January 23, 2008

निर्णय

चानक सुमितच्या नंबरला कनेक्ट केलेली धून वाजली आणि अनुजा चमकलीच. साडेअकरा तर वाजले होते.. ही त्यांची नेहेमीची वेळ नव्हती बोलायची. ’काय झालं असेल? आत्ता का बरं केला याने फोन?’ मोबाईल वाजण्यापासून तो घेईपर्यंतच्या एका सेकंदात असंख्य विचार मनात येऊन गेले तिच्या..
"अरे, आत्ता कसा?"
पलिकडून सुमितचा काहीसा घाईत असलेला आवाज आला,"एक वाईट बातमी आहे.. अमित गेला.. हरीकाकांचा मुलगा.. आठवला ना?"
"हो, हो आठवला ना.. अरे, असा अचानक? कशानी? काय झालं?"
"ऍक्सिडेंट झाला काल त्याला.. हायवेला ट्रकनी धडक दिली.. कालचीच गोष्ट.. डोक्याला जबरी मार होता.. वाचणं अवघड होतं.. आत्ता एक तासापूर्वी गेला.."
"बापरे! कोणकोण आहेत तिथे? काका-काकू, आणि आई-बाबा?"
"हो, सगळेच जमलेत.. पोलिसकेस वगैरे सगळंच होणार आता.. म्हणलं तुला कळवावं पटकन.. आता मी बिझी असेन.. आपल्या नेहेमीच्या वेळेला नाही करणार कदाचित फोन.. आणि तूही करू नकोस मला, ओके? वेळ झाला की बोलतोच मी.."
"बरं चालेल.. सांभाळून..""हो हो, चल, बाय.."

अनुजाला बातमी ऐकून धक्का बसला.. अमितला एकदाच भेटली होती ती त्यांच्या साखरपुड्यात. तो आणि सुमित समवयस्क असल्यामुळे त्यावेळी झालेल्या थट्टामस्करीत तो आघाडीवर होता. असा अचानक मृत्यूच? बापरे! अंगावर काटाच आला तिच्या. बिचारा.. काय चालू असेल आत्ता तिथे? अमितच्या आई-बाबांची काय अवस्था असेल? पोलिसांच्या भानगडी नीट निस्तरतील ना? सुमित काहीसा चिडका आहे.. पोलिसीखाक्या त्याला आवडणार नाही.. उगाच भलतं काही झालं नाही म्हणजे मिळवली. सारखे फोनकडे हात जात होते, पण तिने मोठ्या मुश्किलीने त्याला फोन करायचा मोह टाळला. दिवसभर ती अस्वस्थच होती. कसंबसं ऑफिसचं काम उरकलं तिने. कधी एकदा आई-बाबांना हे सांगतीये असं झालं तिला.

या नंतर चार-पाच दिवसांनी अनुजाचे बाबा सुमितकडे मुंबईला गेले.. हरीकाकांना भेटायला.. होणारे व्याही या नात्याने त्यांचं कर्तव्यच होतं ते. हरीकाकांकडे सुमितच्या बाबांबरोबरच जाऊन, त्यांची विचारपूस करून ते पुन्हा सुमितच्या घरी आले. सुमित कामाला गेला होता, पण त्याची आई होती घरी.
"खूपच दुर्दैवी घटना झाली हो ही.."
दातेंनी सुस्कारा टाकला,"हो ना.. खूपच धक्कादायक.. आम्ही तर अजूनही ती घटना पचवू शकलो नाहीयोत.."
"साहजिक आहे.."
"दादा आणि वहिनी प्रचंड धक्क्य्यात आहेत, वहिनींची तब्येत किती बिघडली आहे, पाहिलंच तुम्ही. कालच त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणले, त्यांचं बीपी लो झालं होतं. ही तिकडेच होती गेले चार दिवस.. आजच आलीये. खरं तर बरं झालं तुम्ही प्रत्यक्षच आलात ते.."
दात्यांच्या बोलण्यात एक अवघडलेपण आलं. अनुजाच्या बाबांना काही कळेना. एवढ्यात तेच पुढे म्हणाले, "सुमित आणि अनुजाच्या लग्न महिनाही राहिला नाही आणि याच वेळी ही घटना घडली.. अर्थात जे झालं ते आपल्या हातात नाही, पण आमच्याकडे सगळ्यांचं मत असं आहे की हे लग्न आपण या काढलेल्या मुहूर्तावर न करता थोडं पुढे ढकलूया.. अजून काही महिन्यानी पुन्हा मुहूर्त निघतील तेव्हा करू.. "

