय, ज्यात चार गाणी केली आहेत. संगीत देण्याआधी मी खूप विचार करते, त्या कथेबद्दल, पात्रांबद्दल, गाणं कुठे येणार आहे त्या सीनबद्दल.. खूप वेळ देऊन मनापासूनचा प्रवास असतो तो, जो मला बेहद्द आवडतोय. याशिवाय काही अल्बमदेखील करत आहे. हे चक्र डोक्यात सतत फिरत असतं, पण संगीत देणं एक हॉबीच आहे सध्यातरी. मी आधी एक गायिका आहे, त्यानंतर एक संगीतकार.

सध्या गाण्याचं ध्वनिमुद्रण करताना द्वंद्वगीत असलं तरी गायक-गायिका वेगवेगळे येऊन, आपापले ट्रॅक गाऊन जातात. यामुळे गाण्यातली केमिस्ट्री कमी होते असं वाटतं का?
वैशाली: आता बहुतेक संगीतकारांशी आणि गायकांशी इतकं व्यवस्थित ट्युनिंग जमलंय, की एकत्र जरी गायलो नाही, तरी साधारण अंदाज येतो, की ही जागा किंवा या ओळी हा गायक कसा घेईल आणि त्याप्रमाणे आपल्या गाण्यात सहजपणे छोट्या जागा, हरकती घेता येतात. एखाद्या गायकाबरोबर आधी काम केलं नसलं, तरी त्याची इतर गाणी ऐकूनही असा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे एकत्र गायलो नाही, तरी फरक पडत नाही.

सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान तू स्वतः किती वापरतेस? तुझे स्वतःचे संकेतस्थळ आहे का?
वैशाली: इंटरनेट या माध्यमाचा मी बराच वापर करते. इंटरनेट हे आजच्या जगातलं अत्यंत ताकदवान प्रसारमाध्यम आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. असे आमचे कित्येक श्रोते आहेत, जे लोकांमध्ये आमच्या नेहेमीच्या माहीत असलेल्या गाण्यांपेक्षा वेगळी गाणी इंटरनेटवरून डाऊनलोड करून ऐकतात, व आम्हांला प्रतिक्रियाही देतात. हा इंटरनेटचा श्रोताही थोडा वेगळा आहे. अधिक शिक्षित, उच्चभ्रू, गाण्याची ठराविक आवड जोपासणारा, नव्या कल्पनांचं स्वागत चटकन करणारा असा. माझी स्वतःची वेबसाईट अजून सुरू नाही केलेली मी, कारण मला तिला पूर्ण वेळ द्यायचा आहे. पण नाव रजिस्टर करून ठेवले आहे, लवकरच ती सुरू होईल. याशिवाय ईमेलवर मी नेहमी असते, बरेच काम तिथूनही करत असते.

'मायबोली' या मराठी संकेतस्थळाबद्दल माहिती आहे का?
वैशाली: हो तर. मी स्वतः मायबोलीची सदस्य आहे. मायबोलीवरच्या कविता विभागात मी जमेल तेव्हा चक्कर मारत असते. कित्येक सुंदर कविता तिथे लिहिलेल्या असतात, ज्या मी आवर्जून वाचते. विवेक काजरेकर, वैभव जोशी या मायबोलीकरांबरोबर तर मी अल्बमही केले आहेत. तुमचे दिवाळी अंकही मी पाहिलेत. सही साईट आहे तुमची. एकदम गुणी, कलाकार लोक दिसत आहेत तिथे. सर्व मायबोलीकरांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

October 15, 2009

शहाणपणा!

पल्याला कोण, कधी आणि केव्हा शहाणपण शिकवून जाईल हे आपण खरंच कधीच सांगू शकणार नाही!! तशी माझी कामवाली बाई मला रोजच शहाणपण शिकवत असते.. ’वैनी, हे मिक्सरमध्ये कशाला वाटत बसलाय? विकत न्हाई आनत? स्वस्त असतंय तसं’- हे इडली, डोस्याचं पीठ वाटत असले की शिकवलेलं शहाणपण असो, की तांब्यांच्या भांड्यांना ’पितांबरी कशाला, नेहेमीची चिंचच बरी आणि स्वस्तही’ असा शहाणपणाचा सल्ला असो.. माझं कसं प्रत्येक बाबतीत चुकत असतं ह्यावर तिचं बारीक लक्ष असतं आणि मला शहाणं करायचा चंगच तिने बांधलेला असतो..

