February 12, 2008

दिवे आगर

दिवे आगरबद्दल अनेक दिवसांपासून ऐकून होतो.. तिथे सापडलेला सोन्याचा गणपति आणि स्वच्छ किनारा.. सगळ्यांकडूनच कौतुक ऐकले होते.. त्याबरोबर हेही की तिकडे भरपूर गर्दी असते. हा दिवे आगर महिमा ऐकून तिकडे सुट्टी मिळाली की जायचेच असे ठरवले होते. त्याप्रमाणे डिसेंबरमधेच बूकिंग करून २४-२७ जानेवारीमधे दिवे आगरची एक सुंदर सफर करून आलो. जाण्याआधी रस्ता, रूट, तिकडे अजून पहाण्यालायक स्थळे यासाठी नेटवर बराच सर्च मारला होता. पण समाधानकारक माहिती नव्हती मिळाली. त्यासाठी आणि एका अप्रतिम ट्रिपची उजळणी म्हणूनही हा लेखनप्रपंच.

पुण्याहून दिवे आगरला स्वत:च्या चारचाकीनी सर्वात सोपा रस्ता म्हणजे ताम्हिणी घाटातून. घाट ओलांडून आपण थेट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर येतो- माणगाव या ’जंक्शन’ला. माणगाव जंक्शन अशासाठी की इथूनच कोकणात जायला अनेक फाटे फुटतात. त्यातला आपण ’म्हसाळा’हा फाटा घ्यायचा- म्हसाळ्यावर तेव्हाही दिवे आगर दिसत नाही, आपण दिशा पकडायची श्रीवर्धनची. मग श्रीवर्धनच्या बरंच जवळ पोचल्यानंतर दिवे आगरला जायला अचानक फाटा लागतो आणि आलं आलं म्हणेपर्यंत दिवे आगर येतंच! पुणे-माणगाव साधारणपणे १२० कि.मी. आणि माणगाव-दिवे आगर साधारण ४५ कि.मी. असे आटोपशीर १७० कि.मीच्या आत आपण चार-साडेचार तासात एका रम्य ठिकाणी पोचतोही.

पण कधी नव्हे ते सुट्टीला बाहेर पडलो होतो म्हणून आम्ही जरा फिरून गेलो.. आम्ही उलटा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे गाठला. हायवेवर दुसर्‍या टोलनाक्याआधी ’पाली’ला जायला एक्झिट आहे.. ते घेतलं. पालीला बल्लाळेश्वराचं सुरेख दर्शन घेतलं आणि निघालो पुढे. एका नयनमनोहर वळणावळणाच्या रस्त्यावरून आम्ही पुन्हा मुंबई-गोवा महामार्गाला लागलो.. थोड्या वेळानी माणगाव आणि मग पुढे तोच रस्ता.. अर्थातच पुण्याहून उलटं गेल्यामुळे हे अंतर पडतं साधारण २३० कि.मी. पण चांगल्या रस्त्यांमुळे वेळ साधारण तेवढाच लागतो. सकाळी लवकर नाश्ता करून घराबाहेर पडले तर वाटेत एक चहा ब्रेक घेऊन गरम गरम जेवायला आपण दिवे आगरमधे असतो!