अनुजाचे बाबा हे ऐकून एकदम आशंकित झाले.."अहो, पण.."
त्यांना पुढे बोलू न देता दाते म्हणाले, "हा धक्का आम्हाला खूप मोठा आहे कुलकर्णी साहेब.. इतका हातातोंडाशी आलेला मुलगा आणि त्याला देवानी आमच्याकडून हिरावून नेले.. अमित आणि सुमित सख्ख्या भावांसारखेच होते.. या परिस्थितीत घरात लग्नकार्याचं काढणं योग्य नाही.. आमचं मनंही लागणार नाही त्यात आणि कार्यही उत्साहानी पार पडणार नाही.. त्यापेक्षा थोडे दिवसांनी हा शॉक थोडा कमी झाल्यावर जर मुहूर्त काढला, तर मुलांचीही हौसमौज होईल.. पटतंय ना तुम्हाला?"
बाबांना पटत होतं, पण मुलीचं लग्न हा जिव्हाळ्याचा विषय.. ते निर्विघ्नपणे पार पडावं अशी प्रत्येक बापाची इच्छा असतेच.. हे असं लग्न पुढे ढकलणं म्हणजे.. पण काही झालं तरी अमित दात्यांचा सख्खा पुतण्या होता.. त्यांच्या बाजूनी विचार केला त्यांचंही बरोबर होतं. अखेर त्यांनी मान्यता दिली.

बाबांनी घरी येऊन हे सांगितल्यापासून अनुजाला चैन पडत नव्हतं. त्या रात्री तिला झोप आली नाही.. अमितबद्दल जितकी सहानुभूति वाटत होती, तितकीच लग्न पुढे गेल्याची निराशा.. काही झालं तरी ती एक सामान्य मुलगी होती.. आपल्या लग्नाची माफक, गोड-गुलाबी स्वप्न तिचीही होती. आणि ती स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना असं काही होणं म्हणजे...’सुमितनी मला का नाही सांगितले? मधे २-३ वेळा फोन झाले होते की.. असं परस्पर बाबांना का सांगितलं? मी समजून घेऊ शकले नसते का? लग्नच काय पुढे ढकललं? फारतर साधेपणानी केलं असतं.. आता कधी होणार? शी! लग्नातल्या साड्यांचे ब्लाऊजही शिवून आले, दागिने झाले.. पत्रिका छापून आल्यात..नशीब अजून वाटल्या नाहीत त्या.. पण पुढच्या आठवड्यापासून केलीच असती सुरुवात.. केळवणांची तर रीघ आहे, त्यांना काय सांगायचं आता? नातेवाईक, शेजारी हजार तोंडांनी चौकश्या करतील.. सुमित जास्त बोलतही नाही फोनवर.. रोज कशीबशी दहा मिनिटं.. तेव्हाही घडाघडा बोलत नाही.. मीच बोलत असते.. आत्ता जाऊन भेटावसं वाटत आहे त्याला.. काय हे, नेमके आम्ही नाशिकला आणि ते मुंबईला.. भरपूर बोलणं नाही, भेटणं नाही.. शी! त्याला काही वाटतच नाही पण असं.. मलाच काय ती आच..’
या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत असतानाच पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला.

