May 16, 2008

’मी का लिहिते?’

मी का लिहिते?’ हे मला कोणी विचारलंच नाही!

या नावाचा एक ’खो’ मधे मराठी ब्लॉगर विश्वात चालू होता, बहुदा अजूनही असेल. त्या आधी ’जे जे उत्तम..’ म्हणून एक उपक्रम झाला होता, तेव्हा मला चक्क तीन जणांनी ’खो’ दिला होता, म्हणून हा खोखो चालू झाला आहे असं समजल्यावर मी जय्यत तयारी वगैरे करून बसले होते. पण मला खो कोणीच दिलाच नाही की! याची काय कारणं असतील बरं असा विचार केला तेव्हा खालील साक्षात्कार (बरोब्बर उलट्या क्रमाने) झाले..
१) मराठी ब्लॉगर विश्वात माझे कुठे इतके मित्र-मैत्रिणी आहेत जे आवर्जून मला खो देतील? (समजूतीनी घातलेली समजूत)
२) या उपक्रमात एका वेळी एकालाच खो द्यायचाय, मागल्या वेळी एका वेळी एकदम ५ जणांना खो द्यायचे होते, म्हणून तेव्हा नंबर लागला. तेव्हा लागला म्हणून आत्ता लागेल असं का बरं वाटलं तुला? (’जमिनीवरून खाली या’ असं सांगणारं आत्मपरिक्षण!)
३) कोणालाही काही फरक पडत नाही, तू ’काय’ लिहितेस. त्यामुळे तू ’का लिहितेस’? विचारायचा प्रश्नच उद्भवत नाही!- (कटू सत्य)

तरी पण म्हणलं, ब्लॉग आपला आहे, सध्या फुकट आहे, आणि बरेच दिवसात काही लिहिलेलं नाही, तर करूचयात विचार की ’का लिहिते मी?’

लिहिण्याचा पिंड असतो, असावा लागतो. मी शाळेत असताना निबंध बरे लिहायचे. इंग्रजीपेक्षाही मराठी जास्त चांगले. तेव्हा बालबुद्धीच होती. वाचन वगैरे जास्त नव्हतं. तरी सुद्धा मराठीतून विषय चांगला व्यक्त व्हायचा. हे लिखाण इथेच थांबलं. नंतर अभ्यासाच्या काळामधे पुस्तकांमधलंच लिहायला इतकं होतं, की स्वत:चं असं काही वेगळं लिहायला वेळच नव्हता.

मग अचानक लिहायला लागले ’मायबोली’ वर. मायबोलीवर तेव्हाही आणि आताही साहित्याची कधीच वानवा नव्हती. कितीतरी लोकांनी प्रथम लिखाण तिथेच सुरु केले. मी त्या आधी कित्येक वर्ष मायबोलीची सभासद होते, पण आपण तिथे काही लिहू शकू हे स्वप्नातही वाटले नव्हते. पण एक दिवस काय सणक आली कोण जाणे, एक कथा लिहिली, ती पोस्टली आणि चक्क त्याला भरघोस प्रतिसादही मिळाला! मग पुढची कथा लिहिली, तीही उचलली गेली.. मग खात्री पटली की आपण जे काही लिहितोय ते लोकांना थोडं तरी आवडतंय. आणि मग जशी अचानक कथा लिहिली, तसाच अचानक ब्लॉगही सुरु केला.

मी सुरुवात केली कथांपासून. मग हळूहळू ललित लेखन आणि थोडसं हलकंफुलकं लेखनही केलं. ब्लॉग सुरु केल्यापासून अगदी नियमितपणे काहीतरी लिहावं असं वाटायला लागलं- ब्लॉग रिकामा रहातो, किंवा लोक आवर्जून कौतुक करतात म्हणून नाही, तर वेगवेगळे प्रयोग करता येतात म्हणून. अर्थात प्रतिसाद नसतील तर लिखाण अर्धवट वाटतं. लोक प्रतिसाद देतात म्हणून तर हे प्रयोग करायची इच्छा होते. आणि वेगवेगळ्या प्रकारानी लिहिताना आपल्याला तसतसं व्यक्त होणं जमतं का हेही तपासता येतं.