दिवे आगर हे श्रीवर्धन तालुक्यातील एक टुमदार गाव. गावाची लांबी साडेचार कि.मी आणि रुंदी दीड कि.मी. इतका छोटसा जीव याचा. हे गाव इतकं उजेडात कसं आलं? तर, गावात ग्रामदैवतासारखं एक गणपतिचं देऊळ आहे. जवळच्या ’बोर्ली-पंचतन’ या गावातल्या द्रौपदी धर्मा पाटील यांचीही बाग या देवळाच्या मागे आहे. तर पावसाळ्यानंतर, नव्हेंबर १९९७ मधे बागेत खताचं, झाडांना आळी करण्याचं काम चालू होतं. आणि असं खोदताना अचानक एका सुपारीच्या झाडाखाली ’खण’ असा आवाज झाला.. कसला आवाज म्हणताना काळजीपूर्वक खोदले असतां चक्क एक तांब्याची पेटी, साधारण जुन्या काळातल्या ’ट्रंक’ असतात ना, तशी मिळाली. तिच्याच एका कोपर्‍यात खोदताना पहार बसली होती. पेटीला कुलूप होतं. ’पेटी सापडली’ ही वार्ता त्या इवल्याश्या गावात वार्‍यासारखी पसरली. गावचे सरपंच, प्रतिष्ठीत मंडळी, पोलिस सगळे आले. सर्वांसमक्ष पेटीचं कुलूप तोडण्यात आलं. सर्वांनाच ’आत काय आहे?’ याची उत्सुकता.. खजिनाबिजिना असला तर? आणि खरंच एक खजीनाच लागला हाती. आत होता गणपतिचा शुद्ध सोन्याचा मुखवटा! बरोबर एक तांब्याचा डबाही होता. त्या डब्यात होते गणपतिचे अलंकार!!! समस्त लोकांनी आश्चर्यानी तोंडात बोटं घातली. हे तर आक्रितच होतं. लोकांचे जथ्थेच्या जथ्थे आले हे पहायला.
आता खरंतर ’पुरलेलं धन’ सापडलं तर ती असते सरकारी मालमत्ता. हे असं ऐतिहासिक महत्त्व असणारं धन सरकारदरबारी नोंद होऊन जातं दिल्लीच्या अथवा कलकत्त्याच्या राष्ट्रीय संग्रहालयात. आता हा मुखवटा आणि दागिने इतके लांब गेले तर पुन्हा पहायचे कधी? आणि जाणार कोण ते पहायला? मोठाच प्रश्न होता.. पण सापडली, त्यात एक वाट सापडली! असाही कायदा आहे म्हणे की जमिनीखाली ३ फूटांपर्यंत असं काही धन सापडल्यास त्याची मालकी मूळ मालकाकडेच रहाते. पण त्या खाली धन सापडलं, तर ते सरकारचं! आता पेटी तर लगेचच खाली सापडली होती. त्यामुळे तिची मालकी सुदैवानी द्रौपदी धर्मा पाटीलांकडेच राहिली. या कामी तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनी बराच पुढाकार घेतला. तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्र्यांना त्यांनी पटवून दिले की हा सांस्कृतिक ठेवा मूळ ठिकाणीच राहू द्यावा. त्या बदल्यात त्यांनी फक्त एक छोटे श्रेय मागितले- हा मुखवटा जिथे ठेवला आहे त्याच्यावर एक पाटी लिहिली गेली- ’महाराष्ट्र राज्याच्या सौजन्याने’!!!

मुखवटा आहे कसा? तर त्याला मुकुट आहे.. आणि आपल्याकडे दिसतो तसा छोटा मुकुट नाही, तर दक्षिणेत दिसतो तसा उंच मुकुट आहे.. मुकुट, चेहर्‍याचा भाग, खांदे आणि सोंड असा साधारण २६ इंच लांबीचा मुखवटा आहे.. तो मूळ दगडी मूर्तीवर अगदी ’फिट्ट’ बसतो! सोबत जे अलंकार आहेत तेही दाक्षिणात्य पद्धतीचेच आहेत.. छोट्या मोहोरांसारखा हार, बिंदल्या वगैरे.. आणि हे दागिने मुखवट्यावर चढवण्यासाठी मुखवट्यावर योग्य जागी भोकंही पाडली आहेत! मुखवटा आणि दागिन्यांच्या कारागिरीवरून हे काम दक्षिणेतल्या सोनाराने केलं असावं असा अंदाज आहे. सोनं असं शुद्ध आहे की कित्येक हजार वर्ष जमिनीखाली पुरलेलं असूनही त्यावर एकही डाग नाही! सापडल्यावर केवळ रिठ्याच्या पाण्यानी मुखवटा साफ केला आणि तो पुन्हा झळाळू लागला. तेच दागिन्यांबाबतही. मुखवट्याचे वजन आहे १ किलो ३०० ग्रॅम आणि दागिने आहेत २८० ग्रॅम वजनाचे. हे सर्व तांब्याच्या पेटीत ठेवल्यामुळे हाती लागले. लोखंडी पेटी असती तर गंजली असती, लाकडी असती तर कुजली असती. तांब्याची असल्यामुळे त्याला गंज, कीड लागली नाही. झाकणावर कडी आहे , जेणेकरून ती पेटी खाली दोराच्या सहाय्यनी सोडता येईल. हा मुखवटा म्हणजे त्या काळी गावाची प्रतिष्ठा असेल. तो परकीयांच्या, शत्रूच्या हाती लागू नये म्हणून एवढा बंदोबस्त. अजून एक प्रश्न पडतो की ही पेटी आधी कशी काय सापडली नाही? तर ही पेटी ज्या झाडाखाली सापडली तिथे एक आंब्याचं झाड होतं- खूपच मोठा विस्तार होता त्याचा. ते झाड काढलं आणि तिथे सुपारीचं छोटं रोप लावलं. त्या रोपालाच खळं करतांना हे धन हाती लागलं. रोज संध्याकाळी मंदिरात आरती असते. नेहेमीच्या आरत्यांबरोबरच खास दिवे आगरच्या गणपतिची एक आरती असते, ती खूप श्रवणीय आहे. तिथे श्री. विजय ठोसर म्हणून एक गृहस्थ आहेत, ते ही गणपतिची कथा अगदी रंगवून सांगतात.

