November 1, 2008

दिवाळी अंक

दिवाळीनंतरचे काही दिवस ’दिवाळी अंकांचे’ असतात.. सुट्टी, फराळानंतर एक सुस्ती आलेली असते. दिवाळी अंक वाचत वाचत एखाद्या चकलीचा तुकडा, अर्धा लाडू वगैरे मस्तपैकी खावा आणि वर झकासपैकी अर्धा कप चहा प्यावा असं मलातरी वाटतं, आणि तसं मी करतेही!

छापील अंकांसोबतच ऑनलाईन अंक आता आपल्यासारख्या ब्लॉगर्सना नवीन नाहीत. त्याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही, फक्त लिंक देते ’मायबोली’च्या नवव्या दिवाळी अंकाची. मायबोलीकडे ’आंतरजालावरचा पहिला दिवाळी अंक’ काढण्याचा मानही जातोच. दर वर्षी दिवाळी अंकात नवनवीन प्रयोग ते सातत्याने करत असतात. फराळाचा आस्वाद घेता घेता या अंकाला जरूर भेट द्या.. एक अप्रतिम अंक वाचल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल. या वर्षीच्या अंकामध्ये मायबोलीकरांच्या एकापेक्षा एक दर्जेदार कथा, कविता, लेख हे आहेतच. याशिवाय काही खास विभागही आहेत-

या वर्षी ’तारांकित’ विभागात साहित्यिकांची मेजवानी आहे. डॉ. श्रीराम लागू, सुनीताबाई देशपांडे, श्री. विक्रम गोखले, श्री. मंगेश पाडगावकर, श्री. ना. धों. महानोर, डॉ. अरुणा ढेरे, श्री. द.मा. मिरासदार, श्री. सुधीर मोघे, श्री. दिलीप प्रभावळकर, श्रीमती शुभांगी गोखले, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, केतकी थत्ते या साहित्य-नाट्य-चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी मराठीचे संवर्धन करण्याकरता व मराठीतील ज्येष्ठ साहित्यिकांचे लेखन नवीन पिढीपर्यंत पोहोचावे, या हेतूने अनेक साहित्यिकांच्या कलाकृतींचे अभिवाचन केले आहे.
मर्ढेकर, बोरकर, पाडगावकर, महानोर, आरती प्रभू यांच्या कविता, जी. ए. कुलकर्णी, द. मा. मिरासदार, शांताबाई शेळके, मिलिंद बोकील यांच्या कथा, दुर्गाबाई भागवत यांचे ललितलेखन या सार्‍यांचा आस्वाद आपल्याला घेता येईल 'तारांकित' विभागात.. हितगुज दिवाळी अंकात..

याशिवाय स्वत: मायबोलीकर उपस्थित आहेत दृक-श्राव्य माधमामधून.. स्वत:च्या कलाकृती मायबोलीकरांनी सादर केल्या आहेत- कवितावाचन आहे, पाककृति आहेत, शास्त्रीय नृत्य आहे, मातीकाम आहे आणि बालगीतही आहे... ’अनुभूति’ आणि ’किलबिल’ विभागात.

’संवाद’ हा असाच एक उपक्रम मायबोलीचा, ज्या अंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या मान्यवर मराठी माणसांच्या मुलाखती असतात. या वर्षी मला पॅराजंपर शीतल महाजनची मुलाखत घ्यायचा बहुमान मिळाला.. तिच्या आणि अजून काही मान्यवर मराठी व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखतींसाठी भेट द्या ’दिवाळी संवाद’ विभागाला.

’मायबोली’चा भरगच्च साहित्याची मेजवानी असलेला अंक इथे पहायला मिळेल.

शीतल महाजनची मुलाखत इथे वाचता येईल.

तुमचे अभिप्राय जरूर कळवा..

1 comments:

Anonymous said...

पाहिला/वाचला/ऐकला! अप्रतिम आहे!! मुलाखत पण छान! :)