तसंच मधे धुलाईयंत्राचं सर्व्हिसिंग करणार्‍या माणसाने माझी अक्कल काढली.. खरंतर चूक माझीच होती.. त्याने सर्व्हिसिंगला यायच्या आधीच सांगितलं होतं की बिलाची फोटोकॉपी करून ठेवा.. पण मी अष्टभुजा ना.. माझ्या आठही हातात काही ना काही.. त्यात बिलाचा कागद कोणत्याच हातात मावला नाही, त्यामुळे विसरले! झालं! सर्व्हिसिंगला आल्याआल्या यंत्राला हातही लावण्याअगोदर त्याने मला विचारलं, "झेरॉक्स काढलीये ना?"
मी प्रचंड दचकत, "अहो नाही! विसरले!! आणते आत्ता दोन मिनिटांत.."
हे बोलून माझी अक्कल काढायचं ’लायसन’च दिलं ना मी त्याला.. लगेच बोललाच तो.. "काय मॅडम!! तुमच्यासारखे लोक असे विसरायला लागले तर काय बोलणार.. मला पुढच्या कॉलला उशीर होतो.. की तो कस्टमर बोलणार.."
हो रे बाबा.. चूक झालीच, विसरले मी.. स्वत:शीच चरफडत, कसंबसं दादापुता करत त्याला शांत करून एकदाची ’झेरॉक्स’ आणून दिली त्याला..

मात्र परवा तर कळसच! कहरच!! हाईटच!!!
अर्थात नेहेमीप्रमाणे चूक माझीच, त्यामुळे माप माझं निघणार होतंच.. फक्त ते ’असं’ निघेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं!!

तर, झालं काय, की यंदा ठरवलं होतंच की ’दिवाळी पहाट’च्या कोणत्या ना कोणत्यातरी कार्यक्रमाला जायचंच. सहाजिकच सोमवारपासून जाहिराती आल्याबरोब्बर मी बालगंधर्वला हजर. ह्या ’दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमांचं मला जाम कुतूहल आहे.. सर्वात पहिलं कारण हे की हे कार्यक्रम खरोखर पहाटेच असतात हो! इतक्या लवकर, अंघोळ वगैरे उरकून, सुंदर सुंदर साड्या-दागिने घालून सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित रहाणं म्हणजे एकदम ग्रेट वगैरे.. मंद सनईचा आवाज, सुगंधी अत्तरं फवारलेली, बरोबर असेच रसिक मित्र किंवा परिवारातील सदस्य, थोडासा फराळ, मैफिलीनंतर चहा किंवा कॉफीवर रंगलेल्या गप्पा, हास्यविनोद.. आणि त्यात एकसे एक दिव्य आवाज!! मधूनच गंभीर असे निवेदन, कलाकारांचा प्रसन्न सहवास.. वाह!! काय वातावरण असेल ते.. आत्तापर्यंत हे मी केवळ कल्पनेने रंगवलेलं चित्र, या वर्षी प्रत्यक्षात उतरणार ह्या आनंदात मी हवेत तरंगतच बालगंधर्वला पोचले..

उत्सुकतेने ’मैं फूली नहीं समायी थी’ वगैरे स्थितीत मी.. त्याच भरात तिकिटं काढली आणि तिथल्या माणसाला विचारून बसले, (का? का?? का???)
"कार्यक्रमाची रूपरेषा काय असते हो?"

त्या माणसाने बोलायला उघडलेले तोंड चक्क बंद केले आणि काही सेकंद शांतच बसला.. मी चक्रावले! म्हटलं, असं काय काहीच्याकाही विचारून बसले की काय मी?