पण मुळात हे व्यक्त होणं इतकं महत्त्वाचं असतं का? काय असतं व्यक्त होणं? रोजचं रूटीन जगताना, आसपास विविध स्वभावांची माणसं बघताना, सामान्य ते असामान्य अनुभव घेताना आपलं मन सतत नोंदी करत असतं. मग ’अमूक एक व्यक्ति अमूक एका परिस्थितीमधे’ कशी वागेल याचं कल्पनारंजन आपोआप सुरु होतं. हे अर्थातच थोडं निरीक्षण, थोडा अनुभव आणि थोडी कल्पनाशक्ति असं मिश्रण असतं. मग डोक्यामधे सतत तेच घोळत राहतं, काही केल्या जात नाही आणि आपोआप साकार होतात एकेक पात्र, एकेक प्रसंग. कधीकधी ’आपल्याला यातून नक्की काय म्हणायचंय’ हे मला स्वत:लाही माहीत नसतं, पण लिहिता लिहिता ते आपोआप उलगडत जातं. कधीकधी सगळं लिहून झाल्यावर बंडल वाटायला लागतं, मग ते लिखाण चक्क डीलीट होतं, पण तो विचार तसाच राहतो, नंतर कधीतरी वेगळ्या स्वरूपात व्यक्त होतो. पण व्यक्त होतो. थांबत नाही. हे असं लिहून टाकलं की खूप समाधानी वाटतं. जे आपण लिहिलंय ते सर्वात आधी आपल्याला आवडणं महत्त्वाचं. मग ते लोकांसमोर मांडलं जातं आणि मग प्रतिसादाची आतूरतेनी वाट पाहिली जाते. आपल्याला जे इतकं आवडलं आहे, ते तसंच लोकांनाही आवडतंय का, का त्यांना त्यातून कुठले वेगळेच अर्थ दिसत आहेत, जो मुद्दा आपल्याला महत्त्वाचा वाटत होता, तो त्यांच्या मनालाही स्पर्श करतोय का हे जाणून घ्यायची उत्कंठा जबरदस्त असते. आणि तसं झालं तर फार आनंद होतो. कधीकधी पुन्हा वाचल्यानंतर आपल्यालाच त्यातला दुसरा पैलू दिसतो आणि खूप जास्त मजा वाटते. मात्र कधीकधी लिखाण फसतंही. चांगलंच फसतं. आणि नंतर विचार केला तर ते का फसलं हे कळतंही- लोक सांगतात त्यातून आणि आपलं आपल्यालाच. मग पुढच्यावेळी त्यात सुधारणा करायचा प्रामाणिक प्रयत्न तरी नक्कीच होतो.

पण नाहीच व्यक्त झालं, नाहीच लिहिलं तर काय होईल? ब्लॉगिंग नसतंच तर काय झालं असतं? नक्कीच कागद-पेन पुढे घेऊन मी मासिकांना वगैरे कथा पाठवल्या नसत्या. मग या सुविधा आहेत- ब्लॉगर आहे, (फुकट आहे,) बरहा आहे, नेट कनेक्शन आहे म्हणून हे व्यक्त होणंही बळंच आहे का? मुद्दाम आहे का? या सुविधांचा फायदा घेण्यासाठी आहे का? खरंतर, काय माहीत ?! असेलही. या सगळ्यामुळे एक एक्स्पोजर मिळालं, मोठ्ठं विश्व समोर येऊन ठाकलं. प्रतिभाशाली, ओघवतं लिखाण वाचायला मिळालं, शब्दांना आपल्या तालावर खेळवणारे लोक बघायला, वाचायला मिळाले.. त्यांच्या लिखाणानी खूप खूप आनंद दिला. प्रस्थापित लेखक, कवि फार लांब असतात, अगदी ’अनरीचेबल’. ब्लॉगर्स कसे आसपासचे वाटतात, आहेत. मग असं वाटलं की आपणही त्यांच्यामधे आपल्या अनुभवांची जोड घालू शकतो का? बघायचे का तसे करून? मग झाली सुरुवात, आणि मग सवय.

