January 16, 2008

बॅरीयर

बॅरीयर्स ब्रेक व्हेन पीपल टॉक’.. ’एअरटेल’ची सध्या खूप गाजणारी अप्रतिम जाहिरात.. दोन देशांतील सीमाभाग.. तारांची लांबचलांब कुंपणं घातलेली.. मधे ’नो मॅन्स लॅन्ड’ही.. अचानक कुंपणापलिकडून एका छोट्या मुलाचा चेंडू ’सीमा’ ओलांडून, कुंपणावरून इकडे, या बाजूला येतो.. चेंडू पाहून इकडच्या छोट्याचं चित्त विचलीत होतं.. तो बाहेर येतो.. समोर चक्क ’शत्रू’पक्षातला मुलगा.. त्याच्याच वयाचा.. त्याला चेंडू परत द्यावा की नाही? आत्ता या क्षणी कदाचित त्या दोघांचे वडील एकमेकांसमोर बंदूका घेऊन उभे ठाकले असतील.. पण त्याचा यांच्याशी काय संबंध? कदाचित त्या बंदूकी जे साध्य करू शकणार नाहीत, ते हा साधा चेंडू साधू शकेल.. अहो आश्चर्यम! आता ’शत्रूपक्ष’ नुसताच चेंडू मागत नाही, तर तो खेळगडीही मागतो.. इकडच्या छोट्याला त्याच्याशी खेळायला बोलावतो.. त्यांना एकमेकांची भाषा समजत नाही, तर तो खूणेनी सांगतो आणि इकडच्या छोट्याला समजतंही! मग, त्यालाही मोह आवरत नाही.. दोघेही आपापली कुंपणं ओलांडतात आणि मधल्या नो मॅन्स लॅन्डमधे मनसोक्त चेंडू खेळतात.. पाटी झळकते.. ’बॅरीयर्स ब्रेक व्हेन पीपल टॉक’!!!

किती सुरेख आणि कल्पक जाहिरात.. नुसतीच व्यावसायिक नव्हे तर संदेशही देणारी.. मनाचा ठाव घेणारी.. एक सेकंदभर आपल्याला विचारात पाडणारी..

खरंच, आपण आपल्याभोवती उभ्या केलेल्या कित्येक अदृष्य भिंती तोडायला दोन शब्द पुरेसे असतात, नाही? कालच आपण मकरसंक्रांत साजरी केली.. ’तीळगूळ घ्या, गोड बोला’ हा संदेश जगभर पसरलेल्या आप्तांना, मित्रमंडळींना दिला.. ’गोड बोलूया, आधीची कटूता विसरूया आणि नव्याने सुरुवात करूया’ असं सांगणारा हा सण खरंच किती मोठा संदेश देत असतो.. माणसं म्हणली की त्यांच्यात मतभेद असणारच.. पण कित्येकदा छोट्या छोट्या गोष्टीचा विपर्यास होतो आणि अबोल्याच्या, गैरसमजाच्या अभेद्य भिंती उभ्या राहतात. मधे थोडा वेळ गेला की दोघांनाही आपल्या चुकीची जाणीवही होते.. पण ’पांढरं निशाण आधी कोण दाखवणार???’ आपला हा ’ईगो’ ना फार वाईट.. जिथे घ्यायला पाहिजे तिथेही माघार घेऊ देत नाही हा.. आणि परिस्थिती चिघळत जाते, अबोले मिटत नाहीत, ती जखम ठुसठुसत रहाते.. कालांतरानी अशी वेळ येते की माघार घ्यायचीही तयारी असते, पण वेळ निघून गेलेली असते.. मग, काय करायचं? ती कटूता तशीच ठेवायची? नाही! आपले पूर्वज खरंच फार महान होते.. त्यांना जाणवलं असणार की असं काहीसं होणारच आहे पुढे.. म्हणून त्यांनी संक्रांतीसारख्या सणाची उपाययोजना करून ठेवली! हे निमित्त साधून तरी काही नाती सांधता येतील, काही भिंती पाडता येतील आणि नव्याने सुरुवात करता येईल..

पण अगदी खरं सांगायचं तर काही काही भिंती नाही पाडल्या जात. काही नाती अश्या वळणावर येतात की कितीही प्रयत्न करा, त्यात एकदा कटूता आली की नाही जात ती कधीच. असं नाही की दोन्ही बाजू प्रयत्न नाही करत, किंवा त्यांची इच्छा नसते. पण नाहीच जमत.. आधी मुळात काहीतरी बिनसतांना कळतच नाही, जोवर कळतं तोवर बरंच बिनसलेलं असतं.. इतकं की ’इतकं झालं तरी आपल्याला कळलं कसं नाही?’ असा प्रश्न पडतो! मग गडबडीनी आपण बिनसलेलं ठीक करायला जातो.. कधीकधी ते ठीक होतं लगेच आणि प्रश्न तेवढ्यापुरता तरी संपतो. परंतु थोड्या दिवसांनी पुन्हा, कदाचित वेगळ्या कारणानी, पण बिनसायला हे लागतंच.. पुन्हा अबोले, किंवा एकमेकांवर कुरघोडी करणं, मीच कसा/कशी बरोबर आहे हे दाखवून देणं असे फोल प्रयत्न सुरु होतात आणि घडी विस्कटायची ती विस्कटतेच. या अश्या नात्यांमधे पूर्ण समेट कधीच नाही होऊ शकत.. कारण यामधे कोण्या एकाचं तरी संपूर्ण समर्पण लागतं, आणि ते आपल्या ’ईगो’मुळे मिळणं अशक्य असतं. थोडा काळ बरा गेला की संधी साधून भिंती डोकं वर काढतातच. त्यांनी डोकं वर काढू नये म्हणून आपण अथक प्रयत्न करतो, पण आपले प्रयत्न अपुरे पडतात.. शेवटी त्या भिंतींची उंची इतकी वाढते की त्यावरून त्या नात्याचा कडेलोटच होऊ शकतो फक्त! हे असं हरलेलं नातं पाहून फार त्रास होतो, निराश व्हायला होतं.. पण वस्तुस्थिती मान्य करून पुढे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही..