"फारच अवघड प्रश्न विचारलात!! गाण्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय?
अहोऽऽऽ (हे जाम ठसक्यात बरंका!) गाण्याच्या कार्यक्रमात गाणंच असणार, नाहीतर सकाळच्या वेळी काय लावणी असणार??? काय पण प्रश्न विचारता!!!" असं म्हणत त्याने मला मोडीत काढलं अणि पुढच्या माणसाकडे सरकला..

हे उत्तर होतं का? मला कळायलाच काही सेकंद लागले! खरंय, गाण्याच्या कार्यक्रमात लावणी नसणार हे मला कळायला हवं होतं. मी आपलं सुधीर गाडगीळांचं नाव वाचून विचारायला गेले हो.. कशाला विचारायचं? कळलं असतंच ना आपोआप! हे नको तिथे प्रश्न विचारणं हमखास अंगलट येतं हे ठाऊक असूनदेखील... जीत्याची खोड मेल्याशिवाय जायची नाही!!

तर, असा हा पुणेरी चिमटा मला बसला!! नुस्ताच बसला नाही, टाणकन मी उडालेदेखील :-)

तर तुम्हाला असे चिमटे बसू नयेत, येईल-जाईल त्याने शहाणपणा शिकवू नये आणि आजूबाजूला केवळ शुद्ध विनोदांचंच वातावरण राहो, अशी या मंगल सणानिमित्त प्रार्थना! शुभ दीपावली!!

October 8, 2009

बोली

चा तणतणात ऑफिसात शिरली.. एक मिनिटाने लेटमार्क! श्शी! सुनितावरची तिची चिडचिड अजूनच वाढली! आज ही बया उशीरा आली नसती तर एका मिनिटाने लेटमार्क नक्कीच टळला असता.. मी काही बोलत नाही, म्हणून शेफारली आहे.. तरी आज ठणकावून सांगितलंय- आठ म्हणजे आठला हजर पाहिजे घरात कामाला..

विचार करत करत पीसी ऑन करून कामाला ऋचाने सुरूवात केली. मेल्स चेक करून आजच्या कामाची priority list केली. आज कोणाकोणाला कामाला लावायचं आहे, कोणाकोणाबरोबर बोलायचं आहे, हे मनाशी ठरवून कामाला सुरूवात केली. आज काही फॉर्म्स भरणं आवश्यकच होतं, एका मीटींगचा फॉलोअप घ्यायला हवाच होता.. हे सगळं सुरू करणार, इतक्यात पाठकसाहेबांचा फोन- ते हॅलो वगैरे म्हणत नसत, थेट कामाचं बोलायचं आणि फोन ठेवून द्यायचा अशी पद्धत-
"आज ११ला अलाण्याफलाण्या डिपार्टमेन्टच्या लोकांबरोबर मीटींग आहे, अजेंडा मेल केलाय, त्यावर थोडा अभ्यास करून, अजून याया चार लोकांशी बोलून 'कृपया' उपस्थित रहा.." आदेशवजा विनंती बोलली..
ऋचाला पेन्डींग कामाचा ढीग दिसला, आणि शेवटी धाडस करून ती बोललीच, "सर, आज जरा अवघड होईल मला अटेन्ड करणं.."
"एखाद्या तासाची मीटींग असेल, तेवढी सवड काढाच." पाठकसाहेबांनी चक्क फोन ठेऊन दिला!!!


संताप संताप झाला ऋचाचा! 'हा माणूस 'का जमणार नाही?' असंही विचारू शकत नाही? साधे प्रोफेशनल एटीकेट्सही नाहीत? ही कसली कामाची पद्धत, ज्यात समोरच्या माणसाला काही किंमतच नाही? त्यांना काय वाटलं, तिला इतर कामं नसतात का? ती मागे पडली तर कोण करणार होतं ती? आणि ही कसली हिटलरगिरी- यांनी हाकारे पिटायचे आणि सगळ्यांनी पळत हजर व्हायचं? शर्मासरांनी फक्त 'त्यांना मदत करा' इतकंच सांगितलं होतं, आता तर हे गृहितच धरायला लागलेत मला.. जोशी, नगरकर, पाळंदे सगळे कसे अलगद सुटले, मीच अडकलीये पार!'