पण मला एका गोष्टीचं नेहेमीच वैषम्य वाटतं, की मी फारच कमी वाचलंय. ’वाचेल तो वाचेल’ या उक्तिच्या अनुभवानी सांगते की एक चांगला लेखक आधी एक चांगला वाचक असतो. इतकं अप्रतिम साहित्य आपल्याला उपलब्ध आहे की त्यातलं काय आणि किती वाचू असं होतं. लोक अक्षरश: पुस्तकं ’खातात’! आणि नुसतेच खात नाहीत तर ते अनुभव ते जपून ठेवतात त्यांच्या आयुष्यात सोबत म्हणून. वाचन आपल्याला काय देत नाही? समृद्ध अनुभव, लेखनशैली, विस्मयकारक माहिती.. तो लेखक त्याचं बोट धरून आपल्याला अश्या अविसमरणीय सफरी घडवतो ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. आणि मग तेच अनुभव, ती भाषा, तो लहेजा, ती शैली कळत नकळत आपल्यात मुरते, आणि मग ती व्यक्त होते.. प्रत्येकाच्या पिंडानुसार. मला हेवा वाटतो अश्या लोकांचा जे कधीही सामर्थ्यवान साहित्यिकांचं साहित्य चुटकीसरशी स्मरू शकतात. मी तिथे खूपच तोकडी पडते. वाचते कमी, आणि जे वाचते ते लक्षात राहतंच असं नाही. म्हणून माझं लेखनही अलंकारिक, सुरेख कल्पनाविलास असलेलं होत नाही याची मला कल्पना आहे. सरधोपट होतं, सरळमार्गी. आणि कित्येक वेळा शब्दबंबाळही. ’कमी शब्दात खणखणीत आशय’ यासाठी मी कवि लोकांना मानते. आता मी ’का’ लिहिते सांगायला बसल्ये आणि त्याऐवजी ’कसं’ लिहिते हेच सांगत बसल्ये हे त्यामुळेच.

थोडक्यात काय, की आजूबाजूला घडणार्‍या गोष्टी मनाला भिडतात, मनात घर करतात आणि डोक्याला खाद्य पुरवतात. ते चक्र जोवर लिहून काढत नाही, तोवर थांबत नाही. लिहून झालं आणि वाचकांना दिलं की काही जण ’ही बोअर करते’ म्हणून सोडून देतात, काहींना ते आवडतं, ते कौतुक करतात. जे शुभचिंतक आहेत ते सुधारणाही सुचवतात. आणि हे सगळं अंगावर मूठभर मास चढवतं. एकामागोमाग एक विषय आणि विचार मनात येत राहतात. लिखाणाचा आनंद मिळतो. म्हणून मी लिहिते.

हं. आता कसं, मन मोकळं झालं! कोणी ’खो’ दिला असता तर दडपण आलं असतं- जो ’खो’ देईल तो आणि त्याच्याबरोबर अजून चार लोक मुद्दाम येऊन वाचणार म्हणून. आता कसं, मनातलं लिहिलं गेलं, वर ’हे काय लिहिलं आहेस तू?’ असं टेन्शनही नाही.

(जाता जाता- माझ्या ब्लॉगवर उजव्या कोपर्‍यात ज्या अन्य ब्लॉगर्सचे पत्ते आहेत (वाचनीय), त्यांचे ब्लॉग्ज तुम्ही जरूर वाचा. अगदी त्यासाठीही माझ्या ब्लॉगवर आलात तरी चालेल. ही मंडळी ग्रेट आहेत. मला त्यांच्या लेखनशैलीचं, त्यांच्या विचारांचं फार फार कौतुक वाटतं.)

