एखादी गुरुवार किंवा शुक्रवारची रात्र असते आणि रात्रीचे १० वाजून गेल्यानंतर माझ्या नवर्याचा मोबाईल वाजतो.. आत्ता, या वेळी कोणाचा फोन असं म्हणत तो पाहतो, तर तो हमखास ’मध्या’चा असतो. मग काय! चेहरा खुलतो, आवाजात चैतन्य वगैरे येतं आणि मित्रांच्या गप्पा सुरु होतात.. हा फोन कमीतकमी अर्धा तास तरी चालतोच. दुसर्या दिवशी सकाळी नवरा मला सांगतो, "अगं आज मी जेवायला नाहीये.. येरवड्याला एक नवीन हॉटेल उघडलंय तिकडे मी आणि मध्या जातोय.. आणि तू म्हणत होतीस ना की तुला ’संडे’ पहायचा नाहीये म्हणून.. मग जेवण झालं की नाईट शो मारू, चालेल ना?" इथे माझी परवानगी अगदी उगाच विचारायची म्हणून विचारली असते हे कोणालाही समजेल.. माझ्या फक्त कानावर घालायची फॉर्मेलिटी असते ती.. प्लॅन तर काल रात्रीच ठरलेला असतो. मी निषेधाचा साधा भाव जरी चेहर्यावर आणला की मग ते ’पेट’ वाक्य येतं, "अगं किती दिवसांनी भेटतोय आम्ही आज.." स्वरातला आनंद आणि उत्साह लपत नसतो. त्याची एक्साईटमेन्ट पाहून मला गंमतच वाटते.. म्हणून मीही आनंदानी ’परवानगी ’ देते!
हा मध्या एक अजब रसायन आहे. हा माझ्या नवर्याचा अगदी बालवाडीपासूनचा मित्र. बालवाडी आणि प्राथमिक शाळेत तर एकाच वर्गात. मग माध्यमिक शाळेपासून थोडी फारकत झाली यांची.. म्हणजे शाळा, पुढे अकरावी-बारावीचे कॉलेज आणि मग ईंजिनीयरींगला हे दोघेही एकाच ठीकाणी पण वेगेवेगळ्या वर्गात/शाखेत होते. सहाजिकच मैत्री टीकून राहिली. वाटा वेगळ्या झाल्या म्हणून संबंध संपले नाहीत. घरंही तशी जवळच. त्यामुळे अगदी रोजचा संपर्क नसला तरी येणेजाणे चालू राहिले, अगदी लग्न, मुलं झाल्यानंतरही. हा मध्या अचानक उगवतो आणि अचानक गायब होतो. आज फोन झाला तर पुन्हा १०-१५ दिवसांनी करेल असा नेम नाही, नाहीतर वेळ असेल तर रोजही फोन करेल! माझं तर असं मत आहे की माझ्या नवर्याकडे काही काम निघालं तरच त्याला याची आठवण येते. पण हे मी उघड म्हणायची सोय नाही! हे वाक्य इतर कोणाबद्दल बोललं तर चालेल, पण मध्याबद्दल? अंहं! चुकार शब्दही काढायला परवानगी नाही! कारण तो बालमित्र!
या बालमित्राबद्दल नवर्याला एक अजब जिव्हाळा आहे. हे दोघे एकमेकांना इतक्या वर्षांपासून ओळखतात की एकमेकांचे गुण-दुर्गुण सगळे माहीत आहेत. विचारसरणी कशी होती आणि परिस्थितीप्रमाणे ती हळूहळू कशी बदलली याला हे दोघे साक्षी आहेत. त्यामुळेच रोज भेटले नाहीत, तरी किमान सहा महिन्यानी तरी भेटणे ही या दोघांचीही मानसिक गरज आहे. ’किती दिवस झाले, भेटलोच नाही’ असं म्हणत एखादा फोन होतो आणि मग कधी घरी, तर कधी बाहेर, सहकुटुंब, किंवा एकटेच, सिनेमा बघत किंवा निव्वळ कट्ट्यावर बसून गप्पा हाणत वेळ कसा जातो समजत नाही यांना.. आणि विषय काय असतो? तर एक असा नाही.. मुळात दोघांचीही क्षेत्रं वेगवेगळी असल्यामुळे ऑफिसच्या गप्पा, तिथलं पॉलिटिक्स एकदम वर्ज्य.. साध्या सुध्या गप्पा, एखादी आलेली अडचण, एखादा अनुभव, मुलांच्या खोड्या.. असेच काहीतरी. पण या शिळोप्याच्या गप्पा मारून झाल्यावर नवरोजी आणि मध्या दोघांचेही चेहरे कसे ’उत्फुल्ल’ वगैरे असतात!!
असं प्रत्येकाला वाटतं ना की असं कोणीतरी असावं ज्याच्याशी आपण काहीही बोलू शकतो.. कोणताही अजेंडा मनात न ठेवता अश्या व्यक्तिकडे आपण मन मोकळं करू शकतो.. ही व्यक्ति पूर्ण विश्वासाची असेल आणि जी त्याचा गैरफायदा घेणार नाही.. कधीकधी एखाद्या अवघड क्षणी ती आपल्याला न मागता आधार देईल, कधीकधी पटकन एक असा सल्लाही देईल ज्याने आपली एखादी समस्या चुटकीसरशी सुटेल.. मध्या हा माझ्या नवर्याचा असा सवंगडी आहे.