हवालदिल झाली बिचारी! संताप, असहायता, सगळं वाटलं, पण मीटींगला जावं लागलंच.. 'ही सगळी स्वगतंच रहाणार.. तोंडावर बोलायचा असभ्यपणा आपण करणार नाही, भांडायला जमणार नाही, करणार काय दुसरं मग? धुसफुसत का होईना, हजर रहावंच लागणार..'

मीटींग सुरू झाली. नेहेमीचे चार आणि नवीन चार लोक होते.. तेचतेच रीपोर्ट्स, तेचतेच बोलणं आणि त्याचत्याच सूचना.. ऋचा अगदी यांत्रिकपणे नोट्स घेत होती.. यातून काय निष्पन्न होणार होतं देवालाच ठाऊक! पाठकसाहेब एक नवीन डीपार्टमेन्ट इनचार्ज म्हणून आले होते.. बरेच सीनीयर होते आणि विभागवार संरचना बघणं आणि त्यात सुधारणा घडवून आणणं हे त्यांचं काम होतं. पण त्यासाठी आधी विभाग कसा चालतो हे ठाऊक करून घ्यायला नको का? त्यातला त्रुटी, ऊणीवा त्यांना दिसत होत्या, पण मूळ रचना ते माहित करून घ्यायच्या फंदातच पडत नव्हते.. सहाजिकच, त्यांनी मीटींगला बोलावलं की लोक बिचकत होते, नीट उत्तरं देत नव्हते आणि साहेब चिडत होते.. आणि गंमत म्हणजे तिने फक्त सर्व वेळ उपस्थित रहायचं होतं, बोलायचं नव्हतं की काही करायचं नव्हतं- मूक साक्षीदारासारखं!! कितीतरी गोष्टी तिला सुचायच्या, सांगाव्याशा वाटायच्या, पण आपण इथे नक्की का म्हणून उपस्थित आहोत, हेच माहित नसल्याने ती फक्त स्वतःच्या रेफरन्ससाठी नोंदी करायची.

ऋचाच्या डोळ्यासमोर परत तिच्या कामांची यादी नाचायला लागली. 'हे मी का करत आहे? का मी यांना सांगू शकत नाही, ही हे माझं काम नाहीये??'

अचानक तिला सकाळी सुनिताबरोबर झालेला संवाद आठवला.. सुनिता आजकाल कामाला यायला रोज उशीर करत होती, आणि त्यामुळे हिलाही पुढे उशीर होत होता.. आज तर सव्वाआठला उगवली बया..
"अगं, किती उशीर करतेस? माहित्ये ना मला निघायचं असतं ते.. मग काम कसंतरी उरकतेस.. आठला यायचं तू असं ठरलंय ना आपलं?"

अपराधी चेहर्‍याने सुनिता बोलली,"अवो वहिनी, त्या शाकाकू किती खिटखिट करत्यात.. पार साताला जाते त्यांच्याकडे.. निस्त्या पोळ्या अनं केर. अनं पोळ्या झाल्या की वटा धुवायचा इत्कंच काम हाये मला तिकडं.. पन वट्यापाशी आलं की बाई म्हन्ती कदी भाजीच चिर, कदी दूधच बग, कदी सिंकमधली भांडीच घासून दे.. केर काडायला लागली की इकडून घे, तिकडून घे.. लय काम पडतं.. उरकतच न्हाई माझं.. खरंतर ज्ये माजं काम न्हाई तेबी मला कराया सांगते ती.. अन मग न्हाई म्हन्ता येत न्हाई बगा.. पन उद्यापासून यीन मी.. तिला सांगत्येच ना.. की ह्ये माज्या बोलीत न्हाई.. माज्या बोलीत ज्ये ठरल्यालं हाय, मी तेवडंच काम करनार.. पटलं तर बग, नाह्यतर मी येत न्हाई.. चिकार कामं मिळ्तील मला.. हिला काय सोनं लागलंय.. अशी सारकी खिटखिट केली की लई वैताग येतो बगा.."