आज माझ्या ब्लॉगलाही एक वर्ष पूर्ण झालं, त्या निमित्तानी अगदी खोल खोल मनातलं लिहून झालं हे अजून एक समाधान. आता खरंच खूप बरं वाटतंय!

या निमित्तानी, मनापासून आभार तुम्हां सर्वांचेच. ’माझ्या ब्लॉगला वाचक आहेत, त्यांना मी लिहिलेलं आवडतं आणि ते मुद्दाम तसं कळवतातही’ ही माझ्यासाठी मुद्दाम मिरवण्याची गोष्ट आहे, माहितीये ना? :-) तुम्हा सर्वांची मी कृतज्ञ आहे!

आणि खास आभार ’अभिजीतचे’ - त्याच्यामुळे माझा ब्लॉग सुरु झाला.

17 comments:

Unknown said...

hey mast lihlays.. ani tu sadha, sahajsoppa lihites hech khaas ahe na ! lihit raha..

Amol said...

एक चांगला लेखक आधी एक चांगला वाचक असतो.

एकदम पटले. पण वैषम्य वाटायची काय गरज आहे? अजून वाच की :) एक वर्ष उत्साह टिकवल्याबद्दल अभिनंदन! आणि लिहीत राहा!

Anonymous said...

ब्लॉगच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन! :-)
खास लेख खासा आवडला.

कथापौर्णिमा पूर्ण भरात आहे. तुझा वाचकवर्ग दिवसेन्‌दिवस प्रतिपश्चन्द्रलेखेव वृद्धिंगत होतोय. अक्षरनिष्ठांची मांदियाळी तुझ्या ब्लॉगवर अशीच सतत जमून राहो ही सदिच्छा!

अस्मादिक केवळ निमित्तमात्र असून सुद्धा ’खास आभार’ खाऊन गेले. चैन आहे लेकाची अन्‌ काय! :-)
धन्स!

Shirish Jambhorkar said...

व्यक्त होणे ही माणसाची गरज आहे ..
त्याला मित्र असतात ..
कशामुळे तर Share करण्यासाठी ...
मुख्य म्हणजे व्यक्त होण्यासाठी ...
जर ही गरज पूर्ण होताना थोडी कमतरता असेल तर माणूस नवीन साधनांचा शोध घेतो ..
आणि वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो ...
ज्यांचा आपल्या आई वडिलांशी संवाद चांगला असतो ते आणि जे सगळ्याच गोष्टी आई वडिलांशी Share करतात ..
त्याना मित्र जास्त असतात ..
पण असे लोक मित्रान्शि जास्त गोष्टी Share करत नाहीत पण व्यक्त होत असतात ...
यांचे मित्र या व्यक्तीना आपले विसाव्याचे स्थान महणून स्वीकार करतात ..

ज्या दिवशी माणूस व्यक्त व्हायचे बंद होतो ..
त्या दिवशी त्याची चिडचिड .. राग .. उदासीनता .. स्वकेंद्रितपणा वाढतो ...

म्हणून व्यक्त होत राहा ... Its good for Health

Jaswandi said...

mast ani halka lihilays! attaparyant ha kho ghetlelya javal javal saglyanich thoda kathin mhana kinva thoda rupakatmak vagaire lihilay.. tu khup halka lihilays tyamule mala vachayla khup chhan watla!!

ha kho madhech konitari "ata hava tyani kho ghya" mhantlyamule band padla bahutek. tu ata lihila ahesch tar kho pudhe de na! tuzyasarkha ajun koni vaat baghat asel tar... :)

ani 1 varsha purn zalyabaddal congrats!