खुद्द दिवे आगर हे गाव अगदी टुमदार आहे. अप्रतिम, अस्पर्श आणि सुरक्षित समुद्रकिनारा हे त्याचं वैशिष्ट्य. किनाराही अगदी विस्तीर्ण आहे. किनार्‍यावर अजूनतरी भेळ, पेप्सी, लेज वाली मंडली नाहीयेत, त्यामुळे किनारा स्वच्छही आहे. संध्याकाळी, थोडं ऊन उतरल्यावर समुद्रावर यावं, पाण्यात मनसोक्त खेळावं, डोळे निवेस्तोवर सोनेरी रंगाची जादू पहावी आणि घरी अप्रतिम रुचकर जेवणाचा स्वाद घेण्यासाठी परतावं!

दिवे आगर हे तसं संपन्न गाव. प्रत्येकाकडे नारळ, सुपारी, केळीच्या बागा आहेत. म्हशीही आहेत, त्यामुळे दूध-दुभतंही पुष्कळ. घरं मोठी, घरामागे बागा आणि शेजारी परसू, गोठा, मोकळी जागा इत्यादि. इथे रहायची सोय ही अशी घरीच होते. कमर्शियल हॉटेलं वगैरे नाहीत. पाहुण्यांसाठी सर्व सोय़ीयुक्त वेगळ्या खोल्या बांधल्या आहेत. आपले ’होस्ट’ आपल्या चहा, नाश्त्याची सोय करतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवण मिळतं. अतिशय रुचकर, गरमागरम जेवण सगळ्यांकडे मिळतं. फ़क्त आधी सांगावं लागतं. दिवे आगरमधेच ’रूपनारायण’ हे विष्णूचे मंदिर आहे. एका अखंड शीळेतून ही मूर्ति घडवली आहे आणि नवल म्हणजे मूर्तीच्या दोन्ही बाजूला चक्क दशावतार कोरले आहेत. तसंच शंकराचं ’उत्तरेश्वर’ म्हणून एक देऊळ आहे. या दोन्ही मंदिरांची नव्याने बांधणी सुरु आहे. यासाठी शासनाकडून त्यांना अनुदानही मिळाले आहे. लवकरच दोन प्रशस्त आणि सुरेख मंदिरं ही गणपतिच्या देवळाबरोबीनी इथली आकर्षणं होणार आहेत.