'ही सुनिता त्या शहाकाकूंना ठणकावून सांगू शकते, मग आपण का बुजतो?' ऋचाचं द्वंद्व परत चालू झालं.. 'आपल्यातरी 'बोली'त आहेत का ही असली वरकामं? आईशप्पथ!! म्हणजे आपण स्वतःचीच तुलना एका कामवालीशी करतोय???'

'मग नाहीतर काय?' दुसरं मन बोललं.. 'काय फरक आहे? तिचं ठराविक काम आहे, तुझंही आहे. तिला ते काम सोडून आणिक काम दिलं की तिची चिडचिड होते, तुझीही होते. तिची 'बोली' नाही म्हणून ती वैतागलेय, आणि तूही!! फरक असलाच तर इतकाच आहे, की ती सहजपणे ते काम सोडून नवं धरू शकते, आणि तुला ते इतकं सोपं नाही! तडफ असलीच तर ती त्या अडाणी बाईत आहे जी तुझ्यासारख्या सुशिक्षित म्हणवणारीकडे नाहीये!'

स्वतःचेच विचार ऐकून ऋचा दचकली, थक्क झाली!! इतका त्रास होत असेल, तर आता काहीतरी करायलाच हवं हे तिने ठरवलं.. एव्हाना मीटींग संपलीही. पाठकसाहेबांच्या हो ला हो म्हणत ऋचा जागेवर आली, पण विचारचक्र चालूच होतं. तिने अगदी शांतपणे रीव्ह्यू घ्यायचा ठरवला. खरंच हे काम तिचा बोजा अनावश्यक वाढवत होतं. हे काम तिनेच करायला हवं होतं असं होतं का? ती त्या मीटींगांना उपस्थित नसेल, तर मीटींग अडणार होती का? नुकसान होणार होतं का? उपस्थित राहून तिच्यावर निर्णय देण्याची जबाबदारी होती का? सगळ्याचीच उत्तरं एकापाठोपाठ एक नकारात्मक यायला लागली. परत परत तिने तपासून पाहिले. खरंच, इतके दिवस भिडस्तपणे तिने उगाचच इतका वेळ खर्च केला होता. पाठकसाहेब इन्-चार्ज असताना पुन्हा तिची तिथे काहीच गरज नव्हती.

अंदाज घ्यायला तिने नगरकरला भेटायचं ठरवलं.. नगरकर एचआरचा डेप्युटी इन्-चार्ज होता. खरंतर हे काम एचआरचं नसूनही, तिने त्याचा सल्ला घ्यायचं ठरवलं. तो तर अतिशयच व्यस्त असायचा.. तिचं आणि त्याचं कामानिमित्त बोलणंही व्हायचं अधूनमधून. तो तिला सीनीयर होता, चांगला होता, मदत करणारा होता.. फोन करून ती त्याला भेटायला गेली..
"काय? कसं चाललंय काम?"
"काय नेहेमीचंच.. काय म्हणत आहेत 'तुमचे सर'?" त्याने विचारलं, आणि तिलाही त्यातली खोच कळली..
"तेच विचारायचं होतं.." आणि तिने सर्व कथन केलं.. शेवटी, ते काम करायचं नाहीये हेदेखील स्पष्ट केलं.

नगरकरने शांतपणे सगळं ऐकून घेतलं."हे बघ, तुला इतका इश्यू आहे, तर इतके दिवस गप्प का बसलीस? आधी का नाही बोललीस? अगं तसे ते ठीक आहेत, त्यांची पद्धत जरा निराळी आहे इतकंच. तुला अ‍ॅडजस्ट व्हायला वेळ लागेलच, in fact कोणालाही लागेल.. अशा पद्धतीची आपल्याला सवय नाही आता, but he means well. त्यांचीही काही बाजू असेल.. बोल त्यांच्याशी, सगळं क्लीयर करून घे.. but no hard words, remember! Just make yourself clear, ok? All the best!" त्याने हसून सांगितलं..