सर्किट said...

chhaan lihilayes punam. :-)

and believe me, mi hya kho-kho cha post lihilyavar tulach pudhacha kho denar hoto. pan kho-kho ya prakaaralach itaka vaitagalelo hoto ki kunalach na deta bandh kela. so, don't mind.

ani blogging chya pahilya vadhadiwasabaddal abhinandan! asach lihit rahun khup saare vadhadiwas saajare karr!

Monsieur K said...

happy birthday once again :D

aapan ka lihito hey kiti sahaj, sopa lihila aahes. asach lihit rahaa - aamhi vaachat raahto :)

poonam said...

तू का लिहितेस असं मी तुला कधीच विचारणार नाही. तुझं हलकं-फुलकं, गप्पा मारल्यासारखं लिखाण मला आवडतं येवढंच मला कळतं. अशीच लिहित रहा. आम्ही वाचत राहू. चुकून नाही वाचलं तर "वाचाल तर वाचाल" अशी धमकी आम्हालाही द्यायला पुढेमागे पाहू नकोस ;-)

(posted by Vivek)

poonam said...
This comment has been removed by the author.
poonam said...

:)
खूप खूप आभार भाग्यश्री, अमोल, अभिजीत, शिरिष, जास्वंदी, सर्किट, केतन आणि विवेक :)

कोणीही मला ’खो’ न देता मी हे आपणहोऊन लिहिणं म्हणजे चोंबडेपणाच होता, पण तुम्ही सांभाळून घेतलंत म्हणून विशेष आभार :)

जास्वंदी, नाही गं, मला कोणाला खो द्यायचा अधिकार नाही. सर्कीटला वाटलं तर तोच देईल तो पुढे..

आणि सर्किट, दे च असा माझा आग्रह.. आपण आपल्या हातानी असे उपक्रम शक्यतो बंद करू नयेत.. आधीच मराठी लोक एकत्रित कोणताही उपक्रम करणं अवघड ;)

प्राची कुलकर्णी said...

punam, blogchyaa pratham varshpurteebaddal abhnandan!
tu nehameech chaan lihites, agadee manaala bhavanaare.... keep it up.

Parag said...

Masta lihilay agadi.. Pinda asava lagto ani vachan asava lagata dohi mudde ekdam patesh.. :)
By the way. hya upkramat mala pan koni kho dila nahi.. :( mala vatlela mala deil koni kho mag me lihin kahi bahi.. pan kasala kay.. :( Aso.. :D
By the way. ujavya kopryat amcha ullekh nahi. ethe hi anullkhach ka shevati?? :P

मिलिंद छत्रे said...

पूनम खरेच चांगले लिहिले आहेस. तू नेहमीच मनापासून लिहितेस त्यामुळॆ ते जरी अगदी साधे सरळ असले तरी वाचक त्याच्याशी relate करु शकतात...

असेच तुझ्या मनात असेल ते कागदावर आपले ब्लॊगवर उतरवत जा...

Anonymous said...

Hey
Congrats for your Blog's 1st B'day!!!
Tu chan lihites , sahaj gappa maralya sarakhe.
Keep writting , I will keep reading.

Anonymous said...

hi Poonam,
I have read your few articles and I am going to complete remaining also. I liked all of them.
i liked one thing about you, when you right (specially this article) I feel that you are directly talking to me(i.e. I am not reading any article)
I request you don’t stop your writing. Keep it up.

Regards,
Prachi Tipare

Meghana Bhuskute said...

बाप रे, अग, तो खो मी सुरू केला होता. कुणी खो द्यायची वाट न पाहता लिहिलंस, यात चोंबडेपणा काय? उलट बरं झालं की. मजा आली होती तो खोखो खेळायला, नाही? आत्ताच तुझा ब्लॉग वाचते आहे, सही आहे...
एखादा नवा खो खो कर की सुरू. काहीतरी जबर्‍या... तुला शुभेच्छा. :)

shrimat said...

hi poonam far chaan lihil aahes
keep it up