October 21, 2008

माझी गझल

मायबोली’ या संकेतस्थळावर अनेक उपक्रम चालू असतात. ’गझल कार्यशाळा’ या त्यापैकीच एक. ’गझल’ हा काव्यप्रकार अनेक लोकांना ऐकायला आवडतो, कारण त्यात असलेली लय, त्यातला आशय, दोनच वाक्यात अचूक टीपलेल्या भावना सगळ्यांचं मन जिंकतात. पण गझल ’लिहिणे’ हे अवघड काम. गझल वृत्तात बांधलेली असते. त्यामधे ’रदीफ आणि ’काफिया’ असतो. जे वृत्त आपण निवडलंय ते सांभाळावं लागतं- या सगळ्या अटी पूर्ण करत बसलो, तर गझल कधी लिहिणार?- असा प्रश्न अनेक लोकांना पडतो. म्हणूनच, लोकांच्या मनातली भिती काढून टाकण्यासाठी, गझलचं ’टेक्निक’ त्यांना समजावून सांगण्यासाठी आणि त्यांना गझल लिहीण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेमधे ’नाही’ हा रदीफ देण्यात आला होता. बाकी वृत्त, अलामत, काफियाची सूट देण्यात आली होती. आपणच आपले वृत्त निवडून त्यात गझल बांधायची होती.

या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद मिळाला. ५०च्या वर होतकरूंनी दिलेले नियम सांभाळून गझल लिहिल्या. कार्यशाळेच्या संयोजकांनी कमालीचा संयम बाळगून सगळ्या सहाध्यायींच्या शंकांचे निरसन केले. मीही या कार्यशाळेत भाग घेतला होता. कार्यशाळा संयोजकांनी कार्यशाळेची सांगता करतानाच या ५० पैकी काही निवडक गझलांचा संग्रह केला, त्यात माझ्या गझलेचाही नंबर लागला! अशी होती माझी गझल:

कुणी कुरवाळले नाही, कुणी रागावले नाही
कधी अस्तित्वही माझे कुणाला बोचले नाही

दुराव्याचा, अबोल्याचा किती करतोस कांगावा
तुझ्यामाझ्यातले नाते कधीचे संपले! नाही?

वहीमध्ये कश्या दिसतात नोंदी फक्त पुण्याच्या?
गुन्हा मी करत असतांना कुणीही पकडले नाही!

जिथे वळते, तुझा रस्ता! जिथे बघते, तुझी मूर्ती!
अशी जादू कधी झाली, मलाही समजले नाही

कुठे आहेस तू देवा किती मी शोधते आहे
(स्वत:च्या अंतरी का मी, कधी डोकावले नाही?)

कार्यशाळेची सर्व माहिती http://www.maayboli.com/node/3604 इथे मिळेल.

9 comments:

Anonymous said...

मस्तच ग.. छान लिहिली आहेस. (संगतका असर..:))
मजा म्हणजे ते 'नोंदी फक्त पुण्याच्या...' वाचले आणि वाटले की हिला काय 'सांगली'च्याही नोंदी हव्या होत्या की काय? मग पुढची ओळ वाचली आणि लक्षात आले ..:फिदी:

सर्किट said...

ओह्, मी पण ’पुण्याच्या’ ला फ़सलो होतो. ’पुण्ण्याच्या’ म्हणायचंय का तुला? मराठी व्याकरणात हे बदल आवश्यक झालेत.

शेवटच्या ओळीचा पंच् मस्त आलाय.

poonam said...

अरेच्च्या! मायबोलीवरही अनेक लोकांनी ते पुणं गाव समजून ’पुण्याच्या’ असं वाचलं :) खरंतर ज्या अक्षरावर जोर हवा आहे, त्या अक्षराखाली एक रेघ ओढतात -underline for emphasis- तसं इथे ’ण्या’ खाली द्यायला हवं होतं.. पण मायबोलीतही आणि ब्लॉगरवरही मला ’underline’ करता येत नाही :(

असो. गझलचा आस्वाद घेतल्याबद्दल धन्स प्राची, सर्किट :)
(सर्किट, पुन्हा कार्यरत झालास का? मधे एकदा तुझा ब्लॉग बघायचा प्रयत्न केला होता मी, तेव्हा ’for invitees only’ची पाटी होती :) कार्यरत झाला असल्यास, आनंद वाटला :))

Anonymous said...

ग़ज़ल एकदम "भाई" झाली आहे. पण पुढच्या ग़ज़लेत मक़्त्यामध्ये तख़ल्लुस वापरलास तर अजुन बहार येईल. मी पारंपारीक ग़ज़लेचा भोक्ता आहे:-)

Anonymous said...

मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!


आपला,

अनिरुद्ध देवधर

Abhi said...

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
मला हा ब्लॉग आवडला मी माझ्या ब्लॉग वरील यादीत तुमचा ब्लॉग सामील केला आहे.
धन्यवाद!!!

Dk said...

chyaala! he maahiteech nvht!!! wwaaaa ekdam chaan (chyaa ylaa hi ek upma samjaavi... PREMAALAA UPMAA NAAHI... SAARKHEE! AATAA HE KAAY TE N VICHAARNE!! :) )

Dk said...

'नोंदी फक्त पुण्याच्या...' >>>>> HO KAA!! :-)

Mahesh said...

khup chaan lihita tumhi

-Mahesh Kale