त्याच्याकडून बाहेर पडेपर्यंत ऋचाला बरंच हलकं वाटायला लागलं, किमान आपण काही अतिचुकीचं किंवा अतिधाडसाचं तरी करत नाहीयोत, इतका विश्वास तिला वाटायला लागला. तो दिवस तसाच गेला..

दुसर्‍या दिवशी सुनिता बरोब्बर आठाला हजर!! तिची आपसूकच नजर गेली घड्याळाकडे..
"आज अगदी वेळेवर आलीस की.."
"मग ओ.. जास्त बोल्लेच न्हाई काई.. चट काम उरकलं आनि आले पटकन.. म्हटलं त्या बाई बी वाट बगत्यात.. थांबलेच न्ह्याई.."
क्षणभर तिला सुनिताचं कौतुकच वाटलं, आणि तीही आपल्या कामाला लागली..

आज तर ऑफिसात कहर! एकापाठोपाठ एक चार मीटींगा, म्हणजे आख्खा दिवस वाया! पण ऋचाने चिडचिड केली नाही, उलट तिच्या निश्चयाला बळकटी मिळाली. आता तर सुनिता तिची रोलमॉडेलच झाली होती, त्यामुळे आज तिने लावला, तसा सोक्षमोक्ष लावायचाच हे तिने मनाशी परत पक्कं केलं.

शेवटच्या मीटींगची शेवटची पाच मिनिटं- ऋचाला धडधडायला लागलं, टेन्शन आलं.. बोलायचं, यातून सुटका करून घ्यायची, हे तर ठरवलं होतंच, पण आता ऐनवेळी कच खायला होतंय की काय अशी भीती वाटायला लागली. 'जाऊदे, जे होईल ते होईल, आपला अधिक वेळ पुतळा होऊन इथे घालवायचा नाही' असं स्वतःला बजावतच तिने पाठकसाहेबांना हाक मारली.

"सर, जरा दोन मिनिटं बोलायचं होतं.." ती चाचरत म्हणाली..
पाठक ढिम्म. सहसा त्यांच्या चेहर्‍यावर सुरकुत्या पडत नसत- ना रागाच्या, ना हास्याच्या. ते फक्त ऐकून घ्यायचे आणि प्रश्न विचारायचे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेचा अंदाजच यायचा नाही. आत्ताही ते 'बोला' म्हटले नाहीत, नुसतंच बघत राहिले तिच्याकडे अपेक्षेने. हाच क्यू घेत ऋचाने आपलं म्हणणं दामटलं..
"सर, खरंतर इतक्या मीटींग्ज अटेन्ड केल्या, पण मला अजूनही माझ्या कामाचं नक्की स्वरूप समजलेलं नाहीये.. मी फक्त मीटींगला येते, पण कोणत्या रोलमध्ये हे कळत नाहीये. माझे इन्पुट्सची कधी आवश्यकता पडलेली नाही, शिवाय, मी जे काम आत्ता पहात आहे, त्याच्याशीही हे थेट संबंधित नाहीये.."

तिने हळूच अंदाज घेतला. समोरचा थंड चेहरा अजूनही थंडच. 'हे आपलं ऐकत तरी आहेत की नाही?' तिला संशय आला. पण बोलतच आहोत, तर आता संपवूनच टाकू, म्हणून ती पुढे म्हणाली,
"तर, यापुढे मी या मीटींग्जला आले नाही तर चालेल का?" हुश्श! ball is in his court now, काहीतरी बोलावं लागेलच त्यांना..

समोर फक्त गार गार शांतता. ते काहीतरी बोलणार हे कळत होतं, पण पटकन बोलत नव्हते. ऋचा टरकली म्हणजे जाम टरकली. आता हे काहीतरी बोलणार, मग आपण बोलणार, अधिक-उणा शब्द तोंडामधून गेला, तर उगाच कटूता येणार.. छ्या! उगाच बोललो आपण- अश्याच मीटींग्ज अटेन्ड करत राहिलो असतो तर काय बिघडलं असतं? आता भोगा आपल्या कर्माची फळं..

