April 30, 2009

आता मी काय करू??

हानपणी आपण सगळ्यांनीच ती राक्षसाची गोष्ट वाचली असेल.. त्याला काम करण्याचा रोग होता.. त्याला सतत काम द्यायला लागायचे, तो त्याच्या मालकाला सतत विचारायचा- "मालक, आता मी काय करू?" आणि मालकाने काम दिले नाही, तर तो त्याला चक्क मारून टाकायचा! लांबचलांब असलेल्या शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची सुरूवात झाली, की हा ’आता मी काय करू?’ राक्षस तमाम मुलांच्या अंगात शिरतो! सुट्टी म्हणजे आराम असे कितीही म्हटले, तरी मुलांना कुठे स्वस्थ बसवतंय? त्यांना आवर्जून सांगितलं की आता लवकर उठू नका, की हमखास मुलं सकाळी रोजच्या वेळेच्याही आधीच उठणार! आणि मग होते सुरू भुणभुण- "आई, आता मी काय करू?" बरं, आई देईल ते एकही उत्तर त्यावेळी पसंत पडत नाही! हे आपलं विचारायचं म्हणून विचारायचं असतं, एक फॉर्मॅलिटी म्हणून! कारण आई म्हणाली- बॉल खेळ, की, आत्ता काय बॉल खेळायची वेळ आहे का? बरं बाबा, मग ठोकळे लाव, पत्ते खेळ, टीव्ही बघ- नाही! नाही!! नाही!!! काहीही पसंत पडत नाही! आई जर कशोशीने टाळत असेल मुलाला उन्हात खेळायला पाठवायला, तर मुलाला तेच हवं असतं! ’हे’ कर म्हटलं, की ’त्यापेक्षा ते करतो’, ’ते’ कर की ’हेच बरंय’ आणि सरतेशेवटी काहीच पसंत न पडून "आता मी काय करू???"

सर्वात अडचणीचं ठरतं ते तीन ते आठ वयाच्या मुलांचं. ही मुलं तशी एकटी कोणाकडे, कुठे जाण्याइतकी मोठी नसतात. पण त्यांना ’बोअर’ तर होत असतंच. तशी उन्हाळी शिबिरं अनेक असतात, पण सगळी तासादोन तासाची. रिकाम्या मुलांची दिवसभराची जबाबदारी कोण ’माईका लाल’ आपणहोऊन घेईल? तर, यांना दिवसभराचा काय उद्योग शोधायचा हा प्रश्न उरतोच! एरवी ज्या वेळेत मुलं शाळेला जातात, तो वेळ तर त्यांचा जाता जात नाही! मग घरात एखादं भावंडं असेल, किंवा शेजारी पाजारी त्याच वयाची मुलं असतील, तर जरा तरी वेळ जातो.. पण एकेकटी मुलं पार कोमेजून जातात बिचारी! त्यातून आई नोकरी करणारी असेल, तर जास्तीच. कारण त्या मुलांना दोन तासांच्या शिबीराला कोण ने-आण करणार? नाईलाजाने, दिवसभर पाळणाघरात रहायला लागतं, त्यामुळे मुलं नाखुश! पाळणघरातल्या मावशी काही हुंदडू देत नाहीत, की आवाज करू देत नाहीत. बाहेर ऊन इतकं असतं, की अंगण असलं तरी खेळता येत नाही. अर्थात, जी मुलं घरी असतात, तीही काही कमी त्रास देत नाहीत म्हणा! घरभर आवाज, पसारा, ओरडाआरडा.. मग आईचा आवाज.. मधेच लाईट जातात, अन आवडतं कार्टून, आवडती गेम बंद पडते.. मग रुसवेफुगवे! चालू असतो कल्ला! आणि इतकं सगळं असतानाही, प्रश्न येतोच, "आई, आता मी काय करू?"