अनुजाच्या मैत्रिणी तिला किती दिवस भंडावत होत्या..’आमची आणि भाऊजींची भेट कधी होणार?’ असं विचारून.. लग्न पुढे गेल्यामुळे तेव्हाची भेट चुकली होती.. अनुजाही साखरपुड्यानंतर भेटली कुठे होती त्याला? पुन्हा पुन्हा आठवण आली की साखरपुड्याचे फोटो पहात होती.. साखरपुडा तिकडे मुंबईला आणि लग्न इकडे नाशिकला असं ठरलं होतं, त्यामुळे सगळ्याच मैत्रिणींशी भेट झाली नव्हती सुमितची. सुमितनी कधीतरी सुट्टीच्या दिवशी इकडे यावं, तिला भेटावं, त्यांनी फिरायला जावं असं फार मनात येई तिच्या.. असंच एकदा फोनवर बोलता बोलता तिने त्याच्यापाशी विषय काढला..
"एका शनिवार-रविवार तू नाशिकला ये ना.."
"नाशिकला? कशाला?"
अनुजाचा मूडच गेला.. वैतागूनच ती म्हणाली,"कशाला म्हणजे? तुला नाही वाटत मला भेटावसं?"
"म्हणजे काय? खूप वाटतं.. अगदी रोज भेटावसं वाटतं.. तुझा फोटो आहे ना माझ्याकडे, त्याला विचार.. मी कायकाय बोलतो त्याच्याशी ते.."
"मग, फोटोशी जे बोलतोस ते माझ्याशी बोल की.. प्रत्यक्षात.. ये की सुमित नाशिकला.. इतकं अवघड काय आहे त्यात?"
"अगं, काही कारण नको का? उगाच काय उठून यायचं? आणि राहू कुठे मी? का एका दिवसात जा-ये करू? म्हणजे दगदगच जास्ती होईल.."
"अरे आमच्याकडेच रहायचं, त्यात काय? पुढे येशीलच ना?"
"तेव्हाचं वेगळं, आत्ताचं वेगळं.. ते बरं नाही दिसणार.. तू उगाच एकएक नवीन काहीतरी काढू नकोस.."
अनुजा हे ऐकून पार हिरमुसली.. तिला रडायलाच आलं एकदम..
"ए रडत्येस की काय? प्लीज अनु.. हे रडणं-बिडणं नको हं आता.. अगं समजत कसं नाही तुला? बरोबर नाही दिसत लग्नाआधी सासुरवाडीला असं उगाच येणं.. एकदा लग्न झालं की तू म्हणशील तेव्हा येईन बघ.."

मधे दोन महिने गेले. कुलकर्णींना असं वाटलं की आता लग्नाच्या तारखेची बोलणी पुन्हा करायला हरकत नसावी.. त्यांनी एका दिवशी दात्यांना फोन केला..
"नमस्कार दाते साहेब, कुलकर्णी बोलतोय, अनुजाचे बाबा.."
"अरे! नमस्कार.."
"कसे आहेत सगळे?"
"बरे आहेत.."
"तुमचे भाऊ आणि वहिनी आता कसे आहेत? थोडे सावरले का?"
"हो, सावरलेच म्हणायचे.. वहिनी नाहीत बर्‍या अजून.. पण त्यांना वेळ लागेलच.."
"तर मग आता लग्नाची तारीख काढूया ना? चातुर्मासही संपतोय.. मार्गशीर्षातला मुहूर्त बघू का? पुन्हा पौषात कार्य काढता यायचं नाही.."
दात्यांनी एक मिनिट विचार केला.. ते एक मिनिट इकडे कुलकर्ण्यांना एका युगासारखं वाटलं.
"हो, चालेल. मार्गशीर्षाला अजून एक-दीड महिना आहे. मी एक काम करतो, इकडे आमच्या गुरुजींनाही विचारतो, आणि ते एकदा हो म्हणाले की बघा तुम्ही चांगला दिवस. मी तुम्हाला एक-दोन दिवसात गुरुजींचा विचार घेऊन कळवतो, चालेल ना?"
"हो, हो, चालेल ना.. तसं मीही इथे आमच्या गुरुजींना विचारलं आहे, आणि त्यांनी दोन-चार चांगले दिवसही दिले आहेत.. तेही तुमच्या गुरुजींना विचारून घ्या हवंतर आणि मला एकदम मुहूर्ताची तारीखच कळवा.."
"अशी घाई नका करू कुलकर्णी.. मी कळवतो ना तुम्हाला दोन दिवसांनी. मला दादाचाही विचार घ्यावा लागेल यामधे.. करतो मी तुम्हाला फोन.. बराय मग.."

अनुजाकडे ते दोन दिवस धाकधुकीतच गेले. सगळेच अस्वस्थ होते.. दात्यांकडून फोन येतोय की नाही अशी उगाचच सारखी शंका वाटत होती. आणि खरंच दोन दिवस फोन आला नाही! तिसर्‍या दिवशीही नाही. अनुजानी सुमितला या बद्दल काही विचारलं की तो अनिच्छा दाखवायचा, मोठ्या लोकांमधे मी पडत नाही म्हणायचा. हा विषय काढला की त्यांच्यामधे खटके उडायला लागले. शेवटी धीर करून चौथ्या दिवशी पुन्हा तिच्या बाबांनी दात्यांकडे फोन केला.
"दातेसाहेब, कुलकर्णी बोलतोय.."
"हां हां, हो बोला.."
"तुमचं गुरुजींशी झालं का बोलणं? "
"हो, हो, बोललो मी.. तुम्हाला फोन करणारच होतो.. चालेल, मार्गशीर्षातले मुहूर्त चांगले आहेत असं तेही म्हणाले.. सोयीची तारीख काढा तुम्ही आणि कळवा मला.."
कुलकर्ण्यांनी निश्वास टाकला. "हो का? बरं बरं, मी आजच जातो गुरुजींकडे आणि मुहूर्त काढतो.."
"चालेल चालेल.."