पेनाशी चाळा करत करत शेवटी पाठकसाहेबांनी तोंड उघडलंच एकदाचं.."खरंतर तुम्ही असा विचार का करताय? ऑर्गनायझेशनचं प्रत्येक काम हे आपलंच आहे असं समजणं हे आपल्या कंपनीचं वैशिष्ट्य आहे. 'हे काम माझं नाही, हे त्याचं आहे' असा विचार कोणत्याही संस्थेला पुढे नेऊ शकत नाही.."

'काहीही!!' अर्थातच मनात! 'प्रत्येकाला well defined role असतो, सुनिताच्या भाषेत 'बोली'! असं एकाचं काम दुसरं करू लागला, तर कुठलंच काम धड व्हायचं नाही..' ऋचाच्या चेहर्‍यावर चलबिचल स्पष्ट दिसायला लागली.

"पण बरं झालं तुम्ही सांगितलंत ते.. आता मीही तुम्हाला काहीतरी सांगतो.. हे थोडं लवकर आहे आमच्या अपेक्षेपेक्षा, पण आता तुम्ही विषय काढलाच आहे.. आपण एक Internal Audit डीपार्टमेन्ट सुरू करतोय. आता Internal Audit म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगत नाही, पण इतकं सांगतो, की ह्या डीपार्टमेन्टचा प्रमुख जरी मी असलो, तरी त्याची Operating Head तुम्ही असणार आहात.."

ऋचाचे डोळे मोठे झाले.. अं? काय? मी? हेड? खरं?पाठकांनी हे सर्व प्रश्न तिच्या डोळ्यात वाचले. उगाच काही त्यांचे केस पांढरे झाले नव्हते.."मला हे रेकमेंडेशन एचाआरकडूनच आलंय. त्याच दृष्टीने तुम्हाला प्रत्येक मीटींगला यायला सांगितलं जात होतं.. एकूण कामाचा आढावा मी घेत होतो, आणि तुम्हालाही आता कल्पना आली असेलच, की काम पुष्कळ आहे, आणि ते करायलाच हवंय. तुम्हाला थोडे दिवसांनी एचआरने कळवलं असतं, पण.." त्यांनी वाक्य अर्धवट सोडलं आणि चक्क स्मितहास्य केलं- 'तुम्हा तरूण मुलांना धीर म्हणून नाही' ह्या अर्थाचं!!

"तुमचं जे सध्याचं काम आहे, त्याचं ट्रेनिंग तुम्ही कोणाला द्यायचं हे तुम्हाला नगरकर कळवतील. अर्थात, तुम्ही ते काम सोडायचं नाहीये, पण रूटीनमधून बाहेर पडा, आणि मुख्य हे काम सांभाळा. तुम्हाला आता सर्व माहिती आहेच. उद्यापासूनच सुरू करा, काय?" याखेपेला त्यांनी भुवया उंचावून तिच्याकडे पाहिलं..

ऋचा भंजाळलेलीच होती अजूनही. म्हणजे हे चक्क प्रमोशन झालं की. यिप्पी!! तेही ऑडीट डीपार्टमेन्टमध्ये! आवडीचं काम! शिवाय, आधीचं आहेच. सहीच. तिच्या मनावरचा ताण कुठेच पळून गेला.. "हो सर." इतकंच म्हणून ती उठली..