दिवे आगरहून श्रीवर्धन १६ कि.मी आहे आणि त्याच दिशेनी हरिहरेश्वर आहे ३२ कि.मी. हरिहरेश्वराचा किनारा साहसी आहे, पण त्यामुळेच त्यावर आता जाऊ देत नाहीत. अनेक तरूण मुलांनी वेड्या साहसापायी तिथे जीव गमावला आहे. पण किनारा अगदी मनोहर आहे. शंकराचं दर्शन घेऊन श्रीवर्धनच्या किनार्‍यावर आपण जाऊ शकतो. श्रीवर्धनचा किनारा दिवे आगरसारखाच शांत आहे, फक्त लांबी कमी आहे. त्यामुळे तोही पोहायला लोकप्रिय आहे. श्रीवर्धन तालुक्याचं गाव असल्यामुळे तिथे गर्दी असते. शिवाय ’स्टॉल’ही आहेत सर्व प्रकारचे. श्रीवर्धनहून परततांना अवश्य ’शेखाडी’मार्गेच दिवे आगरला परतावे. शेखाडी या गावाच्या मागेच समुद्र आहे, आणि तो पूर्ण रस्ता केवळ समुद्राकाठून दिवे आगरला थेट जातो.. ही अगदी परदेशात समुद्राच्या काठाची ’राईड’ असते तशीच आहे. केवळ सुरेख. सूर्यास्ताच्या वेळी गेलं तर ह्या अश्या अप्रतिम दृश्याचे आपण साक्षीदार होतो.. केवळ मंत्रमुग्ध!

तसंच, दिवे आगरहून दिघीही १६ कि.मीवरच आहे. इथे जंजीरा किल्ल्याला जाण्यासाठी मोटरलाँच मिळते. खळबळत्या समुद्रातून सुमारे अर्धा तास सफर करून आपण जंजीर्‍याजवळ पोचतो. हो, जवळच. किल्ल्याच्या आत पोचण्यासाठी अजून एक दिव्य करायला लागतं. ते म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून साधारण ५० फूटांवर आपण आलो की मोटर लाँचवरून आपली रवानगी साध्या होडीत होते आणि ही होडी किल्ल्याच्या पायर्‍यांपर्यंत आपल्याला पोचवते. येताना तसंच- आधी होडी, मग तिच्यातून लाँचमधे ट्रान्स्फर. आणि हे बर्‍यापैकी घाबरवणारं असतं बरंका. समुद्रामुळे होडी आणि लाँच सतत हेलकावे खात असतात. त्यातच आपण उड्या मारून इकडून तिकडे पटकन जायचे. परत पब्लिक इतका गोंधळ घालतं- मी आधी, मी आधी करत सगळे एकाच वेळी चढण्याची किंवा उतरण्याची घाई करतं. यामुळे होडी पलटी होण्याचीही शक्यता असते.

बाकी किल्ला मात्र प्राचीन स्थापत्यकलेची साक्ष आहे. हा एकमेव सागरी किल्ला आहे तो कायम अजिंक्य राहिला. पुरातत्व खात्यानी ’ऐतिहासिक वास्तू’ म्हणून तिकडे एक बोर्ड चिकटवला आहे. त्यानंतर काहीही केलेले नाही. आज ४०० वर्ष झाली, पण तिथे अजूनही बरेच अवशेष शिल्लक आहेत. गोड्या पाण्याचं तळं आहे. इथे थोडीशी डागडुजी केली, तर पुरातन वास्तूचे जतनही होईल आणि अजून लोक येतील.. पण सरकारी खाती इतकी जागरूक असती तर काय? असो! किल्ल्याच्या माहितीसाठी स्थानिक गाईड मिळतात आणि ते किल्ल्याची बर्‍यापैकी ओळख करून देतात.

तर आमची ही छोटी सफर फ़ारच सुरेख झाली. सर्वांनी आवर्जून दिवे आगरला भेट द्या. एक अनामिक मानसिक शांती मिळते तिथे. मात्र एक कळकळीची विनंति- समुद्र किनारा खराब करू नका, कचरा करू नका. किनारा स्वच्छ आहे, त्याला आपण तरी डाग लावायला नको. दिवे आगरमधे जागोजाग लिहिलेल्या या पाटीवरच्या सूचनांचे आपण पालन नक्कीच करूया. हॅपी जर्नी!


12 comments:

सर्किट said...