संध्याकाळी कुलकर्णी पेढे घेऊनच आले. तारीख ठरली होती.. २२ नोव्हेंबर.. चातुर्मासानंतरचा पहिला मुहूर्त.. आल्या आल्या त्यांनी अनुजा आणि तिच्या आईला सांगितले. लगोलग दात्यांकडे फोन केला. त्यांनीही संमति दिली. अनुजाला पुन्हा उत्साह वाटू लागला, तिची आई पुन्हा बेत करायला लागली. इतक्यात अनुजाचा मोबाईल वाजला. सुमितचाच होता.. लग्नाबद्दलच असणार असं गृहित धरून अनुजानी खुशीत तो घेतला..
"कळली ना लग्नाची तारीख?"
अनुजा जितकी खुश होती तितकाच सुमित वैतागल्यासारखा झाला होता..
"हो, आत्ताच सांगितलं बाबांनी.. अगं एक घोळ होणारे.. मी मधे म्हणलो नव्हतो का तुला मी ऑफिसची एक परीक्षा देतोय.. ती नेमकी २१-२२ नोव्हेंबरच आहे.. शनिवार-रविवार.. लास्ट वीक मधेच लागल्या तारखा.. श्या! तुम्हालाही नेमकी हीच तारीख मिळाली का?"
"अरे, असं काय म्हणतोस? तू आधी काहीच का नाही बोललास याबद्दल? तुझ्या बाबांशी माझे बाबा बोलत होते, त्यांना विचारत होते तेव्हा का नाही सांगितलंस?"
"ए मला काय माहित ते हेच मुहूर्त बघत आहेत? हे सर्टीफिकेशन खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. डीपार्टमेन्ट बदलण्यासाठी मी खटपट करतोय. यात पास झालो तर ते लगेच होईल, म्हणून ही परीक्षा मी देणारच. तुला याचं गांभीर्य कळतय की नाही? तू छोट्या गावातली त्यामुळे तुला इथल्या स्पर्धेची कल्पना नाही.. त्च! जाऊदे तुला जास्त काही सांगत बसत नाही.. पण तुम्ही जरा आठ दिवस पुढचा मुहूर्त बघा ना.."
"असं काय बोलतोस रे? तुला काहीच वाटत नाही का लग्नाबद्दल?"
"वाटायचंय काय त्यात? नाहीतरी तारीख काढत आहोतच, तर काढूया ना पुढची तारीख. माझं सर्टीफिकेशनही होऊन जाईल आणि मला टेन्शन नसेल कुठलं.. सांग तुझ्या बाबांना ना प्लीज.. आठच दिवस पुढे.. इतकी आतूर झाली आहेस की काय माझ्याबरोबर संसार करायला?"
"ए मस्करी नको हं.. बरं मी विचारते बाबांना.. पण हे मला पटत नाहीये.."
"आता तू अनरीझनेबल होत आहेस अनु.. नीट सांगितलं ना तुला माझं कारण.. समजून घे ना मग.. पटणं, न पटणं.. प्रश्नच येत नाही.. तू सांग तुझ्या बाबांना.. म्हणावं जावयांची स्पेशल रीक्वेस्ट आहे ही.. मग बघ, पटेल त्यांनाही."
"बर, विचारते.. आत्ता ठेवते फोन.."

शेवटी आपली मुलीची बाजू आहे, आणि सुमितची अपेक्षाही रास्त आहे असं समजून लग्नाची तारीख १ डीसेंबर ठरली.. तो दिवस ’रविवार नाही’ म्हणून पुन्हा बोलून दाखवलं त्यांनी, पण शेवटी सगळ्यांनी मान्य केलं. दिवाळीनंतर गडबड होईल म्हणून पुन्हा अनुजाच्या आईने तयारीला सुरुवात केली. दिवाळी आली. दिवाळीनिमित्त तरी दाते आपल्याला तिकडे बोलावतील, भेट होईल अशी आशा अनुजालाच काय, तर कुलकर्ण्यांनाही होती. पण नेहेमीप्रमाणे शुभेच्छांचे फोन झाले फक्त.