नगरकर!!! आई शप्पथ!! त्याला सगळं ठाऊक असणार.. पण काही बोलला नाही पठ्ठ्या!! so typical HR!!! तरीच तातडीने ह्यांच्याशी बोलायला सांगितलं मला.. सगळं procedureनुसार झालेलं बरं!!
ती जागेवर आली. नवीन जबाबदारीचा आवाका कसा असणार आहे, किती असणार आहे याचा तिने अंदाज घेतला.. ते काम आपल्याला आवडेल, पण झेपेल का याचा कौल घेतला.. अनुकुल उत्तर आल्यानंतर मात्र तिने मोठ्ठा श्वास घेतला. सर्वात आधी नगरकरला फोन केला..
"बोला मॅडम.."
शक्य तितक्या कोर्‍या आवाजात ती म्हणाली, "बोलले पाठकसाहेबांशी.."
नगरकर सावध- "हं, मग?"
"मग काय? तुम्हाला ठाऊक होतं ना?"
"अरे!! सांगितलं का एकदाचं?" तो हसला.. "हो, ठाऊक होतं, पण अनऑफिशियली. मॅडम, आम्हाला ती पॉवर नाय! आम्ही नुसते हुकुमाचे ताबेदार.. आता ऑफिशियली भेटू, तुझ्या नवीन माणसाच्या requirments सांग. कोणी मनात असेल, तर तसं सांग, म्हणजे शोधत बसायला नको. तसंच, तिकडेही एक असिस्टंट मिळेल तुला, किंवा कदाचित दोनही.. मॅडम, आता तुम्ही केबिनवाल्या होणार.."
"काय?" ऋचा आता खरंच उडाली!!! 'केबिन' म्हणजे प्रमोशन!! So, this was real serious ha! हाताखाली दोन माणसं वगैरे! आयला, म्हणजे बोले तो 'बोली' बदलली की!! आनंदाने तिला हास्याच्या उकळ्या फुटल्या..
"येस्स मॅम. हे बघ, तू उद्यापासून काम सुरू कर. ४-५ दिवसात लेटर देतो.. अगदी ऑफिशियल! आणि हो, please accept my official congratulations too!"

ती समजत काय होती, होत काय होत होतं! तिने चिमटा काढलान स्वतःलाच!! श्या! उगाच कुढत बसलो, पण शेवटी कामाचं चीज झालं तर.. आधी तिने रोहीतला फोन करून बातमी दिली.. पण बाकी सगळ्यांना उद्यानंतरच कळवायचं हेही ठरवलं..

दुसर्‍या दिवशीची सकाळ तर प्रसन्नच उगवली, आणि सुनिताही आठाला उगवली, पण तणतणत!!
"वैनी, सोडनार ते काम.. आत्ता बगा, मी कायकाय केलं असंल वट्यापाशी- पोळ्या तर हाईतच, पर मिक्सरमदून चटनी काडली, टमाटे चिरले, कोथमिर निवडून दिली.. इकडं उशीर व्हाया लागला.. परत तुमी बोलनार.. बाईला समजतच न्हाई वो त्या.."

पण ऋचाला आज नवा perspective मिळाला होता ना.. "अगं, सोडू नकोस.. बघ, तुलाही प्रमोशन देणार असतील काकू.."
"म्हन्जी?"
"अगं बये! तुझं काम त्यांना आवडत असेल, पटत असेल, म्हणून तुला इतर कामंही येतात की नाही हे बघत असतील त्या.. मिक्सर फिरवता येतो का, पोळ्या करता करता दूधाकडे लक्ष देतेस का वगैरे वगैरे.. बघ हां पुढच्या महिन्यात अजून काम देतील तुला.."
"पर मी पैसं वाडवून घेनार.." सुनिताला पटलेलं दिसलं..
"अगं घे की.. तुझं काम पटत असेल तर पैसेही देतील.. बोली वाढली, की पैसे वाढतातच.. पण माझ्याकडे मात्र आठाची वेळ पक्की हं.. नाहीतर त्यांच्याकडे पैसे जास्त, म्हणून माझ्याकडचं काम सोडायचीस.." ऋचाने चिडवलं तिला जरा..
"चला.. कायतरीच वैनी तुमचं.." सुनिताने झकास मुरका मारला आणि दोघी आपापल्या वाढीव बोलीच्या विश्वात रमून कामाला लागल्या..

समाप्त!

(ऋचाचं नाव 'पूनम' ठेवायला मला नक्की आवडलं असतं, ते 'प्रमोशन' मला खरंच मिळालं असतं तर ;-))