सहज मी विचार केला, आपणही लहान असताना असेच होतो का? इतकं लहानपणाचं आठवत नाही खरं, पण मुलं चिकार होती आसपास.. आणि बहिणीच्या मागे मी सतत असायचे हे ही आठवतंय. तिची फार चिडचिडही व्हायची- माझं शेपूट कायमच बिचारीच्या मागे! पण काही असो, भातुकली, पत्ते, व्यापार, पुस्तक वाचन यात वेळ जायचा खरा. दुपारी आंबे खाऊन झकास झोप, संध्याकाळी लपंडाव, डबडा ऐसपैस, लगोरी, लंगडी.. रात्री परत आंबे.. मग मध्येच कधीतरी पर्वतीला जायची टूम, पोहायला जायची मोहिम, कधी बागेत किंवा असच काहीतरी.. मोठ्या मुलांमध्ये आम्ही चिल्लीपिल्लीही धमाल करायचो.. आईच्या मागे भुणभुण केल्याचं आठवत तरी नाहीये!

मग आताच्या मुलांचा का बरं वेळ जात नाही? त्यांना जास्त ऑप्शन आहेत, म्हणून का? मुलांना टीव्ही, काँप्यूटर, व्हिडीयो गेम्स- कितीही द्या, पुरत नाहीत. ही मुलं हुशारही आहेतच.. एकाच गोष्टीत तासनतास रमत नाहीत.. आपसात खेळतात, पण दिवसचे दिवस नाही.. काहीतरी कुठेतरी खटके उडतात, की इवलं तोंड करून येतात घरी, "आई, आता मी काय करू?" या प्रश्नासकटच! घरातल्या माणसांचाही पेशन्स संपला आहे मुलांच्या कलाने घ्यायचा? आई-बाबांना वेळ नाही, आजी-आजोबाही निवृत्त असले, तरी त्यांनी स्वत:च्या वेळाची व्यवस्थित आखणी केलेली असते. मुलं "आता मी काय करू" वरवर म्हणत असतील, पण त्यांना "आई/ बाबा, मला वेळ देता थोडा?" असं तर विचारायचं नसेल? पण वेळच सापडत नाही ना! मुलांना शाळेला सुट्टी असते, तशी आई-बाबांना ऑफिसाची उन्हाळी सुट्टी असती तर किती बरं झालं असतं! एरवी मुलांना वेळ देता येत नाही म्हणून हळहळणारे पालक मुलांसोबत मूल होऊन नक्कीच राहिले असते. पण अशी सुट्टी हे एक विशफुल थिंकिंगच!

त्याऐवजी, पालक काही ना काही मार्ग शोधतात, मुलांना कुठे ना कुठे गुंतवून ठेवतात, जमेल तसे त्यांच्यातच एक मूल होऊन खेळतात. सध्याच्या काळाचे ’बाबा’ही मुलांच्या गोष्टीत सहभाग घेतात.. मुलाच रिकामा वेळ सत्कारणी लागावा ही धडपड सगळेच आपल्या परीने करतात..

सध्या तरी सुट्टीचा एक महिना संपला आहे. एकापाठोपाठ एक उद्योग मागे लावून दिल्याने हे दिवस तरी गेले.. आता अजून एकच महिना! मे महिना आजी-आजोबांकडे, एखाद्या छोट्या ट्रिपमध्ये करत घालवायचा.. जमलं तर एखाद्या छंदवर्गात अडकवायचं मुलाला.. मुलगा मोठा होऊन, आपापलं वाचू शकत नाही, एखाद्या घराजवळच्या ठिकाणी आपापला जाऊ शकत नाही, तोवर अश्या कसरती करत रहायचं! अश्या वेळी "आई, आता मी काय करू?" हा प्रश्न कधीही कानावर पडेल याची तयारी ठेवायची आणि स्वत:ची पूर्ण कल्पकता लढवून दर वेळी एखादं नवं, त्याला पटेल असं उत्तरही द्यायचं! सुट्टी झिंदाबाद!

April 2, 2009

फिटींग!