सुमित-अनुजाचे फोन चालू होते. पण अनुजाच्या बोलण्यात केळवणं, खरेदी, मैत्रिणी असे विषय असायचे, तर सुमितला परीक्षेचा अभ्यास दिसत होता फक्त.. केळवणांना त्याने नकार दिला होता. आणि पदोपदी अमितची आठवण येत होती त्याला.. मागच्या वेळी दोघे सगळीकडे बरोबरच होते.

दिवाळी पार पडली, आणि कुलकर्ण्यांकडे तयारीला वेग आला.. आणि एक दिवस पुन्हा दात्यांचा फोन आला..
"कुलकर्णी, एक अनपेक्षित अडचण आलीये.."
अनुजाच्या बाबांना पुन्हा धस्स झालं..
"काय झालं दातेसाहेब?"
"अहो, सुमितची आई काल बाथरूममधे घसरून पडलीये, कंबरेचं हाड मोडलंय.. मी हॉस्पिटलमधूनच बोलतोय आत्ता.."
"अरे बापरे.. मग काय ऑपरेशन वगैरे.."
"हो ना, प्लास्टर घालणं शक्य नाही त्या जागी, त्यामुळे ट्रॅक्शन घ्यायची. ३ आठवडे पूर्ण विश्रांतीही घ्यावी लागेल असं म्हणाले डॉक्टर"
"हो तर, विश्रांती हवीच. मदतीला आहे का कोणी? मी अनुजाला पाठवू का?"
"अं, नाही, नको नको.. तसं वहिनी आहेत, तिच्या माहेरची मंडळी आहेत.. मी म्हणलं तुमच्या कानावर घालावं की आमच्या मागची संकटं काही संपत नाहीयेत.."
"खरंय दातेसाहेब. बरं आईंना पूर्ण आराम करूदे. खरंच अनुजानी तिकडे यायचं असेल तर नक्की कळवा, ती लगेच येईल.."

अनुजाला हे कळल्यानंतर दिवसभर ती गंभीरच होती.. हात काम करत होते, पण डोक्यात सतत विचारचक्र चालू होतं. ती एका मध्यमवर्गीय घरातली साधी मुलगी होती. शिकलेली होती, स्वत:च्या पायावर उभी होती. लग्न करायचं, चांगला संसार करायचा, नोकरी करून आपल्या संसाराला हातभार लावायचा अश्या साध्या इच्छा होत्या. सुमित भेटल्यावर, मुख्य म्हणजे त्याला ती पसंत पडल्यावर या सगळ्याच अपेक्षांना एक मूर्त रूप आलं होतं. संसाराचे कित्येक बेत आता तिला आणि सुमितला, त्याच्या परिवाराला डोळ्यासमोर ठेवून केले होते.. पण गेल्या काही महिन्यातल्या घटना बघता हे लग्नच मुळात योग्य आहे का हे तिला आता कळत नव्हतं..

सुमितला, ज्याच्याबरोबर ती पूर्ण आयुष्य घालवायला निघाली होती, त्याला ती किती ओळखत होती? आणि तो तिला? पत्रिका जुळल्या, चेहरे आवडले, लग्नाची बोलणी जमली.. पण स्वभाव जुळले? मनं जुळायला वेळ मिळाला? ती भेटली होती फक्त ३ वेळा- एकदा ’बघायच्या’ कार्यक्रमाला, एकदा लग्न ठरवतांना आणि एकदा साखरपुड्याला. आज साखरपुडा होऊन ६ महिने होत आले जवळजवळ, पण त्यांची भेट नव्हती, रोज फोन चालू असले तरी भेटीची आस तिला लागून रहायची, तशी सुमितकडून कधी जाणवलीच नाही.. तो ना कधी तिच्या आठवणीनी हळवा झाला, ना तिला भेटायला उत्सुक.. असतो एकेकाचा स्वभाव असं म्हणून सोडून दिलं, तरी त्याच्याकडून या लग्नासाठी, तिच्यासाठी अशी बेसिक कमिटमेन्ट तरी त्याला वाटतीये की नाही अशी शंका वाटण्याइतपत त्याचं वागणं त्रयस्थ वाटत होतं. तशात हे लग्न काही ना काही कारणानी पुढे गेल्यामुळे त्यातली उत्सुकता, हुरहूर नाहीशी झाल्यासारखी वाटत होती. रोज यांत्रिकपणे फोन चालू होते, पण त्यात ’संवाद’ कमीकमी होत चालला होता.

आत्ताही त्याच्या आईला झालेला अपघात म्हणजे लग्नाच्या आड येणारी अजून एक घटनाच असावी असं तिच्या मनात येतंच होतं, आणि तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला.. सुमितचाच फोन होता..