सुरेख लिहीलं आहेस. आणि मराठीब्लॉग्जवर (माझ्यासकट) सर्वजण ’इमोशनल’ पोस्ट्सचा मारा करत असताना, तुझं प्रवासवर्णन अगदी दिवेआगारच्या समुद्रकिनाऱ्यावरून आलेल्या गार झुळुकेसारखं वाटलं. :)

मंदिरातल्या गणपतीच्या मूर्तीचा फ़ोटो नाही काढू दिला का पुजाऱ्यांनी? पहायला आवडला असता!

संवादिनी said...

chaan....avadala....ani diveagar athavala......far chaan aahe te gaav...my fav.

-Sam

Anonymous said...

पुणे....माणगाव...ताम्हिणी घाट काही लक्षात आलं नाही. पण मुंबईहून....पालीला जाताना....कामत रेस्तरॉं पुढे त्याच रस्त्यावर पालीला जायला डावीकडे न वळता सरळ गेल्यास श्रीवर्धन लागतं म्हणे. मी गेले नसल्याने माहित नाहिये..पण तसा बोर्ड तिथे पाहीलाय. लेख नेहमीप्रमाणेच उत्तम. जाऊन पहायची उत्सुकता निर्माण झालीयं

Asha Joglekar said...

आम्ही पण नुक्तेच दिवेआगर ला जाऊन आलो. दिवे आगर सुंदरच आहे मंदिर पण आन समुद्र किनारा पण . तुमचं वर्णन वाचून ट्रिप ची परत एकदा उजळणी झाली . पुण्याहून तिथे जाणारा तस्ता मात्र अगदी खराब आहे. बापटां कडचं जेवण ही खूप छान होतं.

पूनम छत्रे said...

सर्किट, सॅम, माझीमराठी, आशाताई.. धन्यवाद :)

दिवे आगर इतकं सुंदर आहे की कथा, ललित लिहिण्यापेक्षा, त्याबद्दलच लिहावं असं वाटलं :) दुसरं काही सुचेचना लिहायला.. :)

सर्कीट, नाही रे.. मूर्तीचे फोटो काढायला मनाई आहे :( माझ्या लेखात अगदी शेवटी जी पाटी आहे, त्यावर त्या गणपतिच्या मुखवट्याचा फोटो आहे बघ..

आशाताई, बापट आणि लिमयेंचं जेवणही फर्स्क्लास ना? :)

Parag said...

Poonam, farach sundar varnan ahe.. Photos pan apratim, Varnan vachun parat diveagar la gelya sarkhe vatle.. Parat mhantoy karan me ekda jaun aloy.. :D
Shrivardhan cha samudra kinara ani harihareshvar baddal ajun lihile aste tar awadale asate.. mhanje tithe gelya sarkhe pan vatle aste.. (tithe me ajun gelelo nahiye.. :D)
Shevtachya suchananvarun tuzi nisarga baddal chi kalkal pan disun yete..
Asech likhan chalu thev.. Ajun lekh vachayla khup avdel..

Abhijit Dharmadhikari said...

छान लिहीलं आहे. आता जायलाच पाहिजे दिवेआगरला!:-)

प्रकाशचित्रं समर्पक वाटतात.

दीपिका जोशी 'संध्या' said...

आम्ही पण थोडे दिवसां(वर्षापूर्वी)पूर्वी गेलो होतो दिवेआगर ला..खरोखरच अप्रतिम सुंदर आहे. उजळणी झाली लेख वाचून..मज्जा आया...

दीपिका जोशी 'संध्या'

Anonymous said...

Pravas varnan chhan vatla. Mi aajun diveaagar pahilele nahi pan aata pahanyachi far uttsukata lagli aahe.

janya purvi he pravasvarnan punha nakki vachin. far useful aahe.

Unknown said...

Diveagar is really a fabulous place to enjoy with ur loved ones.
Tuze article vachun diveagar agadi dolyasamor ubhe rahile.Everything is just good over there right from atmosphere to food.

with warm regards
sheetal

Anonymous said...

humm changala lihilaya :-)

meenu

Anonymous said...

छानच लिहीले आहेस. आता मला कुणी दिवेआगरबद्दल विचरले की मी तुझ्या ब्लॉगचा पत्ता देणार. तुझी पण आयतीच जाहीरात. :) आवळस्करांचा नं. पण लिहायला हवा इथे. :)

Vinayak