मचे ’हे’ अलिकडे कपडे शिवून घेत नाहीत.. नाही, शिंप्याचं नाव अली नाहीये, अलिकडे म्हणजे आताशा हे कपडे शिवून घेत नाहीत, सरळ विकतच घेतात.. इतके मॉल्स शहरभर उभे राहिल्यानंतर आणि त्यांच्याकडे अक्षरश: हजारो तयार कपडे तयार असताना कपडे शिवून घ्यायचे म्हणजे अंमळ औट ऑफ फ्यॅशनच! त्यातून, आजकाल पॅकेजिंग आणि ब्रँडींगला किती महत्त्व आलंय, ठाऊकाय ना? कपड्याच्या लेबलवरून माणसाच्या स्टेटसचा अंदाज घेतात आजकाल, आहात कुठे? तात्पर्य काय, की सध्या ह्यांची कपडे खरेदी मॉल्समध्ये होते.. आणि ती आमच्या- म्हणजे मी आणि आमच्या संसारवेलीवरच्या गोमट्या फुलाच्या दृष्टीने प्रचंड कंटाळवाणी असते.. कंटाळवाणी का? कारण शर्टाची खरेदी त्या मानाने पटकन उरकते.. मापाप्रमाणे शर्टांचे ढीग असतात, त्यातले आवडतील ते घ्यायचे. पण पँट खरेदी होईस्तोवर आमची जांभया देऊदेऊन तोंड फाटायची वेळ येते.

पहिली गोष्ट म्हणजे पँट घ्यायची, म्हणजे पोटाचे माप उघड उघड तिथल्या ’हेल्पर’ला सांगायचे! हे माप दर सहा महिन्याने वाढत असल्याने, ते असं उघड बोलायची वाटते लाज. त्यामुळे तो तत्परतेने पुढे आला, तरी त्याला ’मी बघतो’ असं मारे तोर्‍यात त्याला सांगितलं जातं. ’मी जाड झालेलो नाहीये’ हे पटवण्यासाठी जुन्या मापाची एक पँट ट्रायलसाठी म्हणून हे ट्रायल रूममध्ये घेऊन जातात. आत गेलं की, आधी पायातले बूट काढायचे, मग अंगावरची पँट उतरवायची. मग ही नवी घालायचा प्रयत्न करायचा. ती होत नाही. मग चरफडत ती उतरवायची. पुन्हा लाजेकाजेखातर जुनी पँट चढवायची. बूटात पाय सरकवायचे. उगाचच गोंधळलेला चेहरा- की घरी आहेत त्या या मापाच्या पँट तर मला होत आहेत, हीच कशी होत नाही बरं?- असा करून बाहेर यायचे. मग नवीन (मोठ्या) मापाच्या ढीगाकडे वळायचे. त्यातली एक घ्यायची. पुन्हा ट्रायल रूममध्ये हे सगळं करायचं. ती मात्र पहिलीच्या मानाने फिट्ट होते. मग ’अरेच्च्या, मला आता हे माप लागतं? काहीतरी घोळ आहे ह्यांच्याच मापात’ असं त्या विदेशी, बड्या, जिच्यामागे हे स्वत:च धावत आलेत त्या कंपनीचं माप काढायचं. मग एकूणच या कंपनीबद्दल मन थोडं कलुषित होतं- कारण ती कंपनी ह्यांना जाड ठरवते. म्हणून हे दुसर्‍या कंपनीकडे वळतात.

दुसर्‍या कंपनीच्या पँट ट्राय करताना, हेच सगळं घडतं. आधी जुनं माप, मग नवीन माप. किती वेळा ट्रायल रूममध्ये जायचं, पँट बदलायच्या.. देवा! आणि मी आणि आमच्या मुलाने काय करायचं या वेळात? तर हे बाहेर कधी येतात याची वाट पहायची. बर्‍याचदा तर ट्रायल रूमसाठीही नंबर असतात. तेव्हा तर आमची तोंडं बघण्यालायक असतात. बरं, ’तुमचं चालूदे, मीही माझ्यासाठी काहीतरी बघते’ असं म्हटलेलंही खपत नाही. ’नाही, तू थांब, सीलेक्शनसाठी’. मग काय, एक कोपरा गाठून मी येणारेजाणारे निरखत बसते. लेक मात्र भयंकर कंटाळतो.. ’आई, मी काय करू?’, ’बाबांना इतका वेळ का लागतोय?’, ’मी तिकडे एक चक्कर मारून येतो’, ’आई, भूक’, ’कंटाळा आला’ हे आळीपाळीने माझ्या कानावर आदळत रहातात. मी ’हो रे, झालंच हां’ असं काहीतरी बडबडत त्याला धीर देते. एकदा तर तो इतका वैतागला की बाबांना म्हणाला, ’बाबा, तुम्ही तिकडे जाऊन काय करता? मलाही आत यायचंय’. हे ऐकून मला इतकं हसायला आलं आणि बाबांनाही, की ते खरंच घेऊन गेले त्याला ट्रायलरूममध्ये! बाबा काही भारी करत नाहीयेत हे पाहिल्यावरच त्याचं कुतुहल शमलं.