"हॅलो, कशी आहे आईंची तब्येत आता?"
"स्टेबल आहे आता. पेनकिलरवर आहे, त्यामुळे झोपून आहे सतत.."
"तुमची फारच धावपळ झाली ना? मी खरंच येऊ का तिकडे?"
"अगं नको, करतोय आम्ही मॅनेज.."
"कसा झाला अपघात नक्की? आंघोळीला गेल्या होत्या का?"
"नाही गं.. लग्नासाठी म्हणून काहीतरी बाथरूमच्या माळ्यावरचं सामान काढायला स्टूलवर चढली होती, आणि तोल गेला एकदम, पडली ती जोरातच.."
"आईगं!"
"बघ ना.. च्यायला, लग्नाची म्हणून काही तयारी करायला लागलो की काही ना काही अपघात होतच आहेत असं काका म्हणत होते.."
"अं?"
"बघ ना, मागच्या वेळी अमितला अपघात, त्यात तो गेलाच.. यावेळी आईला.. सुदैवानी ती वाचली, पण आता काय माहित काय होतंय ते.. पर्मनंट डॅमेज नसलं म्हणजे मिळवली. आणि या भानगडीत माझा अभ्यास मागे पडतोच आहे.. म्हणजे माझी ही संधीही गेली.. आता पुन्हा ६ महिने वाट पहा.. वैताग नुसता. कुठून हा लग्नाचा विषय निघतो असं झालंय"

अनुजा हे ऐकून एकदम गंभीर झाली. सुमित या क्षणी जरी नैराश्याने म्हणत असला तरी त्याच्या बोलण्यात तथ्य होतं. त्यांच्या लग्नाची तारीख जवळ आली की काही ना काही वाईट घडत होतंच. उघड तिला ’अपशकुनी’ जरी कोणी म्हणत नसलं तरी मनातून सगळ्यांना तसंच वाटत असणार, कदाचित सुमितलाही. त्याच्याही मनात अशी पाल चुकचुकत असेल तर? हे लग्न आनंदानी न करता, मनात किन्तू ठेवून करत असेल तो तर? ज्याच्याबरोबर पूर्ण आयुष्यं घालवायचं त्याचीच जर भक्कम साथ नसेल, तर काय अर्थ असणार होता त्या लग्नालाही? त्या क्षणी अनुजाच्या मनानी तिला कौल दिला..

"खरंय सुमित. मलाही जाणवलंय. आपलं लग्न जसं जवळ येतं, तशी एखादी वाईट घटना दबा धरून बसल्यासारखी समोर येते. कदाचित, नियती आपल्याला सावधान करत असावी आणि आपल्यालाच त्याचा अर्थ कळत नसेल.."
"अं? म्हणजे? काय म्हणायचंय तुला?"
"नियतीला आपलं लग्न मंजूर नाही असं वाटतंय मला. आणि विचार करता, आपणही नियतीच्या विरुद्ध जाऊन काही करावं असं नाही वाटत मला.."
"म्हणजे...??"
मनावर दगड ठेवून ती म्हणाली, "म्हणजे, आपण हे लग्न नको करूया.."
"काय बोलत्येस काय? समजतंय का तुला? अर्थ कळतोय याचा? तू एक मुलगी असून चक्क लग्न मोडण्याची भाषा करत्येस? का? काय कमी आहे माझ्यात? उलट आमचंच नुकसान झालंय तू मला भेटल्यापासून.. माझा भाऊ गेला, माझी आई आजारी पडली, माझी मोठ्या पोस्टची संधी गेली.. तू काय मोडतेस गं लग्न? मलाच नाही करायचं तुझ्याशी लग्न.. आयला.. सदानकदा रडके स्वर नाहीतर हट्टीपणा.. बरं झालं या आधी लग्न नाही झालं ते.. नाहीतर आयुष्यभर पस्तावायची वेळ आली असती.." संतापानी सुमितला काही सुचेना. त्याची सारासारविवेकबुद्धी काम देईना. मनाला येईल ते बडबडत होता तो..

अनुजा इकडे थरथरत होती, डोळे बंद करून सुमितची मुक्ताफळं ऐकत होती. हे सगळंच त्याला समजूतीनी, शांतपणानी घेता आलं असतं खरंतर, पण रागाच्या भरात काय वाट्टेल ते बोलला होता तो.

एका परीने ते बरंच झालं होतं. आता बाबांना हा निर्णय कळवताना तिला कुठलंही ओझं, कुठलाही अपराधीपणा वाटणार नव्हता.