त्याचा जसा ’मध्या’ आहे, तशीच माझीही ’सोनाली’ आहे, तसाच तुमचाही कोणीतरी असेल, असणारच.. असा सवंगडी जो तुम्हाला आणि ज्याला तुम्ही अगदी पूर्णपणे ओळखता.. भले आपण बारीकसारीक गोष्टी त्याला सांगत नसू, पण काही ’शेअर’ करायची वेळ आली की आपल्याला हमखास त्याची आठवण येतेच येते. काही कारणानी त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तर आपण बेचैन होतो.. आणि मग अचानक फोन, किंवा भेट झाली की हक्कानी चार शिव्या घालून गप्पांची गाडी पुढे सरकते! ’असेल काही अडचण’ अशी मनमिळावू सूट फक्त त्याला दिली जाऊ शकते. त्या जागी अजून कोणीही असला तर आपण खांदे उडवून ’तो बदललाय आता’ असं सहज म्हणू शकतो.. पण असं आपल्या सवंगड्यानी केलं तर त्याला ’का’ असं विचारयाचा आपला हक्क असतो आणि तो त्यानेही मान्य केलेला असतो.
या सवंगड्यामुळे आपलं आयुष्य किती सहज-सोपं वाटायला लागतं नाही? नवरा/बायको, नातेवाईक, कलीग्ज.. सगळे सगळे जवळचे असले तरी प्रत्येकापाशी कोणत्यातरी मर्यादा येऊन थबकतात. त्याही पलिकडलं आपण ज्याच्याशी बोलू शकतो तो आपला ’सवंगडी’- आपला ’४.०० ए. एम. फ्रेंड!’! जो केवळ आपल्या भल्याचाच विचार करेल, तो खरं काय आहे तेच परखडपणे सांगेल, जो विश्वासानी आपल्यालाही त्याच्या अडचणीत सामावून घेऊ शकेल आणि जो आपल्याला सरळ सांगूही शकेल ’आज माझा वेळ जात नाहीये.. चल टीपी करूया थोडा’.. आपल्या आयुष्यात कितीही स्थियंतरं येत गेली, तरी जो अविचल असेल, कधीही ’रीचेबल’ असेल असा आपल्याला विश्वास असेल.. तो आपला ’सवंगडी’, ’दोस्त’, ’यार’, ’बेस्ट फ्रेंड’.. काहीही म्हणा..
जर खूप दिवसात तुमचा आणि तुमच्या सवंगड्याचा संपर्क झाला नसेल, तर हीच वेळ आहे.. आठवण येता क्षणी फोन उचला, नाहीतर एक भली मोठ्ठी मेल लिहा त्याला.. आपणच बरेच दिवसात त्याच्याशी बोललो नसलो तरीही उलटं त्यालाच विचारा, ’काय रे.. आजकाल तुला माझी आठवण येत नाही..’ मग तो भडकेल आणि गप्पा सुरु होतील.
चला, मनमोकळं हसून, बोलून घेऊया.. पुन्हा असा वेळ आपल्याला कधी मिळेल, काय माहीत!
Subscribe to:
Post Comments (Atom)
17 comments:
Lekh awadala, fakt shevat nahi avadala - agadi spam mail sarkha watla (send this to 5 of your best friend types)... :D (take this lightly).. a good article.
chaan lihilay lekh! kharach asa koNitari jawaLacha asawa. mazi pan ashee ek jawalachee maitreeN aahe....ameriket aste:-)
मला आपला लेख आणि ब्लॉग दोन्हीही आवडले.
लेख उत्तम आहे त्यात काही वाद च नाही.माझी पण एक मैत्रिण आहे ती माझी कॉलेज ची मैत्रिण आहे. कॉलेज सुटुन १० वर्श झाली पण अजुन आम्ही आधीसार्खे सगळे सानग्तो.
:-) very true!!!
hmmm..mitrachi athavan zali vachatana
पूनम, मस्त! :-)
Very True Punam.. and Thank god that I have one! :)
hey..far bhari lihlay.. mazya pan maitrini chi athvan zali vachtana..laggech tila hi link pathvun dili! :)
Poonam ...Very Nice and Absolutely true !
कुणी आपला सवंगडी असावा,
कुणी आपणा सवंगडी जपावा !
CHHAN ZALAY LEKH.
BAKI NANTAR.........
MITRALA PHONE KARTOY!!!!!!!!
masta aahe lekh. aawaDalaa. aataa kuNaa kuNaalaa phone karavaa yaachaa vichaar karoo laagalo aahe ........... :)
मस्त जमलाय लेख.
'मध्या' ही मस्त. चांगली आठवण करून दिलीस, आता माझ्याही अशा मित्रांना जरा डिवचायला पाहिजे
सगळ्यांना आठवण झाली ना एका तरी सवंगड्याची? :) यांच्यामुळेच तर आपले काही दिवस, काही तास, काही क्षण फ़ार निर्भेळ आनंदाचे जातात :) पण आपण त्यांच्या कायम संपर्कात असत नाही, का कोण जाणे! :( गरज लागली की च त्यांची आठवण येते.. हे थोडं अन्यायकारक आहे ना?
keep in touch, people.. at least with those who matter! :)
सगळ्यांचे खूप खूप आभार!
mastach lihIley ga. Agadi agadi athavan jhali asha savangadyanchi.
Kahre tar Mitra baddalch vichar karat hoto,a ni yogayogne ha lekh wachala.. chan watla
Post a Comment