तर अश्या रीतीनी कंपनी कोणतीही असो, माप वाढीवच आहे अशी एकदाची यांची समजूत पटते. मग निवड. नेमके यांना आवडलेले रंग त्यांच्या मापात नसतात. जे असतात, ते यांच्याकडे आधीच असतात. (मुळात पुरुषांच्या कपड्यात रंग असतात तरी किती???) मग पुन्हा तिसरी कंपनी. आताशा कापडातही पन्नास प्रकार आलेत असं कंपन्यांचं म्हणणं हं. ’चिनोज’, ’अँटी रिंकल’, ’कूल फॅब्रिक’, ’टेरिकॉट्स’ वगैरे वगैरे.. मग ही घेऊ? का ती बरी? वगैरेत वेळ जातो.. सुरकुत्या न पडणारं ’कॉटन’ कसं काय बरं असू शकतं हे मला कळलेलच नाहीये.. माझा समज की चुरगाळलं की सुरकुत्या पडणार ही तर कॉटनची खासीयत.. पण विदेशी कंपन्यांचं कॉटन असेल बाई अँटी रिंकल असं म्हणून मी पुन्हा विघ्न आणत नाही. अश्या रीतीने बराच उहापोह झाला की एकदाची पसंती होते. मग पुन्हा एकदा खात्री म्हणून अजून एकदा ट्रायल रूम गाठून प्रत्यक्ष चाचणी होते, आणि माल पक्का केला जातो.

किंमत मी विचारतच नाही. (म्हणजे ह्यांनी घेतलेल्या कपड्यांची पहात नाही.. ढीगातल्या कपड्यांची हळूच पाहून घेते.) ती बघून माझे डोळे पांढरे होऊन, मला चक्कर येऊन मी पूर्ववत झाले की मगच हे ट्रायल रूम्मधून अवतीर्ण होतात. माझ्या एका आख्ख्या पूर्ण सहावारी, पार्टी वेअर साडीची, जी मी किमान दहा वर्ष तरी वापरू शकेन जी किंमत असते, ती यांच्या एका य:कश्चित दुटांगी वस्त्राची असते!!! एक तर हे सर्रास ती पँट वापरणार.. माझी साडी मी जपूनजपून वर्षातून एखाददोनदा वापरते.. परत ही मोलामहागाची पँट त्यांना कितीशी वर्ष होणार? एक? फारतर दोन.. तरी त्याला चार आकड्यात पैसे मोजायचे?? नाही, नकोच ते.. असले विचार करून माझं बीपी वाढतं, आणि ’शेवटी तू टीपीकल मध्यमवर्गीय वातावरणातून बाहेर कधी येणार???’ असा कटाक्ष तेवढा मिळतो मला.. त्यापेक्षा जाऊचदेना.. मी किंमत विचारत नाही. मन शांत करण्यासाठी मॉलमधल्या इतर विभागांना (नुसतीच) भेट देऊन येते.. इतकी महाग खरेदी झाल्यानंतर अजून काय विकत घ्यायची माझी टाप?

कथा इथे संपत नाही. या विकतच्या पँटना खालून शिवणी नसतात. त्या घालणार्‍याच्या उंचीप्रमाणे नंतर मारून घ्यायच्या. त्यासाठी कपडे आल्टर करणारा ’स्पेशालिस्ट’ शोधायला लागतो. घराच्या आसपास जे असतात, त्यांच्या टपर्‍या छोट्या.. ते हे कपडे खराब करतील, म्हणून त्यांच्याकडे टाकायचे नसतात ह्यांना. त्यांना लांब गावातल्या लोकांकडेच जायचं असतं, पण वेळ कोणाला असतो? या शनिवारी, पुढच्या शनिवारी करत करत किमान दोन महिने उलटल्यानंतर तो मुहूर्त लागतो.. मी दरम्यानच्या काळात ह्यांचं ह्यांच्याच नकळत डायट फूड सुरू करते.. त्या नव्या पँट घालण्यायोग्य होईपर्यंत पुन्हा न घालण्यायोग्य व्हायच्या आणि पुन्हा आम्हाला मॉलवारी करावी लागायची, या भीतीने!