समाप्त.

18 comments:

Anonymous said...

ह्म्म.. नक्की काय कॉमेंट लिहावी हेच समजत नाहिये.. नकळत का होईना पण काही वैयक्तीक अनुभवांशी तुलना होतीय मनामध्ये.. :(

त्यातून बाहेर पडून आता कथे विषयी.. एकूणात चांगली जमलीय पण..

जसे सुमीतच्या घरच्या अडी-अडचणी टप्प्या टप्प्याने लिहून खुलवल्या आहेस तसे अनुजाचे लग्न न करण्याचे विचार हे टप्प्या टप्प्यात मांडायला हवे होते असं वाटले.. म्हणजे शेवट त्याचा फोन यायच्या आधी तिची विचारांची काहीतरी प्रोसेस मांडायला हवी होती, म्हणजे विचार करुन ती लग्न न करण्याच्या निर्णयाच्या अवती-भोवती आलीय असं काहीतरी.. आणि शेवटचा त्याचा फोन झाल्यावर परीसीमा होऊन ती निर्णय घेऊ शकते वगैरे असं काहीसं.. असं मला वाटतंय.. चू. भू. दे. घे.

बाकी कथा एकूणातच छान!!

अभि_

Shreya's Shop said...

अनुजाने योग्यच निर्णय घेतला. मुळात लग्नाची इच्छाच नसेल तर कारणं काय कितीही आणि कोणतीही सांगता येतात. त्यात अनुजाने अपराधी वाटून घ्यायचे काहीच कारण नाही. पण मुकाटपणे सुमितचे एकून घ्यायच्या एवजी त्यालाही चार खडे शब्द सुनावायला हवे होते. ते सुनवायची ही वेळ नाही असे मानले तर तशी वेळ पुन्हा कधीही येणार नाही.
असो, हे वैय्यक्तिक मत झाले पण कथा आवडली.

Anonymous said...

maayaboliichyaa divaLii ankaana.ntar baRyAch divasaanI tujhI kathaa vaachaayalaa miLAlI. khUpach chhoI vATalI. tujhyA kathaa.nche shevaT khare tar pOjhiTIvh asataat. paN hA viShayach tasaa hotaa.

manjuDI

Jaswandi said...

खुप छान लिहिल्ये!
वाचताना सुरुवातीपासुन मल वाटत होतं कि हे लग्न मोडणार नाही ना? मोडायला नको!
पण शेवटी अनुजाचा निर्णय बरोबरचं वाटला!

वाचत असताना तिची रुखरुख अनुभवता येत्ये!

कोहम said...

Hmm

Anucha Nirnay ekdam tadakafadaki vatala....dhakka basava mhanun tasa kela hota ka? dhakka basala pan apekshit effect nahi ala asa vatala.

Baki katha uttamach

संवादिनी said...

masta....dashing anu avadali....

अनु said...

कथा आवडली. अपशकुन इ. च्या शंकेपेक्षाही तो सुमित इतका लग्नाबद्दल कमी उत्साही दाखवला असेल तर लग्न मोडण्यात हरकत नसावी असे वाटते. जर एकमेकांबद्दल काही गोष्टी लग्नाच्या आधीपासूनच खटकल्या तर त्या लग्नानंतर तिरस्कारात बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. मन काही विचार न करता सर्वात आधी जी प्रतिक्रिया देतं(ज्याला आपण 'इनर फिलिंग' किंवा इन्ट्युशन म्हणतो) ती नक्की ऐकावी.

सर्किट said...

घरातल्या अगदी जवळच्या पर्सनल अनुभवांशी अतिसाधर्म्य असल्याने कॉमेण्टही लिहीवत नाहीये या कथेवर.. :-((

Tulip said...

आवडली कथा पूनम. अनुजाच्या विचारांची प्रोसेस पटते. सुमित इरिटेटींगच व्हायला लागला होता त्यामुळे अशा वागण्यावर अनुजाचं लग्न मोडण्याचा विचार अजीबात धक्कादायक वाटला नाही.

Anonymous said...

कथा छान जमली आहे. पण मला वाटत थोडीशी अर्धवट झाली आहे. अनुजाने इतक ऐकून घेण्यावी काहीच गरज नव्हती. या सर्व घटनांमध्ये तस बघायला गेल तर तिचा काहीच दोष नव्हता. आणि नाशिक आता काही छोट गाव राहीलेल नाही जे इतर कोणत्याही सोम्यागोम्याने तुच्छ लेखाव.