फक्त पुढे जायचं ते अशी मनात आशा आणि इच्छा ठेवून की आपण अश्या माणसांच्या संपर्कात यावं ज्यांच्याबरोबर आपलं नातं हे नेहेमीच मनमोकळं असेल, आपले मतभेद झाले तरी ते टीकणार नाहीत, टिकले तरी पुढच्या संक्रांतीला नक्कीच विरघळतील.. सर्व नाती ही ’सीमलेस’ असतील, त्यामधे कोणतेही ’बॅरीयर्स’ नसतील!

10 comments:

zakasrao said...

good one.
chhaan lihil aahe.
applicable aahe aagdi.
aapalyaa practical life madhye hi aani net varachyaa social life madhye dekhil :)
tu ithe evadhe lihites he mahit navhate. mala vatat hot fakt MB varach lihites :)
ata ikadehi chakkar maravi laganar tar :)

सर्किट said...

सुरेख लेख! खरंय अगदी नातेसंबंधांबाबत लिहीलेलं.. बऱ्याचदा माघार घेण्याचं टायमिंगही चुकतं - म्हणजे एक साईड जरा विरघळून हलकेच पांढरं निशाण फ़डकवते, तर दुसरी साईड असं समजते की ’अब आया ना लाईनपे!’. आणि भिंत दूर करण्याचा पहिल्याचा प्रयत्न म्हणजे त्याने दिलेली सर्व चुकांची कबुली आहे असं समजून दुसरा अजून जास्त स्पष्ट शब्दांत माफ़ी मागितली जावी असा हट्ट धरतो. ते पाहून पहिल्याचा उत्साह मावळतो, आणि मग भिंत जैसे थे तशीच रहाते.

एनीवे, मकरसंक्रांतीच्या बिलेटेड शुभेच्छा!

A woman from India said...

ही जाहीरातीची कल्पना अमेरिकेतल्या एका दारूच्या जाहिरातीच्या कल्पनेवरून घेतली आहे असे वाटते.
त्या जाहिरातीत कुंपणाच्या एका बाजुला राखण करणारा सैनिक दारूचा ग्लास भरत असतो. दुसर्‍या बाजुचा सैनिक जरा अधाशासारखा तिकडे बघतो. मग दारू पिणारा बघणार्‍याला ऑफर करतो आणि शेवटी दोघांची पार्टी चांगली रंगलेली दिसते.

अनु said...

जाहिरात कल्पक आहे. पण मला जरा खटकली. 'नो मॅन्स लँड' भोवती कडक पहारे आणि दोन कुंपणांमधल्या जागेत सुरुंग पेरलेले असतात असे ऐकून आहे. आणि इथे मुले सरळ कुंपण ओलांडून त्या जागेत खेळताना दाखवली आहेत. 'नो मॅन्स लँड' अशी सहज ओलांडता येते हा धोकादायक संदेश धडपड्या लहान मुलांपर्यंत पोहचू नये असे वाटते.
जाहिराती 'कॅच देम यंग' या भावनेने लहान मुलांच्या हृदयाला भिडणार्‍या बनवायच्या असल्या तरी त्या मुलांच्या डोक्यात काहीतरी भ्रामक समजूती निर्माण करणे किंवा त्यांना घातक आयडीया देणे मॉरली चुकीचे वाटते. कोणत्यातरी ज्यूस ची 'अब कोई बच्चा पानी नही मांगेगा' ही जाहिरात अशीच डोक्यात जाते. तुमच्या भरपूर साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह आणि इसेन्स टाकलेल्या ज्यूसने पाण्याला हरवून त्याची जागा द्यावी ही शिकवण लहान मुलांना??

Abhijit Dharmadhikari said...

lekhachya shevaTee kalpanaa udaatta aahe. chhan lekh!

Monsieur K said...

it is a fantastic ad. i think, the lines in hindi appear more effective than the ones in english.
like your observations about relations in our life. some work out, some wither away... we tend to hold on to those that we want to last a lifetime.. or as long as possible..

mast lihila aahe!

Anonymous said...

attachya india trip madhe hi jahirat baghitali hoti tevhach ti manala khup bhaun geli hoti. tyavarach ha lekh ani tyatun dusaryanna prerana dyenyacha tuza prayatna khup avadala. mi tuze lekh / katha nehamich mala avadatat.

पूनम छत्रे said...

सर्वांचे मनापासून धन्यवाद :) ’नात्यांची जपणूक’ हा फार नाजूक भाग असतो आपल्या सर्वांच्याच आयुष्यात, नाही? :)

अनु, अगदी पहिल्यांदा मलाही असंच वाटलं होतं की इथे सैनिक कसे नाहीत? मग विचार केला की हा रहिवासी भाग असेल आणि प्रत्यक्ष युद्धभूमी वेगळ्या जागी असेल, म्हणून इथे फक्त तारांचं कुंपण.. लोकांना एकमेकांबद्दल आपुलकी वाटतेच.. कुंपणं असोत, नसोत.. :)

Anonymous said...

ekdam manatal....
as hot.... rather hotay.... ua critical phase madhun chalale aahe mi sadhya....

Anonymous said...

GOOD ONE...

Lekh chhan aahe. jahiratich udaharan gheun mandaleli sankalpana chhanach aahe.

( tyamule ya comment madhye jahirati baddal bolayachi garaj nahi.)