हे लग्न न करण्याचा तिचा निर्णय योग्यच आहे. आणि हे तिच्या आई-वडिलांनी पण समजून घेतले पाहीजे. आणि ती जर नोकरी करते तर तिच बर वाईट समजणुआची धमक तिच्यामध्ये नक्कीच असणार.

पूनम छत्रे said...

सर्वप्रथम सगळ्यांचे प्रतिक्रियेबद्दल आभार!

अभि_, सर्किट, या कथेमुळे नकळतपणे तुमच्या मनातल्या कटू आठवणी झाल्या.. मनापासून माफी मागते. ही कथा माझ्यासाठी तरी पूर्ण काल्पनिक आहे, पण या गोष्टी आसपास सहज घडू शकतात, घडत आहेत हे पाहून वाईट वाटले :(

या कथेमधे मला थोडं arranged marraige, वरपक्ष याबद्दल बोलायचं होतं. शिकलेले, पुढारलेले असूनही ’लग्न’ या बाबतीत ’मुला’कडची बहुतांश मंडळी ही ते केवळ ’मुलाकडचे’ म्हणून वधूपक्षाकडून अवास्तव अपेक्षा ठेवून असतात.

तसंच, ’मनं जुळणं’ याबद्दल. कधीकधी काही समजायच्या आत लग्न झालेलंही असतं. मग स्वभाव समजून घेणं वगैरे येतं. त्यावेळी काही खटकलं तरी ’जुळवून, जमवून’ घेतलं जातं- मुलीकडूनच. इथे अनुजाला लग्नाआधी वेळ मिळाला आहे. तिला संधी आहे, पण जसजशी ती सुमितला समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे, तशी जास्तच विचारात पडत आहे की खरंच आपण एकमेकांना अनुकूल आहोत का? आणि सुदैवानी तिच्यामधे इतकी हिंमत होती की ती तिच्या मनाचा आवाज ऐकू शकली आणि तसं वागूही शकली.

इथे मला सुमितला पूर्ण व्हिलनही करायचं नाही. पण काहीकाही घरात बाकी लोक अतिशय प्रभावशाली असतात. त्यांचं मुलांच्या गोष्टीत खूप बारीक लक्ष असतं आणि मुलं ते प्रेशर सहन करू शकतातच असं नाही. ’घरचे काय म्हणतील?’ असा विचार करत ते अनेक गोष्टी करतही नाहीत. कदाचित त्याच्या मनात अनुजाशी लग्न करायचे असेलही, पण घरच्यांच्या विरुद्ध जाणे त्याच्या स्वभावात नाही. पुन्हा ’विषाची परीक्षा कशाला, हे arranged maariage तर आहे, ही नाही, तर दुसरी मिळेलच की मुलगी’ असाही विचार करू शकतो तो..

असो, explaination खूपच लांबले. तुम्ही की कथा आवर्जून वाचलीत, तुमचे अभिप्रायही कळवलएत याबद्दल खूप खूप धन्यवाद :)

Anonymous said...

katha aavadali.

good decision.

Parag said...

Chan lihiliyes goshta Poonam..
Halli tuzya kathanmadhali "depth" vadhayla lagliye.. :D :D :D

Anonymous said...

good one

सर्किट said...

पराग, तुझी कॉमेण्ट म्हणजे पूनमच्या आधीच्या कथांवर टोमणा असल्यासारखी का भासत्येय मला? ;-)

Parag said...

Nahi re.. tomna bimna kahi nahi.. :D
tyala amchya adhicha offline discussion cha reference hota..
Poonam No offense meant barka.. !!

Anonymous said...

पूनम... आवडली कथा...! कथा वाचतानाच हुरहुर जाणवायला लागली होती...लग्न मोडणार तर नाही ना....!! पण वरपक्षाची बेपर्वा वृत्ती आणि वधूपक्षाची पडती बाजू छान रंगवली आहेस. अनूचा तडकाफ़डकी निर्णय मात्र जाम आवडला.

Pooh.... तुला बघितल्यावर तूच ती कथा लिहिणारी पूनम आहेस असं अजिबात वाटलं नाही. जास्तच गोडू आहेस तू :)

Anonymous said...

कथा खुपच आवडली, अतिशय नाजूक विषय हाताळला आहेस, आजही आपल्या समाजात अशा घटना घडत असतीलचं, काय होत असेल मुली कडल्या लोकांचं, विचार करुन सुध्दा अंगावर काटा येतो.

अनूचा निर्णय मात्र एकदम योग्य वाटला.